आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला खतनाविरोधात आज 'झिरो टॉलरन्स डे':92 देशांत वेदनादायी प्रथेतून जातात मुली, लैंगिक जीवन खराब होते

लेखक: आदर्श शर्मा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

8 वर्षीय आफरीनला बाहुली घेऊन देण्याच्या बहाण्याने तिची आई अज्ञात ठिकाणी घेऊन जाते. जिथे काही लोक आधीच हजर असतात. आफरीनला काही समजण्यापूर्वीच हे लोक तिचे हात पाय घट्ट पकडतात. एक महिला आफरीनच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेड चालवून तिची खतना करते.

आफरीन वेदनेने किंचाळू लागते. औषधोपचार आणि ड्रेसिंग करूनही तिचा रक्तस्त्राव थांबत नाही. आपली मुलगी गमावेल असे तिच्या आईला वाटू लागते. दुसऱ्या दिवशी ती तिला घेऊन रुग्णालयात गेली. तिथे सर्जनने मुलीच्या प्रायव्हेट पार्टला टाके घातले, तेव्हाच रक्तस्त्राव थांबला.

8 वर्षांच्या आफरीनची कथा हे फक्त एक उदाहरण आहे. जगातील 92 देशांतील 20 कोटींहून अधिक महिलांना या वेदनादायक प्रथेतून जावे लागले आहे आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे. संयुक्त राष्ट्र हे मानवी हक्कांचे उल्लंघन मानते, म्हणून दरवर्षी 6 फेब्रुवारी रोजी महिलांच्या खतनाविरोधात 'इंटरनॅशनल झिरो टॉलरन्स डे' म्हणजेच 'आंतरराष्ट्रीय शून्य सहिष्णुता दिवस' साजरा केला जातो.

दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आपण महिलांची खतना म्हणजे काय, ती कशी केली जाते, त्याचे किती प्रकार आहेत आणि जगात झिरो टॉलरन्स डे का साजरा केला जातो हे जाणून घेणार आहोत.

खतना करताना महिलांच्या योनीमार्गाचा एक भाग धारदार ब्लेड किंवा चाकूने कापला जातो. खतना बहुतेक 1 वर्ष ते 15 वर्षांच्या वयात केली जाते. या प्रक्रियेत मुलींना खूप त्रास होतो. ही प्रथा भारतातील बोहरा मुस्लिम समाजामध्ये सामान्य आहे.

बोहरा समाजातील खतना प्रथा बंद करण्यासाठी 'वुई स्पीक आऊट' ही संस्था चालवणाऱ्या मासुमा रानालवी म्हणतात की, महिलांची लैंगिक इच्छा नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांना शुद्ध ठेवण्यासाठी खतना केली जाते.

वास्तविक बोहरा मुस्लिम येमेनमधून भारतात आले. तिथे स्त्रियांचा खतना करण्याची प्रथा होती. ही प्रथा बोहरा मुस्लिमांबरोबर भारतातही आली. आज जगातील 80% बोहरा मुस्लिम भारतात राहतात आणि खतना पद्धतीचे पालन करतात.

2018 च्या अहवालानुसार, भारतातील दाऊदी बोहरा समुदायातील सुमारे 75% मुली ज्या 7 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेत त्यांचा खतना करण्यात आली आहे.

खतना एका धारदार ब्लेडने एकाच कटद्वारे केली जाते

गुजरातमधील लारा हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शुजात वली सांगतात की, सहसा घरातील आजी किंवा आई मुलीला फिरण्याच्या नावाखाली घराबाहेर काढतात. एका खोलीत आधीच दोन लोक उपस्थित असतात. ते मुलीचे दोन्ही पाय धरतात. नंतर विशेष धारदार चाकू, रेझर ब्लेड किंवा कात्रीने एकाच कटमध्ये क्लिटॉरिस हूड वेगळे केले जाते.

प्राचीन काळी रक्तस्राव थांबवण्यासाठी थंड राख लावली जात असे. आजकाल अँटिबायोटिक पावडर किंवा लोशन आणि कापूस वापरतात. रक्तस्त्राव थांबल्यानंतर सुमारे 40 मिनिटांनी मुलीला घरी पाठवले जाते. तिला तीन ते चार दिवस खेळण्यास आणि उड्या मारण्यास मनाई केली जाते. अनेकदा मुलीचे दोन्ही पाय आठवडाभर बांधून ठेवले जातात.

खतना चार प्रकारे केली जाते

स्त्रीच्या खतनाला इंग्रजीत फिमेल जेनिटल म्युटिलेशन म्हणजेच FGM म्हणतात. यात त्या सर्व प्रक्रियांचा समावेश आहे ज्यामध्ये कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय महिलांचे बाह्य जननेंद्रिय अंशतः किंवा पूर्णपणे काढून टाकले जाते. WHO च्या मते, याचे 4 प्रकार आहेक. भारतातील बोहरा समाजात टाइप-1 खतना केली जाते.

ब्लॅक्स मेडिकल डिक्शनरीनुसार, क्लिटॉरिस हा योनीच्या शीर्षस्थानी स्थित एक आवश्यक आणि संवेदनशील भाग आहे. या भागात 8 हजारांहून अधिक नसा येऊन थांबतात. क्लिटोरल हूड त्याचे संरक्षण करते.

टाईप-1 आणि टाईप-2 खतनामध्ये क्लिटोरिस हूड कापले जाते. त्यामुळे हजारो नसा धोक्यात येतात.

पुरुषांसाठी खतना चांगली आहे परंतु स्त्रियांसाठी वाईट आहे

मुस्लिम आणि ज्यू समुदायात जन्मलेल्या मुलांची खतना केली जाते. यामध्ये त्यांच्या लिंगाची पुढची त्वचा म्हणजेच वरच्या भागाची त्वचा कापून वेगळी केली जाते. हेल्थलाइन वेबसाइटवरील लेखानुसार, या काळात मुलांना वेदना होत असतात, परंतु ते 7 ते 10 दिवसांत पूर्णपणे बरे होतात.

मुलांमध्ये खतना करण्याचेही अनेक फायदे आहेत. खतना केल्याने त्यांची स्वच्छता सुधारते. लैंगिक संक्रमित रोग, लिंगाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी होतो.

याशिवाय, बॅलेनाइटिस, बॅलेनोपोस्टायटिस, पॅराफिमोसिस आणि फिमोसिस यांसारख्या खाजगी भागांशी संबंधित रोगांवर उपचार करण्यासाठी मुलांची खतना केली जाते.

याउलट, स्त्रियांच्या खतनाचा कोणताही वैद्यकीय फायदा नाही, फक्त हानी आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, खतना झाल्यानंतर महिलांना तीव्र वेदना, रक्तस्त्राव, सूज, ताप, संसर्ग, जखमा न भरणे आणि शॉक यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

महिलांना लैंगिक जीवनाचा आनंद घेता येत नाही

या प्रथेवर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात सांगण्यात आले होते की, खतना केल्यानंतर अनेक महिलांना आयुष्यभर सेक्सचा आनंद घेता येत नाही. संबंध ठेवताना त्यांना वेदना सहन कराव्या लागतात.

वास्तविक, महिलांना मिळणाऱ्या लैंगिक सुखामध्ये क्लिटॉरिसची भूमिका महत्त्वाची असते. सेक्स करताना क्लिटॉरिस मोठे आणि कडक होते. जर खतना करताना क्लिटोरिसला इजा झाली तर स्त्रीच्या लैंगिक जीवनावर परिणाम होतो. सेक्स करताना स्त्रीला आनंद न मिळण्याची शक्यता असते.

'द क्लिटोरल हूड अ कॉन्टेस्टेड साइट' या 2018 च्या अभ्यासात, सर्वेक्षणातील 33% महिलांनी कबूल केले की खतनामुळे त्यांच्या लैंगिक जीवनावर परिणाम झाला आहे. या महिलांनी नोंदवले की त्यांना सेक्सची इच्छा नाही, लैंगिक सुख नाही आणि क्लिटॉरिस भागात अतिसंवेदनशीलता आहे.

अभ्यासात सहभागी महिलांच्या या विधानांद्वारे खतनाच्या वेदना समजून घ्या-

खतना करताना जिथे कट केला गेला होता तिथे स्पर्श केल्यावर जळजळ होते. सेक्स करताना ही जळजळ खूप वाढते. क्लिटॉरिस हूड आहे त्याच ठिकाणी हे आहे. मला वाटते की सेक्स लवकर संपला पाहिजे.

- मुनिरा, 39 वर्षे.

मी माझ्या पतीला आनंद देऊ शकत नाही. एका काळानंतर मी माझ्या पतीला खिन्नपणे म्हणाले की त्यांची इच्छा असेल तर त्यांनी बाहेर जाऊन हे सर्व करावे कारण मी त्यांची इच्छा पूर्ण करू शकत नाही.

- राशिदा, 50 वर्षे.

माझ्या मुलाने सांगितले की, त्याला बोहरा समाजातील मुलीशी लग्न करायचे नाही. जेव्हा मी विचारले तेव्हा त्याने संकोचितपणे उत्तर दिले की बहुतेक बोहरा मुलींची खतना झालेली असते आणि त्या बेडवर चांगल्या नसतात.

- जोहरा, 62 वर्षे.

आता खतना केव्हा आणि कशी सुरु झाली हे जाणून घेऊया

महिलांची खतना संपुष्टात आणण्याची मोहीम राबवणाऱ्या 'साहियो' एनजीओच्या लेखानुसार, महिलांच्या खतनाच्या उत्पत्तीबाबत अनेक सिद्धांत आहेत.

एका सिद्धांतानुसार, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माच्या सुरुवातीपासून खतना करण्याची प्रथा आहे. ते कोणताही समाज, धर्म, वंशापुरते मर्यादित नव्हते. ऐतिहासिक ग्रीक दस्तऐवजांमध्ये इसवी सन पूर्व 163 मध्ये एका महिलेच्या खतनाचा उल्लेख आढळतो.

अनेक विद्वानांचा असा विश्वास आहे की खतनाची सुरुवात इजिप्तमधून झाली. हळूहळू, ते अरबी व्यापाऱ्यांद्वारे लाल समुद्राच्या किनाऱ्यालगतच्या भागात पसरले. फारोनिक काळातील इजिप्शियन लोक उभयलिंगी देवतांवर विश्वास ठेवत होते. त्यांचा असा विश्वास होता की स्त्रियांचे क्लिटॉरिस हे पुरुषांचे प्रतीक आहे आणि पुरुषांची पुढची त्वचा स्त्रियांचे प्रतीक आहे. म्हणूनच ते स्त्रियांची खतना करून घेत पुरुषांचे प्रतिक काढून टाकायचे. त्या काळी विवाह आणि कौटुंबिक मालमत्तेचा वारसा मिळण्यासाठी खतना गरजेची होती.

दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये 13 व्या शतकात महिलांची खतना सुरू झाली असे मानले जाते. अलीकडच्या काळात इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये सुन्नी इस्लामला मानणारे लोक याला इस्लामिक प्रथा मानतात. सध्याच्या येमेन आणि ओमानचा समावेश असलेल्या अरबी द्वीपकल्पाच्या पूर्वेकडील भागाच्या प्रभावाखाली त्यांनी खतना स्वीकारली होती.

2030 पर्यंत खतना संपवण्याचे लक्ष्य

UN ने डिसेंबर 2012 मध्ये एक ठराव मंजूर केला आणि 2030 पर्यंत ही प्रथा पूर्णपणे काढून टाकण्याचे लक्ष्य ठेवले. इजिप्त, जिथून त्याची उत्पत्ती झाल्याचे मानले जाते, त्यांनी 2008 मध्ये त्यावर बंदी घातली. तथापि, खतना होण्याची बहुतेक प्रकरणे अजूनही तेथे आढळतात. याशिवाय ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बेल्जियम, स्वीडन, डेन्मार्क, यूके, अमेरिका आणि स्पेनसह अनेक देशांनी महिलांची खतना गुन्हा घोषित केला आहे.

भारतात सध्या खतना करण्यावर बंदी नाही. या प्रथेवर बंदी घालण्यासाठी 2017 मध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये ही प्रथा महिलांशी भेदभाव करत असल्याचे नमूद केले होते. हे महिलांचे समानता, गोपनीयता आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे अधिकार हिरावून घेते.

या याचिकेला उत्तर देताना महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने सांगितले की, सध्या आमच्याकडे भारतात महिलांच्या खतनाबाबत कोणताही अधिकृत डेटा किंवा अभ्यास नाही.

तथापि, सर्वोच्च न्यायालयाने या प्रथेबद्दल चिंता व्यक्त केली आणि सुनावणीसाठी हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवले होते.

References

https://www.equalitynow.org/resource/female-genital-mutilation-cutting-a-call-for-a-global-response/

https://www.scobserver.in/wp-content/uploads/2021/10/FGM__Indira_Jaising_.pdf

https://www.wespeakout.org/images/files/pdf/fgmc_study_results_jan_2018.pdf

https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/female-genital-mutilation

https://sahiyo.com/2018/07/21/tracing-the-origins-of-female-genital-cutting-how-it-all-started/

https://www.healthline.com/health/circumcision#pros-and-cons

ही बातमीही वाचा...

कासगंजमध्ये मेलेल्या चंदनचा ना चौक, ना नोकरी:आई म्हणाल्या- ज्यांच्यासाठी मेला, तोच पक्ष विसरला; वडील म्हणाले- लोक हसतात

बातम्या आणखी आहेत...