आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंबेडकरी विचारांचा प्रसार आणि प्रचार हा शाहिरी जलसे, सत्यशोधक तमाशा अशा कलाप्रकारांमुळे अधिक रुजत गेला. पण काळ बदलत जातोय तशा प्रकारे ही प्रसार आणि प्रचार करण्याची अभिव्यक्तीची माध्यमंही बदलली. सध्याच्या सोशल आणि डिजिटल माध्यमांच्या काळात बाबासाहेबांचा विचार रुजवण्यासाठी वेगळ्या टूल्स आणि ट्रेंडचा वापर केला जातोय. प्रस्थापित ट्रेंडची परिभाषा मोडीत काढत अशा कोणत्या वेगवेगळ्या माध्यमांचा वापर सध्याची तरुणाई करतेय यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप.
भीम पुतळ्यातून बाहेर ये बाबा भीम भजनातून बाहेर ये बाबा नवा विचार घेऊन ये बाबा नवा हत्यार घेऊन ये बाबा भीम भीम येणार येणार बाई
शाहीर संभाजी भगत यांचे हे अजरामर गाणं... यात शाहीर म्हणताहेत तसे आत्तापर्यंत आंबेडकरी विचारांचा प्रसार आणि प्रचार हा शाहिरी जलसे, सत्यशोधक तमाशा अशा कलाप्रकारांमुळे अधिक रुजत गेला. पण काळ बदलत जातोय तशा प्रकारे ही प्रसार आणि प्रचार करण्याची अभिव्यक्तीची माध्यमंही बदलली. सध्याच्या सोशल आणि डिजिटल माध्यमांच्या काळात बाबासाहेबांचा विचार रुजवण्यासाठी वेगळ्या टूल्स आणि ट्रेंडचा वापर केला जातोय. त्या पार्श्वभूमीवर "नवा विचार घेऊन ये बाबा' आणि "नवा हत्यार घेऊन ये बाबा' याच्या जोडीला आता " नवी प्रतिके घेऊन ये बाबा'असेही म्हणावे लागेल.
समाजात सतत वेगवेगळ्या पातळ्यांवर बदल होत असतात. त्यात सतत ट्रेंडच्या नावाने जे वारे वाहतात त्याकडे आपण फॅशन किंवा फॅड म्हणून बघतो. कोणताही ट्रेंड हा कायस्वरुपी राहत नाही, ट्रेंड हे सतत बदलत जातात. काही ट्रेंड हे तात्कालिक स्वरुपात अस्तित्वात येतात तर काही ट्रेंड हे समाजात रुजत जातात, त्यांचा शिरकाव हा पंरपरेत होतो आणि कळत नकळत आपल्या जगण्याचा एक भाग बनून जातो. आत्तापर्यंत जर या ट्रेंडकडे आपण पाहिले तर ट्रेंड हे वरच्या स्तरापासून खालच्या स्तरांवर रुजवले गेले आहेत. ट्रेंडचा प्रवास हा खालून वर असा कधीच जात नाही. पण अिलकडच्या काळात हा ट्रेंड आता खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत नेण्याला सुरूवात झाली आहे. प्रस्थापित ट्रेंडची परिभाषा मोडीत काढत वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करत बाबासाहेबांच्या विचार रुजवण्यासाठी आंबेडकरी, बहुजन ट्रेंड सुरु करण्याचा यशस्वी प्रयत्न सध्याची तरुण पिढी करतेय. यात सामाजिक माध्यमांचा अभिनव वापर त्यांनी केला आहे. कारण ही माध्यमे तशी जातीनिरपेक्ष आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रुजवायचे म्हणजे नेमके काय आणि कसे करायचे यावर अनेक प्रयोग आजवर होत आले आहेत. यामध्ये सांस्कृतिक व सामाजिक चळवळींसोबतच बाबासाहेबांच्या जीवनकार्याशी संबंधित प्रतीकांचा महत्त्वाचा वाटा आहे. सध्याच्या काळात या प्रतीकांकडे नव्याने पाहण्याची वेळ आली आहे. औरंगाबादचा निखिल बोर्डे या आंबेडकरी चळवळीच्या नव्या पिढीच्या कार्यकर्त्याने ई-कॉमर्स माध्यमाचा वापर करून आंबेडकरी, बहुजन समाजाच्या प्रतीकांची विक्री करण्यासाठी ‘बोधीतत्व’ नावाचं एक ई-कॉमर्स प्लँटफॉर्म सुरु केलं आहे.
या मागची प्रेरणा सांगताना निखिल म्हणतो की, “२०१० नंतर ई-कॉमर्स प्लँटफॉर्म जोर धरत होते. बाजारपेठेत नवे ब्रँड उभे राहत होते. २०१५ नंतर मुंबईत शिकत असताना एक विचार सतावत होता. ई-कॉमर्स मार्केट इतकं भरभराटीत असून सुद्धा मेनस्ट्रिम मार्केटमध्ये आंबेडकरी बहुजन समाजाच्या एस्थेटीक्स प्रतीकांना कुठेच बाजारपेठ उपलब्ध नाहीये. यात मोठ्या प्रमाणात पैसा मिळणार असून सुद्धा मोठमोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये या गोष्टी केल्या जात नाहीत. तेव्हाच ठरवलं की आंबेडकरी बहुजन समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक वस्तूंचा एकत्रित एक प्लॅटफॉर्म बनवायचा. त्या वस्तूंना मेनस्ट्रिम पॉप्यूलर क्लचरमध्ये स्थान मिळवून द्यायचं. एका दृष्टीने बघितले तर आंबेडकरी बहुजन समाज हाच मेनस्ट्रिम आहे. त्यामुळे आंबेडकरी बहुजन समाजाचा स्वतःचा एक मेनस्ट्रिम ऑडियन्स उभा करण्याचा हेतू ठेवून भारतातील पहिला आंबेडकरी बहुजन समाजाचा ई-कॉमर्स ब्रँड ‘बोधीतत्व’ या नावाने सुरु केला. ‘बोधीतत्व डॉट कॉम ही एक ई-कॉमर्स वेबसाइट आहे. या वेबसाइटवर बाबासाहेबांची प्रिंट असलेले टी-शर्ट्स, फ्रेम्स, कॅलेंडर अशा गोष्टी सुरुवातीला विक्रीसाठी ठेवल्या आहेत. त्यानंतर बहुजन, अल्पसंख्यांक समाजाचे जे चित्रकार-शिल्पकार आहेत, जे काही नवं करू पाहतात त्यांच्या वस्तूंच्या विक्रीचा एक प्लॅटफॉर्म असेल. सध्या ऑनलाइन बाजारपेठेत एमेझॉन आणि फ्लिपकार्ट आहेत तसेच भविष्यात बोधीतत्व हे बुद्धीस्ट सेलिंग-बायिंग प्लॅटफॉर्म असेल.”
एकीकडे आंबेडकरी चळवळीची प्रतीकं विक्रीसाठी उपलब्ध होत असतांनाच, आंबडेकरी संघर्षाच्या इतिहासाला उजाळा देण्याचा वेगळा प्रयोग पुण्यातील अविचल धिवर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केला आहे. ज्या समाजाला एकेकाळी थेंबभर पाण्याचाही हक्क नाकारण्यात आला होता त्याच समाजातून आता संपूर्ण देशाला शूद्ध पाणी देण्याची एक अभिनव चळवळ धिवर यांनी उभारली आहे. ‘२० मार्च... रिस्पेक्ट एव्हरी ड्रॉप’ ही त्यांच्या उत्पादनाची टॅग लाईन आहे. १९८४ पासून धिवर दलित चळवळीत काम करताहेत. हे काम करत असताना बाबासाहेबांनी महाडचा जो चवदार तळ्याचा संघर्ष केला होता तो फक्त पाण्यासाठी नव्हता तर आत्मसन्मान आणि समतेसाठी दिलेला लढा होता ही जाणीव त्यांच्या मनात रुजली. शिवाय बाबासाहेबांची शिकवण होती की सामाजिक समतेसोबत आर्थिक समानताही तितकीच महत्त्वाची आहे. शिवाय आजपर्यंत व्यवसाय या क्षेत्रातही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी राहीली आहे, तीही मोडीत काढायची होती. या विचारातून प्रेरणा घेऊन त्यांनी २० मार्च १९२७ या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या तारखेवरून 20th March (ट्वेन्टिएट्थ मार्च) या नावाने मिनरल वॉटर विक्रीचा व्यवसाय सुरु केला. या व्यवसायातून आर्थिक समानता तर रुजते आहेच पण एक विचारही समाजात जिवंत ठेवायचा त्यांचा प्रयत्न आहे. प्रत्येकाची तहान भागवत असतांनाच एका रोमहर्षक जातीय संघर्षाच्या इतिहासाची आठवणही ताजी ठेवली जात आहे.
इतिहास शब्दबद्ध जसा होत असतो तसाच तो चित्रबद्धही होत असतो. छायाचित्रे यांत मोलाची भूमिका बजावत असतात. शब्दांच्या माध्यमातून भारतातील बहुजन समाजाचा इतिहास हा कायमच मोठ्या प्रमाणात दूर्लक्षित राहिलेला आहे. तिच गत छायाचित्रांचीही आहे. तत्कालिन काय व सद्यस्थितीतील माध्यमे काय, त्यांनी बहुजन समाजाला उपेक्षण्याचे काम केले आहे. याला छेद देण्याचा प्रयत्न सुधारक ओलवे या पद्मश्री पुरस्कारप्रापत छायाचित्रकाराने केला आहे. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी भारतभर फिरून बाबासाहेबांच्या पुतळ्यांची छायाचित्रे टिपली आहेत. या कार्याविषयी सुधारक म्हणतात की, बाबासाहेबांचे जे पुतळे आहेत ते फक्त पुतळे नाहीत तर तो एक माणूस म्हणून जगण्यासाठी बळ आणि अधिकार देणारा एक विचार आहे. अशा पद्धतीने मी प्रत्येक पुतळा आणि तिथला आजूबाजूचा परिसर बघत होतो. मी पेशाने फोटोग्राफर असल्याने लेन्सच्या माध्यमातून एक विचार कॅमेऱ्यात कैद करण्याचा विचार केला. मी आणि माझ्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप आहे. आम्ही एकत्र ठरवलं की मुंबई आणि नंतर भारतातील बाबासाहेबांच्या पुतळ्यांचे फोटो काढायचे. असा फोटोग्राफीचा एक वेगळा प्रवास आम्ही ‘ब्लू आयकॉन’ या नावाने सुरु केला. हे करत असताना जाणवलं की प्रत्येक पुतळ्याची एक वेगळी सौंदर्यदृष्टी आहे. त्या पुतळ्यांची रचना, रंग तो पुतळा ठेवण्याची जागा हे सगळ्यांचे जर निरिक्षण केलं तर याचे कलात्मक महत्व खूप मोठं आहे. आज जगाचा विचार केला तर सर्वात जास्त फोटो, पुतळे हे बाबासाहेबांचेच असतील असं मला वाटतंय. मुंबईच्या रमाबाई नगरमध्ये फोटोग्राफी करत असताना एका छोट्याशा घरातील बहुतांश जागा ही बाबासाहेबांच्या फोटोंनीच व्यापलीली आम्हाला आढळली. बाबासाहेबांप्रती असलेली एक प्रकारची आत्मियतेची भावना आहे. ती त्यांच्या प्रतिमेसोबत जोडलेली आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या पुतळ्यांसोबत तिथल्या लोकांचं असणारं नातं या फोटोग्राफीतून मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. छायाचित्रणातील प्रस्थापित विषयांना डावलून एक नवी वाट धुंडाळण्याचा प्रयत्न आम्ही यांतून करतोय.”
वरील तिन्ही उदाहरणं ही वेगवेगळ्या क्षेत्रांतील आहेत पण त्यांचा अंतर्गत उद्देश एकच आहे, तो म्हणजे प्रस्थापित सांस्कृतिक सामाजिक प्रतीकांना समांतर अशी नवी प्रतीके शोधणे, किंवा तयार करणे. बाबासाहेब व त्यांचे कार्य ही या प्रतीकांची खाण आहे. कोणी याला कदाचित बाबासाहेबांच्या दैवतीकरणाचा प्रयत्न म्हणून टीका करतील पण देशात बहुसंख्येने असलेल्या लोकांना त्यांच्या रास्त सामाजिक स्थानाची, हक्कांची व अस्मितेची ओळख घडवून देणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रसारासाठी असे प्रयत्न होणेही गरजेचे आहे हे सत्य नाकारून चालता येणार नाही. मात्र यांतील राजकारण टाळून केवळ निखळ व नितळ विचार घेऊन पुढे जाण्याचे काम या नवप्रतीकांच्या शिलेदारांना करावे लागणार आहे. जेणेकरून यांतील सामाजिक क्रांतिचा आशय गढूळला जाणार नाही. बाबासाहेबांचे विचार त्यासाठी त्यांना बळ देतील ही खात्री आहेच.
मिनाज लाटकर
minalatkar@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.