आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामी 'यूपी में का बा' फेम नेहा सिंह राठौड आहे, हल्ली मला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. आई धक्क्यात आहे. पती हिमांशूला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. माझे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मी मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ आहे. रक्तदाब कमी राहतो.
सासरचे लोक टोमणे मारत आहेत. सुनेवर खूप अभिमान होता असे बोलत आहेत. 6 महिने उलटत नाही तोच लग्नघरात पोलिस बोलावले, कोर्टापर्यंत गेली. पुढे आणखी काय-काय करेल माहीत नाही.
ते लोक ज्या प्रकारे माझ्या मागे लागले आहेत, आता पोटा-पाण्याची चिंताही मला सतावू लागली आहे. नेहाने गाणे सोडावे अशी त्यांची इच्छा आहे, पण मी असे होऊ देणार नाही. अति झाले तर दिल्ली सोडावी लागेल. मी गावी परत जाईन. शेती करेन, पण गाणे सोडणार नाही.
जेव्हा मी पहिल्यांदा यूपी में का बा गायले तेव्हा मला इतके ट्रोल करण्यात आले की मी आतून हादरले. मी सांगू शकत नाही अशा प्रकारे लोकांनी शिवीगाळ केली. मला माझ्या कुटुंबातील सदस्यांना सोशल मीडियावर ब्लॉक करावे लागले, कारण आपल्या बहिणीला-मुलीला कुणी वेश्या म्हणणे हे कोणत्याही कुटुंबीयांना सहन होणार नाही.
त्यावेळी माझा साखरपुडा झाला होता. ज्याप्रकारे मला ट्रोल केले जात होते, त्यामुळे माझे लग्न मोडेल अशी भीती वाटत होती. जेव्हा मी हिमांशूसोबतचा फोटो शेअर केला तेव्हा लोक म्हणू लागले की ही एका रेड्याशी लग्न करत आहे. हीचा नवरा वळू आहे.
लोकांनी तर इथपर्यंत लिहिलं की, तुझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत, चेहरा आरशात बघ... माझी मानसिक अवस्था अशी झाली की मी आरशात माझा चेहरा पाहू लागले. हे सगळे पिंपल्स कसे बरे होतील या विचारात पडले. तेव्हा मला वाटले की ही माणसे अशी आहेत की, एखादी विश्वसुंदरी असली तरी तिच्यात उणीवा काढतील.
कोविडमध्ये सासूचा मृत्यू झाला तेव्हा लोक म्हणू लागले की ती कुलछणी आहे. लग्नाआधी सासूला खाल्ले. मला खूप ताण आला. सुदैवाने हिमांशू आणि माझ्या सासरच्यांनी या गोष्टींकडे लक्ष दिले नाही. सासरे नेहमी म्हणायचे की तुला जे योग्य वाटेल ते कर.
नेहा सिंह राठौड कशी बनली हे फक्त मला माहीत आहे. माझी कथा खूप वेदनादायक आहे. दर पाचव्या दिवशी काही ना काही समस्या माझ्यासमोर उभ्या राहतात. माझ्या पालकांना माझे गाणे कधीच आवडले नाही. मी बीएड करून शिक्षिका व्हावं किंवा स्वयंपाकघरात राहावे अशी आईची इच्छा होती.
माझे लग्न सरकारी नोकराशी झाले पाहिजे. आजही माझे वडील मला गाणे थांबवायला सांगतात, आम्हाला पैसा नको आहे, समाजात मान-सन्मान हवा आहे, पण मी जे करतेय ते योग्य आहे हे मला माहीत आहे.
बिहारच्या कैमूर-भभुआ येथे जन्म झाला. वडील लखनौमध्ये खासगी नोकरी करायचे. गावात भाऊ-बहीण आणि आईसोबत राहत होते. वडील सरळमार्गी होते, पण आई माझ्यात आणि माझ्या भावात भेद करायची. आजीही भावाच्या जेवणात तूप घालायची आणि मला देत नव्हती. ती म्हणायची तुला सासरच्या घरी जावं लागेल, तूप खाऊन इथे आखाड्यात उतरायचंय का..? मला त्यावेळी खूप वाईट वाटायचं.
सुरुवातीच्या शिक्षणानंतर मी बिहारमधून कानपूरला आले, कारण तिथे पदवीधर व्हायला 6 वर्षे लागायची. सुरुवातीपासूनच वाचन आणि लेखनाची आवड होती. तू कलेक्टर होणार असे शिक्षक म्हणायचे. मला लहानपणापासून गाण्याची आवड होती. आईसोबत लग्नाला जायचे. तिथे आई भोजपुरी गाणी म्हणायची, मी पण तिला साथ द्यायचे.
2017 ची गोष्ट आहे. मी माझे ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. भाऊ फेसबुक चालवायचा. त्याच्या याच आयडीने मी फेसबुकवर जायचे. एक दिवस मी पाहिले की लोक सोशल मीडियावर कसलिही गाणी पोस्ट करतात आणि त्यांना लाईक्सही कमी मिळतात.
यापेक्षा मी चांगले गाते असे मला वाटायचे. लोकांना माझी गाणी जास्त आवडतील, पण माझ्याकडे फोन नव्हता. ती भावाशी बोलल्यावर त्याने नकार दिला असता. यानंतर मी काकांच्या फोनमध्ये गाणे रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. एक दिवस हट्ट करत मी माझ्या मामाला माझे फेसबुक खाते बनवायला लावले.
2018 ची गोष्ट आहे. मावशीच्या घरी कोलकात्याला गेले होते. तिथे गुणगुणत असताना काकू म्हणाल्या, तुला गायचे असेल तर नीट गा. त्यांचे म्हणणे मला लागले आणि मग ठरवले की आता मी माझी गाणी फेसबुकवर पोस्ट करेन. हळूहळू फेसबुकवर एक एक गाणी पोस्ट करायला सुरुवात केली.
सुरुवातीला लाईक्स कमी होते. 300-400 लोक बघायचे, पण माझे प्रयत्न चालूच होते. मी लिहिलेलं एक गाणं होतं 'हमारा प्रेम के निसानी (निशान) दिखाई द, पिया शौचालय बनाई द...'. लोकांना ते खूप आवडले. यामुळे माझा धीर वाढला.
आता मला फक्त एका फोनची गरज होती. आईला म्हणाले मला मोबाईल घेऊन दे, पण तिला वाटायचे मी मुलांशी बोलण्यासाठी फोन मागत आहे. ती म्हणायची की तुला जे बोलायचं असेल ते लग्न झाल्यावर नवऱ्याशी बोल.
एकदा भावाने नवीन फोन घेतला. तो त्याचा जुना फोन असाच ठेवत होता, पण मला देत नव्हता. घरातील लोकही माझ्यावर कायम लक्ष ठेवून होते. इतकं झाल्यावरही जेव्हा कधी फोन हाती पडायचा तेव्हा कोणत तरी गाणं फेसबुकवर अपलोड करायचे.
2019 ची गोष्ट आहे. दिल्लीतल्या प्रगती मैदानावरच्या पुस्तक मेळ्याला गेले होते. तिथल्या पुस्तकांच्या स्टॉलवर हिमांशू भेटला. त्याच्याशी बोलणे झाले आणि आम्ही आमचे नंबर एकमेकांना शेअर केले. त्याच्याशी फोनवर बोलू लागले.
एक दिवस त्याने प्रपोज केले, मग मी नकार दिला. मी एका मुलाशी बोलत असल्याचे आईला कळले तेव्हा तिने माझ्या भावाला माझा फोन तोडायला लावला. भावाने हिमांशूला फोनवर शिवीगाळ केली. खूप वाईट बोलला.
हिमांशूने माझ्या मावशीच्या मुलीला फोन केला की नेहाच्या घरच्यांनी तिचा फोन फोडला आहे. मी नेहाशी बोलणार नाही, पण तिला फोन मिळायला हवा. निदान ती गाऊ शकेन. मावशीच्या मुलीने भावाला समजावले की हिला फोन घेऊन दे.
मीही एक नंबरची हट्टी होते. मी ठरवले होते की काहीही झाले तरी मी माझे काम सोडणार नाही. एक दिवस मी अनेक फोन विकत घेईन. मुलींना मेकअप करून सुंदर दिसायचे असते, त्यांच्या अनेक इच्छा असतात, पण माझी इच्छा फक्त फोनची होती.
2020 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान मला एका मीडिया कंपनीकडून गाण्यासाठी 1.5 लाख रुपये मिळाले होते. सगळ्यात आधी मी एक फोन घेतला. त्यावेळी मला इतका आनंद झाला की मी सांगू शकत नाही. काही दिवसांनंतर, ज्या भावाने माझा मोबाईल तोडला होता त्याच भावाला मी अॅप्पल फोन भेट दिला.
निवडणुकीदरम्यान मी 'बिहार में का बा' हे गाणे गायले, ज्यामुळे मला खूप प्रसिद्धी मिळाली. या गाण्याला प्रत्युत्तर म्हणून बिहार सरकारलाही गाणे बनवावे लागले. ही मुलगी कोण आहे, जिच्या गाण्यावर सरकारला उत्तर द्यावे लागले, हे सर्वांनाच जाणून घ्यायचे होते.
मला खूप ट्रोलही केले गेले. काहींनी मला दलाल तर काहींनी मला आरजेडीचा एजंट म्हटलं. माझ्यावर अश्लील शिवीगाळ करण्यात आली. ट्रोल झाल्यावर वडील चांगलेच संतापले, ते म्हणाले गाणे असेल तर पारंपारिक गाणी गा, राजकीय व्यंग नाही, पण मी कुठे ऐकणार होते. मला माहित आहे की मी योग्य काम करत आहे.
यानंतर हिमांशूवरून घरात वाद झाला. माझी आई म्हणाली की मी फक्त सरकारी नोकरी असलेल्याशीच लग्न करावे. कुटुंबीयांना वाटायचे की हिमांशू आपल्या मुलीला फसवत आहे.
हिमांशू माझ्या भावाला माझ्या लग्नाबद्दल बोलला, पण भावाने नकार दिला. मग आमचे वडील एकमेकांशी बोलले. एकंदरीत, हिमांशू आणि मी खूप भांडण आणि तणावानंतर लग्न केले.
लग्नानंतर सर्व काही ठीक चालले होते. आम्ही दोघं आपलं नवं आयुष्य जगत होतो की पुन्हा स्क्रू अडकला. काही दिवसांपूर्वी, मी कानपूर देहातच्या घटनेवर एक गाणे लिहिले- युपी में काबा सीझन-2, ते गाणे व्हायरल झाले. 17 फेब्रुवारी रोजी पोलीस नोटीस घेऊन माझ्या सासरच्या घरी गेले.
त्या दिवसापासून सासर आणि माहेरचे दोघेही नाराज आहेत. आईची तब्येत बिघडल्याने तिलाही रुग्णालयात दाखल करावे लागले. ती म्हणू लागली की आता तु तुरुंगात जाणार. तिथे लोक तुला जास्त त्रास देतील.
घरचे लोक सतत फोन करत असतात. ते म्हणतात गाणे बंद कर. त्रास विकत घेऊ नको. मी पण मोडले आहे. मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. अनेकवेळा माझी तब्येत बिघडते, हॉस्पिटलमध्ये होते, पण मी माझ्या कुटुंबीयांना सांगते की सर्व काही ठीक आहे.
मी कोणत्याही खासदार किंवा आमदाराची मुलगी नाही, मी गाणार नाही, तर काय खाणार. आता तर नवऱ्यालाही नोकरी नाही. माझे सर्व कार्यक्रम जे आधीच ठरलेले होते ते रद्द करण्यात आले आहेत.
नवीन बूकिंगही येत नाहीत. कंटाळून मी गाणे थांबवावे, अशी त्यांची इच्छा आहे, पण तसे होणार नाही. भोजपुरीने मला जन्म दिला, मी या मातीची ऋणी आहे. मी गरीब कुटुंबातील आहे, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत गरिबांसाठी लढेन, मी लिहीन आणि गाईन.
नेहा सिंह राठौडने या सर्व गोष्टी दिव्य मराठी नेटवर्क रिपोर्टर मनीषा भल्लांसोबत शेअर केल्या आहेत.
ही बातमीही वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.