आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळण्याची चर्चा सुरु झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या या विधानामुळे सुरु झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, जर समीकरणे जुळली तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोणत्या महिला नेत्यांची नावे आघाडीवर असू शकतात?
सर्वात आधी पाहूयात नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे...
क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंच्या 228 व्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईत आय़ोजित कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मला पुन्हा मुख्यमंत्री करायचं तुम्ही सांगितलंय. पण मला मुख्यमंत्री करायची गरज नाही. मात्र माझ्या हक्काचा शिवशक्ती, भीमशक्ती लहुशक्तीचा एक कर्तबगार माणूस, मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, आपल्याला मुख्यमंत्रिपदी बसवायचा आहे. शिवशक्ती भीमशक्ती आणि लहूशक्ती एकत्र आली तर, देशात एक मोठी ताकद आपण उभी करू शकतो.'
उद्धव ठाकरेंच्या या विधानामुळे राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळण्याची चर्चा सुरु झाली. या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणत्या महिला नेत्या या पदावर विराजमान होऊ शकतात याचा वेध घेण्याचा प्रयत्न दिव्य मराठीने केला. यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये सध्या सर्वाधिक प्रभाव असलेल्या महिला नेत्यांविषयीही दिव्य मराठीने जाणून घेतले. त्यानुसार, सध्याच्या परिस्थितीत तरी,
1. सुप्रिया सुळे
2. रश्मी ठाकरे
3. पंकजा मुंडे
4. यशोमती ठाकूर
या चार महिला नेत्या त्यांच्या पक्षात सर्वात प्रभावी असल्याचे चित्र आहे. यांच्याशिवाय दुसऱ्या फळीतही अनेक महिला नेत्या त्यांचा प्रभाव टिकवून आहेत. पण सध्याच्या परिस्थितीत तरी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव येण्याची शक्यता दिसत नाही.
सध्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या महिला नेत्यांचा प्रभाव आणि त्यांची मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याच्या शक्यतेविषयी जाणून घेऊया...
1. सुप्रिया सुळे
राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा मान कुणाला मिळेल हे येणाऱ्या काळातच कळू शकेल. मात्र या चर्चेत आणि शर्यतीत नेहमीच सर्वात पुढे असणारे नाव आहे सुप्रिया सुळे यांचे. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या आहेत. राष्ट्रवादीतील जबाबदारीच्या वाटपानुसार सुप्रिया या केंद्रातच राहतील असे वारंवार सांगितले जात असले तरी, परिस्थिती निर्माण झाली तर त्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता राजकीय जाणकार वेळोवेळी व्यक्त करतात.
राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्याच्या राजकारणातील सत्तेचे समीकरण जुळवण्यात नेहमीच महत्वाची भूमिका बजावणारा पक्ष ठरला आहे. भविष्यातही सत्तेच्या समीकरणात राष्ट्रवादीचे महत्व अबाधित असेल हेही निश्चित आहे. या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या संकेतांनुसार जर पुन्हा महाविकास आघाडीचे गणित जुळले आणि एखाद्या महिला नेत्याकडे राज्याची धुरा सोपवण्यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले तर सुप्रिया सुळेंचे नाव यात सर्वात पुढे असेल.
शरद पवार यांच्या कन्या असूनही सुप्रिया सुळे यांनी राज्यासह केंद्रीय राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. विरोधी पक्षावर टीका करताना यामुळे वैयक्तिक कटुता निर्माण होणार नाही याची काटेकोर काळजी घेताना त्या दिसतात. त्यामुळे भविष्यात राजकीय गणिते जुळून सुप्रिया सुळेंचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आल्यास त्यांच्या नावाला सर्वांचेच समर्थन मिळू शकते.
सुप्रिया सुळे 2009 पासून सलग 3 वेळा बारामती मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. संसदेत त्या विविध मुद्द्यांवर सातत्याने अभ्यासपूर्ण मत मांडत असतात. त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारही अनेकदा मिळालेला आहे. अभ्यासू महिला खासदार अशी त्यांची संसदेत आणि राष्ट्रीय राजकारणात प्रतिमा आहे. त्या लोकांमध्ये खूप सहज मिसळतात. सोशल मीडियावरही त्या चांगल्याच सक्रीय असतात. अगदी सामान्य व्यक्तीसोबत भेटीचे फोटो, व्हिडिओ त्या सामान्य माणसाप्रमाणेच शेअर करत असतात. यामुळे त्यांची सामान्यांत एक वेगळी प्रतिमा आहे. ही प्रतिमा त्यांची जमेची बाजू आहे.
2. रश्मी ठाकरे
रश्मी ठाकरे या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक आहेत. महाविकास आघाडीच्या स्थापनेत रश्मी ठाकरेंनीच महत्वाची भूमिका बजावल्याचे नेहमी सांगितले जाते. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात ऐतिहासिक आणि अनोख्या ठरलेल्या या राजकीय प्रयोगासाठी उद्धव ठाकरेंचे मन त्यांनीच वळवले. तसेच याशिवाय महाविकास आघाडीच्या वाटाघाटीसह इतर धोरणात्मक बाबींतही रश्मी ठाकरेंनीच महत्वाची भूमिका बजावल्याचेही सांगितले जाते.
रश्मी ठाकरे या शिवसेना पक्ष संघटनेच्या राजकारणात किचन कॅबिनेटच्या माध्यमातून सक्रीय असतात. त्या पडद्यामागून शिवसेनेची धुरा सांभाळतात आणि पक्षाच्या अनेक मोठ्या आणि धोरणात्मक निर्णयांवर त्यांचा प्रभाव असतो असेही शिवसेनेतील नेते सांगतात. त्यामुळेच जर पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता निर्माण झाली आणि राज्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री देण्याचा निर्णय झाला तर या परिस्थितीत रश्मी ठाकरेच या पदासाठी सर्वात प्रबळ दावेदार असतील असे राजकीय धुरीणांना वाटते.
रश्मी ठाकरे थेट माध्यमांना बोलल्याचे प्रसंग खूपच क्वचित असतील. याशिवाय त्यांनी कधीही कोणत्याही मुद्द्यावरुन कुणावर टीका केलेली नाही किंवा मतप्रदर्शन केलेले नाही. उद्धव ठाकरेंसोबत सार्वजनिक व्यासपीठांवरील त्यांचा वावर हा नेहमीच आश्वासक, धीरगंभीर आणि तितकाच सहज दिसलेला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी असताना त्यांच्यासोबत व्यासपीठावर असताना त्यांनी देहबोलीतूनच एक सकारात्मक छाप सोडली आहे. यामुळे जनमानसात त्यांची एक सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. हीच प्रतिमा त्यांची सर्वाधिक जमेची बाजू आहे.
3. पंकजा मुंडे
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचे नाव गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मुख्यमंत्रीपदासाठीच्या चर्चेत राहिले आहे. पंकजा या स्वतःही राजकीयदृष्ट्या महत्वाकांक्षी आहेत आणि त्यांनी ती महत्वाकांक्षा कधीही लपवूनही ठेवली नाही. अगदी मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे असे जाहीर सभेतही त्यांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळेच त्यांचे नाव भाजपच्या वतीने मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील महिला नेत्यांत नेहमीच सर्वात आघाडीवर आहे.
लोकनेते अशी ओळख असलेल्या गोपीनाथ मुंडेंचा भक्कम वारसा. दिग्गज महिला ओबीसी नेत्या अशी प्रतिमा. भाजप श्रेष्ठींशी थेट संपर्कासोबत पीपल कनेक्ट या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र पक्षांतर्गत राजकारणात स्वतःला प्रस्थापित करण्यात त्या थोड्या अपयशी ठरल्याचे मागील काळातील घडामोडींवरून दिसले आहे. मागील भाजप-शिवसेना महायुती सरकारमध्ये पंकजा मंत्रीपदी असल्या तरी त्यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे आरोप आणि नेतृत्वासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत संघर्ष दिसून आला. त्यामुळेच पक्षांतर्गत राजकारणात त्या बॅकफूटवर गेल्याचे चित्र राजकारणात दिसले.
मात्र तरिही जर भविष्यात भाजपच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एखाद्या महिला नेत्याला विराजमान करण्याची परिस्थिती निर्माण झाली तर तेव्हा शर्यतीत सर्वात वर नाव राहील ते पंकजा मुंडेंचेच.
पंकजा मुंडेंनी 2009 आणि 2014 मध्ये परळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2019 च्या निवडणुकीत त्यांना धनंजय मुंडेंकडून पराभवाचा सामना करावा लागला. 2014 मधील भाजप-शिवसेना महायुती सरकारमध्ये त्या मंत्रीपदी होत्या. मात्र यादरम्यान त्यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले. असे असले तरी ओबीसी नेत्या म्हणून त्यांच्या प्रतिमेला कसलाही धक्का बसला नाही. पक्षांतर्गत नेतृत्वाच्या संघर्षाची किनार वगळता राज्याच्या राजकारणात आपली वेगळी प्रतिमा पंकजांनी निर्माण केली आहे. ओबीसी नेत्या आणि ही प्रतिमा पंकजा यांची सर्वात जमेची बाजू आहे.
4. यशोमती ठाकूर
महाविकास आघाडी सरकारमध्ये महिला व बालकल्याण मंत्री राहिलेल्या यशोमती ठाकूर या काँग्रेसमधील दिग्गज नेत्या म्हणून ओळखल्या जातात. अमरावतीतील तिवसा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 2009 पासून त्या सातत्याने या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. 2014 आणि 2019 या दोन्ही वेळी मोदी आणि भाजप लाटेतही त्यांनी आपली जागा अबाधित राखली. अमरावती जिल्ह्यासह विदर्भात त्यांचा पीपल कनेक्ट चांगला आहे. शिवाय पक्षांतर्गत आणि सर्वपक्षीय धोरणात्मक राजकारणावरही त्यांची मजबूत पकड आहे. धडाडीच्या तसेच मुत्सद्दी नेत्या अशी त्यांची प्रतिमा आहे. आपले मुद्दे त्या अतिशय परखडपणे मांडतात. काँग्रेसच्या हायकमांडशी त्यांचा थेट संपर्क आहे. राहुल गांधींच्या निकटवर्तीय म्हणून काँग्रेसमध्ये त्यांची ओळख आहे. त्यामुळे जर भविष्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याची स्थिती निर्माण झाल्यास त्यांचे नावही या शर्यतीत दिसले तर राजकीय जाणकारांना आश्चर्य वाटणार नाही.
दुसऱ्या फळीतील महिला नेत्या
पहिल्या फळीतील या महिला नेत्या सोडता सर्वच पक्षात दुसऱ्या फळीतही अनेक महिला नेत्या आहेत ज्या निकटच्या नाही मात्र पुढील भविष्यात या पदासाठीच्या दावेदारीत दिसू शकतात. यात राष्ट्रवादीकडून रुपाली चाकणकर, अदिती तटकरे, विद्या चव्हाण, काँग्रेसकडून वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, भाजपकडून पूनम महाजन, विजया रहाटकर, प्रीतम मुंडे तर शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे, प्रियंका चतुर्वेदी, किशोरी पेडणेकर, सुषमा अंधारे अशा महिला नेत्यांची नावे घेतली जाऊ शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.