आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनर:सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष भाजपचे नार्वेकर नव्हे, तर काँग्रेसचे शिवराज पाटील! जाणून घ्या, रंजक इतिहास

नीलेश भगवानराव जोशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पायउतार करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्यात आले आहे. या नवीन सरकारच्या विधानसभा अध्यक्ष हा तरुण चेहरा आहे. मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले राहुल नार्वेकर वयाच्या 45व्या वर्षी विधानसभा अध्यक्ष झाले आहेत. या निवडीनंतर नार्वेकर यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष असल्याचे म्हटले होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करण्यात आले. अनेक माध्यमांनी तसेच प्रतिष्ठित नागरिकांनीही आतापर्यंतचे सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष असल्याचे जाहीर करत नार्वेकर यांचे अभिनंदन केले. मात्र, यासंदर्भात दिव्य मराठीने माहिती घेतली असता, भाजपचे राहुल नार्वेकर नाही, तर काँग्रेसचे माजी मंत्री आणि माजी विधानसभा अध्यक्ष शिवराज पाटील हे सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष होते, अशी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपद हे अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते. या पदावर आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. आतापर्यंत सर्वाधिक काळ या पदावर राहणारा अध्यक्ष कोणता? सर्वात कमी कालावधीसाठी विधानसभा अध्यक्ष पद कोणी भूषवले? सर्वाधिक जास्त वयाचे विधानसभा अध्यक्ष कोण आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात...

संयुक्त महाराष्ट्रच्या विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते तेलगू भाषिक

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान सयाजी सिलम यांना जातो. 1962 पर्यंत म्हणजेच 1 वर्ष 315 दिवस ते विधानसभेचे अध्यक्ष होते. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वीदेखील सिलम यांनी विधानसभा अध्यक्षपद भूषवले होते. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे राज्यातील वातावरण स्फोटक झाले होते. अशा काळातदेखील त्यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट जबाबदारी सांभाळली. सिलम अध्यक्ष असताना त्यांचा सभागृहातील प्रत्येक सदस्यावर वचक होता. सभागृहातील प्रत्येक सदस्य त्यांच्या शब्दाला मान देत असे.

सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषवणारे भारदे उत्तम कीर्तनकार

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले सहकार मंत्री राहिलेले त्र्यंबक शिवराम भारदे ऊर्फ बाळासाहेब भारदे हे विधानसभेचे दुसरे अध्यक्ष झाले. ज्येष्ठ राजकारणी आणि गांधीवादी विचारवंत म्हणूनही त्यांचा लौकिक होता. सर्वाधिक काळ विधानसभा अध्यक्ष पद भूषवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. ते 9 वर्षे 262 दिवस म्हणजेच सुमारे दहा वर्षे विधानसभा अध्यक्ष होते. समाजसेवक, पत्रकार, राजकारणी याबरोबरच भारदे हे उत्तम कीर्तनकारदेखील होते. आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत त्यांनी कीर्तन करणे सुरूच ठेवले. त्यांनी अनेक पुस्तकेदेखील लिहिली आहेत. 2001 मध्ये केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले.

मधुकरराव चौधरी सर्वात वयस्कर विधानसभा अध्यक्ष

1990 च्या कालखंडात मधुकरराव चौधरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधानसभेचे अध्यक्ष झाले. 21 मार्च 2090 रोजी त्यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. पुढे सलग 5 वर्षे 1 दिवस ते विधानसभा अध्यक्ष होते. मधुकरराव चौधरी विधानसभा अध्यक्ष झाले त्यावेळेस त्यांचे वय होते, 70 वर्षे 9 महिने सोळा दिवस. आजपर्यंतच्या इतिहासात ते सर्वाधिक वयस्कर विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यांच्यानंतर भाजपचे हरिभाऊ बागडे हे सर्वाधिक वयाचे विधानसभा अध्यक्ष आहेत. 12 नोव्हेंबर 2014 रोजी हरिभाऊ बागडे यांनी विधानसभा अध्यक्ष पद स्वीकारले होते, त्यावेळी त्यांचे वय होते, 70 वर्ष दोन महिने 26 दिवस.

विधानसभा अध्यक्ष पदाच्या काही रंजक बाबी

  • महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष सयाजी लक्ष्मण सिलम हे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती पूर्वीदेखील मुंबई विधानसभाचे अध्यक्ष होते.
  • त्र्यंबक शिवराम भारदे हे सर्वाधिक काळ 9 वर्षे 362 दिवस विधानसभा अध्यक्ष होते.
  • दोन वेळा अध्यक्षपद भूषवण्याचा मान त्र्यंबक भारदे यांच्याच नावावर आहे.
  • काँग्रेस नेते प्राणलाल व्होरा हे सर्वात कमी, 159 दिवस विधानसभेचे अध्यक्ष होते. तर दौलतराव श्रीपतराव देसाई हे 252 दिवस महाराष्ट्र विधानसभाचे अध्यक्ष होते. एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी अध्यक्ष राहिलेले हे दोनच अध्यक्ष आहेत.
  • त्र्यंबक भारदे, एस. के. वानखेडे, मधुकरराव चौधरी आणि हरिभाऊ बागडे केवळ या चौघांनी पाच वर्षांपेक्षा अधिक काळ विधानसभा अध्यक्षपद भूषवले आहे.
  • मधुकरराव चौधरी यांनी पाच वर्षे आणि त्यावर केवळ एक दिवस अध्यक्षपद भूषवले आहे.
बातम्या आणखी आहेत...