आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दृष्टिकोन:या वर्षी प्रतीक्षा नव्हे, व्यवस्था करून जीवनात बदल घडवू

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका मोठ्या बदलासाठी काही मोठे करावे लागत नाही. छोटे-छोटे बदल दररोज करावे लागतात.

वर्ष २०२० कधी संपेल याची आपण खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. कारण हे वर्ष आपल्यासाठी चांगले नव्हते, असे आपणच म्हटले होते. २०२१ येईल तर आपले जीवनमान बदलेल, परिस्थितीत फरक पडेल, मन:स्थिती ठीक होईल, ही प्रतीक्षा करत होतो. आपली मन:स्थिती, आपला आनंद, आपली मन:शक्ती व शांतता परिस्थितीवर, लोकांवर अवलंबून अाहे, असा आपण विचार करत होतो. ज्याप्रमाणे एक मूल विचारते, ‘तुम्हाला काय वाटते, परीक्षेत माझे कसे होईल?’ तेव्हा आपण त्याला सांगतो, ‘जशी तयारी असेल तसे तर घडेलच.’ परीक्षा सोपी असेल तर चांगली जाईल आणि कठीण असेल तर चांगली कशी जाईल? असे तर आपण सांगत नाही. आपण परीक्षेवर नव्हे, तयारीवर लक्ष केंद्रित करतो. २०२० मध्ये आपल्याला परीक्षा अवघड गेली, परंतु अापली तयारी कशी होती? २०२१ची सुरुवात तर झाली, पण यावर्षी कोणती परीक्षा द्यावी लागेल? मग ती जगात, देशात, शहरात, गल्लीत, कुटुंबात अथवा वैयक्तिक आयुष्यात असेल, आपल्या प्रकृतीची असेल? २०२१ आपल्यासाठी कोणत्या घटना घेऊन येत आहे, यावर्षीची परीक्षा कशी असेल? याची कल्पना आहे का?

आता फोकस करूया तयारीवर, परीक्षेवर नाही. २०२१ कसे असेल यावर विचार करू नका. महत्त्वाचे म्हणजे आपल्या मनात असेल तीच तर आयुष्याची गुणवत्ता असते. आपल्याबाबत घडते ते म्हणजे जीवन नव्हे. जीवन म्हणजे जे घडते त्याबाबत आपला दृष्टिकोन, आपली वाणी व व्यवहार कसा आहे? यामुळे आपण आजपासून प्रतीक्षा करणार नाही. प्रतीक्षेने जीवन बदलत नसते, तयारीने बदलते. नव्या वर्षात कोणत्या नव्या सवयी, नवे संस्कार स्वीकारणार आहोत, असा आपण विचार करत असू. दरवर्षी आपण योजना आखतो व खूप प्रेमाने अमलात आणून आयुष्यात काही बदल घडवतो. त्या योजना आपण कोणत्याही दिवशी आखू शकतो. छोट्या-छोट्या सवयी, गोष्टी, लहान-सहान व्यवहार, विचार करण्याची पद्धत ही माझी आत्मिक शक्ती घटवू शकतात. आत्मिक शक्ती म्हणजे माझी तयारी. जीवनातील प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी माझी तयारी कशी असेल? आपण आत्म्याची शक्ती कशी वाढवू शकतो, त्या लहान-सहान बाबीकडे पाहतो. आपण छोट्या-छोट्या गोष्टी करतो. लवकर उठतो. रात्री लवकर झोपतो. आहारात बदल करतो.

मोठा बदल घडवण्यासाठी खूप काही मोठे करावे लागत नाही, परंतु छोटे-छोटे बदल रोज करावे लागणार आहेत. परमात्मा सांगतात, तुमचा प्रत्येक क्षण नवा असू द्या. परमात्म्याची शिकवण अशी की, नव्या वर्षाची प्रतीक्षा करायची नाही, नव्या दिवसाचीही प्रतीक्षा करायची नाही. तुमचा प्रत्येक क्षण नवा असू द्या, तेव्हाच तुमची मन:स्थिती चांगली राहील. याला आपण गणिताच्या भाषेत समजून घ्यायचे तर, आपण आज जे आहोत तसेच वर्षभर राहिलो तर आपल्यात काही बदल होणार नाही. म्हणजे आपण १ वर राहू आणि १x३६५ =१, म्हणजे काहीच बदलत नाही. परंतु आपल्यात १ टक्काही बदल घडवला आणि तो एक टक्का दररोज बदलत असू तर एका वर्षात आपल्यात ३६७% बदल घडेल. आता आपल्याला वाटते की, काही केले नाही तरी आपण जसे एक आहोत तसे ३६५ दिवसांनीही आपण एकवरच राहू, परंतु तसे होणार नाही. कारण आपण एक टक्काही वर जात नाही, तेव्हा आपली थोडी घसरण होईल. कारण वातावरणाचा, लोकांच्या परिस्थितीचा, एकूण परिस्थितीचाही प्रभाव पडतो. आपण एकाकी तर नाहीत ना? परिस्थिती कशी असेल माहिती नाही, लोक कसे असतील, त्यांचे वर्तन कसा असेल याची कल्पना नाही. दररोज आपल्यात छोटे-छोटे बदल घडवल्यास ३६५ दिवसांत किती बदल घडेल, याचा विचार करा. आपल्या मन:स्थितीत दररोज छोटा बदल करा. आपण तसे केले तर २०२१ कसे असेल, २०२२ कसे असेल? याचा विचार करण्याची गरज भासणार नाही. आपण परीक्षा कशी असेल, याची वाट पाहणार नाही. आपले लक्ष फक्त आणि फक्त तयारीवर असावे.

बी. के. शिवानी ब्रह्मकुमारी awakeningwithbks@gmail.com

बातम्या आणखी आहेत...