आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:कोरोनाची लागण झाल्यानंतर वर्षभरानंतरही डोके वर काढतो म्युकरमायकोसिस आजार, आता ओमायक्रॉनमुळेसुद्धा फंगल इन्फेक्शनचा धोका? काय म्हणतात तज्ज्ञ

वैशाली करोलेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर...

देशात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातदेखील ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असून ओमायक्रॉनने बाधितांचा आकडा 10 च्या वर गेला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन (WHO) ने याला व्हेरिएंट ऑफ कंसर्न (VoC) घोषित केले होते. अद्याप ओमायक्रॉनवरील संशोधन पूर्ण झालेले नाही. मात्र ही कोरोनाच्या तिस-या लाटेची चाहूल असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोनाची दुसरी लाट आली होती, तेव्हा काळ्या बुरशीचा म्हणजेच म्युकरमायकोसिसचा आजार खूप वाढला होता. तिसरी लाट आली तर पुन्हा एकदा म्युकरमायकोसिस आपले डोके वर काढू शकतो का? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

म्युकरमायकोसिस हा आजार का आणि कसा होतो? याचा लहान मुलांना धोका असतो का? कोरोनाची लागण झाल्यानंतर या आजारापासून स्वतःचे रक्षण कसे करावे? यासाठी कोणती खबरदारी घेणे गरजेचे आहे? याविषयी आम्ही महाराष्ट्र राज्य ओरल सर्जन असोसिएशनचे सचिव डॉ. विजय कुमार गि-हे आणि औरंगाबाद येथील ओरल व मँक्झीलो फेशियल सर्जन (चेहरा, तोंड, जबड्याचे सर्जन) डॉ. विजय देशमुख आणि यांच्याशी बातचित केली. यावर काय आहे तज्ज्ञांचे मत जाणून घेऊया...

  • ओमायक्रॉनमुळे म्युकरमायकोसिस होण्याचा धोका आहे का?

डॉ. विजय कुमार गि-हे म्हणतात, म्युकरमायकोसिस हा कोविड होऊन गेल्यानंतर उद्भवणारा आजार आहे. ज्यामध्ये रुग्ण कोरोनातून बरा होतो किंवा एखाद्या व्यक्तीला कोरोना होऊन दहा ते बारा दिवस होऊन जातात अशा परिस्थितीत हा आजार होऊ शकतो. सध्या ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण हे हाय आयसोलेटेड किंवा अतिशय सौम्य लक्षणे असलेले आहेत. शिवाय सध्याच्या संशोधनानुसार ओमायक्रॉन हा आजार झपाट्याने पसरत असला तरी त्याची लक्षणे अतिशय सौम्य प्रकारातील आहेत. त्यामुळे सध्या ओमायक्रॉनच्या रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका आहे, असे म्हणणे खूप घाईचे ठरु शकते. पण शक्यतादेखील निश्चितच नाकारता येत नाही.

अगदी 25 वर्षे वयोगटातील व्यक्तींपासून ते ज्येष्ठांमध्ये म्युकर मायसिस झाल्याचे आढळून आले होते. आता ओमायक्रॉनमुळे पुन्हा एकदा म्युकरमायकोसिस डोके वर काढू शकतो का, यावर डॉ. विजय देशमुख म्हणाले, ही शक्यता नक्कीच नाकारता येत नाही. ओमायक्रॉन हा व्हेरिएंट कसा म्युटेड होत जाईल, यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे लोकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

  • म्युकरमायकोसिस हा आजार कुणाला होतो?

डॉ. गि-हे यांनी सांगितल्यानुसार, कोरोनाच्या दुस-या लाटेत डेल्टा व्हेरिएंटमध्ये रक्त वाहिन्यांवरील दुष्परिणाम अधिक होते. म्युकरमायकोसिस हा काही खास गोष्टींमुळे होतो, पहिले म्हणजे खालावलेली इम्युनिटी आणि दुसरे म्हणजे रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण आणि रक्त वाहिन्यांमध्ये होणा-या रक्ताच्या गाठी तसेच फंगसच्या गाठी, त्यामुळे त्या भागाचा रक्ताचा पुरवठा बंद होतो आणि त्यामुळे फंगसच्या वाढीला चालना मिळते. आता ओमायक्रॉन या व्हेरिएंटमध्ये किती प्रमाणात म्युकरमायकोसिस होईल आणि ते कसे होईल हे सांगणे सध्या खूप घाईचे होईल. डेल्टा व्हेरिएंटमध्ये अनेक रुग्णांचे रक्तातील साखरेचे प्रमाण खूप कमीअधिक होत होते. या व्हेरिएंटमध्ये इम्युनल इंटरेशन किती होतात, यावर आम्ही तज्ज्ञ लक्ष ठेऊन आहोत. सध्या फक्त हा व्हेरिएंट प्रचंड प्रमाणात पसरतोय. हा व्हेरिएंट कधीही टाइमबॉम्ब सारखा फुटू शकतो. त्यामुळे सध्या काळजी घेणे हेच महत्त्वाचे आहे.

  • दुसरी लाट ओसरल्यानंतर म्युकरमायकोसिस हा आजारही कमी झाला असे म्हणता येईल का?

डॉ. गि-हे सांगतात, म्युकरमायकोसिस हा आजार अजून संपलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा हा आकडा खूप मोठा होता. पण अजूनही आठवड्याला एक ते दोन म्युकरमायकोसिसचे रुग्ण आमच्याकडे येत आहेत. अगदी काल परवामध्ये म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी आम्ही एका म्युकरमायकोसिसने ग्रस्त रुग्णावर शस्त्रक्रिया केलेली आहे. या रुग्णाला कोरोना होऊन एक वर्ष लोटले आहे. एवढ्या दिवसांनी या रुग्णात म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळली. पण आता त्याची तीव्रता कमी आहे. अगदी सुरुवातीला जेव्हा दुसरी लाट आली होती तेव्हा म्युकरमायकोसिसची तीव्रता अतिशय गंभीर होती. त्यात अनेकांचे डोळे गेले. मेंदुपर्यंत विषाणू पोहोचल्याने काही लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. मागील दोन महिन्यांत एवढी तीव्रता असलेले रुग्ण समोर आलेले नाहीत. फक्त जबडा काढावा लागतोय.

  • म्युकरमायकोसिस हा आजार स्टेरॉइडचा अतिवापर किंवा रेमडिसिव्हर इंजेक्शन यामुळे होते का?

डॉ. गि-हे सांगतात, म्युकरमायकोसिससाठी स्टेरॉइडपासून ते ऑक्सिजन लेव्हल खालावणे अशा प्रत्येक गोष्टीला जबाबदार ठरवले गेले. मी उपचार केलेल्या तीनशे ते साडे तीनशे रुग्णांचा डेटा माझ्याकडे आहे. यातील कॉमन फाइंडिंग अशा होत्या की, रुग्णांपैकी 80 टक्के लोकांचे लसीकरण झालेले नव्हते. एकही डोस त्यांनी घेतलेला नव्हता. त्यांचे रक्तातील साखरेचे प्रमाण प्रचंड वाढले होते. यापैकी 50 टक्के रुग्णांना स्टेरॉइड तर दूर कोणतेही औषध देण्यात आले नव्हते. रेमडिसिव्हरमुळे म्युकरमायकोसिस होतो, असेही म्हटले गेले होते. पण आमच्याकडे आलेल्या पेशंटपैकी डेटामध्ये 15 ते 20 रुग्णांनाच रेमडिसिव्हर देण्यात आले होते. म्हणजेच तो डेटा 5 टक्क्यांपेक्षाही कमी होता. कोरोनाची लागण झाल्यानंतर रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण, खालवलेली रोगप्रतिकारक शक्ती आणि वाढलेली रक्तातील फेरॅटीनची लेव्हल या सर्व दुस-या लाटेनंतर आलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमधील कॉमन फायंडिंग होत्या.

  • म्युकरमायकोसिस होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायला हवी?

डॉ. गि-हे सांगतात, दुस-या लाटेत जेवढे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे प्रमाण खूप होते. हा आजार होऊ नये यासाठी काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी काय करावे तर... स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवावी, समतोल आहार घ्यावा, नियमित व्यायाम करायला हवा. समजा दुर्दैवाने कोविड झाला तर कोविडदरम्यान आणि कोविडनंतर रक्तातील साखरेचे प्रमाणे नियंत्रित ठेवावे. रेस्परिटी हायजिन म्हणजे ओरल आणि नेझल कॅव्हिटी स्वच्छ ठेवावी. कोरोना झाल्यास वेळेत योग्य उपचार घेणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे महत्त्वाचे आहे, म्हणजे जरी म्युकरमायकोसिस झाला तरी त्याची तीव्रता कमी असेल. कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे खूप गरजेचे आहे.

  • म्युकरमायकोसिस आजाराचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडील?

डॉ. गि-हे सांगतात, खासगी रुग्णालयांमधील म्युकरमायकोसिस आजारावरील उपचाराचा खर्च खूप खर्चिक आहे. उपचारादम्यान 20 दिवस रुग्णाला कमीत कमी 60 इंजेक्शन्स द्यावे लागतात. आणि ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना जवळपास दीडशे इंजेक्शन्स द्यावे लागतात. त्या इंजेक्शनच्या एका डोसची किंमत सुमारे 60 हजारांच्या जवळपास आहे. म्हणजे चार ते साडे चार लाखांपर्यंत इंजेक्शन्सचा खर्च येतो.

  • लहान मुलांना म्युकरमायकोसिसचा धोका आहे का?

डॉ. गि-हे आणि डॉ. देशमुख सांगतात, सुदैवाने लहान मुलांमध्ये कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेत म्युकरमायकोसिसचा धोका आढळला नाही. लहान मुले या आजारापासून दूर होती. डॉ. गि-हे यांनी सांगितल्यानुसार, त्यांनी सर्वात तरुण म्युकरमायकोसिसच्या ज्या रुग्णावर उपचार केले तो 28 वर्षांचा आहे.

  • ओमायक्रॉन रोखण्यासाठी बुस्टर डोस गरजेचा आहे का?

डॉ. गि-हे सांगतात, नक्कीच. बुस्टर डोस महत्त्वाचा आहेच. लसीनंतर अँटीबॉडी निर्माण झाल्या. पण त्याचेही मर्यादित आयुष्य असते. कोरोना लसीचे डोस घेतल्यानंतर आता अनेकांमधील अँटीबॉडी संपल्या आहेत. आपल्यामध्ये टीमेमरी सेल असतात, जे अँटीबॉडीजचा एक घटक असतात. जेव्हा आपण लस घेतो, तेव्हा त्यामुळे तयार झालेल्या अँटीबॉडीज आपले संरक्षण करतात. जेव्हा त्या अंँटीबॉडीजचं आयुष्य संपते त्यानंतर त्या अँटीबॉडीजसाठी तयार करण्याची मेमरी आपल्या शरीरातील टी सेल नावाच्या सेल्समध्ये असते. ती टी सेल मेमरी आपल्याला सध्या प्रोटेक्ट करेल. तज्ज्ञांचे मत आहे की, जर आपण बुस्टर डोस दिला तर परत एकदा अँटीबॉडीजचे बुशअप होईल आणि आपल्याकडे रेडीमेड अँटीबॉडीज असतील ज्या या व्हेरिएंटविरुद्ध लढण्यास मदत करतील. बुस्टर डोस आला तर प्रत्येकाने तो घ्यायलाच हवा.

बातम्या आणखी आहेत...