आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Madhurima Special | Marathi Specila Madhurima | Divya Marathi Special Article For Masdhurima | Woman Should Not Be Sad Because Of Birth ...

मधुरिमा स्पेशल:स्त्री जन्म म्हणुनी न व्हावे उदास...

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरण संस्कृती ग्रंथ नव्हे, तर अनुभवप्रामाण्य मानत असल्याने महिलांना विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य होते. पतीला चारचौघांत, सार्वजनिकरीत्या जाब विचारण्याचा अधिकार तिला होता. ‘समागमासाठी स्त्री आणि पुरुष ही दोन शरीरे आहेत, त्यांच्या ज्ञानास लिंगभेद कुठे आहे,’ असा सवाल वचनकार लक्कम्मा करते.

सुनीता विल्यम्स ही भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री. महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या १९५ दिवस अशा प्रदीर्घ अंतराळयात्रेचा विक्रम तिच्या नावावर आहे. शिवाय सगळ्यात जास्त अंतराळात चाललेली महिला असण्याचा विक्रमही तिच्याच नावावर आहे. अंतराळ मोहीम फत्ते करून सुखरूप पृथ्वीवर परतलेल्या सुनीताला पत्रकार परिषदेत ‘या मोहिमेत महिला म्हणून तुला काही अडचणी आल्या नाहीत का?’ असा प्रश्न विचारण्यात आला.

या प्रश्नाचे सुनीताने दिलेलं उत्तर थेट वैराग्यज्योती अक्का महादेवी यांच्याशी नाते सांगणारे आहे. ती म्हणाली की, ‘यंत्राचे बटण केवळ कमांड स्वीकारते, तुमच्या आदेशाचे पालन करते. कमांड देणारे हात कुणाचे आहेत?’ स्त्रीचे आहेत वा पुरुषाचे हा भेद कॉम्प्युटर करत नाही. बटण ऑन होणे महत्त्वाचे, कोण करते हे महत्त्वाचं नाही.’ हा विचार सुमारे नऊ शतकांपूर्वी अक्का महादेवीने सांगितला. स्त्री वा पुरुष केवळ बाह्य शरीरावरून ठरते. मात्र आत्म्याला लिंगभेद नाही.

सर्वच धर्मांमध्ये आईला देवत्व आहे. ‘मातृ देवो भव’ हे आपण लहानपणापासून ऐकलेलं असतं. परंतु आई वगळता इतर महिलांसाठी आपला दृष्टिकोन निकोप राहत नाही. पत्नी तर सुशील, आज्ञाधारक आणि गृहकर्तव्यदक्ष अशीच हवी असते. आदर्श पत्नीकडून सहा गुणांची अपेक्षाही पुराणकारांनी व्यक्त केली आहेे. परंतु पती कसा असावा, हे मात्र सांगत नाहीत. आजही तिच्या दिसण्यावर, कपड्यावर, वागण्या-बोलण्यावर पुरुषांचा कंट्रोल असावा ही मानसिकता आहे. हे आपलं सार्वजनिक अपयश मान्य करायला हवं. म्हणूनच संतांनी स्त्रीला दिलेलं समानतेचं स्थान केवळ पुस्तकी नव्हे, तर प्रॅक्टिकल असणं खूप भावतं. केवळ आई नव्हे, तर स्त्रीला ईश्वर मानण्याचा बसवेश्वरांचा विचार अधिक मित्रत्वाचा आणि काळाच्या पुढचा असल्याचे दिसून येईल. बसवेश्वरांनी स्त्रियांना समान स्थान दिले आहे. शरणांच्या वचनांत पदोपदी स्त्रीत्वचा गौरव दिसतो. स्त्री (हेण्णु), सोन (होन्नु) आणि भूमी-माती (मण्णु) हे तिन्ही माया आहेत. स्त्री मोहमायात ओढणारी, विनाशास कारणीभूत ठरणारी, अशी धारणा असताना अल्लमप्रभुदेवांनी त्याचे खंडन केले आहे. ‘मनातील आशा हीच माया’ असल्याचे ते सांगतात. तर स्त्री ही संपत्ती नव्हे, स्त्री ही माया नव्हे, स्त्री ही राक्षस नव्हे, ती साक्षात कपिलसिद्ध मल्लिकार्जुन म्हणजे ईश्वर असल्याचे शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी म्हटलं आहे.

शरण संस्कृती ग्रंथ नव्हे, तर अनुभवप्रामाण्य मानत असल्याने महिलांना विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य होते. आपल्या पतीला चारचौघांत, सार्वजनिकरीत्या जाब विचारण्याचा अधिकार तिला होता. ‘समागमासाठी स्त्री आणि पुरुष ही दोन शरीरे आहेत, त्यांच्या ज्ञानास लिंगभेद कुठे आहे,’ असा सवाल वचनकार लक्कम्मा करते. मारय्या आणि लक्कम्मा यांचे चरित्र स्त्री समानतेचा मानदंड ठरावा. शरणांनी जन्म, जाती, रजस्व, उच्छिष्ट (दुसऱ्यांनी खाल्लेलं-उष्ट झालेलं) आणि मृत्यू ही पंच सूतके नाकारली आहेत. त्यातील रजस्व-मासिक पाळीला विटाळ मानणे शरणांना मान्य नाही. ती नैसर्गिक असल्याचे बसवेश्वरांनी सांगितले आहे. म्हणूनच बसवेश्वरांनी आमच्यावरील सूतकाचे कलंक पुसल्याचे अक्क नागम्मासह इतर महिला शरण अभिमानाने सांगतात. तीच कथा वारकरी संप्रदायाची. वारकरी संतपरंपरेत जनाबाई अग्रस्थानी आहेत. त्यांनी अनेक अभंग लिहिले. कीर्तनाचं संचालन करण्याची त्यांची जबाबदारी होती. वारकरी संप्रदायामुळे त्यांना स्त्री असल्याचा कोणताच न्यूनगंड नव्हता. ‘स्त्रीजन्म म्हणूनी न व्हावे उदास’ असं त्यामुळेच जनाबाई म्हणतात.

‘हाती घेईन टाळ खांद्यावरी विणा। आता मज मना कोण करी॥’ असं थेट आव्हानच त्या देतात. वारकरी संतपरंपरेच्या उदयकाळात सोयराबाई, मुक्ताबाई आणि निर्मळा अशा अनेक संतकवयित्रींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. उपेक्षित वर्गातल्या स्त्रिया कर्तृत्व आणि प्रतिभेने समाजात वंदनीय ठरल्या. पुढच्या काळात तर गणिकेच्या पोटी जन्माला आलेल्या कान्होपात्रांनी वारकरी संप्रदायात मोठा अधिकार मिळवला. अलीकडे ८ मार्च जागतिक महिला दिवस म्हणून साजरा होतोय. आईच्या रूपात आपल्या एकूणच अस्तित्वास कारणीभूत असलेल्या व बहीण, पत्नी, मुलगी आणि मैत्रीण अशा विविध नात्यांनी जगणं समृद्ध करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान झाला पाहिजेच, त्यापेक्षाही तिच्या कर्तृत्वाला बळ देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचाही विचार व्हावा. कालच्या तुलनेत आजचे पती हे अधिक पत्नी फ्रेंडली झाल्याचे दिसतात. अनेक जण दैनंदिन कामात मदतही करतात. परंतु जितक्या कर्तव्यभावनेनं ती करते तसं घडताना दिसत नाही.

काही वेळा ‘तुझ्या कामात मदत करतो’ अशी भाषा वापरली जाते. यामध्ये घरातील, त्यातही किचनमधील कामांचा क्रम वरचा आहे. आजही आपण किचन हे तिचेच साम्राज्य असल्याचे ठरवले आहे. उलटपक्षी तिलाही हे मान्य असल्याचं जाणवतं. या पार्श्वभूमीवर तिला आपली होणारी मदत केवळ किचनपुरती मर्यादित न राहता दूधवाला, घरकाम करणारी मावशी यांचे महिन्याचे हिशेब असे पुढचे टप्पेही खुणवायला हवेत. कालपर्यंत आमची मुलगी सुगरण आहे हे जितकं सहज सांगितलं जायचं, तितक्याच नैसर्गिकपणे मुलाबद्दलही सांगितलं जावं. ते रुटीन व्हायला हवं. यू ट्यूबवर एक जाहिरात पाहिली एका कपड्याच्या ब्रँडची. आई आणि पत्नी यांच्या कोंडीत सापडलेल्या एका मुलाची. चहा करण्यावरून घरात आदळआपट सुरू असताना तो मुलगा समजुतीने स्वत: चहा करून त्या दोघींना देतो. सोफ्यावर बसून मस्त चहा घेत असताना रात्रीच्या जेवणाची फर्माईश करत असताना त्या दोघींची ‘मिलीभगत’ त्याच्या लक्षात येते अशी कथा. मुलाने किचनमध्ये मदत करावी असं आईला वाटणं आणि पतीने स्वयपाक करावा, आपण आपली फेव्हरीट सिरियल एन्जॉय करावं, असं पत्नीला वाटणं स्वाभाविक असतं. परंतु सून सोफ्यावर टीव्हीसमोर आणि मुलगा किचनमध्ये लुडबुड करणं आईला बहुतेक वेळा मान्य नसतं. म्हणूनच मला ही जाहिरात भावते. त्यासाठी घरातील भांडी आदळायची गरज न पडता सहज आणि नैसर्गिकपणे ज्या दिवशी हे घडेल तो दिवस खऱ्या अर्थाने महिला दिवस ठरेल.

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याचा ट्रेंड सेट झालाय. सन्मान झाला पाहिजेच, त्यापेक्षाही तिच्या कर्तृत्वाला बळ देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचाही विचार व्हावा.

चन्नवीर भद्रेश्वरमठ

संपर्क : ९९२२२४११३१

बातम्या आणखी आहेत...