आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अघळपघळ:मराठी सेलिब्रेट करूया...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन परब मराठीच्या नावाने गळा काढणारेच मराठीचा गळा घोटण्याच्या प्रयत्नासाठी जबाबदार धरले पाहिजेत. हे रडके लोक सांगतात, तशी मराठी मरत बिरत नाहीय. ती वेगाने वाढते आहे. व्यापक होते आहे. त्यामुळे आता आपण मराठी सेलिब्रेट करायला पाहिजे.

मराठी भाषा दिन हा आपली भाषा साजरा करायचा दिवस आहे. जगाने अभिमान बाळगावी अशी माझी भाषा आहे. म्हणून माझ्या भाषेनं मला कसं समृद्ध केलंय, हे आठवावं. माझं जगणं कसं आनंददायी बनवलंय, ते ओळखावं. तिच्यामुळे काय छान ऐकता आलं, वाचता आलं, लिहता आलं, बघता आलं, अनुभवता आलं, ते डोक्यात घोळवत रहावं. तिच्यासोबत आपली मुळं शोधत खोल खोल गुंतावं. तिला मनापासून थँक्यू म्हणावं. हे करताना मिळालेला आनंद शेअर करावा. याशिवाय मराठी दिन काय असतो दुसरा! थोडक्यात, वर्षातला एक दिवस आपल्या मायमराठीला द्यावा. भाषा ही गोष्टही सेलिब्रेट करता येते, हे दाखवून द्यावं. आता सेलिब्रेशनसाठी काय करायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कुणी लाऊडस्पीकरवर गाणी लावावी. कार्यक्रमात भाषणं करावी. बॅनर लावावे. पुस्तक घ्यावीत. कविता कराव्यात. आलेले मेसेज फॉरवर्ड करावेत. मीम बनवानेत. काय हवं ते करावं. फक्त एक गोष्ट करायची नाय. हा माझ्या भाषेचा दिवस आहे, या दिवशी तरी तिच्या नावाने रडायचं नाय. रडगाणी गायची नायत. पण आपल्या काही लोकांना मराठीविषयी रडायलाच खूप आवडतं. मराठीच्या मरणाच्या चर्चा करून किमान शंभर वर्षं तरी झाली. मोठमोठे लोक मराठी मरायला कशी टेकलीय याची आयुष्यभर चर्चा करत राहिले आणि स्वतःच खपले. मराठी त्या सगळ्यांच्या तेराव्याचं जेवून धडधाकट उभी आहे. मराठी फक्त जिंदा नाही, तर जिंदाबाद आहे. खणखणीत, ठणठणीत आहे. `मुमूर्षू` नाही, वर्धिष्णू आहे. संपलेली नाही. तर वाढतेय. आमच्या आईसाठी कुणी रडायची गरज नाही, आम्ही तिची पोरं जित्ती आहोत अजून. तिला सांभाळायची गरज नाही. खरंतर आमची ऐपतही नाही. तीच आम्हाला पोसतेय. आजवर कधी निघाली नाहीत, इतकी मराठी पुस्तकं दरवर्षी प्रकाशित होत आहेत. गावोगावचे लेखक दमदार व्यक्त होत आहेत. दोनतीन शहरांतले तेच तेच लोक एकाच चौकटीत घोळ घालत होते. कुथून कुथून पुस्तक काढत होते. त्याला आपण मराठीचा सुवर्णकाळ म्हणत राहू तर कठीण आहे. त्या तुलनेत आजच्या काळाने काय घोडं मारलंय. ज्यांचे मायबाप शाळेतही गेले नाहीत, त्यांची पोरं लिहित आहेत. ते प्रत्येक अक्षर सोन्यापेक्षाही चोख आहे. कष्ट करणाऱ्यांच्या हातात आज कीबोर्ड आहे. त्याचं मोल जाणणारी समीक्षाही उभी राहतेय. त्यामुळे पुलं आणि वपुंपाशी गाडी

अडकलेले खरे करंटे आहेत. त्यांनी आजचं वाचलं नाही, तर मराठी भाषा करंटी ठरत नाही. एकट्या कोरोनावर आज मराठीत वीस पंचवीस तरी पुस्तकं आलीत. त्यात कविता कादंबऱ्यांपासून डॉक्टरांच्या संशोधनापर्यंत सगळं आहे. प्लेगपासून दुष्काळ, पानशेत, कोयना, गिरण्यांचा संप, किल्लारी, दंगली, बॉम्बस्फोट, सगळं आठवून बघा, असं याआधी कधीच घडलेलं नाही. फक्त पुस्तकंच नाहीत, तर मराठी वर्तमानपत्रंही वाढत आहेत. त्यांच्या आवृत्या पूर्वी कधीच नव्हत्या इतक्या आहेत. दिल्लीतही मराठी पेपरच्या आवृत्त्या आहेत. पत्रकारांच्या नव्या पिढीचा शब्द गावोगाव पोचतो आहे. कोणत्याही सेट टॉप बॉक्सवर वीसपेक्षा जास्तच मराठी चॅनल लागतात. पूर्वीपेक्षाही अधिक ताकदीने आणि संख्येने मराठी सिनेमे निघत आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक छोट्या शहरात थिएटर बहरतंय. इंटरनेटवर तर मराठी धिंगाणा घालतेय. इंटरनेटवर इतर भारतीय भाषांसह मराठी कशी वाढतेय, याचे रिपोर्ट सर्च केले तर सहज सापडतात. सोशल मीडियावर कुणीही लिहू शकतं. त्यामुळे त्यात कचरा असणारच. पण त्यातही जमिनीवरचे अनुभव सशक्तपणे मांडणाऱ्यांची मोठी फळीच महाराष्ट्रभर उभी राहिलीय. त्यांनी भाषाशुद्धी आणि प्रतिशब्दांसारख्या मराठीचा श्वास कोंडणाऱ्या दळभद्री गोष्टी कधीच्याच भिरकावून दिल्यात. प्रमाणभाषा नावाच्या कृत्रिम जोखडातून मराठीला सोडवण्याची तयारी केलीय. त्यातून निमशहरी बनलेल्या नव्या महाराष्ट्राची नवी जिवंत भाषाच तयार होतेय. इच्छा असेल तर वानगीदाखल बालाजी सुतारांची फेसबूक वॉल बघू शकता. या सगळ्यातून मराठी लिहिणारी, वाचणारी, बोलणारी, बघणारी माणसं वाढलीत की कमी झालीत, हे सहज कळू शकतं. ती कमी झालेली नाहीत, तर प्रचंड वाढलेली आहेत. मोबाईल मराठीला अधिक पसरवतो आहे. एका अर्थाने वाढवतोही आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. भारतातल्या इंटरनेट वापराचा भाषिक अंगाने केलेला केपीएमजी-गुगल यांचा सर्वे गाजला. आश्चर्य वाटेल, पण त्यानुसार फक्त आपली मातृभाषाच इंटरनेटवर वापरणाऱ्यांचं सर्वाधिक प्रमाण मराठीत आहे. म्हणजे मराठी माणूस इंटरनेटवर तरी हिंदी किंवा इंग्रजी कंटेण्टच्या नादी लागत नाहीय. हे महत्त्वाचं आहे, कारण ही सगळी आपली नव्या पिढीची पोरं आहेत. इंग्रजी मीडियममधे शिकलेली, रोमन अक्षरांमधून मराठी लिहिणारी, पण मराठीत ती कम्फर्टेबल आहेत. मराठी शाळा किंवा कॉलेजांमधली मराठी डिपार्टमेंट बंद पडतात, म्हणून मराठी संपतेय असं मानायचं कारण नाही. त्यांना पहिलीपासून मराठी आहेच आणि बहुतांश शाळांमधलं वातावरणही मराठीच आहे. मराठी शाळा बंद पडणार, असं रडगाणं गायलं नसतं तरी अनेक मराठी शाळा वाचल्या असत्या. त्यामुळे मराठी शाळेत घालायला तयार असणारे पालकही घाबरले. अशावेळेत मराठीच्या या वाढत्या व्यवहारात स्थान उरलेलं नाही, ते मोजके जण मराठी मेल्याची रडगाणी गात आहेत. ते बोलके, बडबडे आहेत. त्यांचा आवाज जास्त ऐकू येतो. त्यांना त्यांच्या अमेरिकेत मराठी भाषा दिनी भोंडले नाचू द्यावेत. त्यांचं फारसं मनावर घ्यायची गरज नाही. आपल्यासाठी मराठी हा त्यांच्यासारखा नॉस्टॅल्जिया नाही, तर वर्तमान आहे. मराठीच्या अस्मितेचं राजकारण करणाऱ्यांना हे ठणकावून सांगायची गरज आहे. इस्लाम खतरे में, हिंदू खतरें में सारखं मराठी खतरें में असं डोक्यात भरवून अल्पसंख्याक मानसिकता तयार करायची गरज नाही. हिटलरने ज्यूंचं हत्याकांड करूनही ज्यू संपलेले नाहीत, उलट आज वाढलेलेच आहेत. मराठी

तर जगातली दहाव्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ती कशी संपणार? माऊली आणि तुकोबा, जोतिबा आणि बाबासाहेब यांनी लिहिलेलं शाबूत आहे, तोवर मराठीला संपवणाऱ्याची माय विण्याची शक्यता तरी आहे का?

ssparab@gmail.com

बातम्या आणखी आहेत...