आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मराठवाड्यातील मुलींवर कमी वयात मातृत्व लादले जात आहे. कमी वयात गर्भधारणा होणाऱ्या महिलांमध्येही उस्मानाबाद, परभणी जिल्ह्याची टक्केवारी मराठवाड्यात सर्वाधिक आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक कमी वजनाची बालके आहेत. राष्ट्रीय कुटुंब आराेग्य सर्वेक्षणातून हे धक्कादायक वास्तव समाेर आले. दरम्यान, कमी वयांच्या मातांमुळे मातेबरोबरच बालकांचेही कुपोषण वाढत असून कमी वजनाच्या बालकांची संख्याही सर्व जिल्ह्यात ३५ टक्क्यांहून अधिक आहे.
रोजगाराचा अभाव, गरिबी, अशिक्षितपणा, हुंड्याची समस्या यामुळे मराठवाड्यात बालविवाहाची समस्या आहे. कमी वयात लग्न होऊन मुलींवर मातृत्व लादले जात असल्याने प्रजननाची नवी समस्याही आहे. परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्येही बालविवाह व महिलांच्या प्रजननविषयक समस्यांमध्ये वाढ झाली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये यात काहीशी घट झाली असली तरी ती लक्षणीय किंवा फारशी दिलासायदायक नसल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालातून समोर आले आहे. परभणीत सन २०१५-१६ मध्ये बालविवाह होण्याचे प्रमाण ४४.५ टक्के होते. सन २०१९-२० मध्ये हे प्रमाण वाढून ४८ टक्के झाले आहे, तर उस्मानाबाद जिल्ह्यात सन २०१५-१६ मध्ये बालविवाहाचे प्रमाण ३१.१ टक्क्यांहून वाढून ३६.६ टक्के इतके झाले आहे. सर्वेक्षणाच्या वेळी गर्भवती किंवा ज्यांना मुले आहेत अशा १५ ते १९ वर्षे वयोगटातील मातांचे प्रमाण परभणी जिल्ह्यात १३.७ इतके होते, तर सन २०१५-१६ मध्ये हे प्रमाण ११.२ होते.
एक्स्पर्ट व्ह्यू : माता कुपोषित असेल तर बाळही कुपोषित जन्मते
कमी वयातील लग्नामुळे आणि मातृत्वाने माता कुपोषित होते, त्यामुळे तिचे बाळही कुपोषित जन्मते. त्याची वाढ खुंटते, कुपोषित, कमी वजनाच्या बाळाची रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. त्यामुळे अतिसार, न्यूमोनियासारख्या आजारांना ही बालके बळी पडतात. त्यामुळे बालमृत्यू वाढतात. शिवाय, कुपोषित मातेला दुसऱ्यांदा गर्भधारणा झाल्यास दुसऱ्या बाळालाही पोषण मिळत नाही, ते कुपोषित राहून त्याची संतती कुपोषित होण्याचा धोका असतोच यातून हे चक्र सुरू हाेते. - डॉ. अनुराग पांगरीकर, बालरोगतज्ज्ञ बीड
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.