आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Madhurima Special Article Suvarna Sadhu | Divya Marathi Madhurima Special Article | Marathi News

चीनचे अंतरंग:चिनी स्त्री : स्वतंत्र, मुक्त की बांधलेली?

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुसरी बायको, चोरी-छुपे चालणारा वेश्याव्यवसाय अशा गोष्टींसाठी चीन सर्वाधिक बदनाम आहे. मात्र, अनेक राजकीय नेत्यांच्या यामधल्या सहभागामुळे सरकार त्याकडे डोळेझाक करते.

एक कम्युनिस्ट राष्ट्र, ज्या विचारधारेत, सगळे समान म्हणवले जातात, मग तो स्त्री असो वा पुरुष, गरीब असो वा श्रीमंत. सगळ्यांचे हक्क समान. पण पूर्वापार चालत आलेल्या रीतिरिवाजांप्रमाणे चीनदेखील एक पितृसत्ताक समाज आहे. त्यामुळे चिनी बायकांविषयी जगभरात फारच कमी माहिती आहे. चिनी स्त्री, स्वतंत्र आणि मुक्त आहे का? की तीदेखील संस्कृतीच्या, रूढींच्या, परंपरेच्या दडपणाखाली दबलेली आहे? पुरुषप्रधान संस्कृतीत अनेकदा स्त्रियांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष केले जाते. चिनी महिलांनादेखील स्वतःचा असा एक आवाजआहे. त्या केवळ पुरोगामीच नाहीत, तर अनेक क्षेत्रांत पुरुषांना आव्हानदेखील देत आहेत. अर्थात तिथेही स्त्रियांवर होणारे अत्याचार कमी नाहीत, त्यांची फक्त जास्त वाच्यता होत नाही एवढेच. नुकतीच एक उच्च टेनिसपटू, प्फंग श्वाई, बातम्यांमध्ये होती. चिनी कम्युनिस्ट पक्षातील एका उच्च निवृत्त अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप तिने सार्वजनिकरीत्या केल्यानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीला, ती अचानक गायब झाली. चीनमध्ये या गोष्टी अतिसामान्य आहेत. चीनमध्येदेखील मुलांना प्राधान्य देणे, मुलींना कमी लेखणे, त्यांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य हे नेहमीच दुय्यम होते. घरांमध्येदेखील महिलांचे स्थान नेहमीच दुय्यम होते, त्यांना वारसा हक्क नव्हता. पूर्वीच्या काळी तर वधूचा बाजार चीनमध्ये भरत असे. वधू विकत मिळत असत. कम्युनिस्टांनी क्रांती आणल्यानंतर हे प्रकार बंद झाले. बहुपत्नीत्व मात्र चीनमध्ये सर्रास सुरू झाले. हा एकेकाळी चीनमधल्या स्त्रियांसाठी सगळ्यात कठीण प्रश्न झाला होता, आणि अनेक शहरांमध्ये आजही तीच स्थिती आहे.

चीनमधील औद्योगिकीकरणाने दोन प्रकारचे लोक एकत्र आले : तरुण महिला कामगार आणि हाँगकाँगसारख्या शहरातील श्रीमंत व्यापारी. स्वतःच्या घरापासून दूर, हे व्यापारी, या आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या महिलांकडे आकर्षित होतात आणि त्यांना “अर्र नाय” (दुसरी पत्नी) ठेवतात. चीनच्या दक्षिण भागात अशी अनेक गावे आहेत, जिथे प्रामुख्याने या दुसऱ्या बायका राहतात. शहरांमधल्या अनेक बायकांच्या हे अंगवळणी पडले आहे. या परिस्थितीमुळे अनेक सामाजिक आणि कायदेशीर समस्या निर्माण झाल्या आहेत. पण त्याला अंकुश लावणे हे सरकारच्यासुद्धा हाताबाहेरचे आहे. १९४९ साली कम्युनिस्ट पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी स्त्रियांच्या विकासासाठी अनेक पावले उचलली. महिलांना समान अधिकार दिला, पण पुष्कळ ठिकाणी तो केवळ कागदोपत्रीच उरला. अचानक सुरू झालेल्या औद्योगिकीकरणात खूप महिला कामगार पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या. २०१९ साली आलेल्या नव्या कायद्यानुसार, नोकरीसाठी “पुरुषांना प्राधान्य दिले जाईल” किंवा “केवळ पुरुष कामगार पाहिजेत” अशा जाहिरातींवर बंदी घालण्यात आली. महिला अर्जदारांकडून लग्न, मुले, बाळंतपण, किंवा गर्भधारणा चाचणी करून घेण्यावरदेखील बंदी घालण्यात आली.

आज शहरांत चीनमध्ये स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करतात, लग्न करण्यास नकार देतात, भरपूर पैसे कमवतात आणि स्टाइलमध्ये राहतात. शहरी बायका प्रत्येक काम करतात, पण लहान शहरांमध्ये किंवा गावखेड्यांमध्ये चित्र पूर्ण वेगळेच दिसते. आजही खेडेगावातील बायकांना शिक्षण दिले जात नाही. स्त्री भ्रूणहत्या, आजही लहान गावांत दिसतात. घरगुती हिंसाचार, मारहाणीचे प्रकार होतात. पण त्याही स्त्रियांना स्वतःच्या हक्कांची जाणीव झालीय. महिलांना समान हक्क आणि समान संधी देण्याबरोबरच, १९४९ साली कम्युनिस्ट पक्षाने वेश्याव्यवसायावर बंदी घातली, मात्र त्यांच्या पुनर्वसनाचे फारसे प्रयत्न झालेच नाहीत. त्यामुळे तात्पुरता हा व्यवसाय बंद जरी झाला असला, तरी काही वर्षांतच तो लपून-छपून आणि अधिक जोमाने सुरू झाला. स्त्रियांच्या बाबतीत, चीन या गोष्टीसाठी सर्वात बदनाम आहे. पण सरकार या सर्व प्रकाराकडे डोळेझाक करते. कारण अनेक चिनी राजकीय नेते यात गुंतलेले असतात. अनेक नेत्यांची “अर्र नाय” आहे. चीन, हा सामान्यतः महिलांसाठी सुरक्षित देश मानला जातो, कारण महिलांविरुद्ध होणारे गुन्हे कमी आहेत. पण ते कमी नसून, त्यांची दाखल घेतली जात नाही किंवा नोंदवलेच जात नाहीत. तसे असते तर आज प्फंग श्वाई गायब झाली नसती. चीनमध्ये एकूणच स्त्रीमुक्ती किंवा स्त्री-पुरुष समानतेची संकल्पना आहे का, असल्यास या संघटना काय काम करतात, त्यांना कशास सामोरे जावे लागते, याची चर्चा पुढच्या भागात करू. चिनी महिलाही अनेक क्षेत्रांत पुरुषांना आव्हान देत आहेत. तिथे स्त्रियांवर अन्याय होत नाही असे नाही. स्त्रियांवरचे अत्याचार तिथेही कमी नाहीत. फक्त त्याची वाच्यता होत नाही, एवढेच.

सुवर्णा साधू संपर्क : suvarna_sadhu@yahoo.com

बातम्या आणखी आहेत...