आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Madhurima Special Article | Marathi | Sarita Ubale Special Article | Sumangalgan In Ancient Poetry

मधुरिमा स्पेशल कवितेतली ‘ती’:प्राचीन काव्यातील सुमंगलगान

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कविता महाजनांच्या एका कवितेतील निवेदिका म्हणते, ‘परवा अंघोळीनंतर राहून गेलं कपाळाला कुंकू लावणं, आठवतच नाहीये स्वयंपाक केलाय का नाही... पायांना टाकता येत नाहीयेत पाऊल दुसऱ्यांच्या पावलावर. पाठीचा कणा विसरलाय वाकणं...तल्लख झालाय मेंदू एकाएकी निखाऱ्यासारखा..’

पूर्वेकडील हिंदू आणि मुस्लिम धर्मवाद्यांनी स्त्रीवादाला नाकारताना स्त्रीवादाला पश्चिमेचे खूळ मानले. तथापि, स्त्रीवाद्यांचा प्राचीन काव्य वाङ्मय आणि धार्मिक महाकाव्ये यांकडे आणि धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा चिकित्सक आहे. स्त्रीवाद्यांनी धर्माचे सम्यक आकलन पुढे आणले. अलीकडे स्त्रीवाद्यांनी असे मांडले की, युरोपमधील आद्यतम स्त्री लेखन हे धार्मिक रूपातच उपलब्ध आहे. नकोशा असलेल्या अथवा लग्न होऊ न शकणाऱ्या असंख्य स्त्रियांना ख्रिस्ती कॉन्व्हेंटमध्ये दाखल केले जात असे. स्त्रियांची अशी धार्मिक संस्थांमध्ये बोळवण करण्याची प्रथा संपूर्ण युरोपमध्ये प्रचलित होती. या प्रथेला काही जण धार्मिक तुरुंगात बंदिस्त करण्याची प्रथा संबोधू शकतात, परंतु अशा वातावरणातच या स्त्रियांचे संघटनकौशल्य आणि लेखनकौशल्य बहरले.

इव्ह असो वा सीता.. मंथरा, कैकयी असो वा द्रोपदी.... स्त्री हीच मानवाच्या समूळ नाशाचे कारण आहे याच्या अनेक कपोलकल्पित कथा धर्मातून, लोककथांमधून रुजवण्याचा सार्वत्रिक प्रयत्न झाला. ‘रामायण’, ‘महाभारत’ यांसारखी महाकाव्ये असोत, जगभरातील वेगवेगळी मिथके वा दंतकथा असोत.. समाजाच्या नेणिवेच्या पातळीवर ते काम करत असतात. ते उघडउघड ढोबळ रूपाने व्यक्त होत नाहीत. त्यांचे विश्लेषण करणे सोपे नसते, शिवाय वेगवेगळ्या कथांमधून एकाच वेळी वेगवेगळ्या परस्परविरोधी समजुती वा प्रतिमा तयार होताना दिसतात. उदा. ग्रीक पुराणातील डेलिया आणि ज्युडीथ, अस्पॕशिया आणि ल्युक्रेशिया, पँडोरा आणि अथेना पुराणकथांमध्ये स्त्री ही पुरुषाला रिझवण्यासाठी जन्मलेली असते व ख्रिस्ताला जन्म देणारी मेरीही असते. कधी ती देवता म्हणून वावरते, तर कधी गुलाम म्हणून. कधी पुरुषाच्या विनाशाला कारणीभूत होणारी, तर कधी पुरुष ध्यास घेईल अशा सद्गुणांची पुतळी. स्त्रीच्या स्वतःविषयीच्या कल्पना विचारात न घेता पुरुषांना ती कशी वाटते किंवा कशी असावी असे वाटते याची भरभरून वर्णने केली जातात. ती कशी असावी याविषयी त्याच्या ज्या काही कल्पना असतात त्या तिच्यावर लादल्या जातात आणि तशा प्रतिमा तयार होतात असे दिसून येते.

भारतात ‘रामायण’, ‘महाभारत’ अशा काव्यग्रंथांमध्ये स्त्रियांविषयी बरंच लिहिलं गेलं. या ग्रंथांमध्ये व्यक्त झालेले स्त्रीविषयक विचार किंवा स्त्रियांच्या तोंडी असलेली विधाने किंवा संवादांनाही स्त्रियांचा अस्सल आवाज म्हणता येत नाही. स्त्रियांबाबत केलेली किंवा स्त्रियांच्या तोंडी पेरलेली ही पुरुषांची मतं आणि विधाने आहेत असंच साधारणपणे म्हणता येतं. बौद्ध काव्य वाङ्मयातही साधारणपणे असाच अंतर्विरोध दिसतो. सुरुवातीच्या बौद्ध वाङ्मयातील स्त्री चित्रण हे पारंपरिकच राहिलेले आहे, परंतु ‘थेरीगाथा’ या लेखनाला अपवाद आहे. ‘थेरीगाथा’ हा बौद्ध ग्रंथ आहे. वयाने वृद्ध असलेल्या आद्य प्रबुद्ध स्त्रियांच्या – भिक्खुणींच्या - लघुकवितांचा हा संग्रह आहे. या कविता तीनशे वर्षांच्या कालखंडातील असून काही कविता तर इ.स.पूर्व सहाव्या शतकाच्या उत्तरार्धातील आहेत. ‘थेरीगाथा’ या संग्रहात ७३ कवितांचा समावेश आहे. हा संग्रह आकाराने लहान असला तरी स्त्री साहित्याच्या प्राचीन काळातील ज्ञात संग्रहाच्या अभ्यासातील ‘थेरीगाथा’ हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. ‘थेरीगाथा’मध्ये आध्यात्मिक प्राप्तीच्या बाबतीत स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत, या मताचा पुनरुच्चार करण्यात आला. भगवान बुद्धांपासून प्रेरित होऊन अनेक स्त्रियांनी भिक्खुणींच्या संघामध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे या स्त्रियांनी सांसारिक बंधने झुगारून दिली होती.

श्रावस्तीमध्ये एका दरिद्री कुटुंबात सुमंगल-माता यांचा जन्म झाला होता. बुरूडकाम करणाऱ्या एका पुरुषाशी सुमंगल-मातेचे लग्न झाले होते. तिची ही गाथा. तत्कालीन स्त्रियांच्या जीवनातील तणावाचे अद्भुत वर्णन आहे. या कवितेत सुमंगल-माता लिहितात : ‘अहो! मी मुक्त झाले आहे. माझी मुक्ती धन्य आहे. मी मुसळापासून मुक्त झाले आहे. तसेच निर्लज्ज पतीपासून नि छत्र्या करण्याच्या कामापासून मुक्त झाले आहे. अन्न शिजवण्याच्या भांड्यालाही पाणसापाचा दुर्गंध येत आहे.’

या कवितेतून स्त्रियांच्या जीवनातील अपात्र नवऱ्याशी केल्या जाणाऱ्या सक्तीच्या विवाहातून आलेले वैफल्य आणि नावडत्या व एकसुरी कामाचा निषेध व्यक्त होतो. या कवितेत केवळ तक्रारीचा पाढा वाचलेला नाही. म्हणजे ही कविता केवळ नकारात्मक नाही, तर अशा दु:खमय जीवनातून मुक्ती मिळवण्याची ग्वाही ही कविता देते. विद्रोहाचा हाच आदिम स्वर अलीकडच्या कवयित्रींच्या कवितांमध्येसुद्धा प्रतिबिंबित होतो आहे : ‘आता उशिरा का होईना मीही सुकलेलं गर्भाशय फेकावं म्हणते. ही बाईपणाची जन्मजात उधारी संपवून टाकावी म्हणते!’ - योगिनी राऊळ

अशा काही आधुनिक कवितांमधूनसुद्धा दैनंदिन कामाला उबगलेली, बाईपणातून बाहेर पडू पाहणारी मुक्त होऊ पाहण्याची ही ऊर्मी आदिम आहे असं लक्षात येतं. सर्वसामान्य सरळ रेषेमधील पारंपरिक आयुष्य जगणाऱ्या अनेक स्त्रियांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांनंतर येणारं आत्मभान मुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जातं. सर्वच धर्मांमध्ये कमीअधिक प्रमाणात स्त्रीला दुय्यमच स्थान मिळालेलं आहे असं जगभराचा इतिहास सांगतो. तरीसुद्धा पारंपरिक व्यवस्थेनं वर्षानुवर्षे स्त्रियांवर लादलेले अन्यायकारक संस्कार, जाचक रूढी नाकारून स्वाभिमानानं, ताठ कण्यानं स्वत:चा मेंदू वापरून जगू पाहणाऱ्या अनेकींच्या विचारांचं मूळ हे थेरीगाथेतल्या मुक्ततेच्या विचारात आहे असं म्हणता येऊ शकतं.

प्राचीन काव्य वाङ्मय बहुतांश धार्मिक स्वरूपाचे आहे. शिवाय, त्याचे रचयिते मुख्यत: पुरुष होते. अशा वेळी या प्राचीन धार्मिक काव्य वाङ्मयातून स्त्री प्रतिमा, तत्कालीन स्त्री जीवन अशा अनुषंगाने कोणत्या प्रकारचे स्त्री चित्रण समोर येते, हा प्रश्न निर्माण होतो.

सारिका उबाळे संपर्क : sarikaubale077@gmail.com

बातम्या आणखी आहेत...