आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशंभुनाथांनी सांगितले, पोरीला कळा सुरू झाल्या.. ती तडफडत होती. दवाखान्याच्या गेटवरच प्रश्नांची सरबत्ती झाली. प्रसंग बाका होता. डॉक्टरांना गयावया केली, शेवटी एका गृहस्थानं मध्यस्थी केली आणि काही तासांतच पोरीची सुटका झाली. पण अर्धपोटी राहूनच पुढले दिवस काढावे लागले..
मध्य प्रदेशातील मंसोरी जिल्ह्यातील काकडसेमली येथील रहिवासी असलेले शंभुनाथ व्यास पंचवीस जणांचे कुटुंब घेऊन सहा महिन्यांपूर्वी मलकापूरला आले. चार मुली, जावई, नातवंडे असा जंबो परिवार. गावाकडे जगण्याचे हाल. येवता रोडवर तंबू ठोकून राहू लागले. औरंगाबादहून प्लास्टिकच्या टोपल्या आणायच्या आणि इथे विकायच्या यावर गुजराण सुरू होती. लेक-जावई रोजंदारीने जात. लॉकडाऊन झाले आणि सगळ्यांचेच काम थांबले. साठवलेलं धान्य दोन दिवस पुरलं. तिसऱ्या दिवसांपासून लेकरं भुकेनं रडू लागली. सगळीकडे भीतीचे वातावरण. त्यातच लेक रविनाचे दिवस भरले. दवाखान्यापर्यंत जाण्यास वाहन मिळाले नाही. तिथे पोहोचले तर कोणी आत घेईनात. फक्त प्रश्नांचाच पाऊस. शेवटी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी मध्यस्थी केली आणि लेकीला दवाखान्यात घेण्यात आले. तिला मुलगा झाला. बाळंतिणीची सुखरूप सुटका झाली, पण भुकेच्या धगीपासून ती सुटली नाही.’
बाळंतीणही अर्धपोटीच झोपायची
हाती काहीच नव्हतं. काहींनी तांदूळ आणून दिले. सगळ्यांसह बाळंतीणही अर्धपोटीच झोपायची असे दिवस कधी पाहिले नव्हते, शंभुनाथ सांगत होते. दीड महिन्यांनी रासूबाई ही दुसरी लेकही बाळंत झाली. दोघींची सुटका व्यवस्थित झाली, पण अर्धपोटी राहूनच त्यांना लेकरं पाजावी लागली. त्या दिवसांच्या आठवणींसोबत त्यांच्या मनात घर करून आहे मदतीला धावून आलेल्यांबद्दलची कृतज्ञता. लोक धावून आले म्हणून अडलेल्या मुलीची दवाखान्यात सुटका होऊ शकली. परिसरातील लोकांनी धान्य दिले म्हणून दोन दिवसांचा भुकेचा प्रश्न सुटला. सरकारी अधिकाऱ्यांनी जेवणाची व्यवस्था करून दिली म्हणून तगता आलं. ज्यांच्याकडून माल आणायचे त्या मालकांनीही दोन वेळा दोन - दोन हजार रुपयांची मदत पाठवली याचा ते आवर्जून उल्लेख करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.