आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Nirav Modi Mumbai Arthur Jail | Fugitive Diamond Nirav Modi Merchant Extradition India UK Latest News

एक्सप्लेनर:भारतात आणल्यानंतर आर्थर रोड कारागृहातील बॅरेक क्रमांक -12 मध्ये राहणार नीरव मोदी; परंतु ब्रिटनहून भारतात आणण्यासाठी लागू शकतात 12 महिने

9 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला ब्रिटन सरकारचा हिरवा झेंडा...

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून पळ काढणार्‍या नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने शुक्रवारी मंजुरी दिली आहे. त्याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या लढ्याचे हे मोठे यश आहे. त्याच्या प्रत्यार्पणातील पहिला कायदेशीर अडथळा ब्रिटनच्या न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात दूर केला होता. पंजाब नॅशनल बँकेच्या फसवणुकीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआय व अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी तपास करीत आहे.

नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सीवर पंजाब नॅशनल बँके (पीएनबी) मध्ये 14,500 कोटी रुपयांचा कर्जघोटाळा केल्याचा आरोप आहे. जानेवारी 2018 मध्ये नीरव मोदी भारतातून पळून गेला होता. मोदीला भारतात आणल्यानंतर त्याला मुंबईतील आर्थर रोड जेलमधील बॅरेक क्रमांक -12 मध्ये ठेवले जाईल. बॅरेक क्रमांक -12 हा हाय सिक्युरिटी सेल आहे, जिथे सामान्य कैद्यांपेक्षा चांगल्या सुविधा मिळतात.

 • सर्व प्रथम, आर्थर रोड कारागृहाचा इतिहास जाणून घेऊया...

नीरव मोदीला आर्थर रोल कारागृहातील ज्या बॅरक क्रमांक 12 मध्ये ठेवले जाणार आहे, त्याचा इतिहास 95 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे. हे कारागृह 1926 मध्ये ब्रिटीशांनी बांधले होते. आर्थर रोड जेल 2.83 एकरवर बांधले गेले आहे. येथे एका वेळी 800 कैदी ठेवता येतात, परंतु बर्‍याच वेळा येथे कैद्यांची संख्या 2-3 हजारांपेक्षा जास्त असते.

आर्थर रोडचे नाव सर जॉर्ज आर्थरच्या नावावर आहे, जे 1842 ते 1846 पर्यंत मुंबईचे राज्यपाल होते. या कारणास्तव, याला आर्थर रोड जेल देखील म्हटले जाते. 1970 मध्ये या रस्त्याचे नाव बदलून साने गुरुजी मार्ग करण्यात आले. 1994 मध्ये या कारागृहाचे नाव मुंबई सेंट्रल कारागृह ठेवण्यात आले होते, परंतु ते आर्थर रोड जेल म्हणूनच ओळखले जाते.

 • नीरव मोदी ज्या तुरूंगात राहणात तेथे काय असेल?

2019 मध्ये, महाराष्ट्र कारागृह विभागाने लंडनमधील वेस्टमिन्स्टर कोर्टात बॅरेक क्रमांक -12 बद्दल माहिती दिली होती. कारागृह विभागाने सांगितले होते की, नीरव मोदीला ज्या ठिकाणी ठेवले जाईल, तिथे कडक सुरक्षा असेल आणि तिथे त्याला वैद्यकीय सुविधादेखील मिळेल. ऑगस्ट 2020 मध्ये वेस्टमिन्स्टर कोर्टाने बॅरेक क्रमांक -12 चा व्हिडिओ देखील पाहिला. त्यानंतरच कोर्टाने नीरव मोदीला भारतात आणण्यास मान्यता दिली.

बॅरेक क्रमांक -12 मध्ये नीरव मोदी पूर्णपणे सुरक्षित राहिल असे कोर्टाने म्हटले आहे. त्याची मानसिक स्थिती ठीक नाही आणि जर त्याला भारतात पाठवले तर तो आत्महत्या करेल, असा युक्तिवाद नीरवच्या वतीने वकिलांना केला होता. यावरही कोर्टाने म्हटले की, बॅरेक क्रमांक -12 मध्ये नीरवची आत्महत्या करण्याची कोणतीही शक्यता नाही, कारण तिथे त्याच्या प्रकृतीची संपूर्ण काळजी घेतली जाईल.

तुरूंग अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, नीरव मोदीला आर्थर रोड कारागृहात आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे आणि जेव्हा त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू होईल, तेव्हा सेलदेखील तयार होईल. तुरूंग विभागाने कोर्टाला आश्वासन दिले आहे की, ज्या सेलमध्ये नीरव मोदीला ठेवले जाईल त्या सेलमध्ये फार कमी कैदी असतील.

ज्या बॅरेक 12मध्ये नीरव मोदीला ठेवण्यात येणार आहे, ते 20 फूट लांब आणि 15 फूट रुंद आहेत. तेथे पंखा आणि लाइट आणि व्हेंटिलेशनची व्यवस्था असेल. त्याला आपले सामान आणि कपडे ठेवण्यासाठी एक कपाट देखील मिळेल. याशिवाय तेथे डास होऊ नये यासाठी दर आठवड्याला औषधाची फवारणी केली जाईल.

तुरूंगात सहसा कैद्यांसाठी कॉमन शौचालय असते, परंतु नीरव मोदीला पर्सनल टॉयलेट दिले जाईल. त्याला सेलमध्ये चटई, उशा, बेडशीट आणि ब्लँकेटही देण्यात येईल.

सरकारने लंडन कोर्टाला सांगितले आहे की, विजय मल्ल्यााला भारतात आणल्यास त्यालाही बॅरेक क्रमांक -12 मध्ये कडक सुरक्षाव्यवस्थेत ठेवले जाईल. विजय माल्ल्यावर 9 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे.

 • पण नीरव मोदी कधीपर्यंत भारतात येणार?

याबद्दल आता काहीही सांगता येणार नाही, वेस्टमिन्स्टर कोर्टाने ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांच्याकडे नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाची शिफारस पाठवली होती. दोन महिन्यांनंतर शुक्रवारी (16 एप्रिल) ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली असल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्याने दिली. नीरव मोदीने आपल्या प्रत्यार्पणाला कोर्टात आव्हान दिले होते. जवळपास दोन वर्ष कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू होती. भारतात सुरू असलेल्या खटल्यासाठी नीरव मोदीला भारतात हजर राहवे लागणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. नीरव मोदीला ब्रिटनच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी 13 मार्च 2019 रोजी अटक केली होती. त्यानंतर तो वँड्सवर्थ तुरुंगात आहे. नीरव मोदी व्हिडिओ लिंकद्वारे सुनावणीला हजर होता.

जरी नीरव मोदीच्या भारत प्रत्यार्पणाला मंजुरी मिळाली असली तरी तो लगेचच भारतात येईल असे नाही. गृहमंत्रालयाची मान्यता असूनही नीरव मोदी उच्च न्यायालयात दाद मागू शकतो. या व्यतिरिक्त, सर्वोच्च न्यायालयात अपील आणि ब्रिटनमध्ये आश्रय घेण्याचा एक मार्ग देखील यात आहे. याव्यतिरिक्त, त्याला मानवी हक्क न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार देखील असेल. हे सर्व मार्ग मोकळे झाल्यानंतरच नीरव मोदीला भारतात आणता येईल.

 • नीरव मोदीने उच्च न्यायालयात अपील केल्यास काय होईल?

भारतीय तपास यंत्रणांना न्यायालयात हे सिद्ध करावे लागेल की नीरववरील आरोप ब्रिटनच्या कायद्यानुसार गुन्हा आहेत. आरोप सिद्ध झाल्यास उच्च न्यायालय नीरवच्या प्रत्यार्पणाचे आदेश देऊ शकतो. नीरवच्या प्रत्यार्पणामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होईल की नाही हेही हायकोर्ट बघेल. अशा परिस्थितीत नीरवला भारतात आणण्यासाठी भारतीय एजन्सींना किमान 10 ते 12 महिने लागू शकतात.

 • 1992 मध्ये झाल्या होत्या भारत-ब्रिटन प्रत्यार्पण करारावर स्वाक्ष-या

22 सप्टेंबर 1992 रोजी भारत आणि ब्रिटन यांच्यात प्रत्यार्पण करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या, पण पहिल्या आरोपीला भारतात आणण्यास 24 वर्षे लागली होती. खुनाचा आरोपी समीरभाई वीनुभाई पटेल याला 19 ऑक्टोबर 2016 रोजी भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते.

त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये संजीव कुमार चावलाला भारतात आणण्यात आले. संजीवला मॅच फिक्सिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. म्हणजेच ब्रिटनबरोबर प्रत्यार्पणाच्या कराराला 28 वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत, परंतु आतापर्यंत केवळ दोन आरोपींनाच भारतात आणण्यात यश आले आहे.

 • भारतातून तीन आरोपींना ब्रिटनला पाठवण्यात आले

आतापर्यंत तीन आरोपींना भारतातून ब्रिटनला पाठवण्यात आले आहे. पहिल्यांदा 8 जुलै 2009 रोजी केनियाचा नागरिक असलेल्या सोमैया केतन सुरेंद्रला ब्रिटनमध्ये पाठवण्यात आले त्याच्यावर फसवणूकीचा आरोप होता.

त्यानंतर अपहरण प्रकरणात अटक झालेल्या कुलविंदर सिंगला 14 नोव्हेंबर 2013 रोजी ब्रिटनच्या ताब्यात देण्यात आले होते. ब्रिटनच्या हाना फोस्टरच्या हत्येचा आरोपी असलेला मनिंदर पाल सिंग याला 29 जुलै 2017 रोजी ब्रिटनमध्ये पाठवण्यात आले होते.

 • शेवटी आर्थर रोड कारागृहाशी संबंधित रंजक गोष्टी

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. हा हल्ला करणा-या 10 दहशतवाद्यांपैकी 9 दहशतवाद्यांचा चकमकीत मृत्यू झाला. एकमेव दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडले गेले होते.

कसाबला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. तो या कारागृहात असताना येथील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली होती. आयटीबीपीचे कर्मचारी चोवीस तास त्याच्या सुरक्षेत तैनात होते. 21 नोव्हेंबर 2012 रोजी कसाबला पुण्याच्या येरवडा तुरूंगात फाशी देण्यात आली होती.

23 नोव्हेंबर 2012 रोजी तत्कालीन गृहमंत्री आरपीएन सिंह यांनी संसदेला सांगितले की, चार वर्षांत महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे कसाबवर 31.40 कोटी रुपये खर्च केले.

बातम्या आणखी आहेत...