आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रामनवमी विशेष:प्रभू श्रीराम मनुष्यत्वाचे ‘इम्युनिटी बूस्टर’, कुशल व्यवस्थापनाचे मार्गदर्शक

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. कुमार विश्वास
कोरोना काळाने आपल्याला वेगवान जीवनात थोडेसे थांबून विचार करण्यासाठी वेळ दिला आहे. आपल्याला आपल्या तीव्र इच्छा जवळून पाहण्याची संधी मिळाली आहे. भीती आणि अनिश्चिततेत व्यतीत होत असलेल्या या काळात आपल्याला एक सहारा गरजेचा आहे. जीवनातील या परिस्थितीत आपल्याला आश्वस्त राहण्यासाठी मार्ग दाखवू शकेल असा सहारा. आयुष्यातील घनघोर अंधार सूर्याप्रमाणे भेदण्यात समर्थ असेल असा एक नायक. भारतीय संस्कृतीत अवतारांच्या धारणेच्या केंद्रस्थानीही हीच गरज आहे. अवतार म्हणजे ईश्वराने बनवलेल्या सृष्टीत दिव्यतेबाबत परम विश्वासाचे पावन प्रतीक. ज्या काळात जग प्रतिकूलतेशी झुंजत आहे, निराशेचे ढग मनाला सतत विचलित करत आहेत, अशा वेळी सूर्य-वंशी भगवान राम अत्यंत प्रासंगिक ठरतात. राम हे एक असे देव आहेत, जे दु:खासारख्या मन:स्थितीच्या कुशल व्यवस्थापनाचा मार्ग प्रशस्त करतात. रामकथा मनुष्यत्वाची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इम्युनिटी वाढवते.
रामकथाही असे म्हणते -
एक बान काटी सब माया। जिमि दिनकर हर तिमिर निकाया।।

हा ‘एक बाण’ सात्त्विकतेचा आहे, तो आपले पौरुष आणि संकल्पातील सुदृढ विश्वासाचा आहे. ‘रमेति इति राम:’ रामाचा अर्थ बंधनमुक्त होऊन परम चेतनेच्या आकाशात रमणे असा आहे. बंधनमुक्त होऊन रमण करणाऱ्या नारायणाचा अवतार कुठे असेल? याचा विचार करा. त्याचे उत्तरही श्रीरामांचे पिता महाराज दशरथ यांच्या नावात आहे. ‘दशरथ’ या नावाचा अर्थ आहे- दहा रथांचा नियंता म्हणजे जी व्यक्ती पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये यांच्यात एक सम्यक संतुलन कायम करू शकते, ती व्यक्ती म्हणजे दशरथ. ईश्वर त्यांनाच आपल्या प्रकट होण्याचे माध्यम बनवेल. हे सम्यक संतुलन कुशलतापूर्वक धारण करण्याचे सामर्थ्य बाळगते अशा कौसल्येच्या घरातच राम जन्म घेतील.

राम हीच एक जीवनदृष्टी आहे. ते आपल्या फक्त कृपादृष्टीने सर्व काही चांगले करीन असा दावा करत नाहीत, तर आपल्या मर्यादित पौरुषाद्वारे सर्व काही सांभाळण्याची कला शिकवतात. सोन्याचा किल्ला आणि निसर्गपुत्र यांच्यातील युद्धात नेहमी सामान्य माणूसच जिंकतो याचे प्रतीक म्हणजे राम. निसर्गाच्या साहचर्याच्या साहाय्याने परम वैभवाला अत्यंत सहजपणे पराभूत करता येऊ शकते, हेच रामकथा आपल्याला सांगते.

श्रीरामांचे संपूर्ण सैन्यदल लोककौशल्याचा अद्भुत संग्रह आहे. युद्ध रामाचे आहे, पण एक सामान्य वानरही नखे आणि दातांच्या साहाय्याने रावणाला पराभूत करण्यासाठी सज्ज आहे. विश्वातील सर्वात मोठ्या योद्ध्याला पराभूत करण्यासाठी राम शेजारच्या राजांची मदत घेण्याऐवजी वंचित आणि वनवासींची मदत घेतात. रामाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते कुठेही अति चमत्कारिक असल्याचे दिसत नाहीत. ते मानवी भावनांशी लढण्याऐवजी त्यांचा सन्मान करावा, अशी शिकवण देतात. ते संपूर्ण मानवजातीला आपला मूळ स्वभाव कायम ठेवून देवत्वाच्या बरोबरीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतात. रामाबाबत कितीही बोलले तरी ते कमीच आहे. मी माझ्या या प्रिय कवितेच्या काही ओळींसह येथेच थांबतो... राम आराध्य भी हैं और आराधना भी! राम साध्य भी हैं और साधना भी! राम मानस भी हैं और गीता भी! राम राम भी हैं और सीता भी! राम धारणा भी हैं और धर्म भी! राम कारण भी हैं और कर्म भी! राम युग भी हैं और पल भी! राम आज भी हैं और कल भी! राम गृहस्थ भी हैं और संत भी! राम आदि भी हैं और अंत भी!

आज ज्या आत्मशिस्तीची गरज आहे, श्रीराम त्या कौशल्याचे सिद्ध महारथी
आज जर कोरोनाला खर-दूषणाची संज्ञा दिली तर या खर-दूषणाला आपल्या आध्यात्मिक चेतनेचे अपहरण करता येणार नाही याकडेच आपल्याला लक्ष द्यावे लागेल. श्रीरामांनी संपूर्ण युद्धादरम्यान विचलित करणाऱ्या क्षणांतही परिस्थितीला आपल्या चेतनेचे अपहरण करू दिले नाही. सात्त्विकतेवर ठाम राहणाऱ्या श्रीरामांनी समोरची व्यक्ती सतत अमर्यादित आहे हे पाहूनही आपली मर्यादा निष्ठा कायम राखली. आज कोरोनाशी लढण्यासाठी याच धोरणाचे पालन करावे लागेल. साधनांवर अवलंबून राहिल्याने आणि त्यांची संख्या वाढवल्याने काही विशेष होऊ शकत नाही. कारण एवढ्या मोठ्या लोकसंख्येत प्रत्येक व्यक्तीसाठी एक विशेष डॉक्टर उपलब्ध करून देणे अशक्य आहे. ही लढाई आपल्याला स्वत:चा संयम व आत्मशिस्त यांच्या बळावरच लढावी लागेल. लोकांना आपल्या संरक्षणासाठी मर्यादेत आणि सतत सिद्ध राहावे लागेल. ही मर्यादा आणि आत्मसंयमातून जन्मलेल्या कौशल्याचे सिद्ध महारथी म्हणजे भगवान राम. फारसीत एक म्हण आहे ‘राम कर्दन,’ तिचा अर्थ आहे- ‘प्रेमाने वश करून घेणे.’ भगवान रामाला प्रेम सर्वात प्रिय आहे. राम आपल्या संपूर्ण जीवनात फक्त प्रेमानेच वश झाले आहेत. तुलसीदास तर म्हणतात की-‘रामहि केवल प्रेम पियारा|’हे प्रेमच रामकथेचे सार आहे, ते अगदी फारसी संस्कृतीतही पोहोचले आहे.

भारतात नैराश्य नाहीच, कारण आपण भावनिक शक्ती श्रीरामांकडून घेतली
मी युरोपमधील सर्व देश फिरलो आहे, रोम पाहिले आहे, लंडनच्या गल्ल्यांमध्ये सुंदर सायंकाळ व्यतीत केली आहे. अपार वैभव आणि अगाध संपन्न असलेले हे सर्व देश कोरोना काळात त्राहि त्राहि करत होते. संपन्नतेच्या शिखरावर बसलेले लोक कोरोना काळात महामारीपेक्षा निराशेमुळे जास्त त्रस्त दिसले. आपल्या देशात त्या देशांसारख्या आरोग्य सुविधा नाहीत. तरीही भारतातील लोक निराश झाले नाहीत. या संकटाच्या काळातही आपण आपल्या शेजाऱ्यांचा हात धरून ठेवला. स्वत: आर्थिक अभावात असूनही इतरांना शक्य होईल तितकी मदत केली. साधनांची कमतरता असूनही भावनात्मकदृष्ट्या सबळ राहण्याचे हे रहस्य भारतीयांनी रामकथेतूनच शिकले असावे. लॉकडाऊनला अभिशाप मानणारे जग त्याला बंधन समजत आहे, पण बंधनात राहणे म्हणजे बाध्य होणे नाही हेच रामकथा शिकवते. माता सीताही जेव्हा रावणाच्या अशोक वाटिकेत होती तेव्हा बंधनात होती, पण क्रूर मानसिकतेच्या त्या राजधानीत असूनही माता सीतेची सात्त्विकता वैभवशाली तामसिकतेसमोर बाध्य नव्हती. त्यामुळेच आज कोरोना काळात रामकथा अत्यंत प्रासंगिक आहे. ती या भीषण संकटात आत्मबळ सुरक्षित ठेवण्याचे रहस्य आपल्याला उलगडून दाखवते.

बातम्या आणखी आहेत...