आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवं कोरं:गिनिपिग -  मध्यमवर्गीय समाजाचे बुर्झ्वाकरण...

(महेंद्र कदम)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

"गिनिपिग' ही राकेश वानखेडेे यांची ‘पुरोगामी’ नंतरची महत्त्वाची कादंबरी हस्ताक्षर प्रकाशनाने नुकतीच प्रकाशित केली आहे. ‘पुरोगामी’ ही कादंबरी नक्षलवादाचा नीट अन्वय लावू पाहताना ती मार्क्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाला एकत्र आणून नवी शोषणमुक्तीची भाषा बोलताना दिसते. हा शोषणमुक्तीचा धागा त्याच्या ‘गिनिपिग’ या कादंबरीतही आहे.

"गिनिपिग' ही राकेश वानखेड़े यांची ‘पुरोगामी’ नंतरची महत्त्वाची कादंबरी हस्ताक्षर प्रकाशनाने नुकतीच प्रकाशित केली आहे. ‘पुरोगामी’ ही कादंबरी नक्षलवादाचा नीट अन्वय लावू पाहताना ती मार्क्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाला एकत्र आणून नवी शोषणमुक्तीची भाषा बोलताना दिसते. हा शोषणमुक्तीचा धागा त्याच्या ‘गिनिपिग’ या कादंबरीतही आहे. गिनिपिग म्हणजे प्रयोगशाळेत ऑपरेशनसाठी वापरला जाणारा बेडूक. या बेडकाला तसा काही अर्थ नसतो. केवळ प्रयोग करून ज्ञान मिळवायचे, पैसा मिळवायचा आणि त्या बदल्यात बेडकाला काय तर तीच ती पोटफाड आणि शेवटी मृत्यू. भारतीय सामान्यजनांची आज अशीच गिनिपिगसारखी स्थिती झालेली आहे. या गिनिपिग होण्याच्या प्रक्रियेला नकार देत नवी भाषा बोलणाऱ्या या कादंबरीचे हे प्रतीकात्मक शीर्षक बरेच काही सांगून जाते.
ऋषी घुगे आणि गठ्या या अनुक्रमे लोहार आणि परिट जातीतून आलेल्या पात्रांच्या माध्यमातून ही कादंबरी उलगडत जाते. या दोन व्यक्तिरेखा जरी उपेक्षित वर्गाचे प्रतिनिधित्व करीत असल्या तरी त्यांचे मंगोल नावाचे गाव मात्र स्वत:ला मुसलमानांचा वंश असल्याचे मानते. याचा अर्थ धर्म आणि जात यांच्यात कोणतीही शुद्धता उरली नसल्याचा निष्कर्ष प्रारंभीच नोंदवून ही कादंबरी नव्या मांडणीला सुरुवात करते. ऋषी हा आयायटीयन असून तो मोठ्या पदावर कंपनीत अधिकारी आहे. तर गठ्या हा पंचायत समितीत क्लर्क आहे. ऋषीच्या सहीने त्यांच्या कंपनीतील सत्तावीस कर्मचारी कामगार कपात या धोरणाखाली कमी केले जातात. त्यातील राघो इदे हा नोकरी गमावल्याने आत्महत्या करतो. त्याचा मुलगा प्रकाश वडलांचे प्रेत ऋषीच्या बंगल्यात आणून टाकतो आणि ऋषीच्या आयुष्याला वेगळेच वळण लागते. आपल्या सहीने राघो इदेचे आयुष्य संपले असे समजून तो नोकरीचा त्याग करतो आणि स्वत:च्या गिनिपिग होण्याच्या प्रक्रियेला विरोध करतो. आणि आयुष्यभर बुर्झ्वा मूल्यांना विरोध करताना अनेक गुन्हे करत जगतो. शेवटी त्याला फाशीची शिक्षा होते. तर गठ्या हा शक्य तेवढ्या तडजोडी करीत मिळेत तिथे पैशावर हात मारून संपत्ती गोळा करत असतो. हा गठ्या आजच्या चंगळवादी मध्यमवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करताना दिसतो.
या दोघांच्या जगण्यातून ही कादंबरी आजच्या जागतिकीकरणाचा आणि खाजगीकरणाचा अन्वय लावत जाते. या अन्वयाला दलपत जानूच्या हत्येने अधिकच खोली लाभत जाते. कारण त्याने आपल्या मार्क्सवादी धारणेने आजच्या जागतिकीकरणाच्या शोषणाची परखड चिकित्सा केलेली आहे. त्यामुळे त्याची हत्या केली जाते. कादंबरीचा आशयात्मक आणि रूपबंधात्मक तोल सावरण्यासाठी येथे पटेकर बाई, वच्छी या दोन महत्त्वाच्या व्यक्तिरेखा कादंबरीत प्रवेश करतात. या दोन्ही स्त्रिया भांडवलदारी व्यवस्थेच्या (बाजारपेठेचा) आणि दारिद्र्याच्या शिकार आहेत. या दोघी दोन टोकाला उभ्या आहेत. वच्छी ही स्लम वस्तीत राहते तर पटेकर बाई ही स्मॉल स्केल इंडस्ट्रीची मालकीण आहे. तिच्या घरातील मंडळींना केवळ पैशांचा हव्यास असतो. त्यात हव्यासापायी त्यांचे आयुष्य संपून जाते. नवरा, सासरा अपघातात गेल्यानंतर पटेकर बाई एकटी पडते. तर वच्छीबाई आपल्या मुलाला इंग्रजी शिकवून मोठा साहेब करून स्लम झोपडीतून बाहेर पडू असे स्व्प्न पाहण्याच्या नादात पोराचा बळी देते. अशा ध्रुवात्मक मांडणीतून राकेशने आपला आशय अधिक नेमकेपणाने वाचकांसमोर ठेवला आहे. गेन आणि लूज या कार्पोरेट तत्त्वज्ञानाला बळी पडलेल्या या सगळ्या व्यक्तिरेखा आपल्या जगण्यातून सामान्य माणसाने बूर्झ्वा बनून राहू नये. जरी तो प्रत्यक्ष लाभार्थी वाटत असला तरी ही व्यवस्था तुम्हाला गिनिपिग बनवल्याशिवाय राहत नाही. तेव्हा अपण जगण्याच्या शक्यता समजावून घेताना शोषणाला नकार देत नवी व्यवस्था उभी करता आली नाही तरी चालेल परंतु जागतिकीकरणाला मानवी चेहरा द्यायला काय हरकत आहे, अशा स्वरुपाचे विधान ही कादंबरी करते.
या कादंबरीचा अवकाश वरकरणी नव्वदोत्तर वाटत असला तरी तो सुरु होतो वसाहत कालखंडापासून. ही कादंबरी शोषणाची चिकित्सा करताना वसाहतावादाचाही अन्वय लावते. विश्लेषण करीत आकाराला येतो. वसाहतकाळाने शोषित समाजाला एक भान दिले, ते म्हणजे जात हे भारतीय शोषणाचं माध्यम आहे. त्यामुळे शूद्रांचा आर्थिक स्तर सदैव ढासळत राहिला आहे. तरीही येथील शोषित जनतेला आपल्या मुक्तीसाठी लढता येते, हे भान ही वसाहतकाळाची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. असे नोंदवणारी ही कादंबरी वसाहतकाळाच्या पार्श्वभूमीवर जागतिकीकरणाची चिकित्सा करते आणि साहित्य हे सांस्कृतिक हस्तक्षेपाचे महत्त्वाचे हत्यार आहे, याचा प्रत्यय देते. वसाहतवादामुळे भारतीयांना आधुनिकतेचे इहवादी भान आले होते. म. फुले, डॉ. आंबेडकर ही याची उत्तम उदाहरणे आहेत. डावे, आदिवासी, कामगार, दलित, शेतकरी, सैनिक आदी अनेकांनी शोषणाला नकार देत पारतंत्र्याच्या काळातही आंदोलने केली आहेत. आपापल्या परीने शोषणाला नकार देण्याचा प्रयत्न केला आहे. या वेगवेगळ्या सामजिक स्तरांना हे भान या काळाने दिले असल्याचे प्रतिपादन ही कादंबरी करते.
याच काळात उभ्या जगाची दोन गटात विभागणी होते. एक रशियन गट आणि दुसरा म्हणजे युरोपियन अमेरिका गट. रशियाच्या बाजूने गेलेली राष्ट्रे डावी बनली. तर युरोपियन- अमेरिकन राष्ट्रे उजवी बनली. मात्र त्यावेळी भारताने तटस्थ धोरण स्वीकारले असले तरी भारताचा कौल रशियाच्या बाजूने राह्यला आहे. त्यामुळे भारताने विस्तारवादी आणि साम्राज्यवादी धोरणाला नकार देत कल्याणकारी राज्याचा स्वीकार केला होता. नेहरूंचे पंचवार्षिक धोरण म्हणजे या कल्याणकारी राज्याचा अजेंडा होता. हा सारा आशय या कादंबरीत चित्रित झाला आहे. दरम्यान अमेरिकेने डॉलरचे मूल्य कसे वाढवले, रशियाच्या रूबलचा पाडाव कसा केला आणि रशिया तुटला कसा तुटला? त्यातून उजव्यांची आक्रमकता जगभरात कशी वाढली? या सगळ्यांच्या भांडवलदारी आणि चंगळवादी धोरणांचे मूलगामी परिणाम इथल्या सामान्य जनतेवर कसे झाले याचे अत्यंत प्रभावी मांडणी ही कादंबरी करते. उजव्या राष्ट्रांनी गरीब राष्ट्रांवर दबाव कसे आणले गेले? भारताला गॅटवर सही कशी करावी लागली? जागतिकीकरणाच्या या घडामोडीचा दुष्परिणाम म्हणजे NGO कशा वाढल्या? गॅट, डंकेल, डब्ल्युएचओ सारख्या संस्थामुळे अमेरिकन भांडवली साम्राज्यवाद जगभरात कसा वाढला? त्याने भारतातल्या कल्याणकारी राज्य संकल्पनेचा कसा सुफडा साफ केला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते. जागतिकीकरणाने जात संपल्याचा निव्वळ भास निर्माण केला. सामान्यांच्या खिशात पैसा कसा खेळता राहील आणि तो वस्तू कसा बनत जाईल याचा विचार केला आहे. मात्र त्याच्यावर कर्जाची टांगती तलवार कायम डोक्यावर ठेवली. सगळ्या सेवा उपलब्ध करून देऊन तुम्हाला निव्वळ भोगवादी बनवले. चैन करायला भाग पाडले. तुम्हाला डेड इनव्हेस्टमेंटला कर्ज मिळते. घर, कार, भौतिक सुविधा, सेवा इत्यादीसाठी कर्ज मिळते. परंतु त्याच तारणाच्या आधारावर मात्र प्रॉडक्टिव्ह गोष्टींसाठी कर्ज मिळत नाही. म्हणजे शेती, अवजारे, धंदा, व्यवसाय, ट्रॅक्टर आदीसाठी बँकेचे दरवाजे बंद आहेत. तुमचे विखंडन करून तुमची क्रयशक्ती आणि बंडखोरी मोडून काढली जात आहे. भारताने जी कल्याणकारी राज्याची योजना स्वीकारली होती त्यात टॅक्स भरणारा जो वर्ग श्रीमंत होता, त्यांचा पैसा गरिबांच्या कल्याणाला जात होता.. गरिबी हटावसारखे कार्यक्रम यातून उभे राहत होते, हेच नेमके श्रीमंतांना नको होते. आपला पैसा असा गरीबांच्या कामा येता कामा नये, या एका धारणेतून वेगाने खाजगीकरण सुरु झाले. या खाजगीकरणातून शोषणाची नवी हत्यारे कशी जन्माला आली, याची चर्चा येथे आलेली आहे.
गिनिपिग ही तत्त्वज्ञानच्या अंगाने जाणारी कादंबरी आहे. केतकर, मुक्तिबोध यांच्या परंपरेशी जुळवून घेत ती आपल्या पुढे येते. यातली भाषा रोखठोक आहे. भाषा हा सुद्धा शोषणाचा भाग असतो. भाषेच्या सांस्कृतिक राजकारणाच्या अनुषंगाने कायम शोषितांच्या मनात एक गिल्ट निर्माण करून ठेवला आहे. त्यामुळे शोषितही इंग्रजी भाषेला प्राधान्य देऊ लागला आहे. या एका मोठ्या गिल्टचा परिणाम कादंबरीत वावरणारी पात्रे आहेत. ही कादंबरी वैचारिकदृष्ट्या महत्त्वाची असली तरी अनेक ठिकाणी पुनरुक्ती आढळते. ऋषी, गठ्या, पटेकर बाई आणि निवेदक एकाच भाषेत बोलत असल्याने कादंबरीची वाचनीयता कमी होते. विचारातील ताण आणि द्वंद्व ज्या पद्धतीने यायला हवे तसे ते येत नाही. ताणात्मक चर्चेने कादंबरी आणखी उंचीवर गेली असती. असे असले तरी ही कादंबरी सामान्य माणसांच्या गिल्टला आणि मध्यमवर्गीय माणसांच्या बुर्झ्वा होण्याला नकार देण्याचा प्रयत्न करते. देवहत्या, राजहत्या झाल्या परंतु नंतरच्या क्रांत्यांनी मानवहत्या केली नाही म्हणून आज आधुनिक क्रांती होत नाही. मानवहत्या याचा अर्थ विषमतेला जन्माला घालणारी मानवविकासाची हत्या असा कादंबरीचा सांगावा आहे. हा सांगावा हे कादंबरीचे वेगळेपण आहे. तसेच दलित, ग्रामीण, महानगरी कादंबरीची वाट नाकारत ही कादंबरी आशयाच्या अंगाने नव्या शक्यता सूचवत जाते. तथाकथित कप्पेबंद मराठी कादंबरीला नाकारत आकाराला आलेली ही ‘गिनिपिग’ महत्वाची वाटते.

mahendrakadam27@gmail.com

बातम्या आणखी आहेत...