आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुरुपौर्णिमा विशेष:अंध भूमिकासाठी केले ब्रेलमध्ये डीएड, गुरू होत आईने दिली रोशनी!

अतुल पेठकर | नागपूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशेष ब्रेल पाटीवर गणिते सोडवून घेताना आई रोशनी राय. - Divya Marathi
विशेष ब्रेल पाटीवर गणिते सोडवून घेताना आई रोशनी राय.
  • मुलीची तल्लख बुद्धी पाहून शिक्षण वारीचे केले तिच्या हस्ते उद्घाटन; सर्वसाधारण मुलांइतकीच केली उत्तम प्रगती

शरीरातील अतिरिक्त ऑक्सिजनमुळे दृष्टिबाधित झालेल्या मुलीला पुन्हा दिसावे म्हणून आई-वडिलांनी प्रयत्नांची शर्थ केली. चेन्नई, हैदराबाद, जालना, मुंबई, केरळ सगळीकडे जाऊन आले. बालरोगतज्ज्ञाच्या हलगर्जीपणामुळे होती तीही दृष्टी गेली. तिचे भविष्य घडवण्यासाठी घराचा उंबरठाही न ओलांडलेल्या आईने थेट नागपूर येथे वसतिगृहात तिच्यासोबत राहून अंधांसाठी असलेले ब्रेल लिपीतील डीएड केले. आज तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या मुलीची प्रगती पाहून कष्टाचे सार्थक झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यवतमाळचे नगरसेवक सुजित राय व रोशनी या दांपत्याला भूमिका ही कन्या व शौर्य हा मुलगा आहे. जन्मत: अतिरिक्त आॅक्सिजनमुळे भूमिकाचा रेटिना बाधित झाला. यवतमाळ येथील एका बालरोगतज्ज्ञाकडे उपचार सुरू असताना तिची दृष्टी पूर्णपणे गेली. त्याचा खटला अजूनही सुरू आहे. भूमिकाच्या वाट्याला आलेले दु:ख पाहून वर्ष रडण्यात गेले. यातून सावरत नव्याने आयुष्य घडवण्याचा त्यांनी निर्धार केला. यवतमाळात उत्तम शाळा नव्हती म्हणून रोशनी या भूमिकाला घेऊन नागपूर येथे आल्या. हिंगण्यातील ज्ञानज्योती अंध विद्यालयात तिचे नाव घातले. एकाच परिसरात शाळा, वसतिगृह व डीएड महाविद्यालय आहे. तिथे वसतिगृहात राहून मुलीचे व त्यांचेही शिक्षण सुरू झाले. सर्व शिक्षा अभियानाच्या बुद्धिमत्ता चाचणीत भूमिकाचा पहिला क्रमांक आला. त्यामुळे शिक्षणाच्या वारीचे उद्घाटन तिच्या हस्ते करण्यात आल्याचे रोशनी राय यांनी सांगितले.

ब्रेलमध्ये डीएड केल्याचा मायलेकींना खूप फायदा झाला

दीड वर्षाच्या शौर्यला वडिलांजवळ सोडून रोशनींनी भूमिकासह नागपूर गाठले. मुलीला शिकवता यावे म्हणून ब्रेल डीएड केल्याचा खूप फायदा झाला. लाॅकडाऊनच्या काळातही तिचा अभ्यास सुरू अहो. ती उत्तम कॅसिओ वाजवते, क्रिकेट खेळते तसेच सायकल चालवते. हे सर्व छंद भूमिका खूप सफाईदारपणे जोपासते.

तिला मी पुस्तके वाचून दाखवते, यूट्यूब तसेच रेडिओ ऐकवते

रोशनी म्हणाल्या, तिच्यासाठी मीच गुरू झाले. तिला मी पुस्तके वाचून दाखवते, यूट्यूब तसेच रेडिओ ऐकवते.ती खास पाटीवर फटाफट गणिते सोडवते. ब्रेलमध्ये इंग्लिश भल्याभल्यांना लवकर जमत नाही. पण, भूमिकाने खूप लवकर आत्मसात केले. इंग्रजीमध्ये तिचे भाषण हमखास असते. तिच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर मी तिची सोबत करते. दोन वर्षानंतर मुलगा शौर्यलाही आणले. आता मी शौर्य व भूमिका सोबत राहतो. हिंगण्यात किरायाने घर घेतले आहे. पती यवतमाळला असले तरी ते नेहमी आमच्याकडे येतात. भूमिकेच्या सोनेरी भविष्यासाठी मी तिच्यासोबतच राहणार आहे, असे रोशनी यांनी सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser