आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:डिग्रीचे नाही, पण डेथ सर्टिफिकेट मात्र नक्की मिळेल! अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून वाद विवाद

नितीन पोटलाशेरू | औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या यूजीसीने घेतलेल्या निर्णयावर विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि राज्य सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे. परीक्षा घेण्यास सरकारने नकार दर्शवला. दुसरीकडे यूजीसी त्यांच्या निर्णयावर ठाम आहे. विद्यार्थी मात्र कात्रीत सापडले आहेत. सद्य:स्थितीत परीक्षेला सामोरे जाण्याची बिल्कुलही मानसिकता नाही. परीक्षा घेतली तर पदवीचे प्रमाणपत्र मिळेल की नाही हे सांगता येत नाही, पण मृत्यू प्रमाणपत्र मात्र नक्की मिळणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर नोंदवली.

“पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात की नाही?’ हा प्रश्न घेऊन औरंगाबादमधील विद्यार्थी आकाश देशमुख, अजय हाटवटे यांनी विद्यार्थी, पालकांचा फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅपवर पोल जाणून घेतला. त्यात परीक्षा घेऊन आमचा जीव धोक्यात घालू नका, असे मत शेकडो विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. ट्विटरवर तर # studentsvoice ही मोहीम चालवली. याला चांगला प्रतिसाद मिळाला. या ऑनलाइन सर्वेक्षणात बीड, औरंगाबाद, जालना, जळगाव, नाशिक, उस्मानाबाद येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांचा प्रवास अन् राहण्याची व्यवस्था कशी करणार

बीसीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणारा आकाश म्हणाला की, शहरात, तालुक्यात शिकायला येणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. परीक्षेला बोलावताना त्यांनी प्रवास कसा करावा व परीक्षेला शहरात आल्यानंतर राहावे कुठे? कारण सर्वच वसतिगृहे व काॅलेजेस क्वॉरंटाइन सेंटर झाली आहेत. विद्यार्थी शेवटच्या वर्षात येताे याचा अर्थ त्याने पाच किंवा सात सेमिस्टर पास केलेले आहेत. त्यामुळे गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे असल्याचे संदीप हांगे याने म्हटले. अशा अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सध्या परीक्षा न घेणेच योग्य

सद्य:स्थितीत परीक्षा घेणे शक्यच नाही. आॅनलाइन परीक्षेचा पर्याय आहे. पण तशी व्यवस्था आपण निर्माण केलेली नाही. विद्यार्थ्यांच्या मानसिक आराेग्याचा विचार करता परीक्षा न घेणेच याेग्य. पण ऐच्छिक परीक्षेचा पर्याय उपलब्ध करत सुवर्णमध्य साधता येईल. - दिलीप गौर, शिक्षणतज्ज्ञ.