आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Madhurima Special Article | Marathi News | Madhurima Special Article Vrusha Deshpande | Mother Tongue: A Free Thought

मधुरिमा स्पेशल:मातृभाषा : एक मुक्त चिंतन

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मातृभाषा आपल्या अस्तित्वाला ओळख, आकार आणि व्यक्तित्वाला समृद्धी देते. बहुभाषिकता आवश्यक असली तरी ज्याची मातृभाषा पक्की तो परभाषा सहज आत्मसात करू शकतो. बहुभाषिकता ही काळाची गरज असेल, तर मातृभाषेची जपणूक ही माणसाच्या अस्तित्वाची गरज आहे. २१ फेब्रुवारी या जागतिक मातृभाषा दिनानिमित्त मातृभाषेच्या आवश्यकतेची अभ्यासपूर्ण मांडणी करणारा लेख...

जगभरात २१ फेब्रुवारी हा ‘जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. बांगला भाषेला अधिकृत दर्जा मिळावा यासाठी २१ फेब्रुवारी १९५२ रोजी ‘ढाका विद्यापीठा’तील विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी तत्कालीन पाकिस्तान सरकारच्या भाषा नीतीला जोरदार विरोध करत आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या युवकांच्या स्मृतिनिमित्ताने युनेस्कोने पहिल्यांदा १९९९ मध्ये हा दिवस ‘मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश जगभरात भाषा आणि संस्कृतीप्रति जागरूकता निर्माण करणे हा असतो. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी २१ फेब्रुवारीला ‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा केला जातो.

जागतिक मातृभाषा दिनाला – ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’, ‘टंग डे’, ‘मदर लँग्वेज डे’, ‘मदर टंग डे’, ‘लँग्वेज मूव्हमेंट डे’ आणि ‘शहीद दिवस’ या नावानेदेखील ओळखले जाते. जगभरात शांततेला, बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व मातृभाषांचे संरक्षण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मानवी संस्कृतीच्या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी भाषा हे सर्वात शक्तिशाली साधन आहे. कालच साजऱ्या झालेल्या ‘जागतिक मातृभाषा दिना’बाबत विचार करत असताना अनेक प्रकारच्या विचारांची गर्दी मनामध्ये झाली आणि मग आपल्या सर्वांशी संवाद साधावा वाटला. सगळ्यात पहिला खट्याळ प्रश्न मनामध्ये आला - कुटुंबाच्या आनुवंशिकतेतून, जन्मजात मिळणाऱ्या भाषेला ‘मातृभाषा’ का म्हणत असावेत, ‘पितृभाषा’ का नाही? आणि मग विचार करताना जाणवले, ‘स्त्रीत्व-मातृत्व-मातृभाषा’ यांचे काही एक शाश्वत नाते समाजाने अनुभवलेले असले पाहिजे. त्या अनुभव-संचितातून ‘मातृभाषा’ ही एक संज्ञा-संकल्पना साकारली असावी. ‘मातृत्व’ म्हणल्यानंतर स्वाभाविकच स्त्रीची सृजनशीलता, वात्सल्य, संस्कार देणारी-शिस्त लावणारी वृत्ती, घरादाराला आणि पर्यायाने समाजाला पुढे नेणारी कर्तव्यदक्षता, राष्ट्राला शूरवीर संतती देणारी माता आणि विश्वबंधुत्वाचे पाठ देणारी माउली अशा प्रकारच्या स्त्रीच्या अनेक भूमिका माझ्यासमोर आल्या. कदाचित हीच संवेदनशीलता आणि व्यापकता ‘मातृभाषे’मध्ये अपेक्षित असावी.

जगात प्रत्येकाला आई असते. ती आपल्या आनंदाचा, अभिमानाचा, जीवनाधाराचा भाग असते. बालपण असं असतं की, ‘आई म्हणेल तेच खरं’. औपचारिक शिक्षण सुरू झाल्यानंतर, ‘बाई म्हणतील तेच खरं’. या औपचारिक शिक्षणाचे माध्यम मातृभाषाच असली पाहिजे, हे सैद्धांतिक पातळीवर जगन्मान्य आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अंक आणि अक्षरज्ञानाच्या पलीकडे जाऊन ज्या सृजनशील ज्ञानाची व ज्ञानोपासकांची अपेक्षा केलेली आहे, त्याची बीजे ‘मातृभाषेतून शिक्षण’ या संकल्पनेत आहेत. शिक्षणाने मातृभाषेशी फारकत घेतल्याने आपल्या देशाला काय किंमत मोजावी लागलेली आहे हे एकदा गांभीर्याने समजून घेतले पाहिजे.

‘यंग इंडिया’च्या १ सप्टेंबर १९२१ च्या अंकात म. गांधीजींनी स्पष्ट लिहिलेले आहे, ‘परकीय माध्यमामुळे बालकांचा मेंदू थकतो आणि बुद्धीला मांद्य येते. त्यामुळे ती केवळ घोकंपट्टी आणि पोपटपंची करतात. परिणामी मूलभूत विचार व संशोधन याकरिता ती अपात्र बनतात. आपल्या ज्ञानाचा लाभ ती कुटुंबाला किंवा समाजाला दे‌ऊ शकत नाहीत. जर मी हुकूमशहा असतो, तर परकीय माध्यमातून होणारे बालकांचे शिक्षण आजच थांबवले असते आणि त्यांनी हा बदल अमलात आणला नाही, तर शिक्षक-प्राध्यापकांना सेवामुक्त केले असते.’

कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात थोर तत्त्वचिंतक रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते, ‘बालकाची भाषा आणि शिक्षणाची भाषा यांच्यात फारकत केलेला जगात भारताशिवाय दुसरा कोणताही देश नाही. पाश्चात्त्य ज्ञानाकडे वळून जपानला पुरती शंभर वर्षेही लोटली नाहीत. आरंभी त्यांना पाश्चात्त्य पाठ्यपुस्तकांचा आधार घ्यावा लागला, पण शिक्षणाकरिता स्वदेशीवरच निर्भर राहायचे असा त्यांचा निर्धार होता. कारण शिक्षण त्यांना निवडक नागरिकांपुरते आणि शोभेसाठी नको होते. पाश्चात्त्यांच्या शोषणप्रवृत्तीला तोंड देणे आणि जगात स्वत:साठी मानाचे स्थान उभारण्याकरिता हवे होते. म्हणून फारच थोड्यांच्या आवाक्यात ये‌ऊ शकेल असे परकीय भाषा माध्यम चालू ठेवण्याचा मूढपणा त्यांनी मुळीच केला नाही.’

काही जणांना वाटते, मातृभाषेतून शिक्षण घेऊन आयुष्याचे सगळे प्रश्न सुटत नाहीत. मग संस्कृतीचा दाखला देत ते म्हणतात, ‘माय मरो मावशी उरो, अशी आमची संस्कृती सांगते.’ मी जेव्हा मातृभाषेसोबत तिच्या भाषाभगिनींचा विचार करते त्या वेळेला मला वाटायला लागते, ‘आई, आत्या, मावशी, काकू, आजी अशा सगळ्या जणी आपल्याला हव्याच असतात ना. आई आहे म्हणून ही नको, ती नको असे नाही म्हणत आपण. प्रत्येकीशी आपलं एक वेगळं नातं असतं. मग पाहुण्या भाषेसह प्रत्येक भाषेशी असं आत्मीयतेचं नातं आपल्याला सहज जोडता येऊ शकतं... आईची उपेक्षा न करता.’

कधी कधी मला भाषा देवाचे स्वरूप भासते. अनादी आणि अनंत वाटते. कारण मानवी जीवनाच्या सुरुवातीपासूनचा सगळा भाग ती संचितासारखा आपल्या पुढ्यात आणून ठेवते. भाषा आपल्याला भूतकाळाचे भान देते, वर्तमानाची जाणीव देते आणि भविष्याची आस लावते. आम्ही जेव्हा बेसावध म्हणजे झोपेमध्ये असतो तेव्हासुद्धा भाषा मेंदूत कार्यरत असते. ती दृश्यरूपांमध्ये आमच्या स्वप्नामध्ये येते. ती दृश्य स्वरूपात स्वप्नात असेल, आमच्या अव्यक्त विचार-कल्पना-भावना यामध्ये असेल, ती भाषाच असते. प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात तर ‘बोली भाषा’, ‘प्रमाण भाषा’, ‘व्यवहाराची भाषा’, ‘साहित्याची भाषा’, ‘क्षेत्रनिहाय परिभाषा’, ‘ज्ञानभाषा’, ‘व्यक्तीनिहाय – समाजनिहाय भाषा’, ‘प्रसारमाध्यमांची- समाजमाध्यमांची भाषा’ आणि ‘मौनाचीही भाषा’च, अशा अनेकविध रूपात भेटते. यामुळे मला भाषा अनादी-अनंत वाटते. ‘एकोहं बहुस्याम’ या प्रवृत्तीने परमेश्वर जसा विविध रूपांनी नटलेला दिसतो तशा ‘या विविध भाषाकुलांशी नाते सांगणाऱ्या सर्व भाषांच्या मुळाशी एकच भाषा असली पाहिजे’ असे भाषातज्ज्ञांनी साधार सांगितलेले आहे.

कोणत्याही वयात आईच्या कुशीत डोके ठेवून झोपलं की बरं वाटतं, सगळे ताण हलके होतात. अगदी तद्वतच कोणत्याही क्षणी मातृभाषेत व्यक्त होताना माणूस अगदी सहजतेने, ताणविरहित व्यक्त होतो. मातृभाषा आपल्या अस्तित्वाला ओळख, आकार आणि व्यक्तित्वाला समृद्धता देते. बहुभाषिकता ही काळाची गरज आहे. ज्याची मातृभाषा पक्की तो परभाषा अगदी सहजपणे आत्मसात करू शकतो.

बहुभाषिकता ही काळाची गरज आहे, पण मातृभाषेची जपणूक ही माणसाच्या अस्तित्वाची गरज आहे. स्वाभाविकच साने गुरुजींची ‘श्यामची आई’ आठवली. पायाला माती लागू नये म्हणून ती श्यामच्या शब्दाखातर त्याच्या वाटेवर मायेचा पदर पसरते आणि त्याला सांगते, ‘श्याम, पायाला माती लागू नये म्हणून जसा जपतोस, तसेच मनाला माती लागू नये म्हणून जप हो.’ हाच श्याम ज्या वेळेला पोहायला नकार देतो तेव्हा त्याची पोहण्याची भीती घालवण्यासाठी त्याच्या मित्रांच्या मदतीने धरून, ओढून ती आई त्याला पाण्यामध्ये ढकलते. मला वाटतं, आईची कान धरण्याची ही भूमिका माणसाला घडवणारी आहे. आज भाषेची उपेक्षा आणि हेळसांड माणसाने चालवलेली आहे. मला मातृभाषेला विनंती करावी वाटते, ‘आई, माणसाचा कान धरण्याची वेळ आज आलेली आहे. धर त्याचा कान आणि घाल पाठीत एक रपाटा.’
प्रा. वृंदा देशपांडे - जोशी
संपर्क : vrundavdeshpande@gmail.com

बातम्या आणखी आहेत...