आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इये बोलिचिये नगरी...:त्याल आन बूड जळू दे... पण, प्रकाश पडू दे..!

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवनाथ द. सकुंडे

मराठी मालिकांमध्ये आताशा जो बदल होतोय, त्यामध्ये बोलीभाषांचा समावेश ही गोष्ट नजरेआड करता येत नाही. माध्यमं सतत परिवर्तनवादी असायला हवीत, त्यासाठी वेळोवेळी आवश्यक बदल करत समाजमनाचा ठसा त्यात उमटायला हवा. "मी करेन तेच धोरण आणि मी बांधेन तेच तोरण' ही वृत्ती सोडत, मराठी मालिकांना विविधांगी रूप देण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नांचा भाग म्हणून, मराठी मालिकांमधील प्रांतिक मराठी बोलीभाषांच्या वापराकडे बघायला हवं.

आंगात न्हाय बळ, आन चिमटा घिऊन पळ, घेणं ना देणं, खंदील लावून यणं, चोरून पुळी खा म्हणलं तर, बोंबलून गुळवणी मागणारी तुमची जातअस्सल सातारी म्हणींचे दणक्यावर दणके बसल्या-बसल्या भाकरी थापणारे सारजाबायचे हात थबकतात... दूध घालायला जाणारे तात्या अंगणातच किटली ठेऊन दारातनंच टीव्हीकडे बघत राहतात अन् खुदकन हसतात... हे तर झालं देवमाणूस मालिकेत गॉगल घातलेल्या सरूआज्जीचं... पण त्याही आधी मला फुल्ल कॉन्फिडॉन्स हाय म्हणत लागिरं झालं जी तला राव्हल्याही प्रेक्षकांना खिळवून ठेवायचा...कारभारी लयभारी तली सोलापूर-सातारा-सांगलीच्या वेशीवरील अकलूजच्या बोलीभाषेची चमचमीत मिसळ, तुझ्यात जीव रंगलातला कोल्हापुरी बाज, राजा राणीची गं जोडी तली सांगलीकडची लज्जत, माझ्या नवऱ्याची बायको तसेच एक होती राजकन्या'तला वैदर्भीय झणका, त्याचप्रमाणे, रात्रीस खेळ चालेतला कोकणी गोडवा आणि नवरी मिळे नवऱ्यालातला मराठवाडी लहेजा किंवा तुझ्या इश्काचा नाद खुळा, जीव झाला येडा पिसा या मालिकांच्या संवादांमध्येही अशा विविध भागांतला गावरान झटका बघायला-ऐकायला मिळाला... आपल्या भागातली, गावातली इतकंच काय, तर घरातली भाषा साक्षात टीव्हीवर पाहायला-ऐकायला मिळते म्हणून प्रेक्षकांना आनंद तर होतोच, पण इतर प्रांतातल्या भाषांबद्दल प्रेक्षकांना कुतूहल आणि गोडी वाटत असते... कोकणातल्या माणसाला पश्चिम महाराष्ट्रातल्या बोलीभाषेचं जसं कौतुक असतं, तसच, मराठवाड्यातील भाषेचंही विदर्भातल्या माणसाला अप्रुप असतंच... नेहमी काहीतरी नवं देण्याचा होलपडत-चाचपडत का होईना प्रयत्न करणाऱ्या चॅनल्सनी, मराठी माणसाच्या याच सर्वव्यापी भाषाप्रेमाचा ठाव घेतला नसता तरच नवल.

मराठी चॅनल्सनी हा ठाव घेतलाय, संधी साधलीय की मारूती बनवण्याच्या नादात गणपती बनवलाय, हा वेगळा विषय असू शकेलच... पण, कुंकू-टिकली, सासू-सून अशा कालबाह्य कुबट कथासूत्रांत अडकलेल्या चॅनल्सनी पूर्णत: कात टाकली नसली तरी, कूस बदललीय एवढं नक्की... अर्थात हेही नसे थोडके...

खरंतर, डेलीसोपचा फंडा जसा हिंदी मालिकांच्या बोटाला धरून मराठी मालिका शिकल्या, अगदी तसंच, प्रांतवार भाषांची गोडी मालिकांमध्ये उतरवण्याची किमयाही हिंदी मालिकांनी आधीच करून दाखवलीय... तारक मेहता का उल्टा चष्मा, जस्सी जैसी कोई नही वगैरे ही त्याची काही उदाहरणं... ब्लॅक अॅण्ड व्हाईटच्या जमान्यातली गोट्या ते पिंपळपान वगैरे मालिकांनीही अशा भाषिक विविधतांची झालर पांघरून, प्रेक्षकांना भरजरी मनोरंजन बहाल केलं. मराठी सिनेमा अनेक वर्ष सासर-माहेर, प्रियकर-प्रियसी, डाकू-चोर, हळद-कुंकू, माहेरची आणि बाहेरचीही साडी अशाच साचात अडकून पडला होता, त्यामुळे हे साचलेपण अखेर गढूळ होऊन, मराठी माणूसच त्यावर नाराजीचे ओरखडे ओढू लागला होता... या ओरखड्यानंतर मराठी सिनेमाने जो बदल केला तो, पुढे जगभरात कौतुक आणि अभ्यासाचा विषय बनला... अगदी तसेच काहीसे दशावतार, कधीकाळी प्रचंड प्रेम मिळालेल्या मराठी मालिकांनाही भोगावे लागले. टीकांच्या बाणांनी घायाळ झाल्यावर मराठी चॅनल्सही जागे झाले आणि प्रेक्षकांना गृहित धरण्याची पारंपरिक जळमटं झुगारली, त्याचसोबत "मी करेन तेच धोरण आणि मी बांधेन तेच तोरण' ही वृत्ती सोडत, मराठी मालिकांना विविधांगी रूप देण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नांचा भाग म्हणून, मराठी मालिकांमधील प्रांतिक मराठी बोलीभाषांच्या वापराकडे बघायला हवं. लागिरं झालं जी, मिसेस मुख्यमंत्री आणि आताच्या देवमाणूस मालिकेच्या निर्मात्या श्वेता शिंदे सांगतात की, ''मराठी मालिकांना बोलीभाषांचं वैविध्य देण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला तो 'झी मराठी'ने, 'झी मराठी'ने असे प्रयोग करण्यासाठी संपूर्ण प्रोत्साहन तर दिलंच, पण, अशा मालिकांना प्राइम-टाइम स्लॉटही देऊ केला. अशा मालिकांना अस्सल आणि मातीत झिरपलेल्या बोलीभाषेची गोडी यावी म्हणून आम्ही त्या-त्या भागांत राहणाऱ्या लेखक-अभिनेत्यांना संधी देऊ शकलो, त्यातूनच विशाल कदम, तेजस घाडगे, राहुल मगदूमसारखे लेखक आणि अभिनेते पुढे आले, आणि आधी शहरांमध्ये किंवा स्टुडिओंमधून होणारं शूटिंग गावोगावी होऊ लागलं. बोलीभाषेसोबतच, त्या- त्या भागांतल्या चित्रीकरणामुळे मालिकांमध्ये एकप्रकारचा जिवंतपणाही आला.'' 'सोनी मराठी'चे प्रमुख अजय भाळवणकर यांनीही मराठी संस्कृती-प्रकृती-प्रवृत्ती, मराठी मानसिकतेचं भान आणि मराठी मातीचं गान मराठी मालिकांमध्ये यायला हवं, असं एकदा बोलताना सांगितलं होतं. आता, मराठी मालिकांमधल्या बोलीभाषा खरंच अभ्यास करून वापरलेल्या असतात का? किंवा शब्दोच्चारांना शास्त्रोक्त आधार असतो का? असेही प्रश्न हल्ली विचारले जाऊ लागलेयत. याबाबत बोलताना लेखक तेजपाल वाघ सांगतात की, "प्रमाणभाषा नावाचा एक प्रकार असतोच, पण बोलीभाषा ही त्या-त्या भागातली एकप्रकारची प्रमाणभाषाच असते... भाषा लिहिली जाते तेव्हा जसं असतं, तसं बोलण्याच्या भाषेमध्ये शुद्ध-अशुद्ध असं काही नसतं, आपण बोलतोय ते समोरच्याला समजलं, आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या की बस्स... भावना वाहून नेत, त्या एकमेकांपर्यंत पोहोचवणं हेच तर बोलीभाषेचं सौंदर्य आहे. त्यामुळे, बोलीभाषेला शुद्ध-अशुद्ध- शास्त्रोक्त वगैरे तराजूत टाकता कामा नये. त्याचा फक्त आनंद घ्यावा." तेजपाल जे सांगतायत, त्यात बव्हंशी तथ्य जरी असलं तरी, व्यासपीठावर जे घडतं (मग ते सिनेमाच्या पडद्याचं असो की, टीव्हीचं असो) त्याचं एकतर कौतुक होतं किंवा त्यावर टीका होते... किंवा त्याचं मोजमाप तरी होतंच होतं... मग त्यातून मराठी मालिका तरी का सुटतील?

खरंतर, अशा बोलीभाषा जन्मतात, त्याच मुळी त्या-त्या भागांतील लोकांच्या मनातून अन् खूप आतून... तिथल्या लोकांचं जगणं, भोगणं, उपभोगणं आणि वागणं या सर्वांचा परिपाक त्यांच्या बोलीभाषेतून ओघळत असतो... त्यातला गोडवा, त्यातला कडवटपणा किंवा राग-लोभ-द्वेष- मत्सरादी भावना जशाच्या तशा खळाळत वाहत राहतात... अशा भाषा नियोजनबद्ध पद्धतीने आखलेल्या नसतात किंवा त्या ठरवून ओतलेल्याही नसतात, तर त्या मनसोक्तपणे सांडलेल्या असतात... म्हणूनच त्या अघळ-पघळ असतात... रांगड्या असतात तर कधी करड्याही असतात... अस्सल ग्रामीण माणसाच्या भवतालातला दरवळ त्यांच्या बोलण्यात ओसंडत असतो. अर्थात, समाजमाध्यम कोणतंही असलं, तरी एकाचवेळी अनेक लोकांपुढे सादर होणारी कोणतीही गोष्ट तावून-सुलाखून आणि महत्त्वाचं म्हणजे अभ्यासात्मक चौकटीतूनच सादर व्हायला हवी. हा नियम मराठी मालिकांनाही लागू पडतोच. त्यामुळे, मराठी मालिकांच्या पुढाऱ्यांनी याचा विचार करायला हवा का? तर त्याच उत्तर हो असंच आहे. त्यासाठी हवं तर बोलीभाषांतील तज्ज्ञांचा, अभ्यासकांचा सल्ला घ्यावा लागला तरी हरकत नसावी. हे जरी खरं असलं तरी, मराठी मालिकांमध्ये आताशा जो बदल होतोय, त्यामध्ये बोलीभाषांचा समावेश ही गोष्ट नजरेआड करता येत नाही. माध्यमं सतत परिवर्तनवादी असायला हवीत, त्यासाठी वेळोवेळी आवश्यक बदल करत समाजमनाचा ठसा त्यात उमटायला हवा. कारण, पेपर वाचताना, बातम्या बघताना, तमाशा-ऑर्केस्ट्रा आणि थिएटरात सिनेमा बघताना किंवा टीव्हीही बघताना प्रत्येकजण त्यात स्वत:ला शोधत असतो. हेच प्रेक्षकांना हवं असतं... आपल्या गावातील माणसांची बोलीभाषा टीव्हीतल्या मालिकांमध्ये दिसते म्हणून, जसं शहरात राहणारा त्यांचाच कुणी मुलगा, सून, नातू किंवा नातेवाईक आनंदाने बघतो, तसंच शहरी भाषाही त्यांचेच गावात राहणारे नातेवाईक आवडीने बघत असतात... म्हणजेच, मालिका हल्ली प्रेक्षकांसमोर टीव्हीवरून प्रेक्षकालाच मांडू पाहतायत. ही एकार्थाने स्वागत करण्याची गोष्ट आहे. कारण, मंगल कार्यालयात ड्युटीवर असलेल्या माणसाने रुक्ष, कोरडेपणाने जेवण वाढावे तसे, अनेक वर्ष तेच ते विषय प्रेक्षकांच्या ताटात फेकले जायचे, ते थांबतंय ही आशादायीच गोष्ट आहे. असा काहीतरी बदल होऊन, मराठी मालिका कूस बदलतायत, तेच घोरणं, तेच अंथरूण आणि तेच पांघरून घेऊन नुसतं निपचीत पडून राहण्यापेक्षा ते बरंच की. अर्थात, एवढा बदल स्वीकारणारे चॅनल्स पुढे-पुढे अभ्यास करूनच मराठी मालिकांमधील बोलीभाषेला शास्त्रोक्त आकार देतील, ही आशा आहेच. देवमाणूस मालिकेत सरूआज्जीच्या तोंडी एक डायलॉग होता, ''त्याल (तेल) जळतं राजाचं आन बूड जळतं मशालीचं''. त्यानुसार, तेल जळू दे आणि बूडही जळू दे... पण मराठी मालिकांना एरवी आलेली मरगळ जाऊन, मनोरंजानाची मशाल देदिप्यमानपणे तेवत राहू दे... रंजनाचा निखळ प्रकाश राहू दे. त्याची सुरूवात झालीय, ही मराठी भाषा दिनी गोड गोष्टच म्हणावी लागेल. navnathaaradhya@gmail.com

बातम्या आणखी आहेत...