आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई लोकलला पर्याय ठरेल मेट्रो-3:लोकलची गर्दी 15%, तर रस्त्यावरील वाहने 35% घटणार; वाचा लाईन-3 विषयी सर्वकाही...

विश्वास कोलते22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईकरांना प्रवासासाठी लोकलशिवाय आणखी एक आरामदायी पर्याय म्हणून लवकरच सेवेत रुजू होणाऱ्या मेट्रो-3 ची पहिली चाचणी मंगळवारी घेण्यात आली. मेट्रो ही मुंबईच्या लोकलसाठीचा चांगला पर्याय म्हणून समोर येईल असे बोलले जात आहेत. वाहतूकीच्या समस्येमुळे चर्चेत राहणाऱ्या मुंबईसाठी ही मेट्रो किती महत्वाची आहे आणि तिची वैशिष्ट्ये तसेच फायदे-तोटे काय ते समजून घेऊया दिव्य मराठीच्या खास एक्सप्लेनर रिपोर्टमधून

आधी जाणून घेऊया मेट्रो-3 विषयी
प्रवासासाठी प्रामुख्याने लोकलवर अवलंबून असणाऱ्या मुंबईकरांना मेट्रोच्या रुपाने लवकरच एक नवा पर्याय मिळणार आहे. मुंबईत मेट्रोचे 146 किलोमीटर लांबीचे जाळे उभारण्याची योजना असून यात ९ कॉरिडोरचा समावेश असणार आहे. मेट्रो-3 ही त्यापैकीच एक आहे.

33 किमी लांबी, 27 स्थानके
मेट्रो-3 प्रकल्पाची लांबी 33.5 किमी असून 6 व्यावसायिक केंद्रे, 5 उपनगरीय रेल्वे स्थानके, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ व रेल्वेने न जोडलेले परिसर जोडले जातील
कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो मार्गिकेवर एकूण 27 स्थानके (26 भूमिगत व 1 जमिनीवर) आहेत

उत्तर-दक्षिण कनेक्टिव्हीटी
मेट्रो-3 चे वैशिष्ट्य म्हणजे ही मुंबईच्या भौगोलिक रचनेप्रमाणे उत्तर-दक्षिण अशीच धावणार आहे. म्हणजेच मुंबईतील रस्ते आणि लोकल अशा दोन्ही प्रमुख वाहतूक मार्गाला ही मेट्रो समांतर असणार आहे. त्यामुळेच या मेट्रोमुळे मुंबईतील उत्तर-दक्षिण मार्गावरील रस्ते वाहतूकीचा आणि लोकलवरील ताण कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सध्या मुंबईत सुरू असलेली वर्सोवा ते घाटकोपर ही मेट्रो पूर्व-पश्चिम अशी आहे.

मेट्रो-3 साठी खर्च
प्रकल्पासाठी अंदाजे 23,136 कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे. यापैकी 13,325 कोटींचे अर्थसहाय्य जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेने अल्प व्याजदराने केले आहे. तर केंद्र व राज्य सरकारने प्रत्येकी 2403 कोटींचे अर्थसहाय्य केले आहे.

असे असतील मेट्रोचे डबे
मेट्रोचे डबे वजनाने हलके असतील. याची रुंदी 3.2 मीटर इतकी असेल तर अॅक्सलचे वजन 17 टन असेल. एअर ब्रेकिंग प्रणालीमुळे मेट्रोचा प्रवास अधिक सुरक्षित होईल. प्रत्येक डब्यात दोन एसी असतील. तर दरवाजे हे चालकाच्या केबिनमधून रिमोटद्वारे नियंत्रित होतील. डब्यांमध्ये अधिकाधिक प्रवासी बसू किंवा उभे राहू शकतील अशी व्यवस्था असेल. एका मेट्रो गाडीतून 2500 प्रवासी प्रवास करू शकतील. मेट्रोचा वेग प्रती तास 90 किमी असेल. तर सर्व थांब्यांसाह हा वेग प्रती तास सरासरी 35 किमी असेल.

17 लाख प्रवासी संख्या
मेट्रो-3 मधुन सुरूवातीला अंदाजे 13 लाख तर 2030 पर्यंत सुमारे 17 लाख प्रवासी प्रवास करतील

अडीच मिनिटांना असेल मेट्रो
सुरूवातीला मेट्रो-3 मार्गावर कुलाबा ते वांद्रेदरम्यान दर साडेतीन मिनिटांनी एक गाडी असेल. तर वांद्रे ते सिप्झदरम्यान दर 7 मिनिटांनी एक गाडी असेल. 2031 पर्यंत ही वेळ अनुक्रमे दर अडीच मिनिटे आणि पाच मिनिटांवर येईल.

जलद तिकिटे मिळणार
तिकिटासाठी रांगा लावाव्या लागू नये यासाठी AFC म्हणजेच ऑटोमेटिक फेअर कलेक्शन म्हणजेच स्वयंचलित भाडे संग्रहण प्रणालीचा वापर केला जाणार आहे. यामुळे जलदगतीने तिकिटे काढता येतील. तसेच महसूली नुकसानीची शक्यता शून्य असेल.

अत्याधुनिक स्थानके
स्थानकांच्या बांधणीसाठी ग्रॅनाईट, काच आणि स्टेनलेस स्टीलचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. ही स्थानके अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असतील. या स्थानकांमध्ये स्मार्ट प्रकाशयोजना असेल. मेट्रोच्या सर्व स्थानकांवर अत्याधुनिक लिफ्ट आणि सरकते जिने उपलब्ध असतील. अपघात टाळण्यासाठी फलाटांना सरंक्षक दरवाजे बसविण्यात येतील. महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जाईल. टोकन / स्मार्ट कार्डसाठी रुंद मार्गिका व स्वयंचलित तिकीट यंत्रे असतील.

बोगद्यांचे खोदकाम
संपूर्णपणे भूमिगत मेट्रो असल्याने खोदकाम व बोगदे करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. आधुनिक TBM द्वारे याच्या बोगद्याचे खोदकाम करण्यात आले. बोगदे खोदण्यासाठी नवीन ऑस्ट्रीयन खोदाई पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. मेट्रोच्या बोगद्यांमध्ये वायुवीजन आणि वातानुकुलन म्हणजेच VAC प्रणालीचा वापर केला जाणार आहे.

झिरो इमिशन
मुंबई मेट्रो -3 ही शून्य कार्बन उत्सर्जन करणारी संपूर्णपणे वीजेवर चालणारी व्यवस्था असेल. 25 किलो वॅट एसी कर्षण पुनर्निर्मित ब्रेकिंग प्रणालीचा वापर केला जाईल. मेट्रो-3 मुळे दरवर्षी 50 कोटींइतक्या उर्जेची बचत होईल.

मेट्रो-3 मुळे हे बदल अपेक्षित
आरामदायी प्रवास
सध्या मुंबईत ये-जा करण्यासाठी लोकल हा एकमेव पर्याय आहे. लोकल रेल्वेतून क्षमतेच्या चौपट प्रवाशांची वाहतूक होत असल्याने यात प्रचंड गर्दी असते. मेट्रो-३ मुळे ही गर्दी १५ टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे. एसी असल्याने प्रवास आरामदायी होईल.

न जोडलेले भाग जोडले जातील
मेट्रो-३ मुळे कुलाबा, नरीमन पॉईंट, वांद्रे-कुर्ला संकुल, फोर्ट, लोअर परेल, गोरेगाव ही आर्थिक केंद्रे जोडली जातील. कफ परेड, काळबादेवी, वरळी, विमानतळ, सिप्झ आणि एमआयडीसीही प्रथमच जोडले जातील. चर्चगेट व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसही यामुळे जोडली जातील.

कुलाबा पुन्हा रेल्वेच्या नकाशावर येणार
मेट्रो-३ मुले कुलाबा स्थानक पुन्हा रेल्वेच्या नकाशावर येईल. १८७३ मध्ये सुरू झालेले कुलाबा स्थानक १९३० मध्ये बंद करण्यात आले होते. मेट्रो-३ मुळे कुलाबा ८५ वर्षांनंतर रेल्वेच्या नकाशावर येणार आहे.

रस्त्यांवरील कोंडी कमी होणार
मेट्रो -३ मुळे रस्त्यावरील रहदारी सुमारे ३५% नी किंवा वाहनसंख्या सुमारे ४.५० लाखांनी कमी होऊन रस्त्यांवरील कोंडी कमी होईल. दररोज ४.५० लाख वाहने रस्त्यावर येणार नसल्यामुळे रोज २.५ लाख लिटर इंधनाची म्हणजे वर्षाला रु ५५० कोटी बचत होईल

प्रवासाच्या वेळेत घट
सध्या कफ परेड ते विमानतळ हे अंतर कापण्यासाठी १०० मिनिटे लागतात. मेट्रो -३ हे अंतर ५० मिनिटांवर येईल.

आता जाणून घ्या मेट्रो-3 च्या घोषणेपासून ते पूर्णत्वास येण्यापर्यंतचा इतिहास

मेट्रो-३ च्या प्रवासातील महत्वाचे टप्पे

  • जानेवारी २००४ - मुंबई मेट्रोच्या मास्टर प्लॅननुसार एमएमआरडीएकडून कुलाबा ते वांद्रे अशा २० किमीच्या मार्गावर मेट्रो-३ ची घोषणा
  • २०११ - मेट्रो-३ चा मार्ग कुलाबा-वांद्रेपासून पुढे सिप्झपर्यंत वाढवण्याची घोषणा
  • फेब्रुवारी २०१२ - केंद्र सरकारची मेट्रो-३ ला प्राथमिक मंजुरी
  • जून २०१३ - मेट्रो-३ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
  • फेब्रुवारी २०१४ - एमएमआरडीएने मेट्रोचा प्लॅन बीएमसीसमोर सादर केला
  • फेब्रुवारी २०१४ - मेट्रो-३ ला राज्य मत्रिमंडळाची मंजुरी
  • ऑगस्ट २०१४ - मेट्रो-३ च्या कामाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते भूमिपूजन
  • त्यानंतर डिसेंबरमध्ये मेट्रो-३ च्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात

एकूणच मुंबईकरांसाठीची ही बहूप्रतिक्षित मेट्रो घोषणेच्या सुमारे 18 वर्षांनंतर सेवेत रुजू होणार आहे. त्यामुळे या मेट्रोबद्दल मुंबईकरांना मोठी उत्सुकता आहे. आता लवकरात लवकर मेट्रो कारशेड पूर्ण होऊन प्रत्यक्ष मेट्रोची सेवा सुरू व्हावी अशी अपेक्षा मुंबईकर व्यक्त करत आहेत. आधीच 18 वर्षांपासून वाट बघत असल्याने आता यात आणखी विलंब नको अशीच मुंबईकरांची भावना आहे.

बातम्या आणखी आहेत...