आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नाटक ‘अनलाॅक’साठी हवे ‘लाइव्ह टेलिकास्ट’; दिग्दर्शक संदीप जंगम यांनी अ. भा. नाट्य परिषदेसमोर मांडली संकल्पना

अतुल पेठकर | नागपूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोबाइल, लॅपटाॅप, टीव्ही, ओटीटीवर प्रक्षेपण; असे मिळेल उत्पन्न

काेरोना महामारीत नाट्यकलेचे खूप मोठे नुकसान होत आहे. यापुढे कोरोनाचा प्रभाव कमी झाला वा संपुष्टात आला तरी प्रत्यक्ष नाट्यगृहात येऊन नाटक पाहणारा प्रेक्षकवर्ग कमीच असेल. यावर उपाय म्हणून नाट्यगृहात नाटक सादर करून त्याचे थेट (लाइव्ह) प्रक्षेपण करण्यात यावे, अशी संकल्पना दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता संदीप रामचंद्र जंगम यांनी अ. भा. नाट्य परिषदेसमोर मांडली आहे.

यासंदर्भात नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी म्हणाले, कार्यकारिणीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. जंगम म्हणाले, रसिकांसमोर चित्रपट, दूरदर्शन, मालिका, वेबसिरीज, डिजिटल मीडिया असे पर्याय उपलब्ध असल्याने नाट्यकलेची घुसमट होत आहे. या पडत्या काळातही नाट्यसृष्टीला उभारी यावी म्हणून लाइव्ह टेलिकास्ट हा चांगला पर्याय ठरेल.

असे होईल थेट प्रक्षेपण

जंगम म्हणाले, नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग सुरू असताना त्या प्रयोगाचे थेट प्रक्षेपण मोबाइल, लॅपटाॅप, टीव्ही, ओटीटीवर करून ते जगभरात पोहोचवता येईल. यात प्रत्येक प्रयोगाचे प्रक्षेपण नव्याने आणि विशिष्ट वेळेतच असेल. त्यानंतर पुढील थेट प्रक्षेपणापर्यंत नाटकाची कोणतीही लिंक उपलब्ध होणार नाही. नाट्यगृहात नाटक सुरू असताना कोरोना नियमांचे पालन करीत ठरावीक प्रेक्षकांना ठरावीक रक्कम देऊन नाटक पाहता येईल. आपण प्रत्यक्ष नाट्यगृहात नाटक पाहतोय अशा पद्धतीने चित्रित करण्यात येईल. त्यामुळे नाटकाची शैली, त्यातील नाट्यमयता, बलस्थाने याला कुठेही धक्का पोहोचणार नाही.

असे मिळेल उत्पन्न

डिजिटल मीडियावर बुकिंग केल्यानंतर एक लिंक पाठवण्यात येईल. त्यावर नाटक पाहता येईल. यूट्यूबवरही अशा पद्धतीने नाटक पाहता येईल. यातून नफा कमावता येईल. नाटक डिजिटल माध्यमातून पोहोचणार असल्यामुळे प्रायोजक, जाहिरातीतून उत्पन्न मिळेल. यात रसिक नेहमीप्रमाणे तिकीट काढून प्रयोगाला येऊ शकतात.

चर्चा करून नेमके प्रारूप ठरवता येईल

नाटक पाहण्यापेक्षा न बघणाऱ्यांची संख्या मोठी. दहामध्ये सहा ते सात लोकांनी नाटक पाहिलेले नसते. असा मोठा वर्ग यामुळे जोडला जाईल. गावाकडे होणारी नाटके यामुळे जगभरात जाऊ शकतात. नाटकाचे दौरे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्याला हा चांगला पर्याय हाेऊ शकतो. नाट्य परिषद आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून नेमके प्रारूप ठरवता येईल. - संदीप रामचंद्र जंगम, दिग्दर्शक व लेखक

बातम्या आणखी आहेत...