आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिल्लीतील मरकज प्रकरणाची झळ सर्वप्रथम कुठे पोहोचली असेल तर संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगावला. नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास ६० लाखांच्या आसपास अन् त्या जिल्ह्यातील मालेगाव हे सर्वाधिक मुस्लिमबहुल लोकसंख्येचे शहर. त्यामुळे अवघ्या देशाच्या बऱ्यावाईट नजरा या शहराकडे लागल्या होत्या. कोरोनाचा कहर सुरू झाल्यावर बाधित व मृत्यूचे आकडे यात जणू स्पर्धा सुरू झाल्यामुळे अगोदरच अनेकार्थाने बदनाम असलेले हे शहर अधिकाधिक चर्चेत आले. पण, आजघडीला कोरोना जिल्ह्यात पाय पसरत असताना मालेगावात हीच संख्या लक्षणीयरीत्या घटताना दिसत आहे. सध्या शहरातील एकूण ८५७ रुग्णांपैकी ७०० वर बरे झाले आहेत.
मालेगावकरांनी कोरोनाला आपलेसे करून घेतल्यागत आजची स्थिती आहे. शुक्रवार, अर्थात जुम्म्याचा दिवस. ‘दिव्य मराठी’ची टीम मालेगाव दौऱ्यावर होती. हे शहर कायमच चर्चेत राहत आले, कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर ही बाब अधिकच अधोरेखित झाली.
मंत्री-प्रशासन हादरले
मालेगावचा बाधितांचा आकडा सुरुवातीच्या टप्प्यात सर्वांचेच डोळे फिरवणारा होता. पालकमंत्री छगन भुजबळ, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मालेगावचे दौरे केले. कृषिमंत्री दादा भुसे यांची तर मालेगाव ही कर्मभूमी. कोरोनापेक्षाही दिवसागणिक बाहेर पडणाऱ्या आकड्यांमुळे तेथील विषाणूच्या प्रादुर्भावाची चिंता सर्वांनाच भेडसावत होती. बंदोबस्तावरील पोलिस कोरोनाग्रस्त होण्याची पहिली घटनाही येथूनच सुरू झाली. याचे प्रमुख कारण म्हणजे, दुपारच्या नमाजपठणानंतर मुस्लिमबांधव मोठ्या संख्येने मोहल्ल्यातून वा गल्लीबोळातून बाहेर पडतात. सध्याच्या वातावरणातही काही मंडळींचा अपवाद सोडला तर मास्क वा सुरक्षित अंतराचा मागमूस दिसत नव्हता. या बाबत एका स्थानिक मित्राला विचारले असता, “ये तो मालेगांव के खतरों के खिलाडी है” अशी बोलकी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. या मंडळींनी खऱ्या अर्थाने कोरोनावर मात करून त्याला आपलेसे करून घेतल्याचे हे ज्वलंत उदाहरण असल्याचे त्याने सांगितले. किंबहुना यामुळेच वर्तमानपत्रे असो की वृत्तवाहिन्या प्रत्येकाला मालेगावातील बाधित अन् बळी यांची दखल घेणे भाग पडले. अगदी सुरुवातीला कोरोना बाधित रुग्ण आरोग्य सेवकांच्या अंगावर चालून जाताहेत, रुग्णवाहिकेवर थुंकत आहेत, जमाव पोलिसांवर चालून जातो आहे, विलगीकरण केंद्रांमध्ये रुग्णांना वेळच्यावेळी नास्ता वा भोजन मिळत नाही म्हणून वादंग निर्माण होत आहे, असे एक ना अनेक प्रवाद राज्यभर चर्चेत आले. पण, तब्बल दोन ते अडीच महिन्यांनंतर मालेगावचे चित्र डोळ्याखालून घातले असता मालेगावकरांनी कोरोनाच्या सोबत जगण्याची कला अंगीकारल्याचे पदोपदी दिसत होते.
अधिकारी तळ ठोकून :
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मालेगाव फेऱ्या वाढल्या. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना घरदार व कुटुंब सोडून दोन महिन्यांहून अधिक काळ तळ ठोकावा लागला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांची शासनाने खास समन्वयक म्हणून नियुक्ती केली. अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्याकडे मालेगावचे दायित्व देण्यात आले.
अशा तऱ्हेने आणले आटोक्यात : प्रशासनाचे अथक परिश्रम, मुल्ला-माैलवींना विश्वासात घेतले, सोशल मीडियाद्वारे जनजागृती, व्हिडिओ क्लिप्सचा वापर.
ईदच्या दिवशी एकत्र येणे कटाक्षाने टाळले...
रमजान ईदच्या दिवशी मुस्लिमांनी नमाज पठणासाठी एकत्रित येण्याचे कटाक्षाने टाळले. मशिदींमध्ये ही मंडळी गेली नाही. एकट्या मालेगावमध्ये तब्बल ६०० मशिदी आहेत. मुल्ला-मौलवींचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. मालेगावचे नेतृत्व करणारे आमदार हेही मौलाना आहेत. त्याउपरही “यहाँ की आम जनता किसी की बात मानती नहीं”, असा एक तक्रारीचा सूर प्रशासनातील उच्चपदस्थांपासून ते कनिष्ठ स्तरावरील मुलाजिमांचा राहत आला. पण, मुस्लिम बांधवांनी सगळ्याच प्रश्नांना, वाद-विवादांना, प्रवादांना स्वकृतीतून उत्तर दिल्यामुळेच बाधितांचा आकडा घसरला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.