आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजजाणिवेतली स्त्रीशक्ती:घेतले व्रत न हेआम्ही अंधतेने...

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजकार्य करणाऱ्यांना ‘घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणारे’ असं चेष्टेने म्हणलं जातं. मात्र, या म्हणीचा मथितार्थ लक्षात घेतला, तर सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणिवेतून समाजऋण फेडण्यासाठी काम करणं हे वाटतं तितकं सोपं नाही, हे लक्षात येईल. करिअरची असंख्य क्षेत्रं समोर खुली असताना समजून-उमजून मनीषा तोकले समाजकार्यात उतरल्या. अजाणत्या, अल्लड वयात पूर्ण विचारांती घेतलेला आपला निर्णय त्यांनी सार्थही करून दाखवला. म्हणूनच त्या समाजजाणिवेतील स्त्रीशक्तीचे वास्तव रूप आहेत. वेगळ्या वाटेवरचा हा प्रवास त्यांच्याच शब्दांत...

बारावीला मी लातूरच्या शाहू काॅलेजमध्ये शिक्षण घेत होते. आमच्या घराच्या समोर खेडी विकास मंडळ नावाची संस्था कार्य करत होती. मला समाजकार्याची आवड असल्याने मी त्यांच्या कार्यात सहभागी होत होते. लातूरच्या विविध भागातल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या वस्तीमध्ये ही संस्था काम करायची. एकदा संस्थेबरोबर मीसुद्धा त्या वस्तीत गेले. वस्तीतील एक मुलगा माझ्यासोबत होता. आम्ही गल्लीत एन्ट्री केली तेव्हा एक माणूस एका बाईला रस्त्यावर केसाला धरून मारत होता. असं दृश्य मी नवरा-बायकोच्या नात्यात पाहिलं होतं. अशी मारहाण मला इथे या वस्तीत अपेक्षित नव्हती. इथे तरी ती स्वतंत्र असेल, स्वाभिमानी असेल, आपल्या मनाप्रमाणे वागत असेल असे वाटले होते. पण इथे तर तेच हमेशासारखे दृश्य दिसत होते.

मी सोबतच्या मुलाला हा माणूस तिला का मारतोय म्हणून विचारले तर तो म्हणाला, “हे याचं हमेशाचं गिऱ्हाईक आहे. तो यायच्या वेळी ही दुसऱ्या गिऱ्हाइकला बोलत बसली होती. त्या हमेशा येणाऱ्या गिऱ्हाइकाला राग आला म्हणून तो तिला मारतोय.’ हे सारं प्रकरण माझ्या डोक्यावरून जाणारं होतं. कारण मी आतापर्यंत या महिलांना चित्रपटातूनच पाहत आले होते. अपेक्षाभंगाच्या झणक्यात मी घरी कधी आले तेच कळलं नाही. पण घरी आले तेव्हा डोक्यात राग, चीड, अस्वस्थता यासारख्या भावना फेर धरून नाचत होत्या. डोकं पार गरगरत होतं. पुन्हा दोन दिवसांनी त्याच वस्तीत त्याच मुलांसोबत गेले. या वेळी मात्र मी शांतपणे सारं न्याहाळत होते, अनुभवत होते, डोळ्यात साठवत होते, महिलांशी बोलत होते. कारण काल पाहिलेल्या प्रसंगानंतर मी ठामपणे आयुष्यात आपण असंच काहीतरी करावं असं मला या चर्चेतून वाटत गेलं.

अशोक मानवी हक्क अभियान संघटनेत काम करत होता. त्यामुळे मी आपोआपच अभियानाशी जोडले गेले. संघटनेचं जमेल तितकं काम आणि शिक्षण सुरूच होते. घरच्यांच्या व नातेवाइकांच्या दृष्टीने लग्नाचं वय झालं होतं. काही पाहुणे सांगून येत होते. मी मात्र अशोकशीच लग्न करायचं असं ठरवलं होतं. त्यांच्यासोबत लग्न केलं तरच मी पुढे सामाजिक काम करू शकेल, नाहीतर मला सामाजिक काम सोडावे लागेल हे मला पक्के माहीत होते. अशोक मला भेटायला लातूरला आला तेव्हा मी त्याला सांगितलं की, “आपण आता लग्न करायला पाहिजे आणि पूर्णपणे सामाजिक कार्यात उतरायला पाहिजे.’ जेव्हा मी त्याला लग्न करण्यासंबंधी विचारलं तेव्हा त्याला एस. एम. जोशी फाउंडेशनची एक हजार रुपये महिना फेलोशिप मिळत होती. भांडे घासून संसार करील, पण तुझ्यासोबतच लग्न करील असे मी त्याला ठणकावून सांगितले.

आम्ही १४ एप्रिल १९९३ ला श्रमजीवी संघटना व विधायक संसदच्या कार्यालयात लग्न केले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मोठा मोर्चा होता. या मोर्चात आम्ही सहभागी झालो. मोर्चात तर लोकांसह आम्हालाही अटक करण्यात आली. आमच्यासोबत विवेकभाऊ, विद्युतताई आणि कार्यकर्ते होते. मंत्रालयात परिसरातील काळाघोडा चौकीत नेऊन रात्री उशिरा आम्हाला सोडून देण्यात आले.

२९ सप्टेंबरला लातूरला प्रलयंकारी भूकंप झाला. या भूकंपात मानवी हक्क अभियानच्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही सक्रिय सहभागी झालो. मातीत गाडलेल्या मढ्यांना काढून जाण्यापासून ते घरं बांधून देण्यापर्यंतच्या सर्व कामात आम्ही सहभागी झालो.

भूकंपासारख्या विनाशकारी नैसर्गिक आपत्तीत ही लोक जातीयता, धार्मिक कट्टरता विसरले नव्हते. भूकंपाच्या मिळणाऱ्या मदतीच्या रांगेत दलितांना उभं राहू दिलं जात नव्हतं. संपत्तीसाठी लहान मुलींचे विवाह जरठ माणसासोबत लावले जात होते. मनाला चटका लावणाऱ्या काही घटना वगळता खूप सकारात्मक व प्रेरणा देणाऱ्या गोष्टीही घडत होत्या. जगभरातील गुणवान, कर्तृत्ववान, विद्वान, शीलवान माणसं आपल्या ज्ञानकौशल्यासह किल्लारी परिसरातील चाळीस गावांत राबत होते. आपल्या पुण्याचं संचित या उद्ध्वस्त मातीत ओतत होते. सोबतच मानवी हक्क अभियानची मानवी हक्कांची लढाई सुरू होती. मानवी हक्क अभियानचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती-धर्माची माणसं एकत्र येऊन दलितांच्या न्याय्य हक्कांसाठी झटत होती. दलितांवर होणारे अत्याचार आणि अस्पृश्यतेविरुद्ध हे काम निष्ठेने सुरू होते. पिंपरी देशमुख येथील अंबादास साबणे, लातूरमधील नारायण हरणे यासारख्या खून प्रकरणाला न्याय मिळावा म्हणून लढाई चालू होतीच, सोबतच पद्मिनबाई लोंढे, अभंग लोंढे, रामा मोतेवार, दुधाराम आवाड, मसू आवाड यांना जातीवर आधारित कामे करायला लावली म्हणून यांच्या वेठबिगारीच्या केसेस त्यांच्या मालकावर टाकल्या होत्या. त्यातही आम्ही सहभागी होतो.

आम्ही सामाजिक कार्यकर्ते होतो तेव्हा दलितांसोबत अस्पृश्यता पाळली जात होती. त्यांच्यावर अत्याचार होत होते आणि आम्ही त्यासंबंधी काही केले नाही असा नकारात्मक इतिहास आम्हाला आमच्या बाबतीत लिहिला जाऊ नये हीच मूलभूत प्रेरणा हे सारं काम स्वीकारण्यामागे होती. या भारलेल्या वातावरणात आमच्या सामाजिक कार्यातील संस्कारांची जडणघडण होत होती. रा. वि. भुस्कुटे, विवेक पंडित, विद्युल्लता पंडित, एकनाथ आवाड, अनिल शिदोरे, दशरथ जाधव, बाबूराव धुळे, शंकर पवार, दत्ता खंडागळे अशा अनेक दिग्गज माणसांसोबत काम करता आले. शिकता आले. समृद्ध होता आले.

मनीषा तोकले
संपर्क : 9325056893

बातम्या आणखी आहेत...