आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:महात्मा गांधींचा जागतिक स्पर्श

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक स्तरावरील गांधी विचारांचा ठसा आणि प्रभाव आजही कमी झालेला नाही. तो नेमका समजून घेताना, आपल्या अवतीभवतीचे सामाजिक पर्यावरण बिघडवणाऱ्यांना आणि खुद्द गांधीजींच्या विचारांना विखारी विरोधाची भूमिका घेणाऱ्यांना, तसे वर्तन करणाऱ्यांना कोण आवरणार, हा खरा प्रश्न आहे. दुसरीकडे, आपल्या मुलांना गांधीजींच्या विचारांचे संचित द्यायलाही आपण कमी पडत आहोत. आज गांधी जयंतीच्या निमित्ताने या प्रश्नांची उत्तरे काही प्रमाणात शोधण्याचा आपण प्रयत्न केला, तरी गांधीजींचे नवे दर्शन आपल्याला होईल.

अ गदी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य परिषदेसाठी उझबेकिस्तानमधील समरकंद येथे गेले होते. तेथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमवेत झालेली मोदींची भेट अनेक अर्थांनी महत्त्वाची होती. कारण रशियाने युक्रेनशी युद्ध सुरू केले, त्याला सहा महिने होऊन गेले आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच या दोन राष्ट्रप्रमुखांची ही भेट होत होती. पंतप्रधान मोदींनी या भेटीत पुतीन यांना, ‘ही युद्धाची वेळ नाही’, असे स्पष्टपणे सांगत आता युक्रेन युद्ध थांबवले पाहिजे, हेच सूचित केले. त्यानंतर विविध राष्ट्रप्रमुखांनी आणि जागतिक स्तरावरील मुत्सद्द्यांनी मोदींच्या या भूमिकेची प्रशंसा केली आणि हे युद्ध थांबले पाहिजे, असाच सूर आळवला. जग कमालीच्या अस्थिर परिस्थितीला सामोरे जात असताना भारताने घेतलेली ही युद्धखोरीच्या विरोधातील भूमिका लक्षणीय आहे. तिचे बीज महात्मा गांधींनी भारतीयांच्या मनामध्ये रुजवलेल्या शांती, अहिंसा, करुणा, सद्भाव या मूलतत्त्वांमध्ये आहे. आज हीच मूलतत्त्वे जागतिक पटलावर भारताचे बलस्थान बनली आहेत. भूतकाळातही जगातील अनेक थोर पुरुषांच्या व्यक्तिमत्त्वाला, त्यांच्या कार्याला गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा स्पर्श झाला होता, त्याच वेळी कितीतरी मोठ्या माणसांच्या विचारांचा प्रभाव गांधीजींवरही प्रभाव पडला होता. पोलंडमधील लेक वालेसा यांच्या नेतृत्वाखालील ‘सॉलिडॅरिटी’ या संघटनेचे आंदोलन चिरडण्यासाठी रशियन लष्कर तेथील सरकारच्या मदतीला आले होते. आंदोलनकर्ते लष्कर आणि पोलिसांवर रॉकेल बॉम्ब, सुतळी बॉम्ब फेकत असत. त्यानंतर मग पोलिस गोळीबारच करायचे. परिणामी कामगारांपैकी काहींचे मृत्यू व्हायचे. या सगळ्या आंदोलनात घरातला कर्त्या पुरुषाचा बळी जातो आहे, हे दिसू लागल्याने तिथल्या महिला चिंतेत पडल्या. अशा स्थितीत पुढे काय करायचे, हे ठरवण्यासाठी संघटनेची बैठक झाली. आमच्या घरातील एकेक माणूस जात असेल तर कसे होणार, असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आणि तेव्हा लेक वालेसांच्या मदतीला आले गांधीजी! आपण रॉकेल बॉम्ब फेकायचे नाहीत, दगडफेकही करायची नाही. शांतपणे रस्ता अडवायचा, आंदोलन शांततेने करायचे, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रशियन लष्कर किंवा स्थानिक पोलिसांना या शांतपणे आंदोलन करणाऱ्या कामगार कार्यकर्त्यांवर गोळीबार करणे अशक्य झाले. यानंतर मग वाटाघाटींना सुरुवात झाली आणि आंदोलनाचा पुढील टप्पा गाठला गेला. खुद्द वालेसा यांनीच हा अनुभव आपल्याला कथन केल्याचे म. गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी एका लेखात म्हटले आहे.

गोलमेज परिषदेसाठी गांधीजी १९३१ मध्ये लंडनला गेले होते. त्या वेळी अमेरिकेतील एक शिल्पकार जो डेव्हिडसन त्यांचे शिल्प तयार करण्यासाठी मुद्दाम लंडनला आला होता. गांधींनी त्याला संमती दिली होती. त्या वेळी अर्धपुतळा तयार करताना काही तास गांधीजी त्याच्यासमोर बसून राहिले. पण त्या वेळीही ते अभ्यागतांना, कार्यकर्त्यांना, पत्रकारांना भेटत होते. सामान्य लोकांशी बोलत होते. जो डेव्हिडसन यांनी त्या वेळचा एक संवाद सांगितला आहे. भेटायला येणाऱ्या लोकांपैकी एकाने गांधीजींना विचारले, ‘महात्मा म्हणजे काय?’ गांधीजी उत्तरले, ‘बिनमहत्त्वाचा माणूस!’ आपल्या महात्मा उपाधीबद्दल गांधीजींनी ‘सत्याचे प्रयोग’मध्येही काही भाष्य केले आहेच. जगातील सर्व खंडांवर गांधीजींचा जितका प्रभाव पडला आहे, जो ठसा उमटला आहे, तसा अन्य कुणाचा पडला आहे का, याचा शोध घ्यावा लागेल. रामचंद्र गुहा यांच्यासारख्या विद्वान चरित्रलेखकांनी याकडे नेहमीच लक्ष वेधले आहे.

दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्याच्या काळातच गांधीजींचा जागतिक स्तरावरील विचारवंत आणि लेखकांशी संवाद सुरू होता. जॉन रस्किन यांचे ‘अनटू धिस लास्ट’ हे पुस्तक वाचल्यावर आदल्या दिवशीचा मोहनदास गांधी दुसऱ्या दिवशी बदलला, असे त्यांनी ‘सत्याचे प्रयोग’मध्ये म्हटले आहे. विख्यात रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा प्रभावही गांधीजींवर पडला होता. ‘द किंगडम ऑफ गाॅड इज विदीन यू’ या ग्रंथाने ते भारावून गेले होते. टॉलस्टॉय यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहारही सुरू होता. तो वाचताना एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे, वयाची ऐंशी ओलांडलेले टॉलस्टॉय या तरुण भारतीयाचे मुद्दे आणि विचार अतिशय आस्थेने समजून घेत होते, त्यांच्या पत्रांना उत्तरही देत होते. यातील काही पत्रे आजही उपलब्ध आहेत. टाॅलस्टाॅय यांच्या या प्रभावातूनच गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत टॉलस्टॉय फार्मची उभारणी केली. अमेरिकेतील पर्यावरणवादी लेखक हेन्री डेव्हिड थोरो यांच्या विचारांनीही गांधीजी भारावले होते आणि त्यांनी त्यांचा अभ्यास केला होता. थोरोंचे सविनय कायदेभंगाचा विचार असलेले लेखन गांधीजींनी अभ्यासले होते आणि त्यांच्या सविनय कायदेभंगाच्या एकूण आंदोलनात हा विचार मूलभूत होता, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

आज आणखी एक नोंद करायला हवी आणि ती म्हणजे, आशिया खंडातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते, बंगाली भाषेचे महान कवी रवींद्रनाथ टागोर आणि फ्रेंच भाषेतील नोबेल पुरस्कार विजेते लेखक आणि विचारवंत रोमा रोलाँ या दोघांचा गांधीजींवर प्रचंड विश्वास होता. असेही म्हणता येईल की, हे गांधीजींचे परम चाहते होते. त्यामुळेच ‘शांतिनिकेतन’मध्ये असताना गुरुदेव टागोर गांधींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक भाषण करीत असत. एखादा माणूस हयात असताना त्याच्या वाढदिवशी केलेली, त्याच्याकडून समाजाच्या, देशाच्या काय अपेक्षा आहेत आणि त्याच्याकडून आपण कोणत्या प्रेरणा घेतल्या पाहिजेत, असे विवेचन असणारी टागोरांची ही भाषणे या दोघांमधील अनोख्या स्नेहबंधाचे दर्शन घडवतात. स्वित्झर्लंडमध्ये राहणारे रोमा रोलाँ हे फ्रेंच लेखक गांधीजींच्या अहिंसा आणि सत्याग्रहाच्या विचारांनी खूप प्रभावित झाले होते. मिळेल ती माहिती घेऊन, संदर्भ शोधून गांधीजींची प्रत्यक्ष भेट होण्यापूर्वीच त्यांनी गांधीजींचे एक छान चरित्र लिहून ठेवले होते. ते १९२४ मध्येच प्रकाशित झाले होते. रोमा रोलाँ आणि गांधीजींची भेट पुढे १९३१ मध्ये झाली. दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषी राजवटीविरुद्ध लढा उभा करणारे नेल्सन मंडेला यांनीही महात्मा गांधींकडून प्रेरणा घेतली होती. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेच्या वास्तव्यात जी ‘नाताळ इंडियन काँग्रेस’ स्थापन केली होती, त्याच संघटनेचे काम बऱ्याच वर्षांनी मंडेला यांनी सुरू केले आणि त्या माध्यमातून आपले राजकीय हक्क मिळवत वर्णद्वेषी राजवटीला परतवून लावले. स्वतंत्र झालेल्या दक्षिण आफ्रिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून मंडेला यांचीच आफ्रिकन जनतेने निवड केली.

व्यापक अर्थाने गांधीजींची प्रेरणा जागवली गेली, ती अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीचे प्रणेते मार्टिन ल्यूथर किंग यांच्या आंदोलनातून. गांधीजींच्या सत्याग्रहाच्या तंत्राचा आणि विचारांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला. मार्टिन ल्यूथर किंग यांनी आपल्यावरच्या गांधींच्या प्रभावाविषयी काही लेखांमध्ये आणि नंतर आत्मचरित्रातही तपशीलवार लिहिले आहे. एके ठिकाणी ते लिहितात...“एका रविवारी दुपारी मी फिलाडेल्फियाकडे निघालो होतो. हार्वर्ड विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. जॉन्सन यांचे भाषण मला ऐकायचे होते. त्यांनी नुकतीच भारताला भेट दिली होती आणि त्यामुळे त्यांच्या भाषणात गांधींचे चरित्र आणि गांधींची शिकवण यांचा तपशीलवार उल्लेख आला. माझा त्याच्यावर विलक्षण परिणाम झाला. मी तेथून निघालो आणि गांधीजींच्या चरित्रावरील काही पुस्तके विकत घेतली. खरे म्हणजे, मी गांधींचे नाव त्यापूर्वी ऐकले होते, पण फार गंभीरपणे त्यांच्याविषयी वाचलेले नव्हते. जेव्हा गांधी वाचायला सुरुवात केली, त्यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यातील सविनय कायदेभंगाच्या चळवळीने मी प्रभावित झालो. विशेषत: मिठाच्या सत्याग्रहाचा त्यांचा लढा मला फारच वेगळा वाटला. प्रेम आणि बंधुतेची शिकवण मला जीझसकडून मिळाली होती. पण, गांधीजींनी त्यापुढे पाऊल टाकले आणि परस्परांमधील ही बंधुता, व्यापक स्तरावर प्रेम आणि आपुलकीच्या आधारे परिणामकारक सामाजिक शक्ती कशी बनू शकते, हे सिद्ध करून दाखवले! गांधीजींनी प्रेम आणि अहिंसा यांच्यावर भर देऊन ज्या गोष्टी करायला सांगितल्या, त्यामुळे सामाजिक सुधारणा करता येतात हे मला उमगले. आणि मग मी पुढे याच विचारांचा अवलंब करत आंदोलने सुरू केली.”

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी तर गांधीजी आणि त्यांच्या विचारांना आपली प्रेरणा मानले होते. अध्यक्ष असताना ते भारताला भेट देण्यासाठी आले होते. तेव्हा आपल्या संसदेत भाषण करताना, ‘गांधीजी नसते तर मी या पदावर येऊ शकलो नसतो!’ असे त्यांनी केलेले विधान अनेक अर्थांनी सूचक होते. गांधीजी आणि टॉलस्टॉय हे दोघेही महापुरुष नेहमीच युद्धाच्या विरोधात बोलत होते, तशी भूमिका घेत होते. जागतिक स्तरावरील गांधी विचारांचा ठसा आणि प्रभाव आजही कमी झालेला नाही. किंबहुना तो अनेक छोट्या-मोठ्या देशांपर्यंत नव्याने पोहोचतो आहे. आपल्या अवतीभवतीचे सामाजिक पर्यावरण बिघडवणाऱ्यांना आणि खुद्द गांधीजींच्या विचारांना विखारी विरोधाची भूमिका घेणाऱ्यांना, तसे वर्तन करणाऱ्यांना कोण आवरणार, हा खरा प्रश्न आहे. दुसरीकडे, आपल्या मुलांना गांधीजींच्या विचारांचे संचित द्यायलाही आपण कमी पडत आहोत. साधेपणातला आनंद, समतेची शिकवण, सत्याचा आग्रह धरणारा त्यांचा निर्धार, अन्यायाविरुद्ध उभे राहणारी त्यांची निर्भयता, जाती-धर्म आणि देशाच्या भिंती ओलांडून मानवतेला त्यांनी घातलेली साद हे सगळे आपण विसरत चाललो आहोत का? आज गांधी जयंतीच्या निमित्ताने या प्रश्नांची उत्तरे काही प्रमाणात शोधण्याचा आपण प्रयत्न केला, तरी गांधीजींचे नवे दर्शन आपल्याला होईल.

अरुण खोरे arunkhore@hotmail.com संपर्क : ९२८४१७७८००

बातम्या आणखी आहेत...