आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Blackboard Detailed Story About Mass Hysteria In Uttarakhand Schools, Girl Students Screaming In Mass Hysteria

ब्लॅकबोर्डदेवभूमीतल्या शाळांमध्ये मुलींच्या किंकाळ्या:गावकरी म्हणतात 'भुताटकी', तर वैज्ञानिकांच्या मते 'मास हिस्टेरिया'

लेखक: उत्तराखंडच्या बागेश्वरहून मृदुलिका झाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उंच डोंगर, हिरवळ, निळेशार पाणी आणि ताजी हवा. सुट्यांमध्ये हिलस्टेशनवर जाणाऱ्यांना या डोंगरदऱ्यांविषयी इतकीच माहिती असते. पण घनदाट जंगलांनी वेढलेल्या या दुर्गम डोंगराळ भागाचा दुसरा चेहराही आहे. थंडी इतकी कि हाडे गोठतील. गर्द इतका की मन सुन्न होईल. या डोंगरदऱ्यांत कित्येक स्वप्ने विरली आहेत. उधाणलेल्या नद्यांनी कित्येक घरे वाहून नेली आहेत. विध्वंसाच्या कहाण्यांमध्ये आणखी एक कहाणी आहे. जितकी न ऐकलेली, तितकीच अंधकारमय. जुलैमध्ये पठारावरील लोक जेव्हा पावसात चहा पिण्याचे फोटो टाकत होते, तेव्हा उत्तराखंडचा बागेश्वर जिल्हा चित्कारांनी भेदरला होता. शालेय मुलींचे चित्कार. आपलेच चेहरे ओरबाडणाऱ्या आणि भिंतींवर डोके आदळणाऱ्या मुलींना भस्म देऊन शांत करण्यात आले. डॉक्टर्स याला मास हिस्टेरिया म्हणाले. तर गावकरी याला वाईट सावली म्हणाले. हा आजार एका शाळेतून दुसऱ्या शाळेत पसरत गेला. काय आणि का झाले, कुणालाही माहिती नाही. घाबरलेल्या मुलींचा त्रास समजून घेण्यासाठी आम्ही जिल्ह्यातील काही शाळांना भेट दिली.

हा त्या शाळेचा बोर्ड आहे, जिथे काही दिवसांपूर्वी मुली अचानक रडू-ओरडू लागल्या होत्या. ही सावली असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
हा त्या शाळेचा बोर्ड आहे, जिथे काही दिवसांपूर्वी मुली अचानक रडू-ओरडू लागल्या होत्या. ही सावली असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

काठगोदामपासून बागेश्वरदरम्यानचे अंतर ६ तासांचे आहे. पावसात वेग आणखी कमी होतो. अरूंद रस्त्यांवरून जाताना मी शाळेतील घटनांचा उल्लेख केला तर बोलक्या ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर भिती दिसून आली. 'डोंगराळ रस्ता आहे, केव्हा काय होईल, कुणाला माहिती नाही. हे विचारू नका.' मी वारंवार विचारल्यानंतर अखेरीस म्हणाला, 'डोंगरांवर छल(स्थानिक भाषेत प्रेत) लागतच असतो. स्वतः मला लागला होता, तेव्हा विश्वास बसला. तुम्हालाही माहिती होईल.' एक प्रकारचा इशारा देऊनच त्याने मला शहरात सोडले. तिथून सुमारे ५० किमी अंतरावर आहे पचार हे गाव. तेच गाव जिथे मास हिस्टेरिया झालेल्या अनेक मुली राहतात. सर्वांनी बोलण्यास नकार दिला. एका मुलीची आई रडतच म्हणाली, चेहरा दिसला, तर लग्नातही अडचण येईल. मी विचारले, पण तुमची मुलगी तर ११ वीत आहे. लग्नाला अजून वेळ आहे. रागातच उत्तर मिळाले, आम्ही शहरात नाही राहत. छोटे-छोटे गाव आहे. पिढ्या जातील, तरिही सर्वांना स्मरणात राहिल.

कित्येक किलोमीटरच्या धोकादायक डोंगराळ रस्त्यावरून मुले शाळेत जातात. कधी कधी यादरम्यान जंगली श्वापदेही त्यांना दिसतात. तर कधी भीतीदायक कहाण्या पिच्छा करतात.
कित्येक किलोमीटरच्या धोकादायक डोंगराळ रस्त्यावरून मुले शाळेत जातात. कधी कधी यादरम्यान जंगली श्वापदेही त्यांना दिसतात. तर कधी भीतीदायक कहाण्या पिच्छा करतात.

मोठ्या मुश्किलीने एका विद्यार्थिनीचे कुटुंबीय बोलायला तयार झाले. वडील गावाचे माजी सरपंच होते. सुशिक्षित आणि खुल्या विचारांचे. अट एकच की चेहरा नाही दाखवायचा आणि मुलगी घाबरणार नाही इतकेच प्रश्न विचारावे. 'आताच धक्क्यातून सावरली आहे' त्यांचा आवाज चिंतेचा होता. 'मी स्वतःचा चेहरा ओरबाडत रडत होते. शिक्षक मला पकडत होते. कुणी पाणी शिंपडत होते. कुणी भस्म लावत होते. नंतर मी बेशुद्ध झाले. शुद्ध आली तेव्हा संपूर्ण शरीरात वेदना जाणवत होत्या. थकवा इतका होता की, डोंगराळ भागातील लोकांना कधीही न व्हावा.' दुबळे शरीर आणि गोड हसणारी कुसुम हे सांगताना अतिशय शांत होती. जणू दीर्घ झोपेतून जागी झालेली असावी. सनेतीतील लाल बहादूर शास्त्री इंटर कॉलेजमध्ये ऑगस्टच्या सुरुवातीला जेव्हा मुली आजारी पडायला लागल्या, तेव्हा कुसुमला भीती आणि बेशुद्धीचा झटका आला होता. १२ वी कला शाखेचे शिक्षण घेणारी ही विद्यार्थीनी ओरडतच बेशुद्ध झाली होती. सतत दोन वेळा असे झाले. सध्या सर्व ठिक आहे, पण किती दिवस, हे निश्चित नाही. अडीच वर्षांपूर्वीही याच ऋतूत शालेय मुली आजारी पडायला लागल्या होत्या. तेव्हा शाळेत असलेल्या एका मंदिरात पूजा करण्यात आली. तेव्हा शांती झाली. शालेय व्यवस्थापन समितीच्या एका सदस्याने मुलाखतीत याबद्दल सांगितले. सर्वच मुलींसोबत असे होत होते का? नाही. सर्वांसोबत वेगवेगळ्या घटना घडत होत्या. कुणी रडत होत्या. तर कुणी ओरडत होत्या. मी चेहरा ओरबाडत होते. कुणी केस मोकळे सोडून डोके आपटत होत्या. कुणाचे ओठ थरथरत होते. नंतर सर्व बेशुद्ध व्हायला लागल्या. कुणाला लवकर शुद्ध आली, तर कुणाला वेळ लागला. एक मुलगी ३ तास बेशुद्ध होती. डॉक्टरही घाबरले होते.

डॉक्टर काय म्हणाले? म्हणाले की, 'तुम्ही सर्व नाटक करत आहात. एकाल होऊ शकते. सर्वांसोबत एकदाच कसे काही होईल?' कुसुम अतिशय भोळेपणाने सर्व काही सांगून जाते. नंतर एकदम थांबत म्हणते, मी दुसऱ्या दिवशी शाळेत गेले नाही. घरीच होते. खांदे आणि पायांमध्ये खूप वेदना होत्या. तिसऱ्या दिवशी शाळेत गेले, तर जाताच गुदमरायला लागले. यानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांनी मला घरी सोडले. आता? शाळेत जात आहे. १२ वीत आहे. नाही गेले, तर कसे चालेल? जावेच लागेल. हे सांगताना तिच्या चेहऱ्यावरील विवंचना स्पष्ट दिसत होती. ती वारंवार खांद्यांना हात लावत होती. गळ्यात काळा धागा आहे. जो कदाचित या घटनेनंतर घालण्यात आला असावा. कारण बाकी कुणाच्याही गळ्यात तसा धागा दिसला नाही.

डोंगराळ भागात जवळपास प्रत्येक घरातील लोक देवी-देवतांच्या सावलीवर विश्वास ठेवतात. त्यापासून वाचण्यासाठी घराच्या भिंतीवर टोटकेही करतात.
डोंगराळ भागात जवळपास प्रत्येक घरातील लोक देवी-देवतांच्या सावलीवर विश्वास ठेवतात. त्यापासून वाचण्यासाठी घराच्या भिंतीवर टोटकेही करतात.

खोलीच्या बाहेरच्या भिंतीवर वाईट शक्तींपासून संरक्षणासाठी पहाडी टोटके दिसून येतात. जास्त काही न विचारता मी कुसुमच्या आईला भेटले. त्या सांगतात, जेव्हा माहिती मिळाली, तेव्हा मी घरी नव्हते. मोठ्या मुलीने तिला झोपवले. ती उठल्यावर मी तिला भस्म लावले. दुसऱ्या दिवशी सुटी होती. पण त्यानंतर शाळेत जाताच पुन्हा काही झाले. देवानेच केले असेल. देव सर्व काही चांगले करतात. ते मुलींना का त्रास देतील? 'त्रास नाही देणार, तर कुणी त्यांच्याकडे लक्ष का देईल. चुप राहतील, तर कुणीही पूजणार नाही. यासाठी मध्ये-मध्ये काही करत असतात.' मोडक्या-तोडक्या हिंदीत कॅमेऱ्यासमोर आरामात हे बोलणाऱ्या कुसुमच्या आईला शहरी शहाणपणाबद्दल माहिती नाही. तिला 'पॉलिटिकली करेक्ट' राहण्याबद्दल माहिती नाही. त्यांना फक्त इतकेच माहिती आहे की त्यांच्याकडे देवी-देवता येत राहतात.

बोलणे सुरूच होते, तेव्हा कुसुमची मोठी बहीण काकड्यांनी भरलेली प्लेट घेऊन आली. सोबत पहाडी नूण(मीठ) आणि लसणाची चटणी.
बोलणे सुरूच होते, तेव्हा कुसुमची मोठी बहीण काकड्यांनी भरलेली प्लेट घेऊन आली. सोबत पहाडी नूण(मीठ) आणि लसणाची चटणी.

काकड्यांनी भरलेली प्लेट पाहून सुरुवातीला मी गडबडले. नंतर एकटक पाहणारे चेहरे पाहून एक तुकडा उचलून घेते. चटणीच्या रेसिपीचे कौतुक करत मुलीचे वडील म्हणतात - मुली आजारी आहेत, हा देवी-देवतांचा प्रकोप आहे. काही कळू शकले नाही. मी विचारले, तुम्ही उघडपणे बोलत आहात, बाकीचे लोक गप्प का आहेत? काय सांगतील? त्यांनाच काही माहिती नाही. भीतीही असतेच ना. कशाची भीती असे विचारल्यावर ते गप्प राहतात. आमचा पुढचा मुक्काम होता सनेती गावातील शाळा. या शाळेत जुलैच्या अखेरपासून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अनेकदा या घटना घडल्या. लांब गवत आणि जंगली झाडा-झुडपांत इंटर कॉलेजचा बोर्ड लागलेला आहे. रस्तापासून ४०० मीटर दूर. रस्ता म्हणजेच दगडांच्या पायऱ्या किंवा कच्च्या मातीचा रस्ता ज्यावरून चालताना एखादा सापही दिसतो. स्वतः माझ्या समोरून एक साप सळसळ करत निघून गेला. मी घाबरल्यावर एक स्थानिक व्यक्ती हसत हसत सांगू लागला की, एका नागाने त्याचा रस्ता कसा अडवला होता आणि तो कसा न घाबरता उभा राहिला. कहाणी ऐकतच आम्ही लाल बहादूर शास्त्री इंटर कॉलेजमध्ये पोहोचलो. शाळेची कोणतीही हद्द नाही. दूरवर झाडे, लांब गवत आणि जंगली झाडी आहेत. यांच्या मध्ये खोल्या पसरलेल्या दिसतात. प्रत्येक खोलीसमोर क्रमांक आणि विषयाचे नाव लिहिलेले.

हा फोटो लाल बहादूर शास्त्री इंटर कॉलेजच्या स्थितीचे वर्णन करण्यास पुरेसा आहे. जमीनीवरच नव्हे तर खोलीच्या छतावरही इथे गवत उगले आहे. साप आणि विंचवाची भीती कायम असते.
हा फोटो लाल बहादूर शास्त्री इंटर कॉलेजच्या स्थितीचे वर्णन करण्यास पुरेसा आहे. जमीनीवरच नव्हे तर खोलीच्या छतावरही इथे गवत उगले आहे. साप आणि विंचवाची भीती कायम असते.

मी रविवारी इथे पोहोचले. शाळा बंद. पण खोल्यांवरच्या कुलुपही त्यांची दुरवस्था लपवू शकत नव्हते. प्रत्येक ठिकाणी धूळ साचलेली. काही ठिकाणी भिंत फोडून बाहेर आलेली झाडे दिसत होती. झाडांनी वेढलेले एक टॉयलेटही होते. कदाचित वापरात नसावे. त्याच्या छतावरही गवत उगलेले होते. सापांचा धोका पत्करून पुढे जाऊन त्याचा फोटो घेण्याचीही हिंमत मला झाली नाही. वरूनच जुगाड करून क्लिक करत मी पुढे गेले. पुढे स्टाफ रुम होती. भिंतीवर लिहिले होते, 'शिक्षक आणि रस्ता सारखेच असतात. दोन्ही स्थिर असतात, दुसऱ्यांना ध्येयापर्यंत पोहोचवतात.' इथेच आम्हाला शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य कॅप्टन धनसिंह बाफळा भेटले. ते सेनेतून निवृत्त झाले आहेत. ते म्हणतात, अडीच वर्षांपूर्वीही असेच झाले होते. तेव्हा शाळेतील मंदिरात पूजा करण्यात आली होती. नंतर सर्व शांत झाले. आता पुन्हा व्हायला लागले आहे. मी मुलींचे खाणे-पिणे आणि वयाचा(13 ते 17 वर्षे वयाच्या मुलींमध्ये दिसत आहे) दाखला दिला. ते फेटाळताना म्हणतात, हे काही नाही. जे आहे ते नैसर्गिक आहे. म्हणूनच मंदिरातील पूजा कामी आली.

सायंकाळ होण्यापूर्वी आम्ही शहरात परतलो. इथे डूग बाजारात आमची भेट झाली दयाल सिंह दानू यांच्याशी. ते 'पुजारी' आहेत. जे झाड-फूक करतात आणि देवांना प्रसन्न करतात. सुमारे ५० वर्षे वयाचे दयाल पूजेच्या सामानसह दैनंदिन गरजेच्या वस्तूही विकतात. त्यांना याची गरज नाही. एका झाड-फूक साठी त्यांना ५ ते १० हजार मिळतात असे एका स्थानिक मैत्रिणीने मला सांगितले. रोज अशी अनेक प्रकरणे त्यांच्याकडे येतात.

स्वतः दयाल सांगतात, दररोज मुले येत आहेत. सर्वांना एकच त्रास आहे. हा काही आजार नाही. ज्याला औषध, इंजेक्शन दिल्यावर तो बरा होईल. कुटुंबीय आमच्याकडे येतात. आम्ही नखे पाहतो आणि कळून जाते की देवता लागले आहेत की छल. इलाज कसा करता? भस्म लावून म्हणतो की जोही बालकाच्या शरीरात आहे, त्याने निघून जावे. त्याला जे हवे ते आम्ही देऊ. जर छल किंवा देवता असेल तर नेहमीच असे का होत नाही? केवळ पावसाळ्यातच असे का होते? माझ्या प्रश्नावर दयाल जोरात हसतात आणि म्हणतात, प्रेतात्मा तर हवा असते. हवेचे काय आहे, कधी वाहते, तर कधी शांत राहते. कधी वाहते. हल्ली हेच होत आहे. मी म्हणाले की, माझेही नख पाहून सांगा की मला पण काही लागले तर नाही ना. त्यांनी मला सकाळी रिकाम्या पोटी येण्यास सांगितले. छल, सावली, देवता लागणे - सर्व मुलींची स्थिती जशीच्या तशी आहे. अदृश्य शक्ती त्यांच्या शरीरावर ताबा न घेवो याची त्यांना भीती आहे. आमच्याही मनात प्रश्न आहे की, पावसाळ्यातच असे का होते. मुलींनाच का होते, आणि डोंगराळ भागातच का होते?

सनेतीतल्या शाळेच्या आवारात हे सरस्वतीचे मंदिर आहे. इथे नवसाच्या अनेक घंटा लटकलेल्या आहेत. जवळच नंदा देवीचेही मंदिर आहे. स्थानिकांची या मंदिरांवर मोठी श्रद्धा आहे.
सनेतीतल्या शाळेच्या आवारात हे सरस्वतीचे मंदिर आहे. इथे नवसाच्या अनेक घंटा लटकलेल्या आहेत. जवळच नंदा देवीचेही मंदिर आहे. स्थानिकांची या मंदिरांवर मोठी श्रद्धा आहे.

प्रश्नांच्या याच गुंत्यादरम्यान माझी भेट डॉ. केएस रावत यांच्याशी झाली. ते डाएट टिचर आहेत. त्यांच्या पैतृक गावातही ही घटना अलिकडेच झाली आहे. ते सांगतात इतक्या वर्षांत दरवर्षी कुठे ना कुठे या घटना मी बघत आलो आहे. डोंगराळ भागातच हे होण्यामागे अनेक कारणे आहेत. इथे पाऊस खूप जास्त पडतो. अनेकदा पावसामुळे गाडलेले प्रेत नदी-नाल्यातून वाहून वर येतात. शाळेत जाताना जंगलांतून प्रवास करता करता मुलांच्या ते नजरेस पडतात. ते कुणाला बोलू शकत नाही, एकमेकांमध्येच बोलतात. यामुळे एक मुल घाबरल्यास इतरही घाबरतात. किशोरवयीन मुलींच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यांच्या शरीरात कॅल्शियम-आयर्नच्या कमतरतेमुळेही असे होऊ शकते की त्यांना लवकर भीती वाटते. विज्ञानाविषयी बोलणारे डॉ. रावत हे पहिलेच व्यक्ती होते. ते याला मानसिक आजार म्हणतात आणि काऊंसेलिंगवर भर देतात. अखेरीस दबक्या आवाजात म्हणतात - लोक विनाकारण देवभूमीला प्रेतभूमी बनवत आहेत.

मुलाखतीची मालिका संपल्यानंतर मी बागेश्वरमधून वाहणाऱ्या शरयू किनारी आले. डोंगरांतून वाहणाऱ्या या नदीच्या चारही बाजूंनी शहर वसले आहे. १९०३ मध्ये नदीवर बनलेला पूल शहराच्या दोन्ही बाजूंना जोडतो. सोबतची मैत्रीण म्हणाली, काही दिवसांपूर्वी या पुलावरून एका व्यक्तीने उडी मारली. लाईफ जॅकेट, दोरी, सर्व काही फेकले गेले. वाचण्यासाठी तो हात-पायही मारत होता. पण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. बोलता बोलताच शरयूची आरती सुरू झाली. धर्म-श्रद्धेच्या पुढे नदीची पूजा, निसर्गाची पूजा. मी कुसुमचे डोळे आठवते. पावसात उधाणलेल्या नदीसारखे तिच्या डोळ्यातले ते भाव रेकॉर्ड करताना माझा कॅमेरा थरथरत होता. ती म्हणाली होती, भीती वाटली, तरीही जावे लागेल. तिथून निघून मी दिल्लीला पोहोचलेच होते की, ३१ ऑगस्टला सायंकाळी माझ्या फोनची बेल वाजली. बातमी होती, सनेतीतील इंटर कॉलेजमध्ये पुन्हा एकदा अनेक मुलींनी भींतीला डोके आदळण्याचा प्रयत्न केला. यानंतर शाळेला सुटी देण्यात आली. मुख्य वैद्यकीय अधिकारी याचा तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...