आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनामुळे यंदा अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करून परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. एकीकडे कपातीचा निर्णय घेतला असताना दुसरीकडे शंभर टक्के अभ्यासक्रमानुसार नेहमीप्रमाणे बोर्डाने प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाचा २५ टक्के अभ्यासक्रम कपातीचा निर्णयही शिक्षकांपुरताच मर्यादित राहिला तर सोशल मीडियातून ५० टक्के कपातीचा संदेश फिरत असल्याने या गोंधळात आणखी भर पडली आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात येते. राज्यातून आठ ते दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आरोग्य विभागाशी चर्चा करून एप्रिल अथवा मे महिन्यात परीक्षेचा निर्णय होईल, असे म्हटले आहे. कोरोनामुळे २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णयदेखील शिक्षण विभाग आणि शिक्षकांपर्यंत आहे. सर्व विद्यार्थ्यांना याची कल्पना नाही. आता बोर्डाने प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या प्रश्नपत्रिका शंभर टक्के अभ्यासक्रमानुसार तयार होत असल्याने विद्यार्थ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. दहावीच्या अभ्यासक्रमात ३० ते ३५ टक्के कपात करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.
कपातीचे व्हिडिओ फेक :
सध्या दहावीच्या अभ्यासक्रमात ५० टक्के कपात केली असल्याचे काही व्हिडिओ समाजमाध्यमांतून व्हायरल होत आहेत. ते व्हिडिओ फेक व अपुऱ्या माहितीवर आधारित अाहेत. दहावीच्या अभ्यासक्रमात आणखी कपातीबाबतचा केवळ प्रस्ताव आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नसल्याचे शिक्षणतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
विद्यार्थी संभ्रमित, पुढच्या परीक्षांवर परिणाम
दहावी-बारावीच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु विद्यार्थी कॉलेजमध्येच येत नसल्याने त्याची कल्पना त्यांना नाही. अभ्यासक्रम कमी केला तरी तयारी मात्र शंभर टक्क्यांवरच करावी लागणार आहे. या दोन महिन्यांत त्यांचे प्रात्यक्षिक करून घेण्याचेदेखील आव्हान आहे. कमी अभ्यासक्रमावर परीक्षा झाली तरीही त्याचा पुढील प्रवेशपूर्व परीक्षांवर परिणाम होणार आहे. -आर.बी.गरुड, उपप्राचार्य, देवगिरी कनिष्ठ महाविद्यालय, औरंगाबाद
अंतिम प्रश्नपत्रिका कपातीनुसारच
अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली आहे. दहावीच्या अभ्यासक्रमात आणखी कपात करण्याचा प्रस्ताव आहे. पण त्यावर कोणताही निर्णय अजून झालेला नाही. अंतिम प्रश्नपत्रिका कपातीनुसार राहील. ही सर्व माहिती विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचवण्याची खरी जबाबदारी शिक्षकांची आहे. -एस.एस. नवले, अभ्यास मंडळ सदस्य
निर्णयानंतर कपातीनुसार प्रश्नपत्रिका
प्रश्नपत्रिकांचे काम सध्या सुरू आहे. सध्या शंभर टक्के अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका तयार करण्यात येत आहेत. मात्र, राज्य मंडळाच्या मार्गदर्शन आणि निर्णयानंतर कपात केलेल्या अभ्यासक्रमानुसार अंतिम प्रश्नपत्रिकेत प्रश्न असतील. -सुगता पुन्ने, विभागीय सचिव, एसएससी बोर्ड
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.