आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी 2.0 चे एक वर्ष:देश परिश्रमाने स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करेल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘जीवनात होत असलेली गैरसोय, जीवनावरील संकटात बदलू नये हेही आपल्याला लक्षात ठेवावे लागेल’

माझे प्रिय स्नेहीजन,

आजपासून एक वर्षापूर्वी भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक नवा सुवर्णअध्याय जोडला गेला. देशात अनेक दशकांनंतर पूर्ण बहुमताच्या एखाद्या सरकारकडे सलग दुसऱ्यांदा जनतेने जबाबदारी सोपवली होती. हा अध्याय रचण्यात आपली खूप मोठी भूमिका राहिली आहे. त्यामुळे आजचा हा दिवस माझ्यासाठी संधी आहे आपल्याला नमन करण्याची, भारत आणि भारतीय लोकशाहीप्रती आपल्या या निष्ठेला प्रणाम करण्याची.

जर सामान्य स्थिती असती तर मला आपल्यात येऊन आपल्या दर्शनाचे सौभाग्य मिळाले असते. पण, कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे जी परिस्थिती उद्भवली आहे, त्या परिस्थितीत मी या पत्राद्वारे आपल्याला प्रणाम करण्यास आणि आशीर्वाद घेण्यास आलो आहे. गेल्या वर्षांत आपला स्नेह, शुभाशीर्वाद आणि आपल्या सक्रिय सहकार्याने मला सतत एक नवी ऊर्जा, नवी प्रेरणा दिली आहे. यादरम्यान आपण लोकशाहीच्या ज्या सामूहिक शक्तीचे दर्शन घडवले ते आज संपूर्ण जगासाठी एक उदाहरण ठरले आहे.

२०१४ या वर्षात आपण, देशाच्या जनतेने देशात एका मोठ्या बदलासाठी, देशाचे धोरण आणि रीत बदलण्यासाठी मतदान केले होते. त्या पाच वर्षांत देशाने व्यवस्थेला जडत्व आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीतून बाहेर पडताना पाहिले आहे. त्या पाच वर्षांत देशाने अंत्योदयाच्या भावनेसोबत गरिबांचे जीवन सोपे करण्यासाठी गव्हर्नन्सला बदलताना पाहिले आहे. त्या कार्यकाळात देशात भारताचा सन्मान तर वाढलाच, शिवाय आम्ही गरिबांची बँकांत खाती उघडून, त्यांना मोफत गॅस आणि वीज जोडणी देऊन, शौचालये बनवून, घरे तयार करून गरिबांची प्रतिष्ठाही वाढवली. त्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक झाला, तर आम्ही वन रँक वन पेन्शन, वन नेशन वन टॅक्स- GST, शेतकऱ्यांची एमएसपीची अनेक वर्षे जुनी मागणीही पूर्ण करण्याचे काम केले. तो कार्यकाळ देशाच्या अनेक गरजांच्या पूर्तीसाठी समर्पित राहिला.

२०१९ या वर्षात आपला आशीर्वाद, देशाच्या जनतेचा आशीर्वाद, देशाच्या मोठ्या स्वप्नांसाठी होता, आशा-आकांक्षांच्या पूर्ततेसाठी होता. आणि या एका वर्षात घेतलेले निर्णय त्याच मोठ्या स्वप्नांचे उड्डाण आहे. आज लोकांशी जोडलेली जन-मनाची जनशक्ती, राष्ट्रशक्तीच्या चेतनेला प्रज्वलित करत आहे. गेल्या एक वर्षात देशाने सतत नवी स्वप्नं पाहिली, नवे संकल्प केले आणि ते संकल्प पूर्ण करण्यासाठी सतत निर्णय घेऊन पावलेही टाकली. भारताच्या या ऐतिहासिक प्रवासात देशाचा प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी सार्थपणे पार पाडली आहे.

‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा मंत्र घेऊन आज देश सामाजिक असो की आर्थिक, जागतिक असो की अंतर्गत, प्रत्येक दिशेने प्रगती करत आहे. गेल्या एक वर्षात काही महत्त्वाचे निर्णय जास्त चर्चेत राहिले आणि त्यामुळे या उपलब्धी आठवणींत राहणेही खूपच स्वाभाविक आहे. राष्ट्रीय एकता-अखंडतेसाठी कलम ३७० ची गोष्ट असो, शेकडो वर्षे जुन्या असलेल्या संघर्षाच्या सुखद परिणामाची-राम मंदिर निर्मितीची गोष्ट असो, आधुनिक समाज व्यवस्थेत अडथळा ठरलेला तिहेरी तलाक असो किंवा मग भारताच्या करुणेचे प्रतीक असलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा असो, या सर्व उपलब्धी आपल्या सर्वांच्या आठवणीत आहेत. एकानंतर एक झालेल्या या ऐतिहासिक निर्णयांदरम्यान अनेक निर्णय-बदल असेही आहेत, ज्यांनी भारताच्या विकास यात्रेला नवी गती दिली आहे, नवे उद्दिष्ट दिले आहे, लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या पदस्थापनेमुळे तिन्ही सैन्यदलांत समन्वय वाढला आहे, तेथे मिशन गगनयानसाठीही भारताने आपल्या तयारीला वेग दिला आहे. यादरम्यान गरिबांना, शेतकऱ्यांना, महिला आणि युवकांना सशक्त करण्यास आमचे प्राधान्य राहिले आहे. आता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या कक्षेत देशातील प्रत्येक शेतकरी आलेला आहे. गेल्या एक वर्षात या योजनेअंतर्गत ९ कोटी ५० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यांत ७२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली आहे. देशात १५ कोटींपेक्षा जास्त ग्रामीण घरांत पिण्याचे शुद्ध पाणी वाहिनीद्वारे मिळावे यासाठी जल जीवन मिशन सुरू करण्यात आले आहे. 

आपल्या ५० कोटींपेक्षा जास्त पशुधनाच्या उत्तम आरोग्यासाठी मोफत लसीकरणाची खूप मोठी मोहीमही चालवली जात आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी, शेतमजूर, लहान दुकानदार आणि असंघटित क्षेत्राच्या श्रमिक सहकाऱ्यांसाठी, सर्वांसाठी ६० वर्षे वयानंतर ३ हजार रुपयांच्या नियमित मासिक पेन्शनची सुविधा सुनिश्चित झाली आहे. मच्छीमारांच्या सोयी-सवलती वाढवण्यासाठी, त्यांना मिळणाऱ्या सुविधा वाढवण्यासाठी आणि ब्लू इकॉनाॅमी मजबूत करण्यासाठी विशेष योजनांबरोबरच वेगळा विभागही तयार केला आहे. अशाच प्रकारे व्यापाऱ्यांच्या समस्यांवर वेळीच तोडगा काढण्यासाठी व्यापारी कल्याण मंडळाचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वयंसाहाय्यता गटांशी जोडलेल्या जवळपास ७ कोटी भगिनींना आता जास्त आर्थिक मदत दिली जात आहे. अलीकडेच स्वयंसाहाय्यता गटांसाठी विनाहमीचे कर्ज १० लाखांवरून वाढवून दुप्पट म्हणजे २० लाख करण्यात आले आहे. आदिवासी मुलांचे शिक्षण लक्षात घेऊन, देशात ४५० पेक्षा जास्त नव्या एकलव्य मॉडेल निवासी शाळांच्या बांधकामाची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. सामान्यांच्या हिताशी संबंधित चांगले कायदे तयार व्हावेत यासाठीही गेल्या वर्षात वेगाने काम झाले आहे. आपल्या संसदेने आपल्या कामकाजाने अनेक दशके जुने विक्रम मोडले आहेत. त्यामुळेच मग ग्राहक संरक्षण कायदा असो, दिव्यांग, महिला आणि मुलांना जास्त सुरक्षा देणारे कायदे असो, हे सर्व वेगाने तयार झाले.

सरकारच्या धोरणांमुळे आणि निर्णयांमुळे शहरे आणि गावांतील दरी कमी होत आहे. गावात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या शहरात इंटरनेट वापरणाऱ्यांपेक्षा १० टक्के जास्त झाली आहे. हे प्रथमच घडले आहे. देशहितास्तव केलेल्या अशा प्रकारच्या ऐतिहासिक कामांची आणि निर्णयांची यादी खूप मोठी आहे. या पत्रात सर्व विस्ताराने सांगणे शक्य नाही. पण, मी एवढे अवश्य म्हणेन की एक वर्षाच्या कार्यकाळाच्या प्रत्येक दिवशी चोवीस तास संपूर्ण दक्षतेने, संवेदनशीलपणे काम झाले आहे, निर्णय घेण्यात आले आहेत. भारतीयांच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करत आम्ही द्रुतगतीने वाटचाल करत असतानाच काेराेनाच्या वैश्विक महामारीने भारताला वेढले. एकीकडे अत्याधुनिक आराेग्य सुविधा आणि महाकाय अर्थव्यवस्था असलेल्या बड्या महाशक्ती आणि दुसऱ्या बाजूला भली माेठी लाेकसंख्या आणि अनेक आव्हानांनी वेढलेला आपला भारत आहे. अनेकांना शंका व्यक्त केली की, जेव्हा काेराेना भारतावर हल्ला करेल, तेव्हा भारत साऱ्या जगासाठी धाेकादायक ठरेल. परंतु तमाम भारतीयांनी आपल्या देशाविषयीचा दृष्टिकाेन पूर्णत: बदलून टाकला. जगातील सामर्थ्यशाली आणि संपन्न देशांच्या तुलनेत भारतवासियांची सामुदायिक शक्ती आणि क्षमता अभूतपूर्व असल्याचे आपण दाखवून दिले. टाळ्या-थाळ्या वाजवणे आणि दीप प्रज्वलित करण्यापासून भारतीय सैन्याद्वारे काेराेना वाॅरियर्सचा असाे, जनता कर्फ्यू किंवा देशव्यापी लाॅकडाऊनच्या दरम्यान नियमांचे निष्ठापूर्वक पालन असाे प्रत्येकी वेळी भारतीयांचे एेक्य हेच भारताच्या श्रेष्ठत्वाची हमी असल्याचे दाखवून दिले.

महामारीच्या या संकटकाळात काेणालाही, काहीही त्रास किंवा काेणतीही गैरसाेय झाली नसल्याचा दावा काेणीही नक्कीच करणार नाही. आपला मजूर वर्ग, स्थलांतरित कामगार बंधू-भगिनी, लहान-सहान उद्याेगात काम करणारे कारागीर, फेरीवाले, दुकानदार, लघुउद्याेजक अशा साऱ्यांनीच अपरिमित यातना साेसल्या आहेत. त्यांच्या व्यथा दूर करण्याचा सारे जण मिळून प्रयत्न करत आहाेत. परंतु, आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, जीवनात हाेत असलेली गैरसाेय ही आयुष्यावरील संकटात परिवर्तित न हाेवाे. यासाठी प्रत्येक भारतीयाने प्रत्येक दिशानिर्देशांचे पालन करणे अत्यावश्यक ठरते. आजवर आपण जगण्याची दुर्दम्य उमेद आणि संयम राखला, तसाच ताे भविष्यातही टिकवून ठेवायचा आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताची स्थिती अधिक चांगली असण्यामागचे मुख्य कारण हेच आहे. ही लढाई दीर्घकाळ चालणारी आहे, आपण विजयाच्या मार्गाने वाटचाल करत आहाेत आणि विजयी हाेणे हाच सर्वांचा सामुदायिक संकल्प आहे. अलीकडेच पश्चिम बंगाल आणि आेडिशामध्ये आलेल्या चक्रीवादळाच्या काळात तेथील रहिवाशांनी ज्या धैर्याने स्थितीचा सामना केला, वादळामुळे उद्भवणारी हानी कमी केली ते आपणा साऱ्यांसाठी प्रेरक आहे.

एकंदर अशा वातावरणातही भारतासह तमाम देशांची अर्थव्यवस्था कशी उभारी घेईल? असा मुद्दा चर्चेत आहे. परंतु ज्या पद्धतीने भारताने एकजुटीने काेराेनाविरुद्ध लढा देऊन साऱ्या जगाला चकित केले, तसेच आर्थिक क्षेत्रातदेखील आम्ही नवा आदर्श स्थापित करू. १३० काेटी भारतीय आपल्या सामर्थ्याने आर्थिक क्षेत्रातही जगाला केवळ चकित नव्हे, तर प्रेरितही करू शकतात. आता आपल्याला स्वबळावर उभे राहावे लागेल, त्याचा एकच मार्ग आहे- आत्मनिर्भर भारत. अलीकडेच आत्मनिर्भर भारत अभियानासाठी घाेषित केलेले २० लाख काेटींचे पॅकेज त्या दृष्टीने माेठे पाऊल आहे. भारतीयांच्या घामाने, परिश्रम आणि प्रतिभाशक्तीने बनलेल्या स्थानिक उत्पादनांच्या बळावर भारत आयातीवरील आपले अवलंबित्व कमी करेल आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करेल. गेल्या ६ वर्षांच्या काळात आपला स्नेह आणि आशीर्वाद माझ्यावर निरंतर राहिला आहे. या शक्तीच्या बळावरच देश गेल्या वर्षभरात एेतिहासिक निर्णय आणि अभूतपूर्व गतीने विकास पथावर मार्गक्रमण करत आहे. तथापि, मला जाणीव आहे की अजून बरेच काही करायचे राहिले आहे. देशासमाेर अनेक आव्हाने आहेत, समस्या आहेत. मी दिवस-रात्र प्रयत्न करत आहे. माझ्यात काही उणिवा असू शकतात, परंतु देशामध्ये काही उणिवा नाहीत. म्हणूनच माझा विश्वास स्वत:पेक्षा आपल्यावर, आपले सामर्थ्य आणि शक्तीवर अधिक आहे. माझ्या संकल्पाची ऊर्जा तुम्ही आहात.

आपण लक्षात ठेवले पाहिजे की, १३० काेटी भारतीयांचे वर्तमान आणि भवितव्य काेणती आपत्ती किंवा विपत्ती निश्चित करू शकत नाहीत. आम्ही आपले वर्तमान स्वत: निश्चित करू आणि भवितव्यदेखील. आम्ही पुढे वाटचाल करत राहू, प्रगतिपथावर धावत राहू, आम्ही सारे विजयी हाेऊ. ‘कृतम् मे दक्षिणे हस्ते, जयो मे सव्य आहितः’॥ असे आपल्याकडे म्हटले जाते. म्हणजेच आपल्या एका हातात कर्म आणि कर्तव्य, तर दुसऱ्या हातात यश नक्कीच आहे. देशाला निरंतर यश लाभत राहाे या अपेक्षेसह मी आपणा सर्वांना पुनश्च नमन करताे. आपणास आणि आपल्या कुटुंबीयांना माझ्या हार्दिक शुभेच्छा! निरोगी राहा, सुरक्षित राहा!! जागृत राहा, जागरूक ठेवा!!

आपला प्रधानसेवक

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

बातम्या आणखी आहेत...