आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्थ नव्हे तर ममतांचे 25 आमदार रडारवर:गोवंश तस्करी, बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी अडकले 19 मंत्री, ममतांचे निकटवर्तीयही

अक्षय बाजपेयी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

2011 मध्ये बंगालमध्ये डाव्या पक्षांची 34 वर्षांची सत्ता संपुष्टात आणून सत्ता स्थापन करणाऱ्या ममता बॅनर्जींचे सुमारे 25 आमदार ईडी-सीबीआयच्या रडारवर आहेत. यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा देखील समावेश आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने दिलेला नवा आदेश पक्षासाठी चिंतेचे सर्वात मोठे कारण ठरले आहे.

2017 मध्ये, कोलकातास्थित वकील बिप्लव रॉय चौधरी यांनी एक जनहित याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी 2011 ते 2016 दरम्यान टीएमसीच्या 19 आमदारांच्या संपत्तीत बेहिशेबी वाढ झाली असून त्याची चौकशी झाली पाहिजे असे म्हटले होते. त्यात ममता यांचे निकटवर्तीय आणि कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम यांचे देखील नाव आहे.

50 कोटी रकमेचे छायाचित्र समोर

बिप्लव रॉय चौधरी यांच्या याचिकेवर 5 वर्षांपासून तपास झाला नाही. पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जीकडून 50 कोटी रुपये आणि 5 किलो सोने मिळाल्यानंतर चौधरी यांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. पार्थ यांचयकडून मिळालेल्या रोख रकमेचे छायाचित्र त्यांनी उच्च न्यायालयात दाखवले आणि 19 आमदारांच्या मालमत्तेचीही चौकशी लवकर व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

उच्च न्यायालयाने त्यांची याचिका मान्य करत ईडीला या तपासाची जबाबदारी देण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात ईडीकडून 12 सप्टेंबरपर्यंत उत्तर मागवण्यात आले आहे.

ईडीच्या तपासाविरोधात तीन मंत्र्यांची उच्च न्यायालयात धाव

उच्च न्यायालयाचा आदेश येताच तृणमूल काँग्रेसचे तीन मंत्री फिरहाद हकीम, ज्योतिप्रिया मलिक आणि अरुप रॉय यांनीही न्यायालयात धाव घेतली. निवडणूक आयोग किंवा आयकर विभागाला देखील चुकीचे कोणतेही पुरावे सापडले नसून ईडीने तपासात सहभागी होऊ नये, अशी याचिका त्यांनी केली.

याशिवाय अनेक मागण्या आल्या. तपास ईडीच्या हाती जाऊ नये, असाच त्यांचा प्रयत्न आहे. आता त्याची चौकशी ईडी करणार की नाही, याबाबत उच्च न्यायालय निर्णय घेणार आहे. मात्र या प्रकरणात ईडी तपास करणार हे निश्चित असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

पश्चिम बंगालमधील ज्येष्ठ पत्रकार स्निग्धेंदू भट्टाचार्य म्हणतात की, ईडी तपासात सामील होताच 19 टीएमसी नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्या मालमत्तेत वाढ झाली असल्याचे देखील सत्य आहे. याबाबद्दल या नेत्यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. याचिकाकर्त्याने याच आधारावर याचिका दाखल केली आहे.

तस्करी ते घोटाळ्यात सापडले मंत्री आणि आमदार

गोवंश तस्करी, कोळसा तस्करी आणि एसएससी घोटाळ्यात पश्चिम बंगालचे मंत्री आणि आमदार ईडी आणि सीबीआयच्या निशाण्यावर आहेत. गेल्या आठवड्यात सीबीआयने अनुब्रत मंडल यांना त्यांच्या बोलापूर येथील घरातून अटक केली होती. अनुब्रत हे ममता यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहेत. ते बीरभूम जिल्ह्यातील पक्षाचे प्रमुखही आहेत.

अटक करण्यापूर्वी सीबीआयकडून त्यांना 10 नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अनुब्रत यांना गोवंश तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याशी संबंधित 49 प्रॉपर्टी डीडही सीबीआयने न्यायालयात सादर केल्या आहेत.

त्यांच्या अटकेवर ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'केश्तो (अनुब्रत मंडल) यांनी काय केले? गेल्या वर्षी ते घरात होते, त्यानंतरही आम्ही निवडणूक जिंकलो. मध्यरात्री ईडी आणि सीबीआयने त्यांच्या घराची तोडफोड केली. तुम्ही एकला अटक केली तर आम्ही असे हजारो उभे करू. पुन्हा एकदा खेळ रंगेल'.

तसेच शिक्षक भरती घोटाळ्यात पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आमदार माणिक भट्टाचार्य यांच्यावर लवकरच कारवाई होऊ शकते. ईडीने त्यांची चौकशी केली असून त्यांना नवीन नोटीस देण्यात आली आहे. ईडीच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भट्टाचार्य यांच्यासह टीएमसीच्या 3-4 नेत्यांना लवकरच या प्रकरणी अटक केली जाऊ शकते.

8 IPS ला नोटीस चौकशीसाठी दिल्लीलाही बोलावले

केवळ नेतेच नाही तर बंगालचे आयएएस, आयपीएसही तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. कोळसा घोटाळ्यात 2 आयपीएस श्याम सिंग (डीआयजी सिव्हिल डिफेन्स) आणि आयबी राजीव मिश्रा (एडीजी आयजीपी) यांना नोटीस बजावण्यात आली आहे. गवंश तस्करीप्रकरणी 6 आयपीएसना नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये सुकेश जैन, ज्ञानवंत सिंग, राजीव मिश्रा, श्याम सिंग, सेल्वा मुरुगना, कोटेश्वर राव यांच्या नावांचा समावेश आहे.

या अधिकाऱ्यांना या तस्करीची माहिती होती, मात्र त्यांनी ती रोखण्यासाठी कारवाई केली नाही, असे ईडीच्या तपासात समोर आले आहे. अनुब्रत मंडलच्या अटकेनंतर या अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली असून या सर्वांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावण्यात आले आहे.

चौकशीमध्ये TMC च्या मोठ्या चेहऱ्याचा समावेश

अभिषेक बॅनर्जी: ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांची कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशी केली जात आहे. अभिषेक आणि त्यांची पत्नी रुजिरा यांना अनेकवेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

पार्थ चॅटर्जी: एसएससी घोटाळ्यात अडकलेले माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी हे त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जीसह कोठडीत आहेत. त्यांच्या अटकेपासून टीएमसीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांना मंत्रिपदावरून काढून टाकण्यात आले असून पक्षातूनही बडतर्फ करण्यात आले आहे.

माणिक भट्टाचार्य: एसएससी शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने यापूर्वीच आमदार माणिक भट्टाचार्य यांची चौकशी केली आहे. पार्थ चॅटर्जी यांना अटक केल्यानंतर माणिक यांना नोटीस बजावण्यात आली होती.

विनय मिश्रा: ईडीने जुलै 2022 मध्ये टीएमसी युवा विंग नेते विनय मिश्रा यांच्याशी संबंधित कंपनीची 13.63 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणी सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टीएमसीचे 25 नेते चौकशीच्या घेऱ्यात

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात पक्षाचे 19 नेते अडकले आहेत. यामध्ये फरहाद हकीम, ज्योतिप्रिया मलिक, मलय घटक, ब्रात्यब्रत बसू, अर्जुन सिंग, गौतम देब, इक्बाल अहमद, स्वर्ण कमल साहा, अरुप रॉय, जावेद अहमद खान, अमित मित्रा, अब्दुर रजक मोल्ला, राजीव बॅनर्जी, सेउली शहा, सब्यसाची दत्ता, बिमन बॅनर्जी, सुब्रत मुखर्जी, साधन पांडे, मदन मित्रा यांचा समावेश आहे.

याशिवाय शिक्षक भरती घोटाळ्यात पार्थ चॅटर्जी हे कोठडीत आहेत. अभिषेक बॅनर्जी, माणिक भट्टाचार्य, विनय मिश्रा आणि अनुब्रत मंडल यांची वेगवेगळ्या प्रकरणात चौकशी सुरू आहे. 4-5 नेते असेही आहेत ज्यांची नावे अद्याप समोर आलेली नसून लवकरच त्यांना देखील सीबीआय-ईडीची नोटीस पोहोचू शकते.

हा खेळ 2024 पर्यंत सुरू राहणार

पत्रकार भट्टाचार्य म्हणतात की, हा खेळ 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. आता प्रश्न आहे सीबीआय आणि ईडीच्या निःपक्षपातीपणावर. त्यांच्या तपासाची आणि निवडणुकीची वेळ का मॅच होते? बंगालमध्ये टीएमसीचा विजय होताच सीबीआयने त्यांच्या चार नेत्यांना अटक केली. दोन दिवसांच्या कोठडीत ठेवले. त्यांना नारद प्रकरणात अटक करण्यात आली होती. हे प्रकरण सुमारे 8 वर्षे जुने आहे.

8 वर्षातही सीबीआयला खटला का पूर्ण करता आला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ निवडणुका किंवा निकालांच्या काळातच अटक आणि नोटिसा का बजावल्या जातात. याप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयानेही सीबीआयला फटकारले आहे. मात्र, नारद प्रकरणात न्यायालयाने कोणतीही मुदत दिली नाही.

ममता सरकारमध्ये अनेक घोटाळे, सीबीआय एकही प्रकरणाचा तपास पूर्ण करू शकली नाही

घोटाळा: शिक्षक भरती

काय झाले: अपात्र असणाऱ्यांना नोकऱ्या देण्यात आल्या. टॉपरपेक्षा 16 गुण कमी मिळवणाऱ्या मंत्री परेश अधिकारी यांची मुलगी अंकिता हिला टॉपर करण्यात आले. याप्रकरणी पार्थ चॅटर्जी तुरुंगात आहे.

कधी घडले: 2016

आताची परिस्थिती: मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता तुरुंगात आहेत. तपास सुरू आहे.

घोटाळा: शारदा चिट फंड

काय झाले: याला बंगालचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा म्हटले जाते. शारदा नावाच्या कंपनीच्या माध्यमातून सुमारे 10 लाख लोकांची फसवणूक करण्यात आली. 40 हजार कोटी रुपयांची हेराफेरी झाल्याचा अंदाज आहे.

कधी घडले: 2013

आताची स्थिती: सीबीआय 8 वर्षांपासून याचा तपास करत आहे. यामध्ये ईडीचाही सहभाग असून आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नाही आणि तपासही पूर्ण झालेला नाही.

घोटाळा: कोळशाची तस्करी

काय झाले: हे अवैध खाणकामाचे प्रकरण आहे. यामध्ये ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचीही चौकशी सुरू आहे. हा सुमारे 1352 कोटींचा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे.

कधी घडले: 2020

आता स्थितीः सीबीआय तपास सुरू आहे. क्लोजर रिपोर्ट अद्याप सादर झालेला नाही.

घोटाळा: रोल व्हॅली

काय झाले: रोझ व्हॅली कंपनीने 464 कोटी रुपयांचा चिटफंड घोटाळा केला. लोकांना गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले. घोटाळ्यातील आरोपी गौतम कुंडू 2015 पासून तुरुंगात आहे.

कधी घडले: 2013

आताची स्थिती: या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे आहे, मात्र अद्यापपर्यंत तपास पूर्ण होऊ शकला नाही.

घोटाळा: नारदा स्टिंग ऑपरेशन

काय घडले: 2016 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या स्टिंगच्या टेप व्हायरल झाल्या होत्या. यामध्ये टीएमसीचे मंत्री, खासदार आणि आमदारांसारखे दिसणारे लोक कंपनीच्या प्रतिनिधींकडून पैसे घेताना दाखवण्यात आले होते. हे ऑपरेशन नारदा न्यूज पोर्टलच्या मॅथ्यू सॅम्युअल यांनी केले आहे.

कधी घडले: 2016

आताची स्थिती: उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआय 2017 पासून तपास करत आहे. अनेकांना अटक करण्यात आली आहे. यामध्येही तपास पूर्ण झालेला नाही.

बातम्या आणखी आहेत...