आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:राज्यातील 34% बालके कुपोषित, अतितीव्र कुपोषण कमी करण्यात महाराष्ट्र आघाडीवर; युनिसेफ, नवी उमेद आणि ‘दिव्य मराठी’चा संयुक्त वेबिनार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरातील लठ्ठ मुले हा कुपोषणाचाच प्रकार : डॉ. मृदुला फडके

राजमाता जिजाऊ पोषण मिशनच्या माध्यमातून कुपोषण निर्मूलनाचे काम अभियानाच्या स्वरूपात सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि युनिसेफच्या बालरोगतज्ज्ञ सल्लागार डॉ. मृदुला फडके यांनी व्यक्त केले. राज्यातील ३४% बालके कुपोषित असली तरी त्यापैकी ८५ % बालके सर्वसाधारण श्रेणीतील असून अतितीव्र कुपोषण कमी करण्यात राज्याला यश आल्याचे डॉ. फडके यांनी मत मांडले. “पोषण महा’ अभियानांतर्गत युनिसेफ, संपर्क - नवी उमेद आणि दिव्य मराठी यांच्या संयुक्त वेबिनार संवाद सत्रात त्या बोलत होत्या.

डॉ. फडके म्हणाल्या, बहुतांश कुपोषित बालकांच्या पोषणात गावपातळीवरच सुधारणा करण्याच्या महाराष्ट्राच्या पिरॅमिड मॉडेलमुळे राज्याची वाटचाल कुपोषणाकडून सुपोषणाकडे होत आहे. ८०-८५ टक्के कुपोषित बालकांच्या प्रकृतीत घरात तसेच गावातील बालविकास केंद्रांमध्येच सुधारणा होत असल्याने अति तीव्र कुपोषणावर मात करण्यात राज्य यशस्वी होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. उंचीनुसार वजन, वयानुसार उंची, वयानुसार वजन आणि रक्ताची किंवा जीवनसत्त्वांची कमी या कुपोषणाच्या प्रकारांची त्यांनी माहिती दिली. शहरातील अधिक वजनाची लठ्ठ मुले हा देखील कुपोषणाचाच पाचवा प्रकार असून मैदानी खेळांचा अभाव आणि जंक फूडचा भडीमार यामुळे हा प्रश्न निर्माण झाल्याचे त्या म्हणाल्या. कुपोषणासारख्या प्रश्नांचे वास्तव मांडण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत युनिसेफच्या पोषण तज्ज्ञ राजलक्ष्मी नायर यांनी या वेळी मांडले. कुपोषण निर्मूलन ही लोकचळवळ होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. परसबागेसारख्या उपक्रमांपासून अंगणवाडी सेविका कुपोषण निर्मूलनासाठी गावपातळीवर करीत असलेल्या अनेकविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. दिव्य मराठीच्या प्रतिनिधींनी कुपोषणाच्या वार्तांकनातील त्यांचे अनुभव या वेळी मांडले. शासकीय निर्णय आणि वास्तवातील परिस्थिती यात संवाद निर्माण करून धोरणात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने हे संवाद सत्र आयोजित केल्याची भूमिका संपर्क - नवी उमेदच्या मेेधा कुलकर्णी यांनी मांडली. तर, वलयांकित विषयांमध्ये लोकांना गुंगवून वास्तवापासून दूर नेेण्यात अन्य माध्यमे व्यग्र असताना, “दिव्य मराठी’ आरोग्य, शिक्षण, पोषण यासारख्या मूलभूत प्रश्नांवर आग्रही पत्रकारिता करीत असल्याचे मत राज्य संपादक संजय आवटे यांनी या वेळी मांडले. माता व बालकांचे आरोग्य ही गावाची पर्यायाने संपूर्ण समाजाची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

असे आहे कुपोषण निर्मूलनाचे महाराष्ट्र पिरॅमिड मॉडेल

5% बालकांना एनआरसी म्हणजे पोषण पुनर्वसन केंद्रांमधून उपचार करावे लागतात.

5% बालके जिल्हा पातळीवरील सीटीसी म्हणजे बाल उपचार केंद्रापर्यंत आणावी लागतात.

10% बालकांचे आरोग्य व्हीसीडीसी म्हणजे ग्राम बालविकास केंद्रात सुधारले जाते

80% बालकांचे कुपोषण घरीच पोषक आहार पुरवून कमी केले जाते