आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पाॅझिटिव्ह:काेल्हापूर, विदर्भ, महाराष्ट्रातून खेळाडूंची तयार हाेईल टीम; संघटनांच्या वादाला खाे, राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा एकच संघ

एकनाथ पाठक | औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खाे-खाे महासंघाकडून आता एक स्टेट, एक युनिटचा निर्णय; बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय
  • आतापर्यंत महाराष्ट्रातून राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व्हायचे तीन स्वतंत्र संघ

एकाच खेळाच्या विविध संघटनांमधील वादाचा समूळ नायनाट करण्यासाठी आता अखिल भारतीय खाे-खाे महासंघाच्या वतीने सकारात्मक निर्णय घेण्यात आला. खाे-खाे महासंघाने एक राज्य, एक संघटना ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील राज्य संघटनांचा वाद आता संपुष्टात आला. या दाेन्ही राज्यांमध्ये आता एकच संघटना सक्रिय असेल. खाे-खाेला जागतिक पातळीवर चालना देण्यासाठी महासंघाने या अंतर्गत वादाला दूर केले आहे. महासंघाची नुकतीच बैठक आयाेजित करण्यात आली. बैठकीत एक राज्य, एक संघटना, चेअरमनपद संपुष्टात आणि आजीवन सदस्याचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याबाबतचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

तिसरे फेडरेशन ठरले

संघटना-संघटनांमधील वादाचा नायनाट करण्यासाठी आता प्रत्यक्षात केंद्र सरकारने लक्ष घातले आहे. यासाठी केंद्र सरकारने भारतीय आॅलिम्पिक संघटनेला साेबत घेऊन देशभरात ‘एक राज्य, एक युनिट’ ही माेहीम राबवण्यासाठी पुढाकार घेतला. २०११ च्या स्पाेर्ट््स काेडनुसार ही माेहीम आता अधिक सक्रिय झाली. यातून ही नियमावली लागू करण्यासाठी आतापर्यंत देशातील तीन फेडरेशनने पुढाकार घेतला. यात टेनिस, हाॅकी आणि खाे-खाेचा समावेश आहे.

आता महाराष्ट्र, मध्य प्रदेशाची प्रत्येकी १ टीम

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यातून दरवर्षी राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्वतंत्र असे पाच संघ सहभागी हाेतात. यामध्ये महाराष्ट्रातील तीन आणि मध्य प्रदेशच्या दाेन संघांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून विदर्भ, काेल्हापूर आणि महाराष्ट्र अशी स्वतंत्र प्रत्येकी एक टीम निवडली जात हाेती. मात्र, या तिन्ही मिळून एकच संघ आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला जाईल. तसेच मध्य प्रदेशमध्ये मध्य भारत आणि मध्य प्रदेश हे दाेन संघ सहभागी व्हायचे. आता यांचाही एकच संघ सहभागी हाेणार आहे.

वाद संपुष्टात आल्याने प्रगती वेगात : त्यागी

राज्यांमधील संघटनांत माेठ्या संख्येत वाद आहेत. याच वादामुळे खेळाच्या विकासाला चालना मिळत नसल्याचे दिसून येते. याशिवाय खेळाडूंचेही माेठे नुकसान हाेते. हाच प्रकार टाळण्यासाठी आम्ही आता ही नियमावली देशभर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा निश्चित फायदा खेळाडू आणि संघटनांना हाेईल. वाद संपुष्टात आल्याने प्रगती हाेईल. महेंद्रसिंग त्यागी, सचिव, अखिल भारतीय खाे-खाे महासंघ, नवी दिल्ली

बातम्या आणखी आहेत...