आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेच्या सिनसिनाटीतील १२ वर्षीय अभिनव कोरोना लस चाचणीत सहभागी झालेला जगातील सर्वात छोटा मुलगा आहे. त्याचे वडील शरत चंद्र डॉक्टर आहेत व तेही फायझरच्या लस चाचणीत सहभागी झाले आहेत. त्याच्याशी ‘दिव्य मराठी’च्या शादाब समी यांनी साधलेला संवाद -
तुम्ही लसीच्या चाचणीत सहभागी सर्वात कमी वयाचे आहात. ही प्रेरणा कशी मिळाली?
- माझे वडीलही लसीच्या चाचणीत सहभागी झालेले आहेत. त्यांनी मला सांगितले की, आता १२ ते १५ वर्षे वयाच्या मुलांवर लसीची चाचणी घेतली जाईल. तुला या चाचणीत सहभागी होण्याची इच्छा आहे का? यानिमित्त मी समाजासाठी छोटे का होईना काही तरी करू शकेन याचा मला आनंद झाला. यामुळे शास्त्रज्ञांना कोरोना विषाणू समजून घेण्यासाठी मदत होईल, या विचाराने बरे वाटत होते.
अभिनव, तुमचे वय खूप कमी आहे, लस घेताना कोणतीही भीती नाही वाटली?
-हो, आधी मला भीती वाटली. मला लसीची नव्हे, तर इंजेक्शन देऊन माझे रक्त काढले जाईल, याची भीती वाटत होती. मी यापूर्वी कोणत्याही लसीच्या चाचणीत भाग घेतला नव्हता, म्हणून थोडा संकोच आणि घबराटही होती. इतर लसींच्या चाचणीत काही लोकांना साइड इफेक्ट झाल्याचे मी ऐकल्यावर आरोग्याची चिंता वाटली, पण फायझरच्या लसीबाबत अशी कोणतीही बातमी न आल्यामुळे मी तयार झालो होतो. माझी आई मात्र यासाठी तयार नव्हती, परंतु माझे वडील या चाचणीत सहभागी झीले होते आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा मोठा साइड इफेक्ट झाला नव्हता, त्यामुळे माझ्यासाठी हे करणे सोपे झाले. याचाच विचार करून आईने नंतर मला या चाचणीत सहभागी होण्याची परवानगी दिली. मला कोरोनावरील या लसीचा पहिला डोस आॅक्टोबरअखेर देण्यात आला. त्यानंतर दुसरा डोस नोव्हेंबरमध्ये देण्यात आला. दोन्ही वेळा मला काहीही साइड इफेक्ट झाला नाही, फक्त दंड काही दिवस दुखत होता.
वडील म्हणाले - संशोधनानंतर मुलाला चाचणीबाबत विचारले
वडील शरत चंद्र सांगतात की, मी रुग्णालयात काम करतो. त्यामुळे कोरोना संसर्ग माझ्या माध्यमातून कुटुंबात शिरण्याची मला भीती होती. म्हणून मी चाचणीत भाग घेण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबरमध्ये दुसरा डोस घेतल्यानंतर मला खूप ताप आला. दोन दिवस खूप थकवा जाणवला. परंतु, याला मोठा साइड इफेक्ट म्हणता येणार नाही. त्यानंतर लसीचे साइड इफेक्ट मुलावर तर होणार नाहीत ना, यावर मी आधी माझ्या पातळीवर बरेच संशोधन केले. गंभीर साइड इफेक्ट होणार नसल्याची खात्री पटल्यावर मी अभिनवशी बोललो. त्याला समजावून सांगून चाचणीत सहभागी केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.