आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तकामागच्या गोष्टी:कलेची पातळी अन् आयुष्याची लांबी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘नेमकं काय चाललं असेल यांच्या डोक्यात?!’ हा प्रश्न सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो. वाचनप्रेमी लोकांच्या बाबतीत तर हे वारंवार घडतंच. ‘लेखक तो दिसतो कसा आननी’ या उत्सुकतेबरोबर महत्त्वाची असते, ती लेखकाची प्रेरणा आणि भूमिका. नेमक्या शब्दांत सांगायचं तर ‘त्यांनी असं का लिहिलं?’ हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं. अशाच काही लेखकांची लेखनामागील प्रेरणा, त्यांची प्रतिभा अन् या मिलाफातून तयार झालेली त्यांची प्रतिमा यांचा वेध घेणारे हे नवे पाक्षिक सदर...

वा चकहो, या लेखमालेत आपण काही लेखकांच्या लेखनामागच्या कथा पाहणार आहोत. या लेखकांच्या निवडीत काहीही सूत्र नाही, हे सुरुवातीलाच स्पष्ट करतो. यात ललित लेखक आहेत, ललितेतर आहेत. जुने आहेत, नवे आहेत. भारतीय आहेत, अभारतीय आहेत. हे लेखक ‘महत्त्वाचे’ आहेत का, याचं उत्तर मी देऊ शकणार नाही; कारण लेखकाचं महत्त्व, सौंदर्याप्रमाणेच व्यक्तिसापेक्ष असतं. अगदी सूत्रच शोधायचं झालं तर या सगळ्यांचं लेखन इंग्रजीत उपलब्ध आहे आणि प्रत्येकाच्या लिखाणामागे सांगण्यासारखी काहीतरी गोष्ट आहे, इतकंच ते आहे.

आजची गोष्ट ब्रिटिश वसाहतीच्या काळातील दोन अधिकाऱ्यांची आहे. ब्रिटिश साम्राज्याने १८५२ मध्ये भारतीय नागरी सेवा सुरू करायचा निर्णय घेतला. आर्थर कोक बर्नेल हे या परीक्षेतून बाहेर पडलेल्या पहिल्या तुकडीतील अधिकारी. आधीपासून बर्नेलना भारतविद्यांमध्ये रस होता. ते संस्कृत शिकले होते. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांना तत्कालीन मद्रास विभागात धाडण्यात आलं, त्या वेळी ते तेलुगूही शिकले. भारतात पोचल्यावर त्यांनी संस्कृत हस्तलिखितं गोळा करण्याचा सपाटा लावला. त्यावर पुस्तकं लिहिली. ब्रिटिश संस्कृततज्ज्ञांच्या वर्तुळात त्यांना चांगला मान मिळू लागला. पण, इतिहास त्यांना वेगळ्याच कारणासाठी लक्षात ठेवणार होता. हेन्री यूल हे बर्नेलपेक्षा विसेक वर्षांनी मोठे होते. यूल यांनी आधीच भारताचा रस्ता स्वीकारला होता. त्यात आश्चर्यही नव्हतं; त्यांच्या कुटुंबांत भारताशी संबंध असलेले कैक लोक होते. सैनिकी शाळेतून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि बंगाल इंजिनिअर्स या तुकडीत स्वतःचा शिरकाव करून घेतला. भारतातील त्यांची सेवा फारशी उल्लेखनीय नव्हती. १८६२ मध्ये त्यांनी निवृत्ती घेत सिसिलीत आपलं बस्तान बसवून लेखन सुरू केलं. ‘मार्को पोलो’च्या अनुवादाबद्दल त्यांना मानमरातब मिळाला.

लंडनच्या इंडिया ऑफिस लायब्ररीत १८७२ मध्ये या दोघांची भेट झाली. बोलता बोलता विषय निघाला आणि बर्नेलनी आपल्या एका आवडीबद्दल यूल यांना कल्पना दिली. बर्नेलना संस्कृत-तेलुगू तर येत होतंच, पण अन्य पौर्वात्य भाषांशीही त्यांचा परिचय होता. ब्रिटिश लोकांचा संबंध पौर्वात्य जगाशी येऊन शंभरावर वर्षे लोटली होती. साहजिकच, काही पौर्वात्य भाषांतील शब्द इंग्रजीत शिरले असणार. बर्नेलनी अशा शब्दांची यादी करायला घेतली होती. यूल यांनाही या विषयात गंमत वाटली आणि दोघांनी पत्रव्यवहारामार्फत हे काम पुढे न्यायचं ठरवलं.

परकीय शब्दांच्या याद्या तेव्हा नवीन नव्हत्या. किंबहुना ‘शासकीय कामांत वापरल्या जाणाऱ्या न्यायविषयक आणि करविषयक भारतीय शब्दांची यादी’ असं लांबलचक शीर्षक असलेली एक यादी लोकप्रिय होती. याच यादीच्या लेखकाने लिहिलेला संस्कृत-इंग्रजी कोश होता. मराठीत मोल्सवर्थचा कोश होता. ही सगळी इंग्रजी माणसाने परकीय भाषा समजून घेण्यासाठी निर्माण केलेली आयुधं होती. पण, इंग्रजीवरच परकीय भाषांचा प्रभाव कसा पडला, हे सप्रमाण दाखवणारा यूल-बर्नेलचा हा कोश पहिलाच असणार होता.

काम पूर्ण होण्यापूर्वीच बर्नेल यांचे निधन झाले. यूल यांनी इतरांच्या सहकार्याने काम पूर्ण केलं. काही तज्ज्ञांची मदत घेऊन भारतीय भाषांबरोबर चिनी, मलाय भाषेतून इंग्रजीत आलेले शब्दही नोंदवले. कोशाचं नाव ‘हॉब्सन जॉब्सन’ ठेवण्यामागे दोन लेखकांचे श्रम यात आहेत, हे सांगण्याचाही हेतू होता. हॉब्सन जॉब्सन कोशाबद्दल, भारतीय भाषांमधून इंग्रजीत शिरलेल्या आणि आज त्यात घट्ट मुळं धरलेल्या ‘शॅम्पू’सारख्या शब्दांबद्दल लिहिण्यासाठी हा लेख कमी पडेल. पण, हॉब्सन जॉब्सन कोशाचं महत्त्व त्याहीपलीकडे आहे. हा कोश इंग्रजी अधिकाऱ्यांच्या भारतातील तत्कालीन राहणीमानाचा आरसा आहे, असं मत एक अभ्यासक नोंदवतात. या कोशाच्या कल्पनेने अनेकांना मोहात पाडलं आहे - अगदी २००८ मध्ये याच धर्तीवरचा, पण आधुनिक शब्द नोंदवणारा ‘हॅन्क्लिन जॅन्क्लिन’ नावाचा कोश प्रकाशित झाला आहे. (‘पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेले शब्द’ - चावी, पगार, वगैरे - यावर असाच कोश लिहिता येईल!) यूल यांनी कोशाच्या प्रस्तावनेत नोंदवले आहे, की हा विषय इतका मोठा होता की तो कुठे संपवायचा आम्हाला कळेना. आणि संपवावासाही वाटेना! पण मग ते पुढे लिहितात, ‘ars longa, vita brevis’; म्हणजे कलेची पातळी गाठायला वेळ लागतो, पण आयुष्य फार थोडं आहे हो!

आदूबाळ aadubaal@gmail.com

बातम्या आणखी आहेत...