आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • LIC IPO Issue । LIC Success Story And History | Interesting Facts About Life Insurence Corporation Of India

LICचा ब्रँड बनण्याची कहाणी:5 कोटी रुपयांच्या सरकारी रकमेने सुरू झाली LIC, आता 6 लाख कोटी रुपयांची कंपनी

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LICचा IPO शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. त्याच्या बोलीची तारीख 4 मे ते 9 मेदरम्यान ठेवण्यात आली आहे. यामुळे LICचे पॉलिसीधारक, एजंट आणि कर्मचाऱ्यांची धडधड वाढली आहे. 5 कोटींच्या सरकारी रकमेतून सुरू झालेली ही कंपनी आता 6 लाख कोटी रुपयांची झाली आहे.

आज आम्ही LICच्या जन्मापासून ते ब्रँड बनण्यापर्यंतची संपूर्ण कहाणी घेऊन आलो आहोत. या कंपनीने सरकारला किती पैसा दिला आहे? भारतात इन्शुरन्सचा अर्थ LIC कसा झाला? गेल्या 65 वर्षांत प्रत्येक गावात LIC कशी पोहोचली?

सुरुवातीला भारतीयांचा विमा काढत नव्हती कंपनी

1818 मध्ये भारताच्या भूमीवर प्रथमच एखादी विमा कंपनी सुरू झाली. तिचे नाव ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी होते. त्यात केवळ इंग्रजांच्या जीवन विमा उतरवला जात होता. बाबू मुत्तीलाल सील यांसारख्या काही लोकांच्या प्रयत्नाने भारतीयांनादेखील विमा मिळाला, परंतु त्यांच्यासाठी दर वेगळे होते. 1870 मध्ये पहिली भारतीय आयुर्विमा कंपनी सुरू झाली तेव्हा त्यांना समान अधिकार मिळाले. हळूहळू भारतात आयुर्विमा कंपन्यांचा महापूर आला.

1956 मध्ये 245 कंपन्यांचे विलीनीकरण करून झाली LICची स्थापना

1956 पर्यंत भारतात 154 भारतीय विमा कंपन्या, 16 विदेशी कंपन्या आणि 75 भविष्य निर्वाह कंपन्या कार्यरत होत्या. 1 सप्टेंबर 1956 रोजी सरकारने या सर्व 245 कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC सुरू केले. त्यावेळी सरकारने पाच कोटी रुपये दिले होते.

1956 मध्ये LICची 5 क्षेत्रीय कार्यालये, 33 विभागीय कार्यालये, 212 शाखा कार्यालये आणि एक कॉर्पोरेट कार्यालय होते. कंपनीने वर्षभरातच 200 कोटींचा व्यवसाय केला. लोकांच्या या उदंड प्रतिसादामागे सरकारची हमी हे प्रमुख कारण होते.

1990च्या उदारीकरणातही दबदबा कायम राहिला

1990 पर्यंत भारतातील बहुतांश कंपन्यांवर सरकारची मक्तेदारी होती. 1991 नंतर हळूहळू सरकारी कंपन्या खासगी हातात गेल्या, पण सरकारने LICला हात लावला नाही. अनेक खासगी विमा कंपन्या असूनही LIC कडे भारतातील विमा बाजारपेठेचा दोन तृतीयांश हिस्सा आहे. ही कंपनी सुमारे 36 लाख कोटींच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करते. LICने लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे की येथे गुंतवलेले पैसे कधीही बुडणार नाहीत.

जीवन विमा म्हणजेच LIC रुजवण्यात जाहिरातींची भूमिका

  • 1970च्या दशकात LICची बाजारात मक्तेदारी होती. त्या काळातील जाहिरातीत दोन हातांमध्ये एका मुलाचा फोटो आहे. त्याला तुमच्या संरक्षणाची ऊब जाणवू द्या असे त्यात लिहिले होते.
  • दृकश्राव्य माध्यमे 1980 मध्ये आली होती. कंपनीने असा संदेश दिला की जीवन विमा म्हणजे LIC, ही गोष्ट लोकांच्या मनात घर करून बसली. त्या दिवसांत, दूरदर्शनवर दिसणार्‍या जाहिरातीची टॅगलाइन होती – रोटी, कपडा, घर आणि जीवन विमा.
  • 1990च्या उत्तरार्धात, LICने आपल्या ब्रँड प्रतिमेसाठी खूप प्रयत्न केले. 'ना चिंता, ना फिकीर' आणि 'जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी' अशा टॅगलाइनसह जाहिरात केली.
  • LIC ची 20 व्या शतकातील एक जाहिरात आहे. एक मुलगी बाजारात हरवते. तिचे वडील तिचा शोध घेत आहेत. अचानक ती बाजूला एका दुकानात दिसते. जाहिरात म्हणते- 'जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी'. 70च्या दशकातील हात आता उबदार मिठीत बदलला आहे.

LIC ही सरकारसाठी सावकाराच्या तिजोरीसारखी

जेव्हा जेव्हा सरकार अडचणीत येते तेव्हा LICचा वापर सावकाराच्या तिजोरीप्रमाणे केला जातो. 2015 मध्ये ONGCच्या IPO च्या वेळी LIC ने 10 हजार कोटींची गुंतवणूक केली होती. 2019 मध्ये जेव्हा कर्जबाजारी आयडीबीआय बँकेला वाचवण्याची वेळ आली तेव्हा LICने पुन्हा एकदा आपली तिजोरी उघडली.

सरकारने LICकडून घेतले 23 लाख कोटी रुपये

2019 मध्ये जारी केलेल्या RBIच्या आकडेवारीनुसार, LICने सुरुवातीपासून सरकारी क्षेत्रात 22.6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यापैकी 10.7 लाख कोटी रुपये 2014-15 ते 2018-19 या कालावधीतच गुंतवले गेले आहेत.

सध्या ही 100% सरकारी कंपनी आहे, पण आता 4 मे रोजी सरकार LICचे 3.4% शेअर्स विकणार आहे. अशाप्रकारे LICचा IPO सुमारे २१ हजार कोटी रुपयांचा असेल. आगामी काळात LIC कंपनीचे 10% स्टेक शेअर बाजारात विकण्याचा सरकारचा विचार आहे.

LIC कर्मचार्‍यांची काय आहे चिंता?

LICचे कर्मचारी सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करत आहेत आणि IPO काढण्यास विरोध करत आहेत. त्यांना त्यांच्या नोकरीची भीती वाटते. LICमधील सरकारी हिस्सेदारीमध्ये कोणतीही छेडछाड केल्यास या कंपनीवरील विमाधारकांचा विश्वास डळमळीत होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

IPOमुळे LIC पॉलिसीधारकांचीही धडधड वाढली आहे. मात्र, त्यांच्यावर कोणताही थेट परिणाम होणार नाही. स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यामुळे कंपनीच्या कामकाजात अधिक पारदर्शकता येईल. सरकारने म्हटले आहे की, ते पॉलिसीधारकांसाठी LICच्या IPO इश्यूमधून 10% शेअर्स राखीव ठेवतील.

बातम्या आणखी आहेत...