आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'नमाज, प्रार्थना... अल्लाह-अल्लाह, माझा अल्लाह आहे, माझे सर्वकाही अल्लाह आहे. स्वर्गात 72 हुर(अप्सरा) मिळतील, तेच माझे खरे जग आहे. मेकअप करू नका, टीव्ही पाहू नका, गाणी ऐकू नका, हिंदूंसोबत बोलू नका, त्यांच्याशी तुमचे काय देणे-घेणे आहे. स्वतः मात्र गाणी ऐकायचा, चित्रपट बघायचा, मात्र घरातील महिलांना अडवायचा. बहीणीचे शिक्षण थांबवले, तिला कॉलेजमध्ये जाऊ दिले नाही.'
मंगळुरू स्फोटात अटकेत असलेला दहशतवादी शारिकची मावशी हे सांगताना भावूक होतात. पुढे म्हणतात - 'आम्हाला वाटायचे की तो जास्त धार्मिक आहे. असे करेल असे वाटले नव्हते. आम्हाला तर समाजात सगळ्यांसोबत राहायचे आहे. याने असे केले की आम्हाला कुणाला तोंड दाखवायला जागा उरली नाही. इस्लाममध्ये कुणाचा जीव घेण्याबद्दल सांगण्यात आलेले नाही. हा गुन्हा आहे. कुणाचेतरी ऐकून त्याने असे केले आहे.'
दहशतवादी शारिकची कहाणी इथून सुरु झाली...
आता तुम्हाला हे सुरुवातीपासून सांगतो. 19 नोव्हेंबर रोजी कर्नाटकच्या मंगळुरूत सायंकाळी चार वाजता एका धावत्या रिक्षात कूकर बॉम्बचा स्फोट झाला. यात रिक्षा चालक पुरुषोत्तम पुजारी आणि त्याच्या मागे बसलेला 24 वर्षीय युवक गंभीर जखमी होतो. दोघांना रुग्णालयात नेले जाते. तपास पथकाला युवकाकडे हुबळीतील रहिवासी प्रेम राज हटगीचे आधार कार्ड मिळते.
तपास आणखी पुढे गेल्यावर एका मोठ्या कटाचा खुलासा होतो. वास्तविक, हे आधार कार्ड चोरीचे होते आणि ज्याने चोरले तो सप्टेंबरमधील शिवमोगातील बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी मोहम्मद शारिक होता. स्फोटाचा तपास NIA करत आहे. तपास संस्थेने कोर्टात अर्ज करत मोहम्मद शारिकच्या चौकशीची परवानगी मागितली आहे.
या घटनेच्या दुसऱ्या दिवशी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुढे येतात आणि कूकर स्फोट हा दहशतवादी कट असल्याचे सांगतात. रिक्षात आढळलेल्या कूकरमधूनही या दाव्याला दुजोरा मिळतो. यात डिटोनेटर, वायर आणि टायमर लावलेला होता.
तपास पुढे गेल्यावर कळते की, शारिक शिवमोगा जिल्ह्यातील तिर्थाली गावातील शोपुगुड्डेतील रहिवासी आहे. तो मंगळुरूत दहशतवादी हल्ला करणार होता. ISIS च्या सहकार्याने देशात खलिफा राज्य आणण्याच्या मोहीमेवर तो होता.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजेंनी तर असाही दावा केला आहे की, शारिकने 40 युवकांना दहशतवादी प्रशिक्षण दिले आहे.
शोपुगुड्डे दहशतवादी अड्डा कसा झाला?
बाहेरून शांत दिसणारे शोपुगुड्डे ISIS च्या पाच दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचा तपास संस्थांचा दावा आहे. या गावात जगातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना कशी शिरली हा तपास संस्थांसमोरील मोठा प्रश्न आहे.
इथे आल्यावर मला हे गाव अतिशय शांत आणि सामान्य वाटले. मंगळुरूच्या मार्गावर असलेले शोपुगुड्डे जिल्हा मुख्यालयापासून 60 किमी अंतरावर आहे. इथे 100 पेक्षा जास्त घर आहेत. एक घनदाट जंगल पार करत शिवमोगातून पुढे गेल्यावर रस्त्यातच मोबाईलचे सिग्नलही गेले.
सुमारे एक तासानंतर मी शिवमोगाहून शोपुगुड्डेत पोहोचलो आणि शारिकचे घर शोधायला लागलो. त्याचे पिढीजात घर विकल्याचे मला कळाले आणि कुटुंब म्हणून त्याच्या दोन मावश्या आणि एक आजी जवळच राहत असल्याचे कळाले. मी दोघींचा शोध घेत त्यांच्या घरी गेलो. तिथे मला शारिकची मावशी भेटली.
उडुपी आणि बंगळुरूत गेल्यावर शारिक बदलला
शारिकच्या वडिलांचा तीन महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता. यानंतर त्यांचे कपड्यांचे दुकान त्याची मावशीच सांभाळत आहे. शारिक दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याविषयी त्या म्हणाल्या की, फेब्रुवारी 2020 मध्ये शिवमोगातील भिंतींवर ISIS च्या समर्थनार्थ लिहिलेल्या घोषणांत शारिक आणि त्याच्या सहकाऱ्यांचा हात होता. त्याला अटक झाली आणि नंतर वडिलांनी त्याला कसेतरी जामीनावर सोडवले होते. उडुपी आणि बंगळुरूला गेल्यावर तो बदलला होता. तिथून परतल्यावर तो नमाज, प्रार्थना आणि अल्लाहविषयीच बोलायचा.
शारिक म्हणायचा – मी लवकरच स्वर्गात जाणार आहे
मावशी पुढे सांगतात- शारीक नेहमी इस्लाम, दीन, नमाज आणि पूजा याविषयी बोलत असे. पाचही वेळेला तो काटेकोरपणे नमाज अदा करत असे. सुरुवातीला त्याचे केस लहान होते, नंतर त्याने दाढी वाढवण्यास सुरुवात केली. आम्ही त्याला लग्न करायला सांगितल्यावर तो उत्तर द्यायचा- 'मी लवकरच असे काहीतरी करणार आहे की स्वर्गात जाईन आणि तिथे मला हुर (अप्सरा) भेटेल. तो म्हणायचा की तेच माझे जग आहे आणि माझे येथे काहीही नाही.'
मी पुन्हा विचारतो, जेव्हा शारिक तुम्हाला अडवायचा तेव्हा तुम्ही काय करायचा? त्या सांगतात- 'जेव्हा कोबी मंचुरियन आणि पाणीपुरी खायचा तेव्हा मी त्याला विचारायचे की हे हिंदूंचे जेवण आहे, तु का खातो? त्यांचा व्यवसाय हवा, पण त्यांच्याशी बोलण्यात अडचण आहे? तुझ्या घरात तर त्यांच्याच पैशातून रोजी-रोटी चालते.'
शारिक हा दहशतवादी असल्याचे कुटुंबीय स्वीकारतात, पोलिसांनी तर त्याचा जीव वाचवला
मी शारिकच्या मावशीला विचारले की पोलिसांनी त्याला फसवले आहे का? उत्तर मिळाले- 'पोलिसांनी आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवले आहे, त्यात तो दिसत आहे. पोलिसांना हवे असते तर त्यांनी त्याला तिथेच मारले असते, त्यांनी त्याचे प्राण वाचवले आहे.'
त्या पुढे म्हणतात- 'शारिक आणि ISISचा घोषित दहशतवादी अब्दुल मतीन एकमेकांना ओळखतात हे कुटुंबाला आधीच माहीत होते. ते एकमेकांसोबत आहेत हे मला माहीत होते. पण ते काय करत आहेत हे माहीत नव्हतं. या प्रकरणी कायद्यानुसार कारवाई व्हावी अशी आमची इच्छा आहे.'' असे सांगताना त्या थोड्या हिरमुसतात.
पुढे म्हणतात- 'आपल्याला समाजात सगळ्यांसोबत राहायचे आहे, त्यामुळे आपण कोणाला तोंड दाखवण्यास लायक राहिलो नाही. इस्लाममध्ये कुणाचा जीव घेण्याबद्दल सांगितले नाही. हा गुन्हा आहे. त्याने हे सर्व कुणाचे तरी ऐकून केले आहे, धर्माची बदनामी करत आहेत.'
100 मीटरच्या परिघात पाच दहशतवाद्यांचे घर
यानंतर मी अब्दुल मतीनची चौकशी सुरू केली आणि मला समजले की शारिक आणि मतीन दोघेही 50 मीटरच्या अंतरावर राहतात. शिवमोगा येथे सप्टेंबरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील फरारी दहशतवादी अराफत अलीचाही शारिक निकटवर्तीय असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
अराफत देखील मतीनच्या शेजारी राहत होता आणि दोघे चांगले मित्र होते. शिवमोगा स्फोटात अटक करण्यात आलेल्या माझ मुनीर आणि सय्यद यासीन यांच्याशी अराफत, शारिकचे संबंध होते. ते दोघेही शारिकच्या घरापासून 100 मीटर अंतरावर राहत होते. माजच्या अटकेनंतर तिसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
अब्दुल मतीन सध्या दुबईत, अल हिंदचा सक्रिय सदस्य
NIA 2019 पासून मतीनचा शोध घेत आहे. NIAच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो सध्या दुबईत असून ISIS चे भारतीय मॉड्यूल 'अल-हिंद'चा सक्रिय सदस्य आहे. तो इसिसच्या दहशतवाद्यांच्या सतत संपर्कात असतो.
मतीनवर शारिक आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या इतर तीन मुलांना भडकवण्याचा आणि दहशतवादी हल्ल्यासाठी निधी पुरवल्याचाही आरोप आहे. मतीन वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्यांच्या संपर्कात होता, असे तपास यंत्रणांचे मत आहे. NIAने मतीनला धोकादायक दहशतवादी मानले असून त्याच्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.
मंगळुरू बॉम्बस्फोटानंतर मतीनचे कुटुंब घरातच कैद
मी अब्दुल मतीनच्या घरी पोहोचलो. येथे मी त्याचे वडील मंजूर अहमद यांना भेटलो. 60 वर्षांचे मंजूर हे लष्करातून निवृत्त आहेत. घरी एक लहान भाऊही होता. जो गेल्या 8 दिवसांपासून घराबाहेर पडला नाही. मतीनची आईही घरी होती.
मंजूर अहमद यांनी सांगितले की, पोलिसांनी 8 दिवसांपूर्वी संपूर्ण कुटुंबाचे मोबाईल फोन काढून घेतले होते आणि ते अद्याप परत दिलेले नाहीत. मंगळुरूमधील घटनेनंतर संपूर्ण कुटुंब घरात कैद झाले आहे. पोलिसांनी कुठेही जाण्यास मनाई केली आहे. यामुळेच हृदयरुग्ण वडिलांना रुग्णालयातही जाता येत नाही.
वडील म्हणाले - मतीन तीन वर्षांपूर्वी घर सोडून गेला होता
मंजूर अहमदने सांगितले की, अब्दुल मतीन इंजिनिअरिंग करण्यासाठी बंगळुरूला गेला होता. त्यानंतर तो तेथे काही खासगी नोकरी करत होता. बी.टेक पूर्ण करण्यापूर्वीच त्याचे नाव एका बॉम्बस्फोट प्रकरणात आले होते. अब्दुल म्हणायचा की मी शोपुगुड्डे राहून काय करणार? तिथे राहून मी खाजगी नोकरी करेन आणि माझे शिक्षणही पूर्ण करेन.
अब्दुल मतीन दहशतवादी असल्याच्या प्रश्नावर त्याचा बचाव करताना वडील म्हणाले- 'एका प्रकरणात त्याचे नाव येताच तो खूप घाबरला. गेल्या 3 वर्षांपासून आमच्यापासून लपून बसला आहे. तो आता आमच्या संपर्कात नाहीत. आम्ही आमच्या मुलासाठी खूप काळजीत आहोत. वस्तुस्थिती काय आहे याची आम्हाला कल्पना नाही.'
आईच्या मृत्यूनंतर शरीक बदलला
अब्दुल मतीनच्या घरातून बाहेर पडताच आम्हाला शारिकच्या शेजारी फळांचा पुरवठा करणारा अफसान भेटला. 30 वर्षीय अफसानने सांगितले की, तो लहानपणापासून शारिकला पाहत आहे. तो असे काही करू शकतो यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. शारिक त्याच्या आईच्या मृत्यूनंतर आणि वडिलांना कॅन्सरचे निदान झाल्यानंतर बदलला होता.
अफसानने पुढे सांगितले की, आमचे छोटे गाव संपूर्ण कर्नाटकात खूप प्रसिद्ध होते. येथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आणि येथील अनेक निर्माते आहेत. असे असूनही, आता त्यांची ओळख दहशतवादाने होत आहे. येथील लोकांना त्यांच्या हॉटेलमध्येही कोणी भाड्याने खोली देत नाही, अशी परिस्थिती आहे. आमच्याकडे संशयाने पाहिले जाते. मी माझा व्यवसाय करू शकत नाही. पूर्वी मी आजूबाजूच्या पाच गावात फळांचा पुरवठा करायचो, पण आता ते लोकही आम्हाला टाळू लागले आहेत.
यानंतर मी शारिकच्या घरासमोर राहणाऱ्या राकेशला भेटलो. राकेशने सांगितले की, आम्ही त्याच्या वडिलांना चांगले ओळखतो, पण तो असे कृत्य करेल, असे वाटत नव्हते.
10वी ते 12वी पर्यंत खेड्यात शिक्षण घेतले, नंतर इतर शहरात गेला
शारिकच्या वडिलोपार्जित घरासमोर 10 वर्षांपासून हार्डवेअरचे दुकान चालवणारे नौशाद म्हणाले की, दहशतवादी घटनांमध्ये ज्या तरुणांची नावे आली आहेत, त्या सर्व तरुणांनी येथे 10-12वीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मंगळुरू, उडुपी आणि बंगळुरू येथे गेले. तिथे गेल्यावर ते कोणाच्या संपर्कात आले हे सांगणे कठीण आहे. ही सर्व मुले खूप चांगली होती आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमीही खूप चांगली आहे. माज अभ्यासात खूप हुशार होता आणि त्याच्या वडिलांना तणावामुळे हृदयविकाराचा झटका आला. बंगळुरूहून परतल्यानंतर माज गप्प राहायला लागला होता.
शारिकच्या घरातून मंदिराचे नकाशे सापडले
मंगळुरू स्फोटानंतर तिर्थाली पोलिस स्टेशनच्या चार पथकांनी शारिक आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या सर्व साथीदारांच्या घरांवर छापे टाकले. या छाप्यात काय जप्त केले, या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही पोलिस ठाण्यात पोहोचलो, तेव्हा प्रभारी निरीक्षक अस्वथ गौडा यांनी हा तपासाचा भाग असल्याचे सांगत काहीही बोलण्यास नकार दिला.
तथापि, राज्याचे एडीजीपी आलोक कुमार यांनी सांगितले की, मंगळुरू आणि त्याच्या आसपासच्या भागात असलेल्या अनेक मंदिरांचे नकाशे शारिकच्या घरातून सापडले आहेत. यासाठी आरोपींनी ठोस आराखडा तयार केल्याचे त्यांनी सांगितले.
बस उडवली जाईल इतकी स्फोटके कुकरमध्ये होती
शारिकबाबत केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले की, शारिकच्या फोनमधून संशयित फरारी इस्लामिक वक्ता झाकीर नाईकचे काही व्हिडिओही जप्त करण्यात आले आहेत. कर्नाटक सरकारने या स्फोटाचे प्रकरण NIAकडे सोपवले आहे.
मंगळुरूमध्ये झालेल्या स्फोटाबाबत बंदी घातलेली संघटना इस्लामिक रिसर्च कौन्सिलचाही यात सहभाग असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यांनी स्फोटाची जबाबदारी घेत एक पत्र जारी केले होते. राज्याचे एडीजीपी आलोक कुमार म्हणतात की शारिकचा या संघटनेशी काही संबंध आहे की नाही हा तपासाचा भाग आहे.
कुकरमध्ये संपूर्ण बस उडवण्यासाठी पुरेशी स्फोटके असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या स्फोटापूर्वी शारीक कोईम्बतूर बॉम्बस्फोटातील आरोपींना भेटल्याचेही तपासात समोर आले आहे.
कुकर स्फोटानंतर तामिळनाडूतही अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. बिटकॉईनच्या माध्यमातून शारिकने पैसे घेतल्याचेही तपासात समोर आले आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, राज्यातील अनेक हिंदू मंदिरांसह लहान मुलांचे फेस्टिव्हल त्याच्या निशाण्यावर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.