आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गझलेच्या गावात:गझलेतील महात्मा गांधी

बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी)23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काल देशभरात महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली./strong>. अमृतमहोत्सवी वर्षातील या गांधी जयंतीला आगळंवेगळं महत्त्व आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधीचं योगदान अतिशय ठळक आहे. हा इतिहास आहे. तो इतिहास अन् वर्तमानाची गझलकारांनी त्यांच्या शेरातून घातलेली ही सांगड आहे.

सध्या आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील आनंदोत्सव साजरा करत आहोत. स्वातंत्र्यावर आपलं निस्सीम प्रेम आहे. जो स्वातंत्र्यावर प्रेम करू नाही शकत तो कशावरच प्रेम करू नाही शकणार हे अगदी उघड आहे. काल देशभरात महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. त्यांनी केलेलं देशसेवेचं कार्य अजोड आहे. त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वाला जगात कुठेच तोड नाही. त्यांच्या अहिंसेच्या मानवतावादी मूलमंत्रातून जगाला शांतीचा संदेश मिळाला. भारतीय समाजरचना अनेकविध भाषा, धर्म व पंथ यात विखुरलीय. गेल्या चौऱ्याहत्तर वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. आपण खूप काही पाहिलं, खूप काही अनुभवलं, खूप काही मिळवलं. अजून काही शिखरं गाठायची शेष आहेत. अजून बराच पल्ला पार करायचाय. हेही खरं आहे की अजूनही अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. मूल्यांचं अंध:पतन सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रांना व्यापणारं आहे. ही बाब चिंतनीय आहे. महात्मा गांधीजींनी रामराज्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. पण ते सत्यात उतरू शकलं नाही. ते स्वप्न साकार करायचं असेल तर 'सबका साथ सबका विकास' ही संकल्पना खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत पोहोचायला हवी. विकासापासून कोसो दूर असलेल्या घटकांनाही स्वातंत्र्याची फळं चाखता आली पाहिजेत. यांचाही सर्वांगीण उत्कर्ष झाला पाहिजे. तरच गांधीजींच्या विचारांचं बीजारोपण झाल्या सारखं होईल.

या स्वातंत्र्यलढ्याच्या अमृतमहोत्सवाकडे गांधीजींच्या चष्म्यातून गझलकार कसं पाहातात हे आपण त्यांच्या शेरातून पाहाणार आहोत. स्वच्छतेवरून देशाची स्वच्छ प्रतिमा दिसून येते. गांधीजींच्या ठायी स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व होतं. समाजजीवनातील सर्वच पातळ्यांवरील अस्वच्छता दूर व्हावी यासाठी स्वच्छता अभियान राबविलेल्या बापूनांच उद्देशून सुरेश भटांनी 'गांधीजयंती' या शीर्षकाची संपूर्ण गझल लिहिलीय. नैतिक मूल्यांच्या पडझडीसंबंधी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत गांधीजींशी संवाद साधलाय. संतापही व्यक्त केलाय.

झोपला घाणीत माझा देश हा बापू!

मी कशासाठी फुलांचे गीत आलापू?

असा मतला असणाऱ्या या गझलेत त्यांनी आजच्या बेभरवशाच्या परिस्थितीकडं लक्ष वेधलंय.

मी भरोसाही धरावा आज कोणाचा?

हा लफंगा! तो हरामी! तो गळेकापू!

असे आजच्या वास्तवाशी संग करणारे शेरही भटांनी लिहिलेत.

ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. देशाला स्वातंत्र्याचा मोकळा श्वास दिला. स्वातंत्र्यासाठी सारी हयात वेचली त्या महात्मा गांधींवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांची जीवनयात्रा संपविण्यात आली. बंदुकीच्या गोळीनं विचार सरत नाही, हरत नाही. उलटपक्षी तो शतपटीनं झळाळून येतो. डोळ्यांना दीपवतो. डोक्यांना चालना देतो. हे माथेफिरू मारेकऱ्यांना नाही कळत. हा घाला त्या महात्म्यावरचा नसतो. हा घाला देशावरचा असतो. बापूंनी देशासाठी दिलेल्या बलिदानानं, त्यांच्या आठवणीनं मन सदगदित होतं असं अनंत नांदूरकर म्हणतात.

गोळीने का विचार सरतो, नाही!

आठवणींनी गदगद होते बापू!

सत्य अन् अहिंसा या मूल्यांवर गांधीजींची निष्ठा होती. असत्यानं माणसाच्या पदरी काहीच नाही पडत. त्याची प्रतिमा काळवंडून जाते. हिंसेतून हिंसाचार वाढत जातो. रक्तपात होतो. म्हणून लोकांनी सतत हिंसेपासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. अशी त्यांची शिकवण होती. लोकांना घडविण्याचं मोलाचं कार्य त्यांनी केलं. इंग्रजांनी आपल्या देशावर कब्जा केला तरी गांधीजींनी स्वातंत्रासाठी हिंसेचा वापर केला नाही. क्षमा, शांतीच्या मार्गानंच भारतातून इंग्रजांना पळवून लावलं. भारताच्या वैभवशाली परंपरेला पारतंत्रतेच्या साखळदंडातून मुक्त करण्यासाठी बापूंनी केलेल्या अभूतपूर्व देश कार्याचा आनिसा शेख यांनी 'बापू' ही गझल लिहून त्यांचा यशायोग्य गौरव केलाय.

सत्य आहिंसेने लोकांना घडविले तुम्ही बापू

शांतीच्या मार्गाने इंग्रज पळविले तुम्ही बापू

गांधीजीनी भारत बलशाली व्हावा, जगाची एकमेव ताकद बनावा या समग्र उद्देशानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. परंतु त्या उद्देशालाच आजकाल हरताळ फासला जातोय. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातही विषमता कमी झालेली नाही. श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत चाललाय. गोरगरिबांच्या हलाखीच्या जगण्यात जराही फरक पडलेला नाही. स्वातंत्र्य, बंधुता अन् समता ही मूलभूत मूल्यं सर्रासपणे पायतळी तुडविली जाताहेत. भ्रष्टतेला अन् लाचखोरीला उधाण आलंय. गांधीजींनी पाहिलेलं रामराज्याचं स्वप्न दिवास्वप्नच ठरत चाललंय. गांधीजींना चौकापुरते पुतळ्यात बंदिस्त करून ठेवण्यात आलाय. या चौकाला लाचखोरीनं जबर विळखा घातलाय. ही लाचखोरी गांधीजींच्या पुतळ्याला साक्षी ठेवून केली जातेय. या भीषण वास्तवाकडं विजय जोशी यांचा शेर इशारा करतोय. खालच्या मिसऱ्यात उपरोधआहे.

पुतळ्यांमधुनी चौकापुरते उरले गांधी

लाच पाहुनी नोटेमधुनी हसले गांधी

गांधीजी आज पुतळ्यापुरते, चौकापुरते उरलेत हे खरंच. परंतु त्यांचा चरखाही फक्त फोटोपुरताच उरलाय. त्यांच्या जयंती दिवशी नेते खादी वस्त्रे लेऊन सजून-धजून जय्यत असतात. स्वतःचा फोटो कसा छान येईल. याकडंच त्याचं सगळं लक्ष लागलेलं असतं गांधीजींच्या देशसेवेचे, त्यांच्या बलिदानाचं कोणालाच काय पडलेलं नसतं. स्वतःचा फोटो वृत्तपत्रात मॅनेज करणं अन् प्रसिद्धी मिळवणं हा गांधी जयंतीचा परिपाक असतो. अशा गैरगुमान नेत्याविषयीची खदखद बाळू घेवारे यांनी त्यांच्या शेरातून मांडलीय.

फोटोपुरता आहे चरखा येथे अजून बापू

अंगावरती खादी अमुच्या दिसते सजून बापू

गांधीजींनी व्यक्त केलेले मानवतेचे महत्त्व, अहिंसेचे तत्त्व साऱ्या जगानं मान्य केलं. त्यांची शांती, क्षमाशीलवृत्ती सबंध जगाला प्यारी वाटते. गांधीजींच्या विचारांचा पुरस्कार चोहीकडे केला जातो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला जातो. त्यावर पुस्तकं लिहिली जातात. परंतु गांधीजींची गांधीगिरी भारतीयांना पूर्ण कळलेली नाही. गांधीजींचा वापर निव्वळ सोयीसाठी करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. ज्यांच्या अनोख्या संघर्षानं आपल्याला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केलं त्या महात्म्याविषयी अंतःकरणपूर्वक आस्था दिसून नाही येत. फक्त त्यांच्या जयंती अन् पुण्यतिथीचा सोपस्कार पार पाडला जातो. अनेकांना तोंडी लावण्यापुरतेच बापू हवे असतात. पूर्ण नम्रताभाव अंगी असल्याशिवाय सत्य नाही सापडत. नम्रताभावानंच गांधीजींच्या विचारधारेतील मूल्याशय मुळातून समजून घेतला पाहिजे. असं सागरराजे निंबाळकर यांना वाटतं.

कळली कधीच नाही गांधीगिरी कुणाला

शांती, क्षमा, अहिंसा प्यारी जरी जगाला

स्वतःच्या स्वार्थापायी आज समाज दिशाहीन झालाय. आपापल्या जातीच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर लोक नाचत राहतात. आज समाजसमूहाचं रूपांतर मेंढरात झालाय. त्यांना बापूंचा मानवतावादी दृष्टिकोन कसा दिसणार, त्यांचं तत्त्वज्ञान कसं पचनी पडणार? इथं सत्य, अहिंसा, शांती वसवण्यासाठी बापूंच्या विचारांची कास धरणं आवश्यक आहे. त्याचे मूल्यात्मक विचार नव्यानं रुजवल्याशिवाय तरणोपाय नाही. सुखी समाजरचनेचा लाभ सर्वांनाच होतो. आचार विचार व उच्चार यातून घडणारी अन् बापूंना अभिप्रेत असलेली नवी समाजरचना भारताच्या भवितव्याची साक्ष देत गौरवानं तळपत राहील. याकरिता निलोफर फणीबंद यांनी बापूनांच सवाल केलाय.

दिशाहीन हा समाज झाला स्वार्थापायी

सूर्य बनूनी पुन्हा उगवणे जमेल बापू?

बापूंच्या सत्याग्रहात अन् मौनात मोठी ताकद होती. त्यांनी मरगळलेल्या लोकमानसाला नवी आशा व दिशा देऊन त्यांच्यात स्वातंत्र्याच्या जाणिवेची जागृती निर्माण केली. याकडं गझलकारांनी आवर्जून लक्ष वेधलंय.

contact@sabirsolapuri.com

बातम्या आणखी आहेत...