आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाझं लहानपणापासून एक स्वप्न होतं. ते म्हणजे पोलिस अधिकारी व्हायचं. जेव्हा मी पोलिस अधिकारी झाले, तेव्हा यासोबतच मान-सन्मान मिळाला. कारण माझं स्वप्न सत्यात उतरलं. पहिल्यांदा जेव्हा मला माझ्या आईनं वर्दीत पाहिलं, तेव्हा ती फार भावुक झाली. आईचे पाणावलेले डोळे तिच्या आनंदाची जाणीव करून देत होते. कारण आईनं आणि मी एकत्र पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं होतं...लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील आपल्या आईबद्दल, त्या दोघींच्या स्वप्नांबद्दल दैनिक दिव्य मराठीशी मातृदिनानिमित्त भरभरून बोलत होत्या. या निमित्तानं एका पोलिस अधिकाऱ्यातलं कर्तव्य आणि मायेच्या दोरीवरून वाटचाल करणारं एक वेगळं आईपण दिसलं.
या मुलाखतीमध्ये त्यांच्या डोळ्याच्या कडा कित्येकदा पाणावल्या. त्या म्हणाल्या, जेव्हा एखादी स्त्री आई होते, तेव्हा तो तिच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण असतो. माझंही असंच झालं. पहिल्यांदा माझ्या मुलाला पाहून वात्सल्य उचंबळून आलं. मात्र, नंतर काळजीची जागा कर्तव्यानं भरून काढली. एकीकडे ड्युटी आणि दुसरीकडे आईपणाची जबाबदारी. या दोन्हींचा समतोल साधणं सोपं नव्हतं. मात्र, ही परिस्थिती हाताळली. त्यात मुलाचा समजूतदारपणा महत्त्वाचा ठरला. माझ्या मुलाला माझी आठवण आल्यावर ती भावना मला आतून जाणवते. मलाही असं अनेकदा वाटतं की, घरी जाऊन पटकन माझ्या मुलाला भेटावे...होय, आई अशीच असते. दुधावरच्या सायीसारखी. मोक्षदा पाटील यांच्याशी आमचे प्रतिनिधी अनिकेत दिलवाले यांनी साधलेला हा मुक्तसंवाद खास तुमच्यासाठी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.