आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनलॉक:होऊ दे चांगभलं..

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गवताच्या काडीनं कानातला मळ काढत भिकानाना म्हणाला, ‘लवू म्यारीजला माजा अजाबात इरोध न्हाई. खरं ते मिळतंजुळतं असावं. उगा फुटात बारा इंचाचा फरक असू नये. दोघं बी नोकरीला हायत म्हणल्यावर शामाच्या उतारवयात शेतीचं कोण बघणार? म्हणून त्यानं लवू जरा स्थानिक पातळीवर करायला पायजे हुतं..’

शा लाबाई आणि शामराव यांनी एकुलता एक मुलगा प्रकाशला चांगलं शिक्षण दिलं. दोघं दिवस-रात्र शेतात राबायचे. प्रकाशनं त्यांच्या काबाडकष्टाच्या बळावर जिद्दीनं उच्च शिक्षण घेतलं. मोठ्या शहरात एका नामवंत कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली अन् त्याच्या करिअरची वाट उजळून निघाली. गावाकडं आई-वडिलांचं नि शहरात प्रकाशचं सारं काही सुखा-समाधानात सुरू होतं. शामरावांचं बँकेत ‘जनाधार’ खातं सुरू होतं. ते महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरीव रकमेनं वाढू लागलं. “तुम्ही काही काम करू नका, आता निवांत राहा, तब्येतीची काळजी घ्या..’ प्रकाशचं हे सांगणं दोघांच्या राबलेल्या जिवाला पटत नव्हतं. त्याला बरं वाटावं म्हणून ते ‘होय’ म्हणायचे अन् काम करत राहायचे. आता पोराचं लग्न करून दिलं, की आपली एक महत्त्वाची जबाबदारी पार पडली, असं त्यांना वाटायचं.

घरी सून आणायची असो की जावई शोधायचा असो; अशा कार्याला वेग येतो तो कुटुंबातल्या स्त्रियांमुळं. शालाबाईही याला अपवाद नव्हत्या. “अवं, पोराच्या लग्नाचं बघायला पायजे हं आता..’ अगदी फार काही नाही, पण बारा तासांतून एकदा तरी हे वाक्य त्या शामरावांना गजर लावल्यासारखं ऐकवत होत्या. आयुष्यातल्या ठराविक टप्प्यावर त्या त्या नात्यांची ही संसारी सूत्रे लिखित नसली, तरी सामाजिक दृष्टीने ती बंधनकारक असतात. म्हणून ‘जबाबदारीची जाणीव’ जागृत आहे.

शामरावांनी मग प्रकाशच्या लग्नासाठी स्थळांची माहिती घ्यायला सुरुवात केली. प्रकाश सुटीला गावाकडं आल्यावर त्याला याची कल्पना दिली, तर तो आई-वडिलांना म्हणाला, “याबाबतीत अजिबात घाई करू नका, मी सांगतो तुम्हाला नंतर..’ हे ऐकून शामरावांना वाटलं, रस्ता म्हटल्यावर वळण आणि धान्य म्हटलं की दळण असणारच. स्त्री स्वभावाप्रमाणं शालाबाईचा मनातल्या मनात विचार सुरू झाला. पोरगं मोठं झालं, शिंगं फुटली. शहरात गेलाय आणि हिथलं सगळं विसरलाय. आता हिथनं म्होरं ह्यो आपल्या मनानं करणार, चालणार, वागणार आन् आमी नुसतं तुणतुण्यावानी व्हई व्हई म्हणायचं. जे हाय ते समजून घेऊ नि पुढं चालत राहू, या समजुतीच्या विचारानं शामराव शांत राहिले. आपल्याला वाटतं सगळं वेळेत व्हावं. वेळेला काय वाटतं, ते आपल्याला माहीत नसतं. काही दिवसांनी प्रकाशने, ज्या मुलीवर त्याचे प्रेम आहे, तिच्यासोबत लग्न करणार असल्याचं त्यांना सांगितलं. एकुलत्या लेकाचं ‘लव्ह’असल्यानं आई-वडिलांनीही मग ‘मॅरेज’ला संमती दिली. शहरातील उच्चशिक्षित, नोकरदार मुलगी त्यांची सून झाली.

कधीही प्रदर्शित न होणारी आणि संपूर्ण भाषणस्वातंत्र्य असलेली गावातली ठिकठिकाणची मतप्रदर्शने, चर्चासत्रे, परिसंवादांना प्रकाश अन् प्राजक्ता यांच्या प्रेमविवाहानं ऊर्जा मिळाली. पाणवठ्यावर, शिवारात, पिठाच्या गिरणीत गावातल्या आयाबाया बोलू लागल्या.

‘पावण्यातली हाय म्हणून गावाला सांगत्यात खरं, पन शालाच्या पकानं लवू म्यारीजच केलं म्हनं. ती काय हिकडं यायची हाय का ह्या दोघास्नी बघायची हाय..’ ती बी नोकरी करतीया. महिन्याच्या महिन्याला लागत्यात तेवढं पैसे खात्यावर पाठीवल्यावर यायला कशाला लागतंय..?’

‘जरी कवा चुकून आली, तरी हिचं तिला आन् तिचं हिला जमायला नको? डोळ्याला चिकटून असली म्हनून काय झालं.. भुवई येगळी नि पापणी येगळी..’ या दोघींचं बोलणं ऐकून सकारात्मक विचाराची तिसरी बाई म्हणाली, “ह्यो सगळा वरच्याचा खेळ हाय.. कवा, कुणाचा, कधी, कसा मेळ बसंल, हे सांगता येत न्हाई. नशिबात असंल, तर ती सासू-सासऱ्याला बी सोताच्या आईबापावानी सांभाळलं. हुतंय ते सगळं भल्यासाठी ह्यावर ईश्वास ठीवायचा..’ रोजच्या चर्चेनं गुळगुळीत झालेल्या राजकारण, महागाई, बेरोजगारीसारख्या विषयांना प्रकाशच्या प्रेमविवाहानं मागं टाकलं.

पुरुष मंडळीही यावर आपलं मत मनमोकळेपणानं मांडत होती. अनुभवी वश्याबापू म्हणाला, “आपल्या येळची गोष्ट येगळी होती. शेतकरी म्हनलं की स्थळं सांगून येत हुती. आता शेती भरवश्याची राह्यली न्हाई. त्या कारणानं स्थळं हुडकाय लागत्यात. खटपट करून बी शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न जुळंना झाल्यात. नोकरदारच पायजे म्हंत्यात. आता एवढ्या सगळ्यास्नी नोकऱ्या आणायच्या तरी कुठल्या? पकानं स्वताचं सोताच जुळीवलं ते झकास झालं!’ गवताच्या काडीनं कानातला मळ काढत भिकानाना म्हणाला, “लवू म्यारीजला माजा अजाबात इरोध न्हाई. खरं ते मिळतंजुळतं असावं. उगा फुटात बारा इंचाचा फरक असू नये.

दोघं बी नोकरीला हायत म्हणल्यावर शामाच्या उतारवयात शेतीचं कोण बघणार? म्हणून त्यानं लवू जरा स्थानिक पातळीवर करायला पायजे हुतं..’ वश्याबापू नानाच्या पाठीवर हात मारत म्हणाला, “नान्या, तू जल्मात कवा सुधरायचा न्हाईस. कुठला हेतू ठेवून कधी होत न्हाई त्येलाच प्रेम म्हंत्यात. लग्न कसं, कुणाशी, कुठं झालं ह्येला महत्त्व देण्यापेक्षा लग्नानंतर दोन जिवांसोबत दोन घरं जोडली जावी. एकमेकांच्या बरोबरीनं दोघांनी बी सासू-सासऱ्यांची काळजी घ्यावी, हे म्हत्त्वाचं हाय. सुखाचं सार कशात हाय, हे कळलं की संसार समाधानाचा हुतो. समजून घेतलं तर सोपं हाय, न्हाई तर नसता ताप हाय. पिढी, काळ बदलला हे खरं. स्वताचं, माझं म्हणून करावं अन् सगळ्याचं आपलं म्हणून जपावं, हे चालत आल्यालं तत्त्व सांभाळलं तर सुटसुटीत होतंय समदं. लवू म्यारीज असू दे न्हाई तर घरच्यांनी जमवलेलं असू दे; घडायला नि बिघडायला बी विचारच कारणीभूत असत्यात.’

भिकानानाला बापूचं म्हणणं पटलं. तरीही सार्वजनिक शंका म्हणून त्यानं बापूला विचारलं, “सगळं मनासारखं झालयं तरी बी मग शामा आन् शालाबाई एवढी गप्प का असत्यात? आधीसारखी दिसत न्हाईत.’ “आरं नाना, चर्चेचा वारा त्याचा गावभर पसारा. माणूस काय एकच बोलतोय का? कोण चेष्टेनं म्हणून चिमटा काढणार, कोण नको ते बोलणार, कोण भलती भीती घालणार. हे ऐकून माणूस बिथरतो. त्याच्या धीराला धक्कं बसाय लागत्यात. जे घडत न्हाई पण शंभर टक्के खरं हाय, ते सांगू का नाना? ज्या दिवशी दुसऱ्याच्या सुखाचा आपल्याला आनंद हुईल, त्या दिवशी समाजाच्या सुखाची सुरवात हुईल.

उद्या पकानं अन् त्येच्या बायकोनं ह्या दोघांची काळजी घेतली, तर आपण म्हणणार पूर्वजन्माची पुण्याई नि लेकानं, सुनेनं बघितलं न्हाई तर आपणच म्हणणार, कुठं बी असू द्यात, किती बी मोठी होऊ द्यात पोरांच्यावर आईबाचा कंट्रोल पायजे, शामाला ते जमलं न्हाई. जे झालं ते चांगलं झालं नि ह्यापुढं घडंल ते उत्तम असंल, ही आपली नीतिमत्ता असायला पायजे. ती आपलं बळ अन् दुसऱ्याचा धीर वाढवती. त्याचं कसं, काय झालं, काय हुईल? या प्रश्नात पडण्यापेक्षा प्रकाशसारखं गावातल्या सगळ्या पोरांचं कल्याण व्हावं, गावातलं प्रत्येक घर सुखासमाधानात असावं, अशी प्रार्थना करूया. दुसऱ्याचं भलं व्हावं एवढी सद्भावना ठेवली, तरी आपल्याला नव्या वर्षासाठी स्वत:चा येगळा संकल्प करायची गरजच नाय पडायची! अवतीभवतीच्या साऱ्यांबद्दल आपुलकी, जिव्हाळा जपला की संक्रांत आणखी गोड हुतीय आन् सुरू झालेलं वर्ष सुद्धा आनंदात पुढं सरकतंय. काही न ठरवता पण समदं कसं आपल्या मनासारखंच हुतंय, असं हळूहळू वाटाय लागतंय. मग कशाला कुणाचं वाईट चिंतायचं? होऊ दे ना साऱ्यांचं चांगभलं..!’

संपर्क : 9922631831 नितीन कुलकर्णी knitinvinayak@gmail.com

बातम्या आणखी आहेत...