आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:मासेमारीच्या व्यवसायाचा नांगरही लॉकडाऊनच्या चिखलात रुतला

एका महिन्यापूर्वीलेखक: दिप्ती राऊत
  • कॉपी लिंक
  • मासेमारीवर बंदी आली आणि, शेकडो नाखवे, जाळीवाले, हजारो खलाशांच्या पोटावर पाय

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ला हे तीन तालुके, रत्नागिरी जिल्ह्यातील मिऱ्या, हर्णे आणि नाटे या तीन बंदरे आणि रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरुड या तालुक्यांच्या किनारपट्टीची गावे, ठाणे, पालघर जिल्ह्यांमधील समुद्रालगतच्या गावांंची भिस्त मासेमारी व्यवसायावर. दरवर्षी पावसाळ्यात नांगर टाकणाऱ्या कोळ्यांच्या होड्या यंदा मार्चपासूनच बंदराला लागल्या आहेत. एकीकडे माशांची निर्यात बंद झाल्याने मासेमारी उद्योगाला बसलेली आर्थिक झळ आणि दुसरीकडे पर्यटन बंदी झाल्याने स्थानिक बाजारात घटलेली मागणी यामुळे मासेमारी उद्योगावर विपरित परिणाम झालाय.

एरवी पावसाळ्यापूर्वी बोटी बंदरावर नांगरून ठेवण्याचे काम त्यांना यंंदा दोन महिने आधीच करावं लागलं होतं. लॉकडाऊन जाहीर झालं आणि माशांची निर्यात, आंतर-राज्य व्यापार आणि स्थानिक उलाढालही ठप्प झाली. शासनानं मासेमारीवर बंदी आणली आणि चंद्रकांत बंदरकरांसारखे शेकडो नाखवे, हजारो खलाशी आणि शेकडो जाळीवाल्यांच्या पोटावर पाय आलाय, बोटीवर न गेल्यानं फाटलेलं जाळं शिवत बसलेले राजा आणि गजानन काशीकर सांगत होते.

कोळणींच्या हाकाट्यांनी दणाणून जाणारा मुरुडचा मच्छिबाजार अंगावर येत होता. बऱ्याच दिवसांनी गिऱ््हाईक आलं वाटून सगळ्या कोळणींनी एकच गलका केला. मथुरा कोळीण पाचशे रुपयांची कोलंबी दोनशे रुपयात द्यायाला तयार झाली. ‘चार महिन्यांपासून असंच चाललंय’, लॉकडाऊनचा विषय काढताच तिनं सुस्कारा सोडला. दिवसाला पाच हजाराचा धंदा व्हायचा तिथं दिवसाला पाचशेही मिळत नाहीत. ती सांगत होती. पाटीवर पाणी शिंपडून मासे ताजे ठेवण्याचा प्रयत्न करत होती. उन्हामुळे कोमेजलेल्या मथुरा कोळणीच्या पाटीतील माशांगत कोकणातील मासेमारीचा व्यवसायाचा नांगरही लॉकडाऊनच्या चिखलात पुरता रुतलाय. खाडीत सापडणारे मासे खारवणे किंवा स्वस्तात संपवणे एवढाच त्यांच्यापुढे पर्याय आहे. दोन्हीत नुकसान सारखेच.

कोळीवाड्यातून फिरताना नेहमीची लगबग दिसत नव्हती. कुणी फाटलेली जाळी विणत बसलं होतं, कुणी बोटीची डागडुजी. उत्साह मात्र कुणाच्याच चेहऱ्यावर नव्हता. सगळ्यांना एकच चिंता, आजचा दिवस सरला, उद्याचं काय?

अवैध मात्र सुरळीत

लॉकडाऊनमुळे मासेमारी बंद झाली आणि समुद्रात बोटी घालणाऱ्या स्थानिक मच्छिमारांना पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद मिळाला. त्याचवेळी शेजारील राज्यांमधील ट्रॉलर्स, पर्सनेट आणि एलईडी ही अवैध मासेमारी मात्र राजरोसपणे सुरू असल्याचे स्थानिक अभ्यास रविकिरण तोरसकर सांगतात. मोठ्याप्रमाणात मासे मिळवणाऱ्या ट्रॉलर्स, पर्सनेट आणि एलईडीमुळे मत्सबिजांची हानी आणि पारंपरिक मासेमारी करण्याचींची उपासमार होत असल्याने कायद्याने बंदी आहे. या लॉकडाऊनचा फटका पारंपरिक मासेमारी करणाऱ्या लहान मच्छिमारांना बसला कारण ते पोलिस बोटींच्या आवाक्यात होते पण अवैध मासेमारी खुलेआम सुरू असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मच्छिमारांच्या जिवाशी खेळ

कोकणातील मच्छिमारांसाठी शासनाने २५ कोटींचे पॅकेज जाहीर करावं अशी आम्ही मागणी केली आहे. फक्त लॉकडाऊन आणि निसर्ग चक्रीवादळच नाही तर गेल्या वर्षी १ ऑगस्टपासून आमचा मोसम वाया गेला आहे. कधी फयान वादळाचा फटका बसला तर कधी पेट्रोकेमिकल कंपन्यांसाठी एकेक महिना मासेमारी बंद ठेवण्यात आली. आता लॉकडाऊनमुळे सरकारने मासेमारी बंद केली तर मच्छिमारांना भरपाई देणे सरकारचे कर्तव्य आहे. २८ मार्चला केंद्रीय मत्स्य विकास मंत्रालयाने मासेमारीवर बंदी आणली, १ मे ला ती उठवली, आता पुन्हा तीन महिने बंद केले. या साऱ्यात मच्छिमारांच्या जिवाशी खेळ होतोय. किरण कोळी, सरचिटणीस, महाराष्ट्र मच्छिमार सोसायटी.

नॅशनल फिशवर्कर्स फोरमच्या पाहणी दौऱ्यात नोंदलेेले नुकसान

> २० मासेमारी नौकांचे पूर्ण तर ३०० नौकांचे अंशत: नुकसान

> राजापुरी बंदरातील ५० टक्के घरांना वादळाचा मोठा फटका

> महाराष्ट्र मच्छिमार संघटनेने नुकसानीबाबत केलेल्या मागण्या

> बोट मालकाला महिना ५० हजार रुपयांप्रमाणे तीन महिने साहाय्य

> खलाशाला १५ हजार रुपये महिना याप्रमाणे तीन महिने साहाय्य देण्यात यावे.

> कोळीण, मेकॅनिक, सुतार यांच्या कुटुंबांना १० हजार महिना याप्रमाणे साहाय्य द्यावे.

0