आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:... निमित्त नेहमीचेच "संभाजीनगर' नामांतर!

4 महिन्यांपूर्वीलेखक: डॉ. महेश रा. सरोदे
  • कॉपी लिंक

"औरंगाबाद की संभाजी नगर' या नामांतराच्या वेळखाऊ, भडकाऊ मुद्द्याने शहराचा विकास कदापि होणार नाही हे औरंगाबादकरांना यावेळी तरी कळेलच. नामांतराची ही नवी घटना काळजीची आणि शहराचे वातावरण बिघडवणारी अशी आहे. त्यामुळे सध्या शहराच्या नावाच्या विविध पाट्या अनेक भागात लागत असल्या तरी शहरवासियांनी विचलित न होता विकासाचाच मुद्दा धरुन निवडणूक हातात घ्यावी व फिरवावी नाहीतर नेत्यांना राजकीय ध्रुवीकरण हवेच आहे. शहर आपले आहे विचारही मग आपलाच हवा.....

औरंगाबाद एक ऐतिहासिक, सामाजिक राजकीय परिवर्तनाची महानगरी... मोठा इतिहास मोठा वारसा आणि त्यासोबत येणारे अपेक्षांचे मोठे ओझे आणि दुर्दैव... पदरी सातत्याने येणारी निराशा, नेत्यांची-अधिकाऱ्यांची उदासीनता आणि तरीही राज्याच्या राजकारणाचे नाक म्हणून ओळखले जाणारे हे शहर... राज्याचा सत्तेचा मार्ग औरंगाबादेतून जातो हे एक अघोषित सत्य आणि राज्याचे राजकीय तापमान अनेक आंदोलनासारख्या प्रतिकांमधून घटनांमधून दाखवणारे शहर... कै. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे आवडते शहर... नेहमीच प्रवाहाविरुध्द उभे राहणारे शहर... इतिहासात फारसे न शिरता सांगायचे झाले तर विद्यापीठ नामांतराचा मुद्दा याच राज्यात पेटला होता आणि आणीबाणीच्या काळात सबंध देश इंदिरा गांधी यांच्या विरोधात असताना येथून मात्र कवीमनाचे कॉंग्रेसचे खासदार काझी सलीम निवडून आले होते. पुणे- नागपुरच्या तुलनेत मराठवाडा, खान्देश व मध्य महाराष्ट्राची राजधानी असूनही विकासापासून कोसो दूर, निजाम कालखंडामुळे आधुनिक ब्रिटीश शिक्षण, विचार, प्रशासनापासून नेहमीच दूर राहीलेले औरंगाबाद शहर... काहीसे वेगळा बाज असणारे हे कॉस्मोपॉलिटीन (बहुसांस्कृतिक) शहर नेहमीच सत्तेविरुध्द राहाले आणि म्हणूनच पर्यायाने विकासापासूनही...

राज्यशास्त्राच्या नियमाप्रमाणे सत्ताधाऱ्यांत खलनायक आणि विरोधकांत नायक पाहणारे हे शहर आहे. शहराबद्दल बिल्कुलच प्रेम नसलेल्या बाहेरच्या नेत्यांनी येऊन या शहराचा इतिहास -भुगोल न जाणता केलेल्या राड्यानेही हे शहर अनेक दशके मागे गेले. या शहराची नाडी ज्याने ज्याने ओळखली त्याने महाराष्ट्रावर राज्य केले. हे पुराण सांगण्याचे एकमात्र कारण म्हणजे सर्वच राजकीय पक्षांना लागलेला औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीचा वास... मग सालाबादप्रमाणे आलेला संभाजीनगरचा मुद्दा आणि गेलाबाजार त्याला आपापल्यापरीने सोयीने हवा देणारे, तापवणारे विविध राजकीय पक्ष. खरं तर सत्य हेच आहे की, हे शहर मलिक अंबरने स्थापले आणि मुघल सम्राट तत्कालीन सुभेदार राहिलेल्या औरंगजेबने वाढविले. त्यात वादाचा काही प्रश्नच नाही. शहराच्या नामांतराचा आणि विकासाचा तसा दुरदुरचा संबंध नाहीच. विकासकामे करणे, लोकांची मने जिंकणे यापेक्षा नामांतर वा असे तणावाचे मुद्दे उकरुन काढणे तुलनेत सोपे असते. त्यामुळे लोकांचे विकासकामांवरुन लक्षही मग इतरत्र वळविता येत. हेच येथे अनेक दशकापासून सुरु आहे.

मलिक अंबरने स्थापलेले शहर :
इ. स. १६०४ साली मलिक अंबरने तत्कालीन जागेला प्रथम सैन्य मुख्यालयाचा दर्जा दिला व शहर फत्तेहनगर नावाने वसवून त्याला अहमदनगरच्या निजामशाहीच्या राजधानीचा दर्जा दिला. २५ वर्षाच्या या अवघड संघर्षाच्या कालखंडात त्याने नहर – ए - अंबरीसह शहरात अनेक इमारती बांधल्या. यात विजयस्मारक भडकल गेट, तत्कालीन स्थानिक स्वराज्य संस्था वा नगरपालिका म्हणता येईल असे टाऊनहॉल, जामा मशिदीचा मधला लहान भाग बांधला मग नंतर जामा मशिद औरंगजेबाने पूर्ण केली. साधारणत: इ. स. १६२९ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तदनंतर निजामशाहीचा लवकरच शेवट झाला आणि जिंकलेल्या औरंगाबादला मुघलांनी मुघल साम्राज्याच्या दख्खनच्या सुभ्याचा दर्जा दिला. औरंगजेब येथे दोनदा दख्खनच्या सुभेदारीवर आला ज्याप्रमाणे मलिक अंबरची नहर – ए – अंबरी प्रसिध्द आहे त्याप्रमाणे औरंगजेबने बांधलेला औरंगाबादचा किल्ला म्हणजे किल्लेअर्क व बिबि- का- मकबरा प्रसिध्द आहे. त्याचप्रमाणे हिमायतबाग आणि अनेक पुरे वसविले तसेच शहराला म्हणजेच औरंगाबादला एक मोठी खंदकयुक्त तटबंदी बांधून त्यात अनेक दरवाजे बांधले. ज्यामुळे संपूर्ण शहरालाच एका भुईकोट किल्ल्याचे स्वरुप आले. त्यातील मुख्य बालेकिल्ला म्हणजे किल्लेअर्कचा शाही महालांचा (जनाना महल-पाणीबाग, मर्दाना महल, शाही मशिद, शाही जनाना मशीद, शाही हमामखाना, किल्लेअर्क तटबंदी त्यातील रंगीन, काला, नौबत आणि बेगम वा किल्लेअर्क दरवाजा तसेच बाजूचे आम-खास मैदान आणि जामा मशीदीचे विस्तारीकरण आदी अनेक इमारती औरंगजेबाने बांधल्या.

औरंगजेब स्वत: औरंगाबादेत ५० हून अधिक वर्षे किल्लेअर्कच्या मर्दाना महालात राहीला हेच मुळी औरंगाबादकरांना माहीत नाही आणि माहीत करुन घेण्याची इच्छाही नाही. त्यामुळे आज बाजुच्याच जनाना महालासह संपूर्ण किल्लेअर्कचे खंडहर झाले आहे. ज्याप्रमाणे मलिक अंबरचे महत्त्व मान्य करुन महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला मलिक अंबर स्थायी समिती सभागृह असे नाव दिले तसे औरंगजेबचे येथे कुठलेही आधुनिक स्मारक नाही. त्याचे औरंगाबाद शहरावर निरतिशय प्रेम होते. मर्दाना महालाच्या सज्ज्यात वरच्या गॅलरीत दक्षिणेकडील दालनात बसून तो सर्वदूर पसरलेल्या शहराकडे पाहात असे आणि मर्दाना महालाच्या मागील उत्तर बाजूस महालाच्या प्रवेशद्वारासमोरील चौथऱ्यावर बसून तो खाम नदीकाठावरील बिबि- का- मकबऱ्याकडे पाहात असे. (अगदी आग्राच्या लाल किल्ल्यातून दिसणाऱ्या ताजमहालाप्रमाणे) पण हे कुणाला जाणूनच घ्यायचे नाही तर मग शहराचे नाव औरंगजेबवरुन पडलेले औरंगाबाद हे नाव तरी कसे काही मंडळीना पचणार? असे नसते तर औरंगजेबाने बांधलेल्या किल्लेअर्कवरुन कधी काळी जवळज‌वळ २० ते २५ वर्षे भारतावर राज्य मुघल सम्राट शहेनशहा आलमगीर औरंगजेबाने केले याकडे सहज दुर्लक्ष केले नसते. ठीक आहे की, येथील स्थानिक दगड विटा, चुना आदी माल वापरुन साध्या पण भव्य पध्दतीने बांधलेल्या या किल्लेअर्कला दिल्ली आणि आग्राच्या लाल किल्ल्याइतका संगमरवराचा "रिचनेस' नसेल पण तरीही त्याचे महत्व कमी होत नाही. तो किल्ला जपला पाहिजे. त्यावरील काही तोफा आजमितीस छत्रपती पुराणवस्तू संग्रहालयात आहेत. राहिला मुद्दा छत्रपती संभाजी महाराजांचा, तर ते दोनदा औरंगाबादेत आले. एकदा आग्रा भेटीस जातांना शिवरायांबरोबर तर दुसऱ्या वेळेस मोठे झाल्यानंतर औरंगाबादच्या मुघल दरबारात पाच हजार मनसबदारी स्वीकारण्याच्या वेळेस.

शिवसेनेची स्पेस घेण्याचा मनसेचा प्रयत्न :
सांगायचा मुद्दा हा की मलिक अंबरने बांधलेल्या नहरीला ज्याप्रमाणे त्याच्यानंतर नहर – ए – अंबरी असे नाव पडले तसेच औरंगजेबाने काही शहराला स्वत:चे नाव दिले नाही ते नंतर पडले. आता शहेनशहा आलमगीर औरंगजेब शहराचा पन्नासहून अधिक काळ तसेच शेवटचा काळही औरंगाबादेत होताच त्यामुळे औरंगाबाद हे असण्यात तसे गैर काहीच नाही. पण मग संभाजीनगर नावाची हवा केली की मते मिळतात, मुद्दा राजकारण तापवता येतं, सामाजिक-सांस्कृतिक ध्रुवीकरण करता येतं... दरवेळी शिवसेना असे करायची मात्र यंदा शिवसेेना आघाडीत पर्यायाने सरकारामध्ये आहे म्हणून त्यांची पोकळी भरुन काढण्याचे काम मनसे करते आहे. मनसेला पूर्वीची शिवसेनेची हिंदुत्ववादाची व्होट बॅंक हवी आहे आणि त्यासाठी त्यांचा संभाजीनगरचा प्रयोग सुरु आहे. त्याचा अप्रत्यक्ष फायदा ए.आय.एम.आय.एम. पक्षालाही होणार असल्याने त्यांनाही मनातून ते हवेच आहे. असे हे "पोलरायझेशन' सुरु असतांना बाकीचे राजकीय पक्ष हतबुध्द असल्यासारखे खेळण्याआधीच बाद झाल्यासारखे शांत बसले आहेत. खरे तर विकासाच्या मुद्द्यावर रान उठवण्याचे सोडून आणि खऱ्या विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याऐवजी दोन पैलवानांची कुस्ती प्रेक्षक सज्जात पाहात शांत बसले आहेत. मुद्दा हा नाही पण विकासापासून भरकटलेले प्रचंड पोटेन्शियल असलेल्या या शहरात करण्यासारखे खुप काही आहे. ते आपण सर्व कधी करणार? नामांतराच्या वेळखाऊ, भडकाऊ मुद्द्याने शहराचा विकास कदापि होणार नाही हे औरंगाबादकरांना यावेळी तरी कळेलच. नामांतराची ही नवी घटना काळजीची आणि शहराचे वातावरण बिघडवणारी अशी आहे. त्यामुळे सध्या शहराच्या नावाच्या विविध पाट्या अनेक भागात लागत असल्या तरी शहरवासियांनी विचलित न होता विकासाचाच मुद्दा धरुन निवडणूक हातात घ्यावी व फिरवावी नाहीतर नेत्यांना राजकीय ध्रुवीकरण हवेच आहे. शहर आपले आहे विचारही मग आपलाच हवा.....

mahesh.sarvade@dhrsl.com

बातम्या आणखी आहेत...