आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लॉकडाऊनमुळे व्यवसायाचा ‘बँडबाजा’; रिकाम्या वेळेचा सदुपयोग करत बाप-लेकाने ५ दिवसांतच खोदली विहीर

नांदेड (विनायक एकबोटे)2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • किनवट तालुक्यातील मुळझरात १६ फुटांवरच पाणी, गावकऱ्यांचीही चिंता मिटली

लॉकडाऊनमधील रिकाम्या वेळेचा काहींनी चांगला सदुपयोगही करून घेतला आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मुळझरा येथील बाप-लेकाने लॉकडाऊन काळात असे काम केले की आता त्यांच्या पाण्याचा प्रश्न तर मिटलाच, शिवाय गावकऱ्यांनाही पाण्याचा स्रोत उपलब्ध झाला आहे. तब्बल पाच दिवस सलग काम करत सिद्धार्थ व पंकज देवके यांनी घराच्या बाहेरच विहीर खोदली. अवघ्या १६ फुटांवर त्यांना पाणीही लागले. 

सिद्धार्थ यांचा बँडबाजाचा व्यवसाय आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर त्यांचे काम पूर्णत: बंद झाले. गावात अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. पाण्याची परवड थांबावी असा विचार करत सिद्धार्थ व पंकज यांनी घरासमोरील छोट्या जागेत विहीर खोदायला सुरुवात केली. दोघांनी जिद्दीने हे काम सुरू केले. अवघ्या पाच दिवसांमध्ये त्यांच्या या कामाला यश आले आणि १६ फुटांवरच विहिरीला पाणी लागले. 

मिळेल त्या साहित्याने खोदकाम :

मुळझरा हे किनवट तालुक्यातील अत्यंत दुर्गम गाव आहे. गावात कोणत्याही सुविधा नाहीत. सिद्धार्थ व पंकज यांनी विहीर खोदण्याच्या निर्णय घेतला खरा पण घरात काहीच नव्हते. मग त्यांनी कुदळ, फावडे अशा मिळेल त्या साहित्याने पाच दिवसांत विहीर खोदली. 

पाणी समस्या शांत बसू देईना

गावात पाण्याची मोठी समस्या आहे. लॉकडाऊन काळात हाताला काम नव्हते. पाण्याचा प्रश्न कसा सोडवावा यावर विचार केल्यावर पोरानेही विहीर खोदण्याची कल्पना मान्य केली. मग पाच दिवसांत दोघांनी मिळून विहीर खोदली. आता पाण्याचा प्रश्न तरी मिटला. - सिद्धार्थ देवके, बँडबाजा चालक

बातम्या आणखी आहेत...