आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुछ दिल ने कहा:ज्यांच्या गायकीच्या भक्त बनल्या होत्या लतादीदी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

५ फेब्रुवारी २०२२ रोजी एक शेवटचा प्रयत्न केला गेला, जेणेकरून “भारताची गानकोकिळा’ या जगात राहील; पण तोपर्यंत नियतीने ठरवले होते की मृत्युलोकातील माणसांनी त्यांच्या मधुर, मोहक आवाजाचा जेवढा आनंद घ्यायचा होता तेवढा त्यांनी घेतला आहे. आता विश्वाच्या निर्मात्यालाही त्यांच्या अद्वितीय स्वरांचा आनंद अनंतापर्यंत घ्यायचा आहे, कारण आता अशी निर्मिती कदाचित ५०० वर्षांनंतरच नियंता करू शकेल. त्यामुळे आता लता यांना परत यावे लागेल. म्हणून ६ फेब्रुवारी २०२२ ला संगीताचा हा ध्रुवतारा अनंतात विलीन झाला! लता मंगेशकर यांच्या आवाजाचे कोट्यवधी चाहते होते, पण लता मंगेशकर या उस्ताद सलामत अली, नजाकत अली, मेहदी हसन यांच्या कलेच्या प्रेमी होत्या. परंतु, कुंदनलाल सहगल यांच्या त्या भक्त होत्या. आणि त्याच एकट्याच नव्हे, तर किशोरकुमार आणि मुकेश हेदेखील सहगल यांचे भक्त होते. सहगल हे आपले पहिले गायक-अभिनेता असलेले स्टार होते! लता मंगेशकर यांना लहानपणापासूनच कुंदनलाल सहगल आवडत होते आणि त्या कायम आपल्या वडिलांना सांगायच्या की, मी मोठी झाल्यावर सहगल साहेबांशी लग्न करेन. निष्पाप बालपणातील निरागस शब्द. आपल्यापैकी बहुतेकांनी आपल्या लहानपणी आई-वडिलांना असेच काहीतरी सांगितले असू शकते, त्यात काही आश्चर्य नाही. हळूहळू वाढत्या वयाबरोबर लता यांची सहगल यांच्याबद्दलची आसक्ती भक्तीमध्ये बदलली. गाणी गाण्यासाठी पैसे मिळू लागल्यावर त्यांनी ते साठवून एक रेडिओ विकत घेतला. त्याचा उद्देश फक्त एकच होता, सहगल साहेबांची गाणी ऐकणे! आजचा इंटरनेटचा प्रसार आणि कोणत्याही क्षणी संगीत, चित्रपट आणि मनोरंजन उपलब्ध असलेल्या माध्यमांचा पहिला टप्पा, पहिली पायरी होता रंगमंच आणि नंतरची पायरी म्हणजे रेडिओ, ज्याची सुरुवात १९२२ मध्ये झाली, पण रेडिओ हे १९३० नंतर मनोरंजनाचे सुलभ माध्यम बनले. आपल्या मूकपटांची निर्मिती १९१३ पासून सुरू झाली आणि बोलपट १९३१ पासून सुरू झाले. स्वातंत्र्य मिळाल्यावर चित्रपटाचा आवाका वाढतच गेला. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये जावं लागायचं, पण रेडिओच्या माध्यमातून करमणूक, गाणी, संगीत, नाटकं, चर्चा इत्यादी गोष्टी घरीच उपलब्ध झाल्या होत्या. पण, त्या काळात रेडिओ विकत घेणे प्रत्येकाला शक्य नव्हते. केवळ काही श्रीमंत कुटुंबच ते विकत घेऊ शकत होते. ज्याचा आनंद सारा परिसर घेत असे. लता मंगेशकर यांनी त्यांच्या कमाईतून स्वतःसाठी रेडिओ विकत घेतला. त्यांनी तो केव्हा आणि कोणत्या तारखेला विकत घेतला, हे नक्की सांगता येणार नाही, पण मी मोठ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो की, ज्या दिवशी लता मंगेशकर यांचा रेडिओ इलेक्ट्रिक वायर जोडून सुरू झाला, ती तारीख बहुधा १८ जानेवारी १९४७ असावी! एकच जोश, एकच उत्साह असा की, आता सहगल साहेबांचे कोणतेही गाणे ऐकले की, मनात मोर थुईथुई नाचू लागेल. त्यामुळे रेडिओ सुरू होताच निवेदकाचा पहिला आवाज आला. हृदयाची धडधड सहगल साहेबांचं गाणं एेकायला उतावीळ! कोणतं गाणं ऐकवलं जाईल? ‘मैं क्या जानू क्या जादू है..?’ की ‘सो जा राजकुमारी सो जा..?’ की ‘ग़म दिए मुस्तक़िल कितना नाज़ुक है दिल ये ना जाना.. हाय हाय ये ज़ालिम ज़माना..?’ पण, निवेदकाने असं काहीच सांगितलं नाही. उलट त्याचा धीरगंभीर आवाज घुमला- देशातील प्रख्यात व्यक्तिमत्त्व, प्रसिद्ध अभिनेते- गायक कुंदनलाल सहगल यांचे निधन झाले आहे... इतरांसाठी ही दु:खद बातमी असेल, पण लता यांच्यासाठी ही बातमी काळीज चिरणारी होती. त्या हादरल्या. त्यांच्या बाबांचे निधन होऊन पाच वर्षेही झाली नाहीत आणि आता ‘कुंदनलाल सहगल यांचे निधन झाले’ या शब्दांनी १७ वर्षे ३ महिने १८ दिवस वयाच्या लता यांच्या उद्विग्नतेला पारावार उरला नाही. दु:ख आणि निराशेच्या भरात लता यांनी सॉकेटमधून रेडिओ अोढला अन् दोन्ही हातांनी उचलून खिडकीतून बाहेर फेकून दिला नि आयुष्यभर रेडिओ ऐकणार नाही, अशी शपथ घेतली. लता मंगेशकर यांनी हे व्रत आयुष्यभर पाळले, त्यांनी ना रेडिओ ऐकला, ना त्यांच्या घरी लावू दिला. ज्यातून मिळालेला पहिलाच संदेश दु:ख आणि वेदना देणारा असेल, तर त्याचं करायचं तरी काय? लता मंगेशकर यांच्या सहवासात राहण्याचे भाग्य मलाही लाभले आहे, कारण त्या माझा टीव्ही शो “मेरी आवाज सुनो’च्या निर्मात्या होत्या. त्या सेटवर यायच्या, त्याविषयीची चर्चा मी नंतर नक्कीच करेन. आता नासिर काझमी यांच्या एका रचनेने आदरांजली अर्पण करतो... गए दिनों का सुराग़ लेकर किधर से आया किधर गया वो अजीब मानूस अजनबी था, मुझे तो हैरान कर गया वो बस एक मोती सी छब दिखा कर बस एक मीठी सी धुन सुना कर सितारा ए शाम बन के आया बरंग ए ख्वाब ए सहर गया वो वो हिज्र की रात का सितारा, वो हम नफस हम सुखन हमारा सदा रहे उसका नाम प्यारा, सुना है कल रात मर गया वो। आणि हो, आज दोन-चार नामवंतांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! निरोगी राहा, यशस्वी व्हा! आपल्या कुटुंबाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करा, या शुभेच्छा! या दाेन-चार नामवंत व्यक्तिमत्त्वांपैकी एकासाठी जो सल्ला आहे, तो इतरांसाठीही फायदेशीर ठरेल, हे निश्चित. कृपया लक्षात ठेवा- काही दिवसांपूर्वी, एका नामवंत व्यक्तीने आपल्या सहायक आणि स्थानिक अंगरक्षकांबद्दल काही अपशब्द काढले होते, ते त्यांच्याकडे काम करणाऱ्या ड्रायव्हरने माझ्या टीमच्या सदस्याला सांगितले होते. सावधान! ही जनता आहे. कोणी कितीही मोठा स्टार असो, कितीही मोठा सेलिब्रिटी असो; तोंडातून कधीही अनुचित शब्द काढू नका. रावणाचा अभिमान राहिला नाही तर आपण कोण आहोत? समझदार को इशारा काफ़ी है! मी तुम्हाला लहानपणापासून ओळखतो, त्यामुळे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा! ही गोष्ट मी घुमवून-फिरवून सांगतो आहे. आणि यातच शहाणपण आहे. पानी में अक्स देख के इतरा रहा था मैं कंकर किसी ने फेंक के मंजर बदल दिया। नमस्कार. जय हिंद! वंदे मातरम!

अन्नू कपूर सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि सूत्रसंचालक

बातम्या आणखी आहेत...