आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Maharashtra Legislative Council Election 2022 । Legislative Council Election Process In Marathi । BJP Vs MVA Candidates 20 June Election

दिव्य मराठी इंडेप्थ:कशी होते विधान परिषदेची निवडणूक? जाणून घ्या, मतदान ते मतमोजणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया

मनोज कुलकर्णी / औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेसाठी उघड मतदान पद्धती असूनही, महाराष्ट्रात झालेली निवडणूक अतिशय चुरशीची ठरली. त्यामुळे आता विधान परिषदेकडे उभ्या राज्याचे लक्ष लागले आहे. त्यासाठी 20 जून रोजी मतदान होणार असून, प्रकांड पंडितांच्या या सभागृहात प्रवेश करण्यासाठी एकूण 10 जागांसाठी 11 उमेदवार भवितव्य आजमावतायत. विजयासाठी महाविकास आघाडी आणि भाजपने कंबर कसल्याने याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर दिव्य मराठी इंडेप्थमध्ये जाणून घेऊया की, ही अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक कशी पार पडेल? विधान परिषदेचा इतिहास काय आहे? मतमोजणी कशी होते आणि सदस्यांचा शपथविधी कसा पार पडतो?

हे उमेदवार रिंगणात

विधान परिषद निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात शिवसेनेकडून माजी राज्यमंत्री सचिन अहिर आणि नंदूरबारचे स्थानिक शिवसेना नेते आमशा पाडवी. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर, तर काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे यांचा समावेश आहे. भाजपने पाच उमेदवार उभे केलेत. त्यात विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड आहेत.

'मविआ'चे संख्याबळ

महाविकास आघाडीकडे एकूण 152 आमदार आहेत. त्यात शिवसेना 55, राष्ट्रवादी काँग्रेस 53 आणि काँग्रेसकडे 44 जण आहेत. विजयासाठी प्रत्येकाला 27 मते लागतील. त्यामुळे 6 उमेदवार जिंकण्यासाठी महाविकास आघाडीला 162 मतांची गरज असेल. सध्याचे संख्याबळ पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी होऊ शकतात. काँग्रेसचा एक उमेदवार विजयी होऊ शकतो. मात्र, काँग्रेसने दोन उमेदवार उभे केलेत. हा दुसरा गडी जिंकण्यासाठी पक्षाला अजून 10 मतांची गरज आहे.

भाजपचे आकड्याचे गणित

भाजपच्या पारड्यात 106 आमदार आहेत. अपक्षांची मदत घेतली, तर हे संख्याबळ 113 पर्यंत जाईल. त्याच्या जोरावर 4 उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. मात्र, 5 वा उमेदवार जिंकण्यासाठी भाजपला अजून 22 आमदारांची मते मिळवावी लागतील. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपला 123 मते मिळाली. त्यात 12 अपक्षांनी पाठिंबा दिला. हे संख्याबळ आपण भाजपच्या पारड्यात धरले तरीही अजून 12 मतांची सोय पक्षाला करावी लागेल.

गुप्त मतदान पद्धती

विधानसभेच्या 288 सदस्यांमधून विधान परिषदेचे 10 सदस्य निवडून द्यायचेत. त्यासाठी मतदान गुप्त होते. पक्ष व्हीप काढतात, मात्र ते पक्षाच्या एजंटांना दाखवायचे नसते. त्यामुळे इथे राज्यसभेसारखे उघड नव्हे, तर गुप्त मतदान पद्धती आहे. आता या 10 उमेदवारांना जिंकण्यासाठी प्रत्येकी 27 मते हवीत. प्रत्येक मताचे मूल्य 100 असते. म्हणजे 2800 मते मिळणारा उमेदवार विजयी होतो. मात्र, मतदान कमी झाले, तर कोटा कमी होऊ शकतो.

असे होते मतदान

आमदारांना मते देताना 1, 2, 3, 4 असे पसंतीक्रम द्यावे लागतात. यात 1 नंतर 2 पसंती क्रमांक दिला नाही, तर त्याने दिलेले पुढचे पसंती क्रमांक बाद होतात. मतदार कळावा यासाठी मतपत्रिकेवर काही चिन्ह, खूण केल्यास किंवा अनेक मतदारांनी कोपऱ्यात, उजव्या-डाव्या बाजूस पसंती क्रमांक दिल्यास आणि हा पॅटर्न असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ठरवल्यास त्या मतपत्रिका बाद केल्या जाऊ शकतात. मतदान करताना पसंती क्रमांक म्हणून रोमन, मराठी, इंग्रजी अंक टाकता येतात. मात्र, देवनागरी किंवा इतर भाषेत अक्षरी पसंती क्रमांक दिले, तर मत बाद होते.

समान मते पडल्यास

शेवटच्या फेरीत दोन्ही उमेदवारास समान मते पडल्यास, ज्या उमेदवारास पहिल्या पसंतीची मते अधिक आहेत त्याला विजयी घोषित केले जाते. आजारी मतदाराला मतदान करण्यास साहाय्य हवे असल्यास मतदार नसणारा कोणीही मदत करू शकतो किंवा निवडणूक निर्णय अधिकारीसुद्धा मतदान करू शकतो. निश्चित केलेला कोटा शेवटच्या उमेदवाराने पूर्ण केला पाहिजे असे नाही. एक-दोन मते कमी असणारा उमेदवार विजयी होऊ शकतो. विधानसभेत 288 अधिक एक अँग्लो इंडियन सदस्य अशी 289 सदस्यांची संख्या आहे. मात्र, सध्या नामनियुक्त सदस्य निवडण्याची पद्धत बंद आहे. त्यामुळे विधानसभा 288 सदस्यांची आहे. पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीची मते मोजली जातात. त्यात 27 चा कोटा पूर्ण करणारे उमेदवार विजयी म्हणून घोषित केले जातात.

...तर मते ट्रान्सफर

दुसऱ्या फेरीत ज्या सदस्याला कोट्याच्या वर सर्वाधिक मते मिळाली आहेत त्याच्या मतपत्रिकेत ज्यांना दुसरा पसंती क्रमांक दिला आहे, त्यांना ट्रान्स्फर केली जातात. त्यानंतर कोट्यावर अधिक मते असणाऱ्या पुढच्या उमेदवाराला मते ट्रान्स्फर करण्यास घेतली जातात. एखाद्यास 28 मते मिळाली आहेत. विजयासाठी 25.51 कोटा आहे. 2800 वजा 2551 = 209 मतमूल्य होते. 209 भागिले 28 = 7.46 मते अतिरिक्त झाली. 28 गुणिले 10 = 196 मते होतात. ती पुढच्या उमेदवारास वळवण्यात येतात.

कोण किती जागा जिंकेल?

सध्याच्या संख्याबळानुसार विधान परिषदेत भाजप चार जागा सहज जिंकू शकते. मात्र, पाचवी जागा जिंकण्यासाठी पक्षाला 130 मते लागतील. सध्या भाजपचे संख्याबळ 106 आहे. काही अपक्ष आमदार बरोबर आहेत. राज्यसभेत भाजपला पहिल्या पसंतीची 123 मते मिळाली. आता विधान परिषदेसाठी गुप्त मतदान पद्धती आहे. त्यामुळे त्यात वाढ होऊ शकते. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे 2 तर काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो. काँग्रेसने बाहेरच्या मतांवर दुसरा उमेदवार उभा केला आहे. विधान परिषदेत विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 25.91 मतांची गरज असेल.

विधान परिषदेचा इतिहास

देशभरात महाराष्ट्राच्या राजकारणाने एक वेगळीच छाप सोडलीय. इथल्या राजकीय परंपरेचे गुणगाण केले जाते. विधान परिषदेच्या निर्मितीचा इतिहास मोठा रोचक आहे. महाराष्ट्र सरकारच्या विधिमंडळ वेबसाइटवर त्याचा सविस्तर उल्लेख वाचायला आढळतो. भूतपूर्व मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलची पहिली बैठक 22 जानेवारी 1862 रोजी मुंबई येथील टाऊन हॉलच्या दरबार हॉलमध्ये भरली. या बैठकीचे अध्यक्षपद मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉर्ज रसेल क्लार्क यांनी भूषविले. 1862 ते 1937 या पंच्याहत्तर वर्षांच्या विधिमंडळाच्या वाटचालीत जगन्नाथ शंकर शेठ, जमशेटजी जोजीभॉय, सर माधबराव विंचूरकर, रावसाहेब विश्वनाथ, नारायण मंडलिक, रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी, न्यायमूती महादेव गोविंद रानडे,सर फिरोजशहा मेहता, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर असे एकाहून एक मोठे प्रकांड पंडित सदस्य म्हणून राहिले. त्यांच्या विदवत्तेने सभागृहाला एका वेगळ्याच उंचीवर नेले. त्यानंतर 1935 चा भारत सरकार कायदा अस्तित्वात आला. आपण संघराज्यात्मक शासन पद्धती स्वीकारली. प्रातांना स्वायत्तता दिली. या कायद्यानुसार विधानसभा व विधान परिषद अशी सभागृहे अस्तित्वात आली.

पहिले अधिवेशन

1935 च्या कायद्यानुसार जुलै 1937 मध्ये विधानपरिषद अस्तित्त्वात आली. 20 जुलै 1937 रोजी पुणे येथील कौन्सिल हॉलमध्ये विधान परिषदेची पहिली बैठक झाली. आतापर्यंत विधान परिषदेची 179 अधिवेशने झाली. त्यातील 14 अधिवेशने पुण्याच्या कौन्सिल हॉलमध्ये, 42 अधिवेशने नागपूरच्या कौन्सिल हॉलमध्ये आणि 123 अधिवेशने मुंबईत झाली. मुंबईतील 72 अधिवेशने जुन्या विधान भवनात आणि 51 अधिवेशने नव्या विधान भवनात झाली.1955 पर्यंत विधान परिषदेचे पावसाळी अधिवेशन पुण्यात भरायचे. मात्र, नागपूर करारानुसार 1960 पासून ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन नागपूर येथे भरू लागले. आतापर्यंत विधान परिषदेचे एकूण 662 सदस्य झाले आहेत, तर 8 सभापती झाले आणि 11 उप सभापती झाले. विधान परिषद स्थापनेवेळी सदस्य संख्या 29 होती. त्यानंतर ती 1957 मध्ये द्विभाषिक मुंबई राज्यात 108 झाली. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा 1960 मध्ये 78 झाली.

विधान परिषदेची रचना

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171 (1)मध्ये विधान परिषदेच्या सदस्यांची एकूण संख्या विधानसभेच्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या एक-तृतीयांशाहून अधिक असता कामा नये. तसेच ती चाळीसहूनही कमी असता कामा नये. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहे. संविधानातील तरतुदीनुसार ही संख्या 96 इतकी असू शकते. सध्या विधान परिषदेचे 78 पैकी 30 सदस्य विधानसभा सदस्यांद्वारा, 22 सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांद्वारा, प्रत्येकी 7 सदस्य पदवीधरांद्वारा तसेच शिक्षकांद्वारा निवडले जातात. तर 12 सदस्य राज्यपालांद्वारा नामनियुक्त होतात. त्यात साहित्य, शास्त्र, कला, सहकारी चळवळ व समाजसेवा यामध्ये विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींना विधान परिषदेवर पाठवले जाते. अनुच्छेद 172 (2) नुसार विधान परिषद विसर्जनपात्र नाही. परंतु सभागृहाच्या सदस्यांपैकी एक-तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात.

असा होतो शपथविधी

विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्यापूर्वी संविधानाच्या कलम 188 अन्वये सदस्याला शपथ दिली जाते. या काळात अधिवेशन चालू असेल, तेव्हा सभागृहात बैठकीच्या सुरुवातीलाच शपथ दिली जाते. कसलेही सत्र नसेल, तर सभापतींच्या दालनात शपथ दिली जाते. यावेळी सदस्यांना निवडून आल्याचे प्रमाणपत्र बरोबर आणणे आवश्यक असते. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर आपले निवडणूक प्रमाणपत्र सदस्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सादर करावे व आपण कोणत्या भाषेत शपथ घेणार आहोत हे सांगावे लागते. शपथविधीवेळी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते, मंत्रिमंडळातील अन्य सदस्य, माजी सभापती, माजी मंत्री, महिला सदस्य आणि शेवटी अन्य सदस्य अशा क्रमवारीने बोलावले जाते. यावेळी ठरवलेल्या जागेवर जाऊन शपथ घेतल्यावर सभापतींशी हस्तांदोलन करून सदस्य शपथ पुस्तिकेत सही करतात व आपल्या जागेवर जाऊन बसतात. अधिवेशनातील नेमून दिलेल्या दिवशी जे शपथ घेऊ शकले नाहीत, त्यांना बैठकीच्या कोणत्याही दिवशी पूर्वसूचना देऊन शपथ घेता येते, पण शपथ घेतल्याशिवाय सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येत नाही.

विलासराव अर्ध्या मताने हरले

विधान परिषदेची 1996 ची निवडणूक विशेष चर्चेत राहिलेली. त्यावेळी 9 जण रिंगणात होते. यात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख अपक्ष म्हणून उभे राहिलेले. विलारावांचा 1995 मध्ये लातूर मतदारसंघात पराभव झाला. त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवली. यावेळी शिशिर शिंदे, रवींद्र मिर्लेकर व प्रकाश देवळे (शिवसेना), छगन भुजबळ, शिवाजीराव देशमुख, रामदास फुटाणे (काँग्रेस), अण्णा डांगे, निशिगंधा मोगल (भाजप) यांनी बाजी मारली. नवव्या जागेसाठी विलासराव देशमुख आणि लालसिंह राठोड यांच्यात लढत झाली. बर हे राठोड विलासरावांचे मित्र. विशेष म्हणजे ते ही अपक्ष म्हणून रिंगणात. विलासरावांना पहिल्या पसंतीची 19, राठोड यांना 20 मते मिळाली. त्यानंतर पसंतीक्रमानुसार राठोड यांना 2468, विलासरावांना 2409 मते पडली. मतमोजणी झाली. त्यात विलासराव हे 0.59 मताने म्हणजे अवघ्या अर्ध्या मताने पराभूत झाले. विशेष म्हणजे या पराभवामुळेच विलासरावांना 1999 चे मुख्यमंत्रिपद मिळाल्याचे बोलले जाते. यावर विलासराव म्हणालेले, मी अर्ध्या मताने पराभूत झाल्याचे दुःख झाले. मात्र, मी जिंकलो असतो, तर मुख्यमंत्रिपदाची संधी मिळालीच नसती.

बातम्या आणखी आहेत...