आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॅशनल हेराल्डप्रकरणी आता राहुल गांधी यांची शुक्रवारी चौकशी होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींना आतापर्यंत केवळ 50% प्रश्न विचारण्यात आले आहेत, त्यामुळे त्यांना ईडी कार्यालयात बोलावणे सुरूच राहील.
एकीकडे ईडीचे अधिकारी त्यांच्या उत्तरांवर असमाधानी दिसले, तर दुसरीकडे, राहुल गांधींना असेही म्हणावे लागले की, आता त्यांना दररोज येथे यावे लागेल, कारण चौकशी बराच काळ चालणार आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार अॅडव्होकेट विवेक तन्खा यांनी राहुल गांधी यांच्या प्रश्नासंबंधीचे वृत्त लीक झाल्यानंतर गृह मंत्रालय, वित्त मंत्रालय आणि कायदा मंत्रालयाला नोटीस पाठवली आहे.
बुधवारी तिसऱ्या दिवशी राहुल गांधी चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले. दुपारी बारा वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू होती, ती रात्री उशिरापर्यंत सुरू राहिली. राहुल गांधींची आतापर्यंत 30 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, राहुल यांच्या अटकेच्या अफवाही उडत होत्या. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांची पोलिसांशी झटापटही झाली.
राहुल यांच्याविरुद्ध ईडीच्या कारवाईचा देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला. बड्या नेत्यांना पोलिसांनी ठिकठिकाणी ताब्यात घेतले. राहुल-सोनियांना काही झाले तर त्याचे परिणाम फार वाईट होतील, असा कडक शब्दांत काँग्रेस नेत्यांनी इशारा दिला. काँग्रेसजनांच्या या विधानाचा भाजपने कडाडून विरोध केला.
रात्री 12 वाजता घरी पोहोचले राहुल गांधी
ईडीने चौकशी केल्यानंतर मंगळवारी रात्री 12 वाजता राहुल गांधी घरी पोहोचले. अधिकाऱ्यांनी बुधवारी पुन्हा येण्यास सांगितले. राहुल गांधी ईडी कार्यालयातून थेट पक्ष कार्यालयात येतील, अशी पक्षाच्या बड्या नेत्यांची अपेक्षा होती, परंतु बराच उशीर झाल्यामुळे लोक हळूहळू पक्ष कार्यालयातून बाहेर पडले. बुधवारी सकाळी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वीच राहुल गांधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी 24, अकबर रोड येथील पक्ष कार्यालयात पोहोचले. सर्वांशी संवाद साधला आणि नंतर ईडी कार्यालयाकडे रवाना झाले.
यंग इंडियाच्या सामाजिक कार्यांची माहिती दिली
सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, चौकशीच्या तिसऱ्या दिवशी राहुल गांधींनी यंग इंडिया लिमिटेड ही कंपनी नॉन प्रॉफिट असल्याचे सांगितले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कामांची माहिती त्यांनी दिली.
राहुल गांधींच्या अटकेची अफवा
बुधवारी दुपारी राहुल गांधींना अटक होण्याची शक्यता असल्याच्या बातम्या आल्या होत्या. राहुल गांधी चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात आले. हे वृत्त काँग्रेसजनांना समजताच ते संतापले. त्यांनी निदर्शने तीव्र करत आंदोलनाचा इशाराही दिला.
सोनिया गांधी यांच्या चौकशीवर बैठक
राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर आता ईडी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी करण्याच्या तयारीत आहे. सोनिया गांधी 23 जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात हजर होणार होत्या, मात्र त्या सध्या रुग्णालयात दाखल आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी याबाबत अभिप्राय घेण्यास सुरुवात केली आहे.
काय आहे नॅशनल हेराल्ड केस?
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 मध्ये दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडीस, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची फसवणूक केल्याबद्दल गैरव्यवहार करून हडप केल्याचा आरोप होता.
आरोपानुसार, या काँग्रेस नेत्यांनी नॅशनल हेराल्डच्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी यंग इंडियन लिमिटेड म्हणजेच YIL नावाची संस्था स्थापन केली आणि त्याद्वारे नॅशनल हेराल्ड प्रकाशित करणाऱ्या असोसिएटेड जर्नल लिमिटेड म्हणजेच एजेएलचे बेकायदेशीरपणे अधिग्रहण केले. दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावरील हेराल्ड हाऊसची 2000 कोटी रुपयांची इमारत ताब्यात घेण्यासाठी हे कृत्य केल्याचा आरोप स्वामी यांनी केला होता.
2000 कोटी रुपयांची कंपनी अवघ्या 50 लाख रुपयांना विकत घेतल्याबद्दल स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि या प्रकरणात गुंतलेल्या काँग्रेसच्या इतर वरिष्ठ नेत्यांविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याची मागणी केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.