आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:‘इफ्फी’च्या अंतरंगातला मोरपिसारा

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) गेल्या काही वर्षांपासून विविधरंगी कलाविष्काराची झळाळी लाभते आहे. साधारणपणे दरवर्षी ‘इफ्फी’मध्ये मल्याळी, तमिळ आणि बंगाली प्रतिनिधींचा मोठ्या प्रमाणावर राबता असतो. त्यात अदूर गोपालकृष्णन यांच्यासारखे दिग्गजही प्रेक्षकांत बसून सिनेमे पाहतात. १९७५ पर्यंत ३ ते ४ वर्षांनी भरणारा इफ्फी १९७६ पासून एक वर्ष दिल्ली आणि दुसरे वर्ष अन्यत्र (दिल्ली, चेन्नई, मुंबई) अशा पद्धतीने आलटून-पालटून भरू लागला. २००४ पासून तो गोव्यात आला. ‘इफ्फी’चे गोव्यातच कायमस्वरूपी आयोजन करण्यास दाक्षिणात्य, बंगाली लॉबीचा विरोध होता. पण, आता ते आवर्जून हजेरी लावतात. अपवाद वगळता मराठी चित्रकर्मी मात्र आपला चित्रपट असेल, तरच प्रसिद्धीच्या निमित्ताने तेवढ्यापुरते येऊन जातात. माझे हे निरीक्षण मी मराठीतील एका यशस्वी अभिनेत्याकडे नोंदवले तेव्हा तो म्हणाला, ‘शूटिंगच्या तारखा ठरलेल्या असतात!’ मग “इफ्फी’च्या तारखा आणि ठिकाण कायमस्वरूपी ठरलेले असते, तेव्हा त्या तारखा राखीव ठेवता येणार नाहीत का?’ असे विचारल्यावर त्याचे उत्तर आले, ‘जागतिक चित्रपट पाहून आलो, तरी काम मराठी चित्रपट उद्योगाच्या, भांडवलाच्या मर्यादेतच करावे लागणार ना?' यावर मी ‘इफ्फी’त पाहिलेल्या अन् भांडवल, तंत्रज्ञानाच्या मर्यादेत काम करूनही सर्जनशील धुमारे फुटलेल्या व्यावसायिक सिनेमांची उदाहरणे दिली. तथापि, मराठी चित्रकर्मींचा तिकडे फारसा ओढा नाही, हेच खरे! गोवा अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या जवळ असला तरीही...

‘इफ्फी’सारखा चित्रपट महोत्सव म्हणजे केवळ तकलादू मनोरंजन नव्हे! देश-विदेशातील वैविध्यपूर्ण भाषांतील, संस्कृतीतील, विषय, आशय, शैली, तंत्रभाषा असणारे चित्रपट अभ्यासण्याची ती संधी असते. कधी वास्तवाला भिडणाऱ्या, तर कधी अंतर्मनाचा वेध घेणाऱ्या, तर कधी प्रायोगिक कलाकृती, तर कधी वेधक मनोरंजनपटही तिथं पाहायला मिळतात. नवप्रवाहांची आणि तंत्रज्ञानातील बदलांची ओळख होते. ‘पुनरावलोकना’सारखी पॅकेजेसही उपयुक्त असतात, ज्यात एखाद्या दिग्दर्शकाच्या वा कलाकार / तंत्रज्ञाच्या महत्त्वपूर्ण कलाकृतींचा एकत्रित आढावा घेतला जातो. यातून त्यांची शैली, तंत्र, कलादृष्टी आणि जीवनदृष्टी यात पडत गेलेला फरक कळतो. हुकूमशाहीतही सत्ताधाऱ्यांविरोधात भाष्य करणाऱ्या कार्लोस सौरा यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देतानाच यंदा त्यांच्या कलाकृती पुनरावलोकन म्हणून दाखवण्यात येणार आहेत. याशिवाय, मानवंदना म्हणून सातत्यपूर्ण निषेधाचे जिवंत व्यक्तिरूप असणाऱ्या इटलीच्या पासोलिनीच्या आणि सर्वस्तरीय साचेबद्धता नाकारणाऱ्या फ्रान्सच्या गोदारच्या कलाकृती दाखवण्यात येणार आहेत. ‘कंट्री फोकस’मध्ये एका देशातील अलीकडच्या काळामधील वेगवेगळ्या शैलीतील निवडक चित्रपट दाखवले जातात. या विभागात यंदा फ्रान्सचे चित्रपट दाखवले जातील. ‘फेस्टिवल कॅलिडोस्कोप’ विभागात कान, व्हेनिस, बर्लिन आदी महत्त्वाच्या महोत्सवांमध्ये गाजलेल्या समकालीन कलाकृती असतात, तर जागतिक सिनेमा गटात जगभरातील नवीन चित्रपट पाहता येतात. त्यातील निवडक चित्रपट आंतराष्ट्रीय स्पर्धा गटात असतात. विजेत्यांना सुवर्णमयूर आणि रजतमयूर स्वरुपातील पुरस्कार मिळतात. ‘इंडियन पॅनोरमा’मध्ये भारताच्या विविध राज्यांतील,भाषांतील निवडक चित्रपट दाखवले जातात. आंतरभारतीच्या भावनेसाठीही हे अत्यंत आवश्यक आहे. यात फीचर गटात पूर्ण लांबीचे कथापट, तर नॉन फीचर गटात माहितीपट आणि लघुपट असतात. वर्तमान भारताचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक प्रतिबिंब लक्षात येण्यास याची मदत होते. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनाही भारतीय सिनेमाजगत आणि भारत समजून घेणे यामुळे अधिक सुलभ होते.

अनेक प्रतिभावान दिग्दर्शक, कलाकारांनी आपल्या कारकिर्दीला दिशा देणाऱ्या बाबींमध्ये चित्रपट महोत्सवांचे योगदान अग्रक्रमाने मान्य केले आहे. चित्रपट महोत्सवात निव्वळ चित्रपट दाखवले जात नाहीत, तर त्यात चर्चासत्रे, कार्यशाळा आणि भेटीगाठींमधून विचारांची देवाणघेवाण होते. ‘मास्टर क्लास’मध्ये चित्रपट कलाव्यवहारातील दिग्गज तज्ज्ञांचे मार्गदर्शन संवादी पद्धतीने लाभते. यंदा मणिरत्नम (विषय : पटकथालेखक ते ऑटियर), ‘बाहुबली’, ’आरआरआर’चे पटकथाकार व्ही. विजयेंद्र प्रसाद (चित्रपट लेखन प्रक्रिया), अनुपम खेर (चित्रपट आणि नाटकातील अभिनय), पंकज त्रिपाठी (अभिनेत्याची व्यक्तिरेखेची उभारणी), श्रीकर प्रसाद (संकलन), अनिल मेहता (शूटिंग दरम्यान प्रकाशाचे नियंत्रण) यांचा यामध्ये सहभाग असेल. याशिवाय, ‘ॲनिमेशन'च्या संदर्भाने हॉलिवूडकरांचे प्रयोग, अनुभवही ऐकायला मिळणार आहेत. संवाद सत्रांमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी, शेखर कपूर, ए. आर. रहमान, आर. बल्की, गौरी शिंदे आदी सहभागी होतील.

‘इफ्फी’ दरम्यानच होणारा, पण स्वतंत्र अस्तित्व असणारा ‘फिल्म बझार’ हा आर्थिक उलाढालीचा उपक्रम नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे राबवला जातो. दक्षिण आशियाई चित्रपटांना आर्थिक आणि कलात्मक पाठबळ मिळवून देणे, हा यामागचा हेतू आहे. पूर्ण झालेले वा निर्मितीच्या अवस्थेतील वा पटकथा पातळीवरचे प्रोजेक्ट येथे पीच केले जातात. देश- विदेशातील वितरक, प्रदर्शक, निर्माते, निर्मिती संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी, महोत्सवांचे क्युरेटर प्रत्यक्ष आलेले असतात. त्यांच्यातील आंतरसंवादातून हे व्यवहार होतात. एकुणातच दरवर्षी होणारा ‘इफ्फी’ चित्रकर्मींना नव्या निर्मितीची अन् जाणकार नि जिज्ञासू रसिकांना चित्रपटांच्या आस्वादाची एक वेगळी दृष्टी देतो.

एका अर्थाने ‘फिल्म ओरिएंटेशन कोर्स’ असणारा भारताचा ५३ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आजपासून २८ नोव्हेंबरपर्यंत गोव्यात पणजी येथे होत आहे. त्या निमित्ताने...

डॉ. अनमोल कोठाडिया cineanmol@yahoo.co.in

बातम्या आणखी आहेत...