आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटची पंचविशी:चला, अधिक प्रगल्भतेने डिजिटल विश्व घडवू या...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अखिलेश पाटील

एका अर्थी पहायला गेलं तर इंटरनेट म्हणजे ज्याच्या त्याच्या हिश्श्याचं आभाळ. प्रत्येक आपापल्या खिडकीतून जेवढं दिसेल, जसं दिसेल ते आपलं मानून घ्यावं. मनसोक्त विहरावं, डोळे भरून पहावं; फक्त हे करताना आपण जे पाहत आहोत ते देखील एका मोठ्या विस्तृत जगाचा भाग आहे याची आठवण रहावी एवढंच.

१५ ऑगस्ट १९९५ ला म्हणजे बरोबर २५ वर्षांपूर्वी देशामध्ये इंटरनेटची सुरवात झाली. अनेकांच्या मते त्यादिवशी भारताच्या नव्या स्वातंत्र्याची नांदी झाली. क्षणार्धात दुनियेला बोटाच्या पेरावर आणण्याची ताकद देणं असो, प्रांत, धर्म, लिंग, वर्ण आदींना न जुमानता माणसं जोडणं असो किंवा सर्वांना ज्ञानार्जनाची समान संधी देणं असो... तसं पाहिलं तर इंटरनेट हा खऱ्या अर्थाने लोकशाही मूल्यांचा अविष्कार! भारतात जेमतेम चार-पाच महानगरं, त्यातही सुरवतीला अत्यंत खर्चिक सेवा परवडू शकतील अशा उच्चभ्रु वसाहतींपासून सुरू झालेला इंटरनेटचा प्रवास आज खडबडणारे रस्ते, डोंगर-दऱ्या पार करून देशाच्या विविध कानाकोपऱ्यांपर्यंत अव्याहत सुरूच आहे. आजच्या घडीला देशातील जवळपास सत्तर कोटी जनता इंटरनेटचा वापर करते. गेल्या पाच वर्षांत इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत दुप्पटीहून अधिक वाढ झालेली आहे.

वेगाने बदलत असलेले तंत्रज्ञान, त्यामुळे बाजारपेठेत स्वस्त झालेले स्मार्ट फोन्स आणि यात भर म्हणून इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या स्पर्धेमुळे पडलेले डेटाचे दर, या सगळ्यात टप्प्या- टप्प्याने विकसित होणाऱ्या इंटरनेटचा गेल्या पाच वर्षात चेहरा मोहराच बदलला आहे. आज जगात सर्वाधिक स्वस्त स्मार्टफोन्सची भारत एक मोठी बाजारपेठ आहे. भारतातील इंटरनेट सेवा दर इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी आहेत. cable.co.uk च्या एका अभ्यासानुसार एक जीबी डेटासाठी भारतामध्ये साधारणतः १८.५ रुपये इतका खर्च येतो मात्र तेवढ्याच डेटासाठी जगातील इतर देशांमध्ये सरासरी ६०० रुपये इतका खर्च आहे. दरातील ही प्रचंड तफावत बघता सध्याचा काळ हा भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांसाठी एकाअर्थी सुकाळच म्हणावा लागेल. याच स्वस्ताईचं फलित म्हणजे सुरवातीच्या वीस वर्षांत देशात जेवढे इंटरनेट वापरकर्ते होते तेवढे गेल्या पाचच वर्षात इंटरनेटच्या विश्वाशी जोडले गेले.

गेल्या २५ वर्षांचा आढावा घेतला तर कोणत्याही देशासाठी ही वाढ काहीशी अकल्पित अशाच स्वरूपाची म्हणावी लागेल. आज इंटरनेटला केंद्रस्थानी धरून नवनवे व्यवसाय तर उभे राहत आहेतच पण त्याच बरोबर सरकारी योजना, बॅंकेचे व्यवहार ते अगदी शालेय शिक्षणापर्यंत... सर्वच ठिकाणी सुविधांच्या सुलभीकरणाचा पर्याय म्हणून इंटरनेटच्या वापरावर भर वाढत आहे. घरी लॅपटॉप, मोबाईल समोर बसलेले विद्यार्थी आणि दूर बसून त्यांना शिकवणारे शिक्षक हे अगदी काही महिन्यांपूर्वी सुद्धा अशक्य वाटणारं चित्र आज इथल्या बहुतेकांच्या रोजच्या जगण्याचा भाग झालेलं

आहे. वेगाने बदलणाऱ्या या वर्तमानात उद्याच्या बदलांची चाहूल आहे. त्यामुळे या पंचविशीच्या निमित्ताने थोडं थांबून वर्तमानाकडे अधिक डोळसपणे बघत लेखाजोखा मांडण्याची गरज आहे. यात पहिला मुद्दा, जे आजही इंटरनेटच्या सुविधेपासून लांब आहेत त्यांचा. जगण्याच्या प्रत्येक महत्वाच्या गरजांना इंटरनेटशी जोडण्याच्या अट्टाहासापायी समाजाचा मोठा हिस्सा, जो इंटरनेटपासून दूर आहे तो आता महत्त्वाच्या सोईसुविधांपासून अधिक दूर लोटला गेला आहे. एका बाजूला अनेकांसाठी जगणं सुसह्य करणारं साधन समाजातील वंचित घटकासाठी शिक्षणासारखा अगदी मूलभूत हक्क मिळवण्यातही अडसर ठरावं हे भविष्यासाठी फारसं आश्वासक नाही. येत्या काळात वाढत असलेली ही दरी मिटवण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न होणं गरजेचं आहे. अर्थात, इंटरनेट हे सामाजिक विभाजनाचं कारण बनणं हा मुद्दा गंभीर असला तरी तो प्रामुख्याने संस्थात्मक आहे. त्यामुळे यात सरकारचं उत्तरदायित्व अधिक आहे.

दुसरा मुद्दा मात्र आपला, वापरकर्त्यांचा. यातील बहुतेक क्षणोक्षणी विकसित होणाऱ्या या आभासी जगाचा अगदी हल्लीच, काही वर्षांत भाग झाले आहेत. काही नव्या स्वातंत्र्याच्या अनुभूतीने भारावलेल्या स्थितीत आहेत, तर काही अजूनही थोडे भांबावले आहेत. काहींचं चाचपडत पुढं जाणं सुरू आहे तर काही माहितीच्या जाळ्यात त्यांच्याही नकळत गुंतून पडले आहेत. या सर्वांनीच इथून पुढे जाण्यापूर्वी क्षणभर थांबून तुमच्या डिजिटल जगण्याचा अर्थ समजून घेणं हिताचं आहे. खरं तर तुम्हाला हवी ती माहिती, तुम्हाला हवी तशी, हवी तेव्हा आणि बसल्या जागी मिळणं हा अनुभव विलक्षण आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्ही सतत केंद्रभागी राहता, महत्वाचे असता. तुमच्या आवडीनिवडीची मोजदाद करत त्यानुसार तुमचं डिजिटल जग बदलत राहतं, तुमच्या नकळत तुम्हालाही बदलत राहतं पण तरीही सतत तुम्हीच तुमच्या डिजिटल जगाचे हिरो आहात याची जाणीव करत राहतं. या स्वकेंद्री गुणधर्मातूनच अनेकदा गफलत होते. आपणच ठरवून दिलेल्या आवडीनिवडी लक्षात घेऊन आपल्याला उत्तरं मिळत आहेत याचा विसर पडतो. मग मिळालेल्या उत्तरांना आपणच आपले सत्य-असत्याचे, योग्य-अयोग्यतेचे निकष लावून निकालात काढतो. पुढे 'इंटरनेटवर वाचलं...' असं सांगून त्याला प्रमाणित करण्याचा प्रयत्न करतो. आपणच आपल्या नकळत उभारलेले हे माहितीचे एको चेम्बर्स प्रत्येकवेळी केवळ आपणच बरोबर असल्याचं ओरडून सांगत असतात याची जाणीव असणं गरजेचं आहे.

दुर्दैवाने तसं होत असल्याचं दिसत नाही. माहितीच्या पसाऱ्यात सत्य-असत्या दरम्यानच्या धूसर झालेल्या रेषा आणि अल्गोरिदमच्या चक्रात अधिकाधीक गडद झालेले आपले पूर्वग्रह यामुळे दिवसागणिक वाढत्या विखाराची वारंवार प्रचिती येत आहे. आपली समाज माध्यमं आणि त्यातील गेल्या काही वर्षांतले संवाद त्याचीच साक्ष देतात. सर्वांचीच ठाम झालेली मतं, सगळ्यांनाच ती मांडण्याचे उपलब्ध असलेले समान पर्याय आणि स्वातंत्र्य यामुळे एका नव्या अनागोंदीच्या विश्वात आपण सर्वांनी नुकताच प्रवेश केला आहे याच इंटरनेटरुपी लोकशाही अविष्काराच्या मदतीने. अर्थात यात पूर्ण दोष स्वकेंद्री अनुभव देणाऱ्या इंटरनेट नावाच्या यंत्रणेचा नाही. तर तो आहे सहअस्तित्वाच्या समाज नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आपल्या सर्वांचा. जो आभासी जगात देखील तेवढाच लागू पडतो याचंच विसर आपल्याला पडला आहे. ह्या पाच वर्षांत डिजिटल विश्वाचा अचानक झालेला विस्तार आणि त्यातून झालेल्या उलथापालथीनंतर एका महत्वाच्या वळणावर येऊन

थांबलो आहोत. नव्याचं नावीन्य आणि अवाजवी उत्साह मागे टाकून आता अधिक प्रगल्भतेने हे डिजिटल विश्व घडवण्याकडे लक्ष देण्याची ही योग्य वेळ आहे. गेल्या पंचवीस वर्षांनी इंटरनेटला नाकं मुरडणारे पाहिले, नंतर याच इंटरनेटशी जुळवून घेण्यासाठी धडपडणारे पाहिले आणि आता सकाळच्या एक्सरसाईज ट्युटोरियल्स, दुपारी मुलांची ऑनलाइन शाळा, ऑफिसचं काम, युट्युबवरच्या रेसिपीज, ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या सिरीज, फेसबुक- इंस्टाग्राम वरच्या पोस्ट्स या सगळ्यात दिवस घालवणारे तर सगळ्यांच्याच आजूबाजूला आहेत. एका अर्थी पहायला गेलं तर इंटरनेट म्हणजे ज्याच्या त्याच्या हिश्श्याचं आभाळ. प्रत्येकाने आपापल्या खिडकीतून जेवढं दिसेल, जसं दिसेल ते आपलं मानून घ्यावं. मनसोक्त विहरावं, डोळे भरून पहावं; फक्त हे करताना आपण जे पाहत आहोत ते देखील एका मोठ्या विस्तृत जगाचा भाग आहे याची आठवण रहावी एवढंच.

संपर्क- 9028818358

बातम्या आणखी आहेत...