आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:मुलांशी वागताना धर्माचा विचार हा संकुचितपणा, ‘खिसा’ लघुपटातील घटनेचा लहानपणी प्रत्यक्ष साक्षीदार हाेताे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘खिसा’लघुपटाचे लेखक जालन्याचे कैलास वाघमारेंचे मनोगत

राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांवर वेगळा ठसा उमटवणाऱ्या “खिसा’ या मराठी लघुपटाला नॉन फिक्शन कॅटेगरीत यंदाचा उत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक या श्रेणीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने या लघुपटाचे जालना जिल्ह्यातील कथा, संवाद व पटकथा लेखक आणि अभिनेते कैलास वाघमारे यांचे मनोगत....

“खिसा’ या लघुपटाला जगभरातील नामांकित २१ पुरस्कार मिळाले आहेत, पण राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय याचे महत्त्व आमच्यासाठी अधिक आहे. या लघुपटाचे दिग्दर्शक हे राज प्रीतम मोरे आहेत. ते जागतिक पातळीचे चित्रकार असून त्यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला लघुपट आहे. या लघुपटात दाखवलेली घटना ही माझ्या लहानपणी मी प्रत्यक्षात अनुभवली आहे. सध्याच्या काळात हिंदू-मुस्लिम धर्मीयांमध्ये एक प्रकारे दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय.

राजकीय हेतूने दोन धर्मांत द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. पण जात, धर्म, द्वेष हे काहीच माहित नसलेल्या लहान मुलांच्या भावविश्वावर या विद्वेषाचा कसा परिणाम होतो याचा आपण कधीच विचार करत नाही. माझ्या मुस्लिम मित्रासोबत अशीच एक घटना घडलेली, मी त्याचा साक्षीदार होतो. तेव्हापासून माझ्या मनावर या घटनेचा परिणाम झाला होता. ही खंत कुठेतरी व्यक्त करायची होती. ती मी माझ्या कलेच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न केला. मुलांशी वागताना किंवा त्यांच्यावर प्रेम करत असतानाही आपण जर धर्माचा विचार करणार असू तर माणूस म्हणून आपण किती संकुचित आहोत, याचा प्रत्येकानेच विचार करावा. त्यामुळे सामाजिक सलोखा टिकून राहील. जाती-धर्मापेक्षा माणूस आणि प्रेम या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे मांडण्याचा प्रयत्न आम्ही “खिसा’ या लघुपटातून केला आहे. समाजात रोज घडणाऱ्या गोष्टींचे प्रतिबिंब पडद्यावर मांडणाऱ्या लघुपटाच्या माध्यमातून सद्य:स्थितीवर भाष्य करण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला याचा आनंद वाटतोय.

राष्ट्रीय पुरस्कार : हिंदीत ‘छिछाेरे’ तर मराठीत ‘बार्डो’ सर्वाेत्कृष्ट
नवी दिल्ली | ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा सोमवारी झाली. दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा ‘छिछाेरे’ हा सर्वाेत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला. कंगना रनाैतला ‘मणिकर्णिका’ व “पंगा’साठी सर्वाेत्कृष्ट अभिनेत्री, तर मनाेज वाजपेयीला भाेसले आणि धनुषला असुरन चित्रपटासाठी सर्वाेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. ‘आनंदी गोपाळ’लाही सन्मान मिळाला.

{ शब्दांकन : मिनाज लाटकर

बातम्या आणखी आहेत...