आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समकाल:लग्नाळू शेतकरी

छत्रपती संभाजीनगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉ र्ड मेकॉलेने जी शिक्षण व्यवस्था भारतात निर्माण केली ती आजही मोडीत काढता आलेली नाही. पांढरपेशे कारकून निर्माण करण्याचा कारखाना म्हणून या व्यवस्थेचे वर्णन करता येईल. तिच्यात काळानुरूप काही गोष्टी बदलल्या असल्या तरी मूळ ढाचा बदलला नाही. या ढाच्याने उच्च-कनिष्ठ भेद निर्माण केले आहेत. चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या ‘अजगर’ या कादंबरीतील चौगुले साहेब निवृत्त होताना, आपल्या खुर्चीवर उद्या दुसरा कोणीतरी बसेल म्हणून ती खुर्ची बाटवण्यासाठी दरवाजावर पहारा देणाऱ्या मोरेला त्या खुर्चीत बळेच बसायला लावतात. पण, या एका घटनेने मोरे कोलमडून पडतो. वेड लागायची वेळ त्याच्यावर येते. तो बेशुद्ध पडतो. या शिक्षणव्यवस्थेने अशा श्रेणीच्या अनेक पायऱ्या तयार केल्या आहेत. त्या ओलांडून पुढे जाण्याची कोणाची हिंमत होत नाही. हे मी का सांगतो आहे, तर मागच्या महिन्यात आमच्या सोलापूरला एक अभिनव मोर्चा निघाला. जिल्हाभरातील लग्नाळू तरुण फेटे, बाशिंग बांधून घोड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन गेले होते, ‘आम्हाला बायको द्या’ म्हणून. यात रोज हजारो रुपये कमावणारे शेतकरी, उद्योजक होते. चार दिवसांपूर्वी सोलापूरच्या एका चालकाने, चारचाकी घेऊन व्यवसाय केल्यावर तरी लग्न जमेल म्हणून मालकाचे दहा लाख रुपये चोरले. परवा सहा एकर द्राक्ष बागायतदार तरुण मला सांगत होता, ‘मुलगी मिळेना म्हणून टोल नाक्यावर नोकरीला लागलो, तर तिथंबी पोरं व्यसन करतात, असा समज करून घेऊन कोणी पोरगीच देईना राव! पळवून आणावी म्हनलं, तरी कुणी आमच्या थोबाडाकडं पाह्यना झालंय..’ अशी शेकडो पोरं गावोगावी आहेत, ज्यांना कोणीच पोरी द्यायला तयार नाहीत. का? तर शेतीचा, उद्योगाचा भरवसा नाही.. यांच्या उद्ध्वस्त आयुष्याच्या कहाण्या ऐकण्यास कुणाकडे वेळ नाही. मग ही चाळिशीला आलेली पोरं व्यसनाकडे वळलीत. विद्ध्वंसक बनू लागलीत. त्यामुळे गावेच्या गावे बिघडून गेली आहेत. या मुलांशी एकदा बोलून बघा. त्यांच्याकडं खूप स्वप्नं आहेत. प्रयोगशील आयडिया आहेत. नवं करण्याची जिद्द आहे. ही मुलं जातीबाहेर लग्न करू लागली आहेत. ऊसतोड कामगारांच्या मुलींशी यांची लग्नं होऊ लागली आहेत. पण, यांच्या जगाकडे डोळसपणे पाहायला आमची शिक्षण व्यवस्था आजही तयार नाही. सगळ्यांना सुटाबुटातला माणूस हवा आहे. शहरातला नखरा हवा आहे. मातीत कुणाला हात मळवायचा नाही. शेतकरी आत्महत्येच्या मुळाशी जायला कोणी तयार नाही. आजही कामगारांना तीनशे ते पाचशे रुपयांपेक्षा जास्त रोजगार नाही. १९९० पासून रोजगारात कमाल वाढ दहापट झाली आहे आणि इकडे वेतन आयोग मात्र शेकडो पटीने वाढले आहेत. शेतकरी मजुराला जादा भाव देवू शकत नाही, कारण त्याच्या शेतमालाला भाव नाही. रात्रंदिवस राबून हातातोंडाशी गाठ पडेल, असे वातावरण शेतीत नाही. बाकीच्या नैसर्गिक संकटांचा तर विचारच नाही. कायम शेती, मजूर आणि शेतीपूरक उद्योग तोट्यात कसे राहतील आणि शोषणाची परंपरा अधिक शाबूत कशी राहील, असाच विचार कोणतेही शासन करत आले आहे. या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ‘मनरेगा’चा, पीक विमा योजनेचा निधी कमी केला आहे. याच शेतीने आणि गावाने कोरोनाच्या काळात माणसाला हात दिला आहे, हे सगळे लक्षात घेऊनही शिक्षण, श्रम, शेती, उद्योग यांची सांगड घालणारे शिक्षण उपलब्ध नाही. आर्थिक तरतुदीसह शिक्षणात आमूलाग्र बदल करावा असे कोणाला वाटत नाही. या वर्षीच्या बजेटमध्ये उच्च शिक्षणासाठीही काहीच भरीव निधी नाही. मी १९८८ ला दहावी झालो. उन्हाळी सुटीत शेजारी विहीर खोदायचे काम सुरू होते, तिथे दोन महिने १५ रुपये रोजाने मजुरी केली. लागणारी वह्या-पुस्तके घेऊन कॉलेजला गेलो. ती विहीर आजही मला खुणावत राहते. या विहिरीला पाणी आणून देण्यात आपला सहभाग आहे याचे अतीव समाधान जसे वाटते तसेच याच विहिरीने जगाच्या नकाशावर जाण्याचे मार्ग उपलब्ध करून दिले हेही लक्षात येते. विहिरीतून गोल आणि छोट्या दिसणाऱ्या, परंतु थकून सायंकाळी सहाला वर आल्यावर अथांग दिसणाऱ्या आभाळाकडे पाहत भिजल्या हाताने पोकळीत नवी स्वप्नं पेरत होतो, जी आज पूर्णत्वास आली आहेत. अशी स्वप्नं देणाऱ्या भूमीत राबणाऱ्या हातांना सक्षम करण्याची आणि आर्थिक गरजांसह त्यांना प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या शिक्षणाची खरी गरज आहे.

महेंद्र कदम mahendrakadam27@gmail.com संपर्क : 9011207014

बातम्या आणखी आहेत...