आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इये बोलिचिये नगरी...:माय मराठी सातसमुद्रा ओलांडे...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुनीला गोंधळेकर माणसांच्या सोबतीने भाषा देशोदेशी जातात. स्थिरावतात. नवीन भाषिक तयार करतात. पण तरीही त्या त्या भाषेचे आर्थिक, सामाजिक पैलूदेखील भाषेच्या विकासात महत्त्वाचे ठरतात. ती भाषा बोलणारा समाज, त्यांची संख्या, त्याचा व्यापार, राजनैतिक प्रभाव यामुळे भाषा अधिक जोमाने पसरते. त्यामुळे भारतीय भाषांचा विचार केला तर परदेशामध्ये हिंदी शिकणाऱ्यांची संख्या कितीतरी जास्त आहे. अर्थात ते सुद्धा काही ठराविक देशांमधेच. महाराष्ट्राची आणि मराठी भाषिकांची आर्थिक, राजनैतिक, सांस्कृतिक स्थिती जशी बदलेल तशी त्यांच्या मातृभाषेची स्थिती सुधारेल.

मराठी ही आपली मायबोली. मायेनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली एक मोठी ठेव. या मोठ्याथोरल्या जगाशी आपल्याला संवाद साधता येतो तो केवळ आपल्या जन्मदात्रीच्या ऋणामुळे. आपली ही मराठी, मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार भारतातील तिसरी तर जगातील दहावी भाषा आहे. आपल्या देशात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या ९ कोटींपेक्षा जास्त आहे. तुम्हाला कल्पना असेलच की मराठी भाषा मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, उत्तर कर्नाटक (बेळगांव, हुबळी, धारवाड, गुलबर्गा, बिदर, कारवार), गुजरात (दक्षिण गुजरात, सुरत, बडोदा व अहमदाबाद), आंध्रप्रदेश (हैदराबाद), मध्यप्रदेश (इंदूर, ग्वाल्हेर), तामिळनाडू (तंजावर) तसेच छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही बोलली जाते. भारत देशातील ३६ राज्ये आणि ७२ देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. इतरही अनेक देशांमध्ये मराठी भाषा बोलण्याचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून त्याला वेगळे महत्त्व आहे. तरी तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण मराठी भाषा भारतासह फिजी,मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते. म्हणजे तसं पाहायला गेलं तर मराठी ही जागतिक भाषा आहे.

मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक. आज बोलली जाणारी मराठी ही महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. या भाषेतला पहिला लिखित पुरावा मिळतो तो अक्षी इथल्या इस १०१२ या काळात. राजा केसिदेवरायच्या कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा आजवर सापडलेला मराठी भाषेतील पुराणतम शिलालेख आहे. अक्षी शिलालेखाच्या शोधापूर्वी कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्‍वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख - "चामुण्डराजे करवियले" हा आद्य मराठी लेख समजला जात असे. अक्षी हे गाव महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून दक्षिण दिशेस ५ कि.मी. अंतरावर अलिबाग- मुरुड जंजिरा रस्त्यावर आहे. मराठी भाषेचा गौरव लीळाचरित्र, संतसाहित्य आणि विशेष करून ज्ञानेश्वरीसारख्या साहित्यातून वाढीला लागला. त्यानंतर पंतसाहित्य आणि पवाडयांनी तिला वेगळे रूप प्राप्त करून दिले. पण काळाबरोबर आवश्यकतेनुसार तिचे रूप बदलले.

मराठी माणूस बदलत्या कामाच्या स्वरूपामुळे आता जगाच्या कानाकोपऱ्यात जातो. काहीवेळा तिथे स्थायिकही होतो. जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी भाषा आता महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अगदी अमेरिकेतही मराठी बोलली जाते. परदेशात गेलेल्या मराठी भाषिकांनी आपल्या पुढच्या पिढीला आपल्या मातृभाषेची ओळख व्हावी या दृष्टिने मराठीचे वर्ग चालवतात. उत्तर अमेरिकेत मराठी भाषिक सर्वात जास्त संख्येने आहेत. त्या मराठी माणसांच्या मनात बऱ्याचदा आपल्या मुलांना आपल्या मातृभाषेची ओळख व्हावी आणि मुलांवर मराठी संस्कार व्हावे असे वाटत असते.

लोकांची ही गरज विचारात घेऊन भारती विद्यापीठ व बृहन्महाराष्ट्र मंडळ ह्यांनी मराठी शाळेचा अभ्यासक्रम तयार केला आहे. शिकागो मराठी विद्यामंदिर विद्यार्थ्यांना मराठी वाचायला, लिहायला व बोलायला शिकवते आणि त्यांना बृहन्महाराष्ट्र मराठी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी परीक्षेला बसण्याची संधी पण देण्यात येते. ह्या शाळेच्या अभ्यासक्रमाच्या ५ श्रेणी आहेत. (मुलभूत, मध्यस्थ ते प्रगत). प्रत्येक मुलगा वा मुलगी हे त्यांच्या क्षमतेनुसार शिकणार आहेत व कोणाही विद्यार्थ्याला कुठलीही श्रेणी गाठण्याचे वेळेचे बंधन नाही. पाल्यांच्या तयारी नुसार त्यांना वरच्या श्रेणी मध्ये जाण्यासाठी परीक्षेला बसण्याची संधी ह्या शाळेतर्फे देण्यात येते.

भाषा प्रवाही असते. ती सतत नवीन वळणे आणि नवीन रूपे घेते. देवाण-घेवाण करत करत समृद्ध होत जाते. भाषा ही माणसाची मुलभूत गरज आहे. त्यामुळे तो जिथे जातो तिथे आपली भाषा घेऊन जातो. आपले शब्द इतरांना वाटतो. काही माणसांना भाषा शिकण्याची अनामिक ओढ असते. ते अगदी अपरिचित प्रांताच्या, तिथल्या भाषेच्या प्रेमात पडतात. आणि मग भाषिक आदानप्रदान व्हायला फार वेळ लागत नाही. मराठी माणूस जगात गेला तिथे आपली भाषा घेऊन गेल्याची जशी खूप उदाहरणे आहेत तशीच महाराष्ट्रात काहीतरी कारणाने आलेल्या माणसांनी इथल्या भाषेची गोडी आपल्यासोबत आपल्या देशात नेल्याचीही उदाहरणे आहेत.

अमेरिकन इन्टिन्टूट फॉर इंडियन स्टडीज ही परदेशी विद्यार्थ्यांना भारतीय भाषा शिकण्याची संधी देणारी संस्था आहे. त्याच्या पुण्यातल्या अभ्यासक्रमात परदेशी विद्यार्थ्यांना संस्कृत आणि हिंदी यासोबत मराठीही शिकवली जाते. काही वर्षांपूर्वी इथे बऱ्यापैकी संख्येने विद्यार्थी येत असत. त्यातील काही मराठी शिकून पुढे विद्यावाचस्पती ह्या महत्त्वाच्या पदवीसाठी परत येत. आणि महाराष्ट्राशी संबंधित विषय निवडून त्यावर काम करत असत. माझ्या एका विद्यार्थ्याने महाराष्ट्रातील हनुमानाची स्थाने तर आणखी एका विद्यार्थ्याने तुकाराम महाराजांच्या अभंगांवर फार उत्तम काम केले. अशा विद्यार्थ्यांपैकी अनेकजण फार छान मराठी बोलतात, लिहितात. पुन्हा पुन्हा इथे येतात. दोन वर्षांपूर्वी कॅनडातून आलेल्या एका विद्यार्थिनीने मंगळागौरी, गणपतीत घरी येणाऱ्या गौरी या विषयात रस वाटून अनेकजणांच्या घरी जाऊन अभ्यास केला.

पाच-सहा वर्षांपूर्वी असाच एक छान अनुभव घेता आला. एका मराठी मुलाशी अमेरिकन मुलीने आपखुशीने लग्नगाठ बांधायची ठरवली. त्यासाठी ती पहिल्यांदा पुण्याला आली तेव्हा तिच्या लक्षात आलं त्याच्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींना इंग्रजी भाषा फारशी येत नाही. तेव्हा तिनी ठरवलं की ती मराठी शिकणार. ती अमेरिकेला परत गेली पण सासूसासऱ्यांना सांगून गेली की मला मराठी

शिकवायला कोणीतरी शोधा. ते शोध घेत माझ्यापर्यंत पोहोचले. आणि मग चार ते पाच महिने इंटरनेटवरून मराठी वर्णमाला, छोटी वाक्ये, नवीन शब्द, त्याचे योग्य उच्चार याची सुरूवात झाली. काही काळ झाल्यावर ती मला सांगायची की माझा नवरा त्याच्या आईशी काय बोलतो, याचा आता मला अंदाज येतो. मला याची खूपच गंमत वाटायची. पण आमीने भाषा शिकण्यासाठी खरंच खूप कष्ट घेतली. कमी वेळात आमी बऱ्यापैकी मराठी शिकली. आणि लग्नाच्या वेळी तिने छोटेखानी मराठी भाषणही केले.

तंत्रज्ञानाच्या आणि इंटरनेटच्या युगात आला मराठी भाषा संगणकावरही रुळली आहे. गुगल, फेसबुक, व्हाटसअप सारख्या परदेशी मातब्बर कंपन्यांना देखील देशोदेशीच्या स्थानिक भाषांचा समावेश करावा असे वाटते आहे. आणि आधुनिक काळात आपली भाषा मागे न पडता, तंत्रज्ञानाशी धागा जोडून आहे. मराठी साहित्य, विविध विषयांवरील माहिती या नवीन माध्यमातून जगभरात अनेकांपर्यंत पोहोचते आहे. हे चित्र आशादायक आहे. माणसांच्या सोबतीने भाषा देशोदेशी जातात. स्थिरावतात. नवीन भाषिक तयार करतात. पण तरीही त्या त्या भाषेचे आर्थिक, सामाजिक पैलूदेखील भाषेच्या विकासात महत्त्वाचे ठरतात. ती भाषा बोलणारा समाज, त्यांची संख्या, त्याचा व्यापार, राजनैतिक प्रभाव यामुळे भाषा अधिक जोमाने पसरते. त्यामुळे भारतीय भाषांचा विचार केला तर परदेशामध्ये हिंदी शिकणाऱ्यांची संख्या कितीतरी जास्त आहे. अर्थात ते सुद्धा काही ठराविक देशांमधेच. महाराष्ट्राची आणि मराठी भाषिकांची आर्थिक, राजनैतिक, सांस्कृतिक स्थिती जशी बदलेल तशी त्यांच्या मातृभाषेची स्थिती सुधारेल. पण आपण मात्र आपली भाषा जोपासण्यापेक्षा दुसऱ्यांच्या परदेशी भाषेचा पदर धरून प्रगती करण्याची स्वप्न पाहात आहोत. आपली मुले ना मातृभाषेत शिकतात, ना मातृभाषेतून बोलतात, ना मातृभाषा वाचतात. मग आपली भाषा जागतिक स्तरावर वृद्धिंगत कशी व्हावी? तिला जगाच्या कानाकोपऱ्यात मान कसा मिळावा? याचा विचार आपणच करायला हवा.

sunila.gondhalekar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...