आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद शहरातील ख्वाजानगर, मिल्ली कॉलनी खिरणी मळा, गालिबनगर भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. प्रशासनावरचा वाढता ताण पाहून मुस्लिम समाजबांधवांनी शहरातील दोन मदरसे रुग्णांना क्वाॅरंटाइन करण्यासाठी उपलब्ध केले आहेत. तसेच सोमवारपासून चार मोहल्ला क्लिनिक सुरू करून उपचार सेवाही देण्यात येणार आहे.
शहरातील मिनार मशिदीजवळ असलेल्या दारूल उलूम मदरशात महिलांसाठी क्वाॅरंटाइन केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे २६ महिलांना क्वाॅरंटाइनही करण्यात आले आहे. तसेच संत ज्ञानेश्वर मंदिरासमोर उर्दू मदरशात १०० पुरुषांसाठी क्वाॅरंटाइन केंद्र सुरू झाले असून तेथे १६ पुरुषांना दाखल करण्यात आले आहे. बाहेरील व्यक्तींना प्रवेशापासून रोखण्यासाठी दरवाजावर सुरक्षा रक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे.
कोराेनासह सर्व प्रकारच्या रुग्णांवर होणार उपचार
अँटिजन किट्सद्वारे तपासणी होईल. साधा ताप-सर्दीसह इतर रुग्णांवरही त्यांच्या घरात वा क्लिनिकमध्ये उपचार होतील. कोरोनाच्या भीतीने सर्वसामान्य रुग्णांनाही उपचार नाकारण्याचा प्रकार होत आहे. त्यासाठी मोहल्ला क्लिनिक सुरू होत आहे. तसेच समाजातील १५ फार्मासिस्टही सेवा देणार आहेत.
कोविड केअर सेंटर :
कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी सहारा प्रशालेत ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू होत आहे. सर्व खर्चही समाजाच्या वतीनेच उचलण्यात येणार आहे. तज्ज्ञ डॉक्टर दररोज दोन तासांची सेवा देणार आहेत.
चार मोहल्ला क्लिनिक
मुस्लिम समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून मोहल्ला क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ख्वाजानगर, खिरणी मळा परिसरात तीन, गालिबनगर व मिल्ली कॉलनीसाठी एक क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये समाजातील डॉक्टर तसेच लॅब टेक्निशियन व सहायक मोफत सेवा देण्यासाठी तयार झाले आहेत. प्रत्येक क्लिनिकमध्ये प्रत्येकी चार डॉक्टर व दोन सहायक सेवा देणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.